आपण आणि देवी-देवतांच्या पुराणकथा : गणपती बाप्पाची “गोष्ट”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम |

===

लेखक: तन्मय केळकर

===

बदलत्या काळानुसार आपल्या पुराणकथांचा परामर्श घेणाऱ्या लेखमालेचा हा दुसरा भाग आहे. पहिला भाग इथे वाचू शकता :

आपण आणि देवी-देवतांच्या पुराणकथा

===

गणपती बाप्पा – आबालवृद्धांना मनाला भावणारा देवाधिदेव. १४ विद्या, ६४ कलांचा अधिपती. भक्तांच्या हाकेला धावून जाणारा, मनोकामना पूर्ण करणारा, विघ्नांचा नाश करणारा, पावित्र्य व मांगल्य घेऊन येणारा मंगलमूर्ती मोरया…!

ganapati inmarathi
stackpathcdn.com

वर्षभर पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासारखीच बाप्पाच्या आगमनाची वाट पाहणाऱ्या भक्तांसाठी बाप्पाचा उत्सव म्हणजे पर्वणीच – आपल्या महाराष्ट्रात तर खासच.

घरात गणपती बसवायचा म्हणजे त्याची मखर आणि आरास सजवणे, मूर्ती आणणे, आप्तस्वकीयांना निमंत्रणं अशी अनेक लगबगीची कामं सुरू होतात आणि घरातले सगळेच झाडून कामाला लागतात – लहानांपासून मोठ्यांपर्यंत.

या उत्सवपूर्ण वातावरणात काही रोचक संवाद कानी पडतात. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी एक आजी व तिचा नातू यांच्यातला ऐकलेला असाच एक संवाद –

नातू : ए आजी…. गणपती बाप्पा हत्तीसारखे का दिसतात?

आजी : (नातवाला जवळ घेऊन) एकदा काय झालं…. शंकर बाप्पा गेले होते दूर जंगलात तपश्चर्या करायला. मग पार्वती मैय्या घरात एकटी होती. तिला जायचं होतं आंघोळीला. मग ती आंघोळ करत असताना बाहेर कुणी तरी लक्ष नको का ठेवायला…. म्हणून मग तिने आपल्या अंगाच्या मळापासून एक बाळ बनवलं. ते म्हणजे गणपती बाप्पा…

नातू : म्हणजे पार्वतीमैयाने हत्तीचं तोंड असलेलं बाळ बनवलं का?

आजी : अरे नाही रे बाळा…. पूर्ण ऐकून तर घे! तेव्हा गणपती बाप्पाचे तोंड आपल्यासारखंच होतं. आता माझं बोलून झाल्याशिवाय मध्ये बोलायचं नाही.

नातू : 🤐🤐

आजी : मग पार्वतीमैया आंघोळीला गेली आणि गणपती बाप्पाला सांगितलं की मी आंघोळ करत असताना कोणालाही आता येऊ देऊ नको. ती आंघोळ करत असताना गणपती बाप्पा बाहेर पहारा देत उभे राहिले.

तिची आंघोळ चालू असतानाच शंकर बाप्पा घरी परत आले आणि पार्वतीमैयाकडे जायला लागले. तेव्हा छोट्या गणपती बाप्पांनी त्यांना थांबवलं. शंकर बाप्पांना माहित नव्हतं आपल्याला थांबवणारा हा मुलगा कोण आणि गणपती बाप्पांना माहीत नव्हतं शंकर बाप्पा कोण आहेत ते.

नातू : पण आजी, तूच तर सांगत असतेस ना, की बाप्पांना सगळं काही माहीत असतं. तर मग त्यांना हे कसं नाही कळलं की हा आपलाच मुलगा आहे? आणि पार्वतीमैयाने आंघोळीला जाताना दाराला कडी का नाही घातली? गणपती बाप्पाना का उभं केलं तिथे?

आजी : हे बघ, बाप्पांनी जे केलं ते बरोबरच असतं. त्यांना असं बोलायचं नाही. नाहीतर ते आपल्यावर कोपतात. पाप लागतं मग…!

नातू : 😳🤔😰

आजी : मग शंकर बाप्पा गणपती बाप्पांना रागावले. तरीपण गणपती बाप्पांनी शंकरबाप्पांना पार्वतीमैयाकडे जाऊ दिलं नाही. कारण पार्वतीमैया आंघोळ करत होती ना…. मग शंकर बाप्पा अजून जास्त रागावले आणि त्यांनी त्रिशूळ घेऊन गणपती बाप्पांचं डोकं उडवलं.

नातू : अरे बापरे!! पण शंकर बाप्पांना खूप राग आला तर त्यांनी गणपती बाप्पांना दम का नाही दिला? मारलं कशासाठी? परवा मी बाबांचा मोबाईल पाण्यात धुतला तेव्हा त्यांना पण खूप राग आला होता. तेव्हा त्यांनी मला फक्त दम दिला होता; पण फटके नाही दिले.

आजी : (चिडून, काय करावं ते न कळून डोक्याला हात लावते.) 🤦🏽‍♂🤦🏽‍♂😡😡

हे बघ, ते बाप्पा आहेत…. ते जे करतात ते बरोबरच असतं.

नातू : (थोडा गंभीर होत) मग गणपती बाप्पांना खूप जास्त दुखलं असेल ना? खूप रडायला आलं असेल ना?

आजी : अरे नाही….. अजून गोष्ट बाकी आहे. मग पार्वती मैया जेव्हा आंघोळ करून जेव्हा बाहेर आली तेव्हा तिला दिसलं की शंकर बाप्पांनी गणपती बाप्पांचं डोकं उडवलं आहे. मग ती खूप चिडली आणि खूप रडायला लागली.

नातू : म्हणजे शंकर बाप्पांचं चुकलं ना? मग शंकर बाप्पांनी गणपती बाप्पांना सॉरी म्हटलं का?

आजी : आता परत बाप्पाविषयी उलटेसुलटे प्रश्न विचारले तर फटके मिळतील. जाऊन बाप्पांना नमस्कार करुन “सॉरी, माझं चुकलं, मला माफ करा….” असं म्हणून ये.

नातू : (मुकाट्याने आजीचं ऐकतो) 😰🙏🏼

आजी : मग शंकर बाप्पांनी सगळ्या देवांना आज्ञा दिली की इथून बाहेर जो कुठला प्राणी सगळ्यात पहिले दिसेल त्याचं डोकं तोडून आणा आणि ते डोकं मी या शरीराला जोडेन. मग सगळे देव प्राण्याला शोधत निघाले. तेव्हा त्यांना दिसलं एक हत्तीचं पिल्लू. मग त्याचं डोकं तोडून त्यांनी शंकर बाप्पांना दिलं आणि शंकर बाप्पांनी ते गणपती बाप्पांच्या डोक्याला लावलं. म्हणून गणपती बाप्पांचे डोकं हत्तीचं असतं.

ganesh parvati shankar mahadev inmarathi
amarchitrakatha.com

नातू : (जरासं गंभीर होत रडवेल्या स्वरात 😭😰) पण मग शंकर बाप्पांनी गणपती बाप्पांचंच डोकं परत का नाही चिकटवलं? हत्तीच्या बिचाऱ्या पिल्लूला का मारलं? पार्वतीमैयाला रडायला आलं तसं हत्तीच्या आईला पण रडायला आलं असेल ना?

आजी : सूनबाई…. बघताय का पोराचे प्रताप? याच्या जिभेला काही हाड? शिव शिव शिव….. अरे देवधर्माबद्दल असं बोलत राहिला तर पितरांचे आत्मे तळतळतील आणि परमेश्वराची निंदा ऐकणारे आम्हीही जाऊ नरकात.

(वर बघून हात जोडत) माफ कर रे देवा परमेश्वरा…..
.
.
.

अशा प्रकारचे संवाद लहान मुलांसोबत बोलताना सर्रास ऐकायला मिळू शकतात. अशा धार्मिक प्रश्नांची उत्तरं देताना काळजी ही घ्यावी लागते की मुलांचं समाधान होईल व प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती व जिज्ञासा उत्तेजित केली जाईल. योग्य प्रकारे न हाताळल्यास मूल एका टोकाला देवधर्माबद्दल तीव्र तिरस्कार किंवा दुसऱ्या टोकाला अंधभक्ती/ अंधश्रद्धेच्या आहारी जाण्याचा धोका असतो.

कोणतीही पौराणिक कथा शब्दशः अर्थाने खरी नसून त्यामागे काही प्रतीकात्मक/लाक्षणिक अर्थ आहे. (काही पौराणिक कथांमागे तोही नाही.) कथा सांगण्यापेक्षा ती कथा शब्दशः अर्थाने घ्यायची नाही हे शिकवणं आणि लाक्षणिक अर्थ समजावणं जास्त महत्त्वाचं आहे.

उदाहरणार्थ, गणपतीच्या मूर्ती मागील लाक्षणिक अर्थ म्हणजे –

सैन्याच्या गणांवर आणि भक्तांच्या हितावर बारकाईने लक्ष ठेवणारे बारीक डोळे….

सगळीकडच्या खबरी मिळत राहाव्यात म्हणून सर्व दिशांना फिरू शकणारे मोठे कान….

भक्त भरकटू नयेत म्हणून एका हातात पाश-अंकुश व विघ्नांचे निवारण करता यावे म्हणून दुसऱ्या हातात परशु….

कोणत्याही सर्वसामान्य माणसाच्या हातापेक्षा जास्त मजबूत पकड यावी म्हणून सोंड…..

… आणि हा प्रतीकात्मक अर्थ मुलांना समजवण्यापूर्वी गणपती या देवतेची उत्क्रांती कशी झाली याची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेणे आवश्यक आहे.

काही हजार वर्षांपूर्वी हत्ती हा प्राणी इतर वन्य पशूंप्रमाणेच भयानक, हिंसक, नुकसानकारक मानला जायचा. पण जेव्हा तो माणसाळला तेव्हा जड मालवाहतूक, युद्ध (गजदल), राजेशाही मिरवणुका वगैरे साठी त्याचा उपयोग होऊ लागला. त्यामुळे हत्ती ताकद, संरक्षण, श्रीमंती यांचं प्रतीक मानला जाऊ लागला. काही राजे आपल्या नाण्यांवर स्वतःच्या डोक्यावर हत्तीचं शिरस्त्राण दाखवू लागले.

भांडारकर ओरिएण्टल इन्स्टिट्यूटने २०१७ साली भरवलेल्या गणेशोत्सव प्रदर्शनाच्या वेळी दर्शवलेली पुढील छायाचित्र हा सर्व प्रवास समोर आणतात :

 

 

 

 

 

 

गावाच्या प्रवेशद्वारावर हत्तीचं तोंड संरक्षणाचं प्रतीक म्हणून लावलं जाऊ लागलं. कामानिमित्त दूर देशी जाताना पर्यटक, व्यापारी, यात्रेकरू संरक्षक चिन्ह म्हणून गजमुख सोबत बाळगू लागले (आजच्या गंडा-दोरा/ ताईत यांप्रमाणे).

 

ganpati significance inmarathi

 

पुढे पुढे गजमुख चिन्हांची पूजा विविध हेतूंनी होऊ लागली आणि यातूनच हत्तीचं तोंड असलेली (गजमुख), सैन्यांचं नेतृत्व करणारी (गण-पती, विनायक) एक तांत्रिक देवता म्हणून विघ्न विनाशक म्हणून पूजिली जाऊ लागली.

या देवतेच्या भक्तांना गाणपत्य संप्रदाय असे म्हटले जाऊ लागले. पुढे काही वर्षांनी हे दैवत समृद्धी, मांगल्य, सुखी संसारी जीवन, शुभारंभ इत्यादीचं प्रतीक बनलं व त्या इष्ट हेतूंसाठी गणेशाची पूजा केली जाऊ लागली.

हा सर्व इतिहास सर्वसामान्य जनतेला रोचक पद्धतीने सांगण्यासाठी विविध रोचक कथा लिहिल्या गेल्या. यातल्या काही कथा गणपतीला शंकर व पार्वतीचा पुत्र असं म्हणतात.

ज्या काळात या कथा लिहिल्या गेल्या त्या काळात प्राण्यांची मुंडकी तोडणे, रागाच्या भरात हल्ले करणे वगैरे गोष्टी कदाचित नित्याच्या असाव्यात. त्यामुळे ती मानसिकता कथांमध्येही परावर्तित झाली असावी.

पण आजच्या काळात त्या कथांनी खरं म्हणजे ना कुठला इतिहास कळतो, ना कुठला चांगला बोध मिळतो. उलट आपल्या देवी-देवतांची बदनामीच आपणच कळत-नकळत करत असतो.

इतक्या मंगल आराध्य दैवताच्या जन्माची कथा म्हणून अशी अमंगल, हिंसक भाकडकथा उगाच का सांगावी?

गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर या बाबतीत आत्मपरीक्षण करणं हीच गणपती बाप्पाला वाहिलेली दुर्वांची जुडी ठरेल.

।। बोला गणपती बाप्पा मोरया ।।

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?