उद्योजकतेची आस + योग्य प्रशिक्षण = गृहिणीचं यशस्वी उद्योजिकेत रूपांतर…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारतात “मायबाप” सरकार ही धारणा खोलवर रुजली आहे. अडीअडचणीला सरकारने मदत करावीच. पण – ती मदत करताना – जनतेने स्वतःच्या हिमतीवर उभे रहावे हा विचार सरकारने करायला हवा. सरकारच्या आधाराने सर्वसामान्य माणूस आपल्या हिमतीच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. इतरांना देखील आधार देऊ शकतो.

याचेच एक उदाहरण आज आपल्यासमोर उभे आहे…एका उद्योजिकेच्या रूपात!

सरकारने मदतीचा हात दिला तर सर्वसामान्य गृहिणी काय करू शकते ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रेखा रविंद्र वाहटुळे.

रेखा रविंद्र वाहटुळे ह्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव शिव येथील रहिवाशी. रेखा वाहटुळे ह्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने अन्न प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि २०१६ मध्ये त्यांनी स्वतःचा गृहउद्योग सुरु केला. अल्पावधीतच रेखा वाहटुळे ह्यांनी एक यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावले. महिला सक्षमीकरण व रोजगार निर्मिती असे दोन्ही उद्देश ह्यातून साध्य झाले.

घरी असलेल्या केवळ २ एकर शेतीवर भागणार नव्हते हे रेखा वाहटुळे ह्यांना उमगले होते. पती रविंद्र वाहटुळे अभियंता आहेत पण हाताला नियमितपणे काम मिळत नव्हते. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी नवीन आर्थिक स्रोत आवश्यक होता.

ह्याच विचारातून रेखा वाहटुळे ह्यांनी एक निर्णय घेतला. त्यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्रातून कौशल्य विकासावर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगाचे एक महिना प्रशिक्षण घेतले.

ह्या प्रशिक्षण कालावधीत त्यांनी फळे व भाज्या ह्यावर प्रक्रिया करणे, बेकरीमध्ये तयार केले जाणारे विविध पदार्थ बनवणे ह्याचे प्रशिक्षण घेतले.

एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करताच त्यांनी आपला स्वतःचा गृहउद्योग सुरु केला ज्यात त्यांनी विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. औरंगाबाद ह्या महाराष्ट्राच्या पर्यटन राजधानीत कॅनॉट प्लेस व नंदनवन कॉलनी अश्या शहरातील महत्वाच्या ठिकाणी आज त्यांचा गृहउद्योग प्रगतीपथावर आहे. स्वतःची आर्थिक उन्नती साधण्याबरोबरच त्यांनी आपल्या ह्या उद्योगात इतर अनेक महिलांनाही रोजगार मिळवून दिला व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास हातभार लावला.

सरकारने राबविलेल्या कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याच्या ह्या उपक्रमाचा प्रत्यक्ष लाभ रेखा वाहटुळे ह्यांना अल्पावधीतच दिसून येऊ लागला. फक्त दीड वर्षातच त्यांनी अडीच लाख रुपये निव्वळ नफा कमावला.

आज औरंगाबाद शहरातील दोन महत्वाच्या परिसरात त्यांचा उद्योग नुसताच चालत नाही तर प्रगतीपथावर धावत आहे. कृषी प्रदर्शनात त्यांचा स्टॉल आवर्जून असतो तसेच त्याला चांगला प्रतिसादही मिळतो. ह्या कृषी प्रदर्शनात अनेक पदार्थांची विक्री त्या करतात व चांगले उत्पन्न मिळवतात.

rekha wahtule success story inmarathi

रेखा वाहटुळे ह्यांच्या ह्या उद्यमशीलतेचा गौरव विविध समाजसेवी संस्था व सरकारने अनेकवेळा केला आहे. रेखा वाहटुळे ह्यांनी उभारलेल्या दितिजा गृहउद्योगाला औरंगाबाद विभागातील प्रयोगशील शेतकरी महिला म्हणून दिला जाणारा कृषिथॉन पुरस्कार २०१७ आणि त्यांना वैयक्तिक मराठवाडा भूमिकन्या पुरस्कार २०१७ ह्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

२०१६ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या कृषी प्रदर्शनात त्यांच्या शेवगा पराठे व इतर विविध पदार्थांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ सन्मानचिन्ह मिळवले. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून रेखा वाहटुळे ह्यांनी प्रशिक्षण घेऊन आपला स्वतःचा उद्योग सुरु केला व तो यशस्वी देखील करून दाखवला.

रेखा वाहटुळे ह्यांच्या मेहनतीला सरकारने राबविलेल्या कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाची जोड मिळाली व त्यांनी आपली आर्थिक उन्नती साधली.

रेखा वाहटुळे ह्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शेतकरी महिला व गृहिणींनी बचत गट स्थापन करून आपल्या आवडीनुसार कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण घ्यावे. आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करावा ज्यामुळे आर्थिक उन्नती साधणे शक्य होईल व अनेकांच्या हाताला कामही मिळेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?