'आपण आणि देवी-देवतांच्या पुराणकथा

आपण आणि देवी-देवतांच्या पुराणकथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

लेखक: तन्मय केळकर

===

लहानपणापासूनच आपण आपल्या देवी देवतांविषयी वेगवेगळ्या पौराणिक कथा आई-बाबांकडून, आजी-आजोबांकडून ऐकत आलेलो असतो. या कथा ऐकताना “यावर काही प्रश्न विचारायचे नाहीत”, “उलट्या सुलट्या शंका विचारायच्या नाहीत”, “हे असेच आहे असंच असतं”, “प्रश्न विचारले तर देवबाप्पांना राग येईल, बाप्पा शिक्षा करेल” अशी दमदाटीसुद्धा ऐकलेली असते. कारण त्यांनाही त्यांच्या आईबाबांनी तसा दम दिलेला असतो.

याचा परिणाम असा होतो की दमदाटी करून मुलांची प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती मारून टाकल्यामुळे त्यांची जिज्ञासा व कल्पकता लहान उमलत्या वयात कुस्करली जाते. मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी हे फारसे योग्य नाही. याशिवाय पौराणिक कथांमधील पात्रांनी (म्हणजेेच देवतांनी) केलेल्या अतार्किक, अव्यवहारी, घाणेरड्या, प्रसंगी खुनशी कृतींचंसुद्धा फक्त “देवतांनी केलं” म्हणून समर्थन केलं जातं. त्यामुळे हिंदूंना आदरणीय असलेल्या देवी-देवतांची हिंदूंकडूनच नकळत अजाणतेपणी बदनामी केली जाते. यातूनच हिंदु-धर्म-द्वेष्ट्यांना आयतं कोलीत मिळतं.

त्यामुळेच हिंदूंनी आत्मपरीक्षण करून आपल्या पुराणकथा कितपत व कोणत्या स्वरूपात स्वीकाराव्यात यावर पुनर्विचार केला पाहिजे. यासाठीच या लेखमालेमध्ये आपण लहानपणापासून ऐकत आलेल्या पुराणकथा, त्यांमधील विसंगती/ दुष्प्रवृत्ती यांवर बोट ठेवून त्यामुळे हिंदूंचं काय नुकसान होईल हे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याच वेळी त्याच पुराणकथा व त्या देवतांच्या प्रतीकात्मक प्रतिमा यांकडून हिंदूंना काय शिकता येईल या संदर्भातही विवेचन केलं जाणार आहे.

bhagwat maha puran katha poster inmarathi
mapassion.co.in

हे सगळं लिहिण्यापूर्वीच काही गोष्टी स्पष्ट करणे इष्ट आहे.

ही लेखमाला नास्तिक विचारांची नाही. हे विचार आस्तिकच नव्हे तर भाविकसुद्धा आहेत. आक्षेप फक्त पुराणकथांवर आहे. वेद, उपनिषदे, गीता, एकूणच दर्शनग्रंथ व त्यांमधील तत्त्वज्ञानाबद्दल नितांत आदर बाळगून हे लेखन केलेलं असेल. पुराणकथांवर व त्यातील चमत्कारांवर आक्षेप असूनही त्या त्या देवतांची भक्त कशामुळे – हे देखील चर्चिलं जाईल.

आपण हिंदू म्हणून जन्मलो हे आपलं मोठं सद्भाग्य आहे. “वादे वादे जायते तत्त्वबोध:” ही हिंदूंची तत्त्वचिंतक, सत्यान्वेषी परंपरा आहे. एक हिंदू असल्यामुळे आपल्याला धर्मविषयक साहित्यातल्या न पटणाऱ्या गोष्टींवर आक्षेप घेण्याचं, चिकित्सा करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य परंपरेनेच दिलेलं आहे. याच परंपरांचा पाईक होण्याची पात्रता आपल्या अंगी यावी यासाठी आपण हिंदूंनी मनापासूूून प्रयत्न व चिकित्सा केली पाहिजे.

त्यामुळे, सदर लेखमालेद्वारे कोणालाही दुखावण्याचा हेतू, अर्थातच, नाही. पण आपण कित्येक वर्ष उराशी बाळगलेल्या श्रद्धास्थानांची चिकित्सा ही खरं म्हणजेेेे कठीणच असते. त्यामुळे हे लिखाण वाचून प्रत्येक जण खूषच होईल असे मात्र नाही. तरीही हिंदूंच्या हितासाठी ही कडू गोळी घेण्याची व देण्याची आपण सर्वांनी तयारी केली पाहिजे. म्हटलेलंच आहे – “हितं मनोहारि च दुर्लभं वच:” !

सदर लेखमालेतील मतं बरोबरच आहेत किंवा हा अभ्यास परिपूर्ण असा दावा अजिबात नाही. चर्चेद्वारे नव्या facts व तर्काच्या आधारावर अधिक योग्य, अधिक इष्ट मत बनवणे – असा हा प्रवास असेल.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?