' ‘साहो’ खरोखरच साहवत नाही! : साहवेना ‘साहो’ – InMarathi

‘साहो’ खरोखरच साहवत नाही! : साहवेना ‘साहो’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

लेखक : विक्रम एडके

===

सध्या एका व्यक्तीचा व्हिडिओ खूप व्हायरल आहे. ती व्यक्ती मोठ्या ऐटीत पॅराग्लायडिंग करायला जाते, पण लगेचच आपली चूक त्याच्या लक्षात येते. मग जमिनीवर उतरेपर्यंत त्या व्यक्तीचं कळवळणं, स्वतःलाच शिव्या देणं सध्या सगळीकडे चर्चेचा विषय झालाय. नेमकं असंच मला आज चित्रपटगृहात वाटलं!

पहिल्या दहाच मिनिटांत माझी अवस्था ‘भाई मुझे लंबी राईड नहीं करनी, सौ-दो सौ ज्यादा ले ले पर लँड करा दे’ झाली होती. त्या व्हिडिओतील व्यक्तीचे आडनाव ‘साहू’ निघावे आणि तशीच अवस्था करविणाऱ्या चित्रपटाचे नाव ‘साहो’ निघावे, हा काय दर्जाचा दैवदुर्विलास म्हणावा, देवच जाणे!

एक आंतरराष्ट्रीय माफिया संघटना आहे. तिचा प्रमुख पृथ्वीराजने (टिनू आनंद) तिची सूत्रे रॉयला (जॅकी श्रॉफ) सोपवली. रॉयचा प्रयत्न त्या संघटनेला कायद्याच्या चौकटीत बसवण्याचा आहे. त्यासाठी तो भारतात बिझनेस सुरू करु इच्छितो. रॉय या गोष्टीसाठी इतका उतावीळ आहे की, तो त्यासाठी केंद्रीय मंत्र्याचं (तनिकेला भरणी) अपहरणही करायला मागे-पुढे पाहात नाही.

दरम्यान शहरात विशेष प्रकारच्या चोऱ्या होऊ लागतात. त्या चोऱ्यांचा तपास करण्यासाठी एका खास पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक होते.

आता या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि त्यात साहो (प्रभास) कुठे येतो, याची गुंतावळ झालेली कथा म्हणजे दिग्दर्शक सुजीतचा ‘साहो’!

आपल्याकडे टिव्हीवरच्या गाण्यांच्या स्पर्धा पाहून जरा कुणी बरं गायलं की, ‘क्या बात है’ म्हणायची पद्धत पडलीये. या ‘क्या बात है’चं संस्कृत रूप काय असावं असा विचार केला तर एकच शब्द आठवतो, ‘साधो’! त्याच्या जवळपास जाणारा हिंदी उद्गार कदाचित ‘जय हो’च असू शकतो.

‘साहो’ शब्द गुगल केल्यावर येणारा अर्थ असाच काहीसा आहे. हाय, चित्रपटही तसाच असता तर?

अरेषीय कथाकथन म्हणजे भूसुरुंगाने भरलेल्या मैदानातून चालण्यासारखे असते. तुम्ही जर सुखरूप सगळ्या जंजाळातून बाहेर पडलात तर लोक टाळ्या वाजवतात, पण एक पाऊल चुकीचं पडलं तर सगळ्याचाच इस्कोट होतो. ‘साहो’चे नेमके तेच झालेय.

एक प्रसंग पूर्ण होण्याआधीच दुसरा त्यात मिसळला जातो. हा सर्जनशील निर्णय म्हणून विचारपूर्वक घेतला गेला, तर अतिशय शैलीदार वाटू शकतो. पण दिग्दर्शक सुजीतने नुसतीच शैली उचलली, विचार नाही. त्यामुळे ‘साहो’तील बहुतांश प्रसंग तुटक आणि अपूर्ण वाटतात. सबंध चित्रपट म्हणून विचार केला तर तो केवळ तुटक प्रसंगांची अपूर्ण भेळ बनून राहातो मग. दिग्दर्शकाने त्यात खूप सारे पात्र आणि उपकथानकं घुसडलीयेत. पण त्यांच्यापैकी कुणालाच लेखन, संपादन आणि दिग्दर्शनाच्या पातळीवर न्याय दिला न गेल्यामुळे ते सगळेच निरर्थक वाटतात.

एकीकडे वाटत राहातं की, पटकथेचा अजून एक कित्ता झाला असता तर चित्रपट जरा तरी सुसह्य वाटला असता. दुसरीकडे वाटतं की, अचानकच मोठे स्टुडिओज आणि प्रोडक्शन हाऊसेस सहभागी झाल्यामुळे एक छोटा प्रोजेक्ट म्हणून कदाचित छान वाटू शकणारा चित्रपट मोठ्यांच्या साठमारीत गंडला आणि नवख्या दिग्दर्शकाचे त्याच्या सर्जनशील बाजूवरील सगळेच नियंत्रण सुटले. दोन्हीही परिस्थितीत एका चांगल्या विषयाची माती झालीये.

शैलीदारपणा म्हणावा तर त्या आघाडीवरसुद्धा प्रचंड संधी असूनही चित्रपट हुकलाय. हिरोच्या हिरोईझमवर चालणाऱ्या चित्रपटात हिरोच्या एंट्रीलाच धमाका होत नाही! त्या वेळी असलेली मारधाडही तुमच्यात उत्साहाच्या लाटा निर्माण करत नाही!

चित्रपटाला अनेक साहस-दिग्दर्शक असूनही जवळजवळ सगळीच साहसदृश्ये अतिशय मलूल आणि वाईट झालीयेत. जी आहेत ती सुद्धा सलग नाहीत, तिथेही इतरत्र असलेला तुटकपणा आहे. एका प्रसंगात प्रभास म्हणतो, ‘मेरे लाईफ में अॅक्शन बहोत हो गया, अब रोमान्स चाहिए’! प्रत्यक्षात त्या प्रसंगापर्यंत अॅक्शनचे क्षण फारच थोडे आलेले असतात आणि जे आलेले असतात तेही गंडलेले.

मग वाटतं की, पटकथा वाईट असली तरी किमान संपादन तरी अजून बरे असले असते तर बरे झाले असते, पण त्या ही पातळीवर (ए. श्रीकर प्रसाद) सगळा आनंदच आहे. दुसऱ्या एका प्रसंगात खूप गोळीबार सुरू असताना प्रभासला अमृता (श्रद्धा कपूर) विचारते, ‘यह कौन लोग है जो मुझ से भी ज़्यादा नफ़रत करते है तुम से’? त्यावर प्रभास उत्तरतो, ‘फॅन्स’! वाईट गोष्ट ही की, त्या क्षणी खरे वाटते ते!!

प्रभास अभिनेता अजिबातच वाईट नाहीये. त्याच्या मर्यादेत चांगलाच आहे तो. पण त्याचे हिंदी बोलणे फारच सपक वाटते. बरेचदा तर तो तोंडातल्या तोंडात बोलतो ते धड समजतच नाही. तेलुगूत तो नक्कीच चांगला बोललेला असणार हे मान्य जरी केलं तरी जिथे मुळात त्याच्या पात्रालाच हातचं राखल्यासारखं लिहिलंय, तिथे संवादांना काय अर्थ असणार?

एका प्रसंगात तर त्याला जेटपॅक लावलेला एक माणूस हवेतल्या हवेत पकडतो. ते दोघेही बिल्डिंगच्या काचा फोडून आत पडतात. भाऊंच्या अंगावर एक जखमसुद्धा नाही. तसाच उठतो. ते जेटपॅक अंगावर चढवतो. हिरोईन हेलिकॉप्टरमधून पडत असते. तिला वाचवायला जातो. रस्त्यात मध्येच त्याच्या जेटपॅकचं इंधन संपतं. तर ते हवेतच उतरवून हवेतल्या हवेत झेप घेऊन तो हिरोईनला पकडतो. दोघे पाण्यात (आणि पिक्चर पण!)!

नाही, नेमके पाण्यातच कसे काय पडले ते, वगैरे प्रश्न मी विचारणार नाही. कारण, या प्रकारचे शेकडो अविश्वसनीय प्रसंग वेगवेगळ्या चित्रपटसृष्टीतील चित्रपटांतून अनेकवेळा सहर्ष आवडलेयत मला. पण केव्हा? जेव्हा ते शैलीदारपणे मांडलेले असतात, तेव्हा!

प्रभासच्याच ‘बाहूबली’त (२०१५-१७) असे पन्नासेक प्रसंग असतील. पण ते राजमौलीने असे काही हाताळलेयत की आपण आनंदाने बुद्धीला बासनात गुंडाळून ठेवतो. इथे तसं होत नाही! हा दोष दिग्दर्शकाचा आहे. आणखी एका प्रसंगात..! जाऊ द्या, किती सांगणार मी तरी?

दुसरे म्हणजे, प्रभास सबंध चित्रपटभर (आणि बाहेरही) सतत आळसावलेलाच वाटतो. ‘बाहूबली’ची चुस्ती तात्पुरती आणि सुस्तीच शाश्वत आहे की काय, असे वाटते त्याच्याकडे पाहून. चित्रपटावर साडेतीनशे कोटी खर्च करताना नेमके प्रभासच्या आंघोळीच्याच वेळी बजेट संपले की काय, अशीही शंका चाटून जाते!

क्लायमॅक्स खूपच प्रेडिक्टेबल असला तरीही बरा हाताळलाय दिग्दर्शकाने, हे तेवढेच दु:खात सुख. त्यामुळे सुजीत वाईट दिग्दर्शक असेलच असे नाही. पण त्याला एवढे मोठे बजेट हाताळता नाही आले आणि एवढी मोठी संधी गमावली, हे निश्चित. आर. मधीचे छायांकन खूपच चांगले झालेय. विभासांचा (व्हिएफएक्स) अतिरेक मात्र काही वेळा अंगावर येतो आणि बऱ्याच ठिकाणी सुमार वाटतो.

प्रभासच्या पात्राला लेखन आणि दिग्दर्शकीय पातळीवर न्याय न मिळण्याचे महत्त्वाचे कारण हे की, दिग्दर्शकाला शेवटी उघड करण्यासाठी एक रहस्य राखून ठेवायचेय.

पण गंमत अशी की, चित्रपटाच्या पहिल्या पाचच मिनिटांत तुम्ही ते रहस्य ओळखू शकता, एवढंच नव्हे तर नेमकं कोण कोण त्या कट-कारस्थानात सहभागी आहे, हे सुद्धा ओळखू शकता.

हा लेखनाचा (सुजीत) दोष आहे. त्या व्यतिरिक्तही कोणत्याच प्रसंगात फारशी मजा नाही. मुख्य पात्रांचा आनंदीआनंद जरी असला, तरीही दुय्यम पात्रांनी मात्र वाट्याला आलेली कामं मस्त केलीयेत. जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, चंकी पांडे, मुरली शर्मा, प्रकाश बेलवाडी, वेन्नेला किशोर वगैरे मुरलेली मंडळी खरोखर भाव खाऊन जातात. मंदिरा बेदी, नील नितीन मुकेश यांनीही बरे काम केलेय. सगळ्यांत जास्त कौतुक वाटते ते अरुण विजयचे! मणिरत्नमच्या ‘चेक्का चिवंता वानम’नंतर (२०१८) या ही चित्रपटात त्याने भूमिकेला साजेसे काम केलेय.

चित्रपटाची अजून एक लंगडी बाजू म्हणजे त्याचे संगीत.

खरं तर, संगीत हे कोणत्याही दाक्षिणात्य ब्लॉकबस्टरचे बलस्थान असते. पण या चित्रपटाची बहुतांश गाणी अतिशय सामान्य, चार दिवसांचे आयुष्य असलेली आहेत. रहमान मागे एकदा म्हणाला होता की, ‘हिंदीत एकाच चित्रपटासाठी खूप सारे संगीतकार घेण्याचा दुर्दैवी पायंडा पडलाय. त्यामुळे गाणी चित्रपटाशी एकरूप वाटत नाहीत’. हिंदीचा हा रोग ‘साहो’च्या निमित्ताने तेलुगू चित्रपटसृष्टीलाही लागल्याचे दिसते. तेलुगूतील एवढे प्रतिभावंत संगीतकार सोडून त्यांना बादशाह, गुरू रंधावा, तनिष्क बागची वगैरे असुरांकडे जाण्याची का गरज पडली असावी?

मला वाटते हा दोष दिग्दर्शकाचा कमी आणि टि-सीरीजसारख्या कंपनीचा जास्त आहे. ही मंडळी काहीतरी छान, चिरस्मरणीय करावे म्हणून काम करत नाहीत, तर पायाजवळ पाहातात फक्त!

पण जर तसे असेल, तर दिग्दर्शकाचे चित्रपटाच्या सर्जनशील बाजूवर नियंत्रण नसल्याचेच यातून दिसून येते. फक्त एकच शंकर-अहसान-लॉयचे गाणे ‘त्यातल्या त्यात चांगले’ आहे. सबंध संगीत एकाच चांगल्या संगीतकाराने केले असते, तर चित्रपटाच्या साऊंडवर आणि व्यवसायावरही खूपच सकारात्मक परिणाम झाला असता. गिब्रन या इतरवेळी चांगले पार्श्वसंगीत करणाऱ्या संगीतकाराचेही पार्श्वसंगीत कर्कश्श झालेय.

असा हा जवळजवळ सर्वच पातळ्यांवर फसलेला चित्रपट ‘साहो’. तेलुगू, तमिळ, कन्नड चित्रपटसृष्टीला हिंदीवाले नावाजू लागल्यामुळे वाटलं होतं की, हिंदी चित्रपट सुधारतील. पण हे तर त्यांनाच बिघडवायला निघालेत. तरीही ‘साहो’ हा साडेतीनशे कोटींचा अपवाद असावा, बनू घातलेला नियम नव्हे, अशी मनापासून अपेक्षा आहे. कारण, ‘साहो’ खरोखरच साहवत नाही!!

*१.५/५

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?