जेव्हा पोलिस गुन्हेगारांना म्हणतात : घरातून बाहेर पडण्यापेक्षा नेटफ्लिक्सवर व्हिडीओ पाहा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

गुन्हेगारांना पकडणं तसं सोपं काम नाहीच! त्यासाठी पोलिसांना कोणकोणत्या युक्त्या शोधाव्या लागतात आणि कोणकोणत्या दिव्यातून पार पडावं लागतं ते तेच जाणोत!

पण, सतत गुन्हेगारांच्या मागावर राहणंही कधी कधी अशक्य होऊ शकतं, अशा वेळी काय करत असतील बरे हे पोलीस?

तसंही पोलीस म्हणजे आपल्या समोर उभा राहतो युनिफोर्म मधला एक तगडा व्यक्ती ज्याच्या चेहऱ्यावर फक्त कोरडेपणा असेल! पण, पोलिसांना देखील विनोद बुद्धी असते.

ते फक्त तापट, रागीट, हेकट, क्रुद्ध नसतात… त्यांच्यातही हजरजबाबी, हुशार, वाकचातुर्य आणि सेन्स ऑफ ह्युमर असतो. काही महिन्यापूर्वी अमेरिकेच्या पोलिसांनी आपल्या फेसबुक वॉलवर अशीच एक पोस्ट शेअर केले होती जी त्यांच्या विनोदी बुद्धिमत्तेची चुणूक दाखवते!

 

american police inmarathi
irishcentral.com

अमेरिकेत फेब्रुवारीमध्ये पोलार व्हर्टेक्स नावाचे थंड वारे सुटले होते. या वाऱ्यामुळे अमेरिकेत अक्षरश: कडाक्याच्या थंडीची लाट पसरली होती. तेथील तापमान अगदी काही उणे अंश सेल्सिअसवर पोचले होते.

अशा कडाक्याच्या थंडीत लोकांना रोजची दैनंदिन कामे करणे किंवा घरातून बाहेर पडणे देखील अवघड झाले. अशा थंडीत उबदार राहायचे असेल तर फक्त घरातच थांबले पाहिजे अशी परिस्थिती होती.

तिथल्या थंडीची नेमकी तीव्रता दाखवणारे अनेक व्हिडीओ इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हायरल झाले होते.

हे व्हिडीओ जर तुम्ही पहिले नसतील तर, अवश्य पहा. कारण, हे व्हिडीओ पाहून तुमचे रक्त देखील गोठून जाईल, खरंच!

जिकडे तिकडे रस्त्यावर बर्फाचे थर साचले होते. प्रत्येक वस्तू बर्फाने आच्छादून गेलेली. कडाक्याच्या थंडीने मिशिगनच्या तलावातील पाण्याचा देखील गोठून बर्फ झाला होते- असे चित्र होते!

घरात उबदार वातावरण निर्माण करण्यासाठी हिटर ४० अंश सेल्सिअस वर ठेवावे लागत असे. गाडी, कपडे, इथपासून ते अगदी टॉयलेट पेपर देखील, प्रत्येक वस्तू जणू थंडीने गोठून गेली होती.

रेल्वे रूळ देखील बर्फामुळे निसरडे बनल्यामुळे त्यावरील वाहतूक सुरळीत चालावी म्हणून रुळावर आग पेटवून त्यांचे टेम्परेचर मेंटेन करण्यात येत होते. घरातील भिंतीवर, दरवाजे खिडक्यांवर देखील बर्फाचे थर साचल्याचे चित्र यादरम्यान पाहिले गेले.

 

polar vertex inmarathi
twimg.com

यादरम्यान सुकण्यासाठी अडकवलेले कपडे देखील गोठून बर्फ झाले होते. जिकडे नजर जाईल तिकडे बर्फाचेच साम्राज्य पसरले होते. अशा थंडीत घरात राहणाऱ्या लोकांना देखील जगणे मुश्कील झाले असताना ज्यांना घरच नाही अशा लोकांची अवस्था काय झाली असेल बरे? कल्पनाही करवत नाही.

आता, अशा थंडीत काही लोकांना घराबाहेर न पडता घरी बसून राहणं परवडू शकतं. पण, ज्यांना अशा पद्धतीने घरी बसून राहणे परवडणार नाही त्यांची कथा काय?

ज्यांना घराबाहेर पडणं आवश्यकच आहे अशांमध्ये येतात पोलीस अधिकारी ज्यांना अशा आपत्तीच्या प्रसंगी देखील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्य तत्पर राहणं गरजेचं आहे.

आता अशा मरणप्राय थंडीत त्यांना तरी घराबाहेर पडणं शक्य आहे का? म्हणून मॅडीसन पोलीस विभागाने यावर एक गमतीशीर शक्कल लढवली. आपल्या फेसबुक पोस्टवरून त्यांनी थेट शहरातील गुन्हेगारांनाच आवाहन केले होते.

या पोस्टमध्ये ते लिहितात, प्रचंड थंडीची लाट पाहता कोणीही घराबाहेर पडणे केवळ धोक्याचेच आहे. म्हणून शहरातील सर्व गुन्हेगारांनी देखील याकाळात घरातून बाहेर न पडता नेटफ्लिक्सवर व्हिडीओ पाहावेत, किंवा पुस्तकं वाचावीत किंवा ज्या गोष्टीत त्यांना जास्त आनंद मिळतो ती करावी.

याची सर्व गुन्हेगारांनी नोंद घ्यावी असे आवाहन देखील केले गेले होते.

 

polar vertex inmarathi
topyaps.com

“गुन्हेगारानो कृपया याची नोंद घ्या, कोणताही गुन्हा करण्यास सध्या पोषक वातावरण नाही कारण बाहेर खूपच थंडी आहे. त्याऐवजी घरीच थांबा, पुस्तकं वाचा किंवा नेटफ्लिक्सवर व्हिडीओ पहा.

अगदी मॅडीसन एरिया क्राईम स्टॉपर्सवर जाऊन इतर गुन्हेगारांना पकडून देण्यासाठी मदत देखील करू शकता काहीही करा पण, किमान गुन्हा करण्यासाठी घरातून बाहेर पडू नका, तुम्हाला पोलर बिअरची शप्पथ.”

कडाक्याच्या थंडीमुळे मॅडीसन पोलीस डिपार्टमेंट सर्व गुन्हेगारी कारवाया रद्द करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते.

हो, हो ही पोलीस डिपार्टमेंटच्या फेसबुक वॉलवरील पोस्ट आहे ज्यामध्ये ते थेट गुन्हेगारांना घरातून बाहेर न पडण्याची विनंती करीत आहेत. त्याऐवजी करण्यासारखी इतर कामे देखील त्यांनी या पोस्टमधूनच सुचवलेली आहेत.

आता या पोस्टवर कमेंटचा पाउस न पडतील ते नेटीझन्स कसले… या पोस्टवरच्या एकेक कमेंट अक्षरश: पोट धरून हसायला लावणाऱ्या आहेत.

“ते तरीही घरातून बाहेर पडलेच तर पोलीस त्यांना वॉटर पिस्तोलचा वापर करून थांबवू शकते.” अशी एक कमेंट आहे तर दुसऱ्या कमेंटमध्ये एकाने लिहिले आहे,

“मी आता लागलीच फॅशन क्राईम करणार आहे. पण, मी घरातून बाहेर पडणार नाही. त्यामुळे पोलिसांनी काळजी करू नये.”

अशा कमेंट्स वर हाहा रीअॅक्ट होणाऱ्यांची संख्या देखील खूप आहे. आणखी एका कमेंट मध्ये लिहिले आहे,

“ही पोस्ट वाचून उलट त्यांना अजून काही गुन्हे करण्याची खुमखुमी येईल. जसे ते घराबाहेर पडतील तसे थंडीने गोठून जावोत आणि त्यांच्या गोठलेली शरीरे जमिनीत गाडली जावोत. ज्यावर उद्या ट्युलिपच्या बागा निर्माण होतील. गुन्हे कमी आणि सर्वत्र फुलांच्या बागा…”

 

tweets inmarathi
tweeter

खरे तर इतक्या गमतीशीर पोस्ट करणाऱ्या पोलिसांना गुन्हेगारांकडून नेमका काय प्रतिसाद मिळाला, हे मात्र कळाले नाही. तरी, पोस्ट मात्र फारच मजेशीर आहे, नाही का?

खरंच सतत तणावात असणाऱ्या पोलिसांनी कधी कधी असे हलके फुलके विनोद करून स्वतःवरील ताण कमी करण्यास हरकत नाही.

यामुळे गुन्हेगारांच्या मानसिकतेत नेमका काय फरक पडेल ते सांगता येणे अशक्य आहे, पण किमान पोलिसांसाठी थोडासा विरंगुळा मिळू शकतो.

अशा कठीण परीस्थितदेखील त्यांच्यातील विनोद बुद्धी किती अॅक्टीव्ह आहे हे पाहून त्यांचा अभिमान वाटतो असेही एका कमेंट मध्ये वाचायला मिळाले होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?