“स्टीव्ह जॉब्ज जिवंत आहे! इजिप्तमध्ये लपून बसलाय”- एक नवी कॉन्स्पिरसी थिअरी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आयफोन, आयपॅड, आयपॉड यासारख्या कॉम्प्युटर मधील नवनव्या तंत्रज्ञानाचा शोध लावणारा, अॅपल सारख्या कॉम्प्युटर आणि मोबाईल निर्मितीमधील सर्वोच्च कंपनीचा सीईओ असणारा स्टीव्ह जॉब्ज हा आपल्या बुद्धिमत्तेने आणि सर्जनशीलतेने जगाला संमोहित करणारा एक अवलिया होता, हे तर आपण जाणतोच.

आपल्या आयुष्यातील आश्चर्यजनक वाटणाऱ्या प्रवासामुळे त्याच्या या यशाचे अनेकांना आकर्षण वाटायचे आणि आजही वाटते.

हलाखीच्या परिस्थितून शिकून पुढे अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या महत्वाच्या पदांवर त्याने काम केले. शिक्षण घेताना खर्च भागवण्यासाठी कोकच्या बाटल्या विकणारा हा मुलगा मरताना अमेरिकेतील श्रीमंताच्या यादीत ४३व्या स्थानावर होता.

नेहमी सर्जनशिलतेची आणि नाविन्याच्या शोध घेण्याची भूक असणारा स्टीव्ह काहीजणांना सणकी देखील वाटत असे.

 

steve jobs inmarathi
thegentlemansjournal.com

आयुष्यात नाविन्याचा ध्यास घेऊन जगणाऱ्या आजच्या तरुण अवलीयांसाठी स्टीव्ह हा आजही आयकॉन वाटतो. आयुष्याच्या संघर्षग्रस्त टप्प्यातून जाणाऱ्यांसाठी स्टीव्ह आजही प्रेरणेचा स्त्रोत्र आहे.

अॅपलबद्दल किंवा स्टीव्ह बद्दल पुरेशी माहिती असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला विचारल्यास तो हेच उत्तर देईल की, २०११ मध्ये पॅनक्रीअॅज कॅन्सरच्या कारणाने वयाच्या ५६व्या वर्षी स्टीव्ह या जगातून निघून गेला.

परंतु, तेच एखाद्या कॉन्स्पिरसी थेअरीस्टला तुम्ही हाच प्रश्न विचारल्यास तो तुम्हाला स्टीव्ह जॉब्ज अजूनही जिवंत असून तो, इजिप्तमधील कैरो येथे मजेत आयुष्य जगत असल्याचे सांगेल.

रेडीटवर कालच पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये हा टेक आयकॉन रस्त्याकडील एका दुकानात निवांत बसलेला दिसेल. या फोटोने रेडीटवर बऱ्याच लोकांना आकर्षित केले आणि धक्का देखील दिला.

या फोटोमध्ये असणारा व्यक्ती हा निश्चितच जॉब्ज नाही पण, त्याच्यात आणि जॉब्जमध्ये इतके साम्य आहे की, तो जॉब्जच वाटावा. एका बाजूने तर तो हुबेहूब जॉब्जच असल्याचा भास होतो.

 

steve jobs inmarathi
indiatimes.in

इतकेच नाही तर जॉब्जच्या व्यक्तिमत्वातील काही गोष्टी आणि या फोटोतील व्यक्तीच्या लकबी देखील इतक्या एकसारख्या आहेत की, त्यावरून ही तो जॉब्ज नाही हे स्वीकारणे शक्य होत नाही. फोटोतील व्यक्तीच्या पायात चपला नाहीत.

स्टीव्ह देखील कोणत्याही नाविन्याच्या कल्पनेचा शोध घेत असला किंवा त्याच्या डोक्यात काही नव्या कल्पना येत असतील तर तो चपला वापरत नसे हे तर, जगप्रसिद्ध आहे.

अगदी त्याचे केस देखील एकसारखेच आहेत. त्याच्या हनुवटीची ठेवण आणि अगदी त्याच्या डोळ्यावरील चष्मा देखील.

स्टीव्हच्या चाहत्यांना तरी हा फोटो पाहून आश्चर्याचा सुखद धक्काच बसला आहे.

“मला वाटत हा एक विनोद ठरेल पण, हा मनुष्य तर अगदी हुबेहूब स्टीव्ह जॉब्जसारखाच दिसतो”, एका रेडीट युजरने त्या फोटोवर अशी कमेंट दिली आहे. आणखी एकाने लिहिले आहे, “या माणसाला माहित असावं की त्याचा चेहरा कितपत स्टीव्हशी जुळतो आणि त्याचाच तो फायदा घेत असावा.

त्याला आपण स्टीव्हसारखे दिसतो हे माहित असावे म्हणूनच त्याने तशी हेअरस्टाईल केली असून चष्म्याची फ्रेम देखील त्याच्यासारखीच निवडली आहे. हा फक्त निव्वळ एक योगायोग असावा असे मला वाटते.”

 

reddit inmarathi
marketingland.com

अगदी त्याची बसण्याची स्टाईल देखील सारखीच आहे, जशी जॉब्जची होती. आणखी एकाने लिहिले आहे, त्याच्या हाताची ठेवण देखील स्टीव्हप्रमाणेच आहे.

आणखी एका रेडीट युजरच्या मते,

“मी काही कॉन्स्पिरसी थेअरीस्ट नाही, पण असे काही तरी विचित्र काम करण्याइतपत स्टीव्ह जॉब्ज विक्षिप्त होता हे मला मान्य आहे.”

स्टीव्हचा मनस्वीपणा आणि त्याच्या विक्षिप्तपणा पाहता कदाचित ही सत्य घटना देखील असण्याची शक्यता आहे, असेही कित्येकांचे म्हणणे आहे.

स्टीव्ह जॉब्ज हे असे व्यक्तिमत्व होते ज्याने जगावर आपले गारुड निर्माण केले होते. त्यामुळे २००७ मध्ये त्याचे लिव्हर ट्रान्सप्लांट करून देखील त्याचा कॅन्सर आटोक्यात आला नाही, हा स्टीव्हच्या चाहत्यांसाठी एक धक्काच होता.

त्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये स्टीव्हप्रमाणेच जर कुणाला साम्य दिसत असेल तर, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. दोन व्यक्तींमध्ये हुबेहूब साम्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

steve jobs inmarathi
newshub.co.nz

अॅपलसारखी तंत्रज्ञानात सर्वोच्च स्थान निर्माण करणाऱ्या कंपनीचा तो संस्थापक सदस्य होता. अगदी अॅपलच्या वतीने पहिला कम्प्युटर तयार करण्यापासून त्यानंतर काही काळ इतर सहकाऱ्यांशी झालेल्या मतभेदामुळे तो अॅपलमधून बाहेर पडला असला तरी, पुन्हा काही काळ स्वतंत्र काम केल्यानंतर तो अॅपलमध्ये परत आला.

यानंतर अॅपलने यशाची अनेक शिखरे गाठली. आज तंत्रज्ञान जगतात अॅपलची स्वतःची वेगळी ओळख आहे. अॅपल हे एक टेक्नो ब्रँड आहे. अॅपलप्रती स्टीव्हला प्रचंड ओढ होती.

त्याच्या मृत्युच्या काही महिने अगोदरच त्याने अॅपलच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला, या पत्रात त्याने लिहिले होते.

“मी शरीरिक दृष्ट्या कामावर येण्यास फिट आहे असे मला वाटत नाही. अॅपलचा सीईओ या नात्याने मी जर कंपनीला आवश्यक असणाऱ्या जबाबदाऱ्या पार पडण्यास मी ज्यादिवशी असमर्थ ठरेन त्याच दिवशी मी अॅपलच्या सीइओ पदाचा राजीनामा देईन असे मी कायम म्हणत आलो आहे.

दुर्दैवाने तो दिवस जवळ आहे. भविष्यात अॅपलला अजून चांगले दिवस येतील आणि इथे अजून नवनवीन कल्पनांचा शोध लागेल अशी मला आशा वाटते.”असे त्याने लिहिले होते.

वस्तुतः हा टेक्नो आयकॉन जिवंत असल्याची बातमी पसरण्याची ही काही पहिली वेळ नाही.

 

steve jobs inmarathi
rollingstone.com

यापूर्वीही पाच वर्षापूर्वी हा अवलिया अजूनही जिवंत असल्याच्या बातम्या येत होत्या. रेडीटवर पाच वर्षापूर्वी पोस्ट करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये स्टीव्ह जॉब्ज जिवंत असल्याचा दावा करण्यात आला होता.

हा टेक गुरु जिवंत असून तो रिओ दि जानेईरो मध्ये लपून राहिला असल्याच्या बातम्या तेंव्हाही अशाच पसरल्या होत्या.

त्याच्याबद्दल सातत्याने येणाऱ्या या बातम्या तो चाहत्यांच्या मनात अजूनही जिवंत असल्याचीच साक्ष देतात असेच म्हणावे लागेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?