'अरविंद केजरीवाल आणि काही जुने अनुत्तरीत प्रश्न

अरविंद केजरीवाल आणि काही जुने अनुत्तरीत प्रश्न

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

अरविंद केजरीवाल एक आम आदमी, अतिशय कमी वेळात आम आदमी पासून ते खास आदमी पर्यंत त्यांचा प्रवास हा थक्क करणारा आहे. प्राप्तीकर खात्यातील प्रामणिक अधिकारी, माहिती अधिकाराकरीता लढणारा स्वयंसेवी संस्थाचालक, जनलोकपालाच्या चळवळीत स्वत:ला झोकून देणारा कार्यकर्ता आणि त्यातुनच उदयाला आलेल्या आम आदमी पक्षाचा नेता अन पुढे दिल्लीसारख्या राज्याचा मुख्यमंत्री. सामान्य माणसाला स्वप्नवत वाटावा असा हा प्रवास आहे. या प्रवासाबद्दल काही शंकाही निर्माण होत आहेत. प्राप्तीकरखात्यातील नोकरी, स्वयंसेवी संस्था, फोर्ड फाउंडेशनच्या देणग्या, रामन मॅगसेसे पुरस्कार, दिल्ली विधानसभेची उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाकडे सादर केलेले प्रतिज्ञापत्र, केजरीवालांची मालमत्ता, त्याची किम्मत अशा अनेक बाबतीत प्रश्न आहेत. (हे प्रश्न फार जुने आहेत. वेळोवेळी उपस्थित केले गेले आहेत, पण त्यावर समाधानकारक उत्तरे अजूनही नं मिळाल्याने त्यावर पुन्हा पुन्हा प्रकाश टाकणे आवश्यक ठरते.)

arvind-kejriwal-marathipizza

भारतात जर कोणतीही निवडणूक लढवायची असेल तर उमेदवाराला भारतीय निवडणुक आयोगाकडे त्याच्या वैयक्तिक माहितीचे प्रतिज्ञापत्र (ऍफिडेविट) सादर करावे लागते.त्या प्रतिज्ञापत्रामधे उमेदवाराचे नाव, पत्ता, त्याचा मतदार यादीतील क्रमांक, त्या उमेदवारावर जर काही गुन्हे नोंदवलेले असतील त्याविषयीची माहिती, उमेदवाराच्या व त्याच्या जोडीदाराच्या संपत्तीचे विवरण, शिक्षण, पॅन क्रमांक, व इतर माहिती भरुन द्यावी लागते.प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या सत्यतेची पूर्ण जबाबदारी ही त्या उमेदवाराची असते.आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जर काही तृटी असेल अथवा महिती अपूर्ण असेल किंवा काही माहिती लपवली असेल तर तो लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार दंडप्राप्त गुन्हा ठरतो.

दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवताना अरविंद केजरीवाल यांनीही निवडणूक आयोगाकडे आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानंतर ते निवडणूक लढले, जिंकले व दिल्लीचे मुख्यमंत्रीही झाले. हे सर्व आपल्याला माहिती आहे दिल्लीतील संस्था मौलिक भारत व त्याच्या सदस्यांनी, केजरीवालांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे बारकाईने वाचन केले व त्याची सत्यता पडताळुन पाहायचे ठरवले. त्यातून त्यांना अरविंद केजरीवालांचा वेगळाच चेहरा त्यांच्या समोर आला.

केजरीवालांच्या प्रतिज्ञापत्रातील त्यांच्या मालमत्तेचा पत्ता अर्धवट आहे. त्या पत्त्यावर भारतीय डाक विभागातर्फे पत्र पाठवले असता ते पत्र लिहिलेला पत्ता अपूर्ण आहे या शेर्‍यानिशी परत आले. प्रतिज्ञापत्रातील मालमत्तेचा पत्ता-11/44, इंदिरापुरम, गाझियाबाद यु.पी. असा आहे. खरा पत्ता- अभय खंड -2 इंडिया रेवेन्यु सर्विसेस ऑफिसर्स को. सोसायटी, प्लॉट-44 इंदिरापुरम, गाझियाबाद यु.पी.असा आहे.

केजरीवालांच्या प्रतिज्ञापत्रातील कायम निवासाचा पत्ता हा बंगला क्र. 41 हनुमान रस्ता, नवी दिल्ली, 01 असा आहे. येथे जाऊन केजरीवालांच्या वास्तव्याविषयी चौकशी केली असता आजुबाजुच्या मंडळींनी वेगळीच माहिती दिली. केजरीवाल इथे कधीच राहत नाहीत, तर ते आर-902, गिरनार अपार्टमेंट,कौशम्बी, गाझियाबाद येथे राहत असल्याचे सत्य समोर आले. या मालमत्तेचे वीज देयक अरविंद केजरीवाल यांच्या नावाने आहे. दि. 27 जून 2013 च्या दैनिक जागरण या वर्तमानपत्रात केजरीवालांच्या सदर मालमत्तेचे वीज देयक न भरल्यास जोडणी तोडू, या आशयाची बातमीही आली होती.या पत्त्यावर स्पीड पोस्टाने पत्र पाठवले गेले व ते यांच्यापर्यंत पोचलेही..याचा सरळ अर्थ आहे की केजरीवाल इथेच राहतात. मात्र केजरीवालांच्या प्रतिज्ञापत्रात कौशम्बी येथील या मालमत्तेचा कुठेच उल्लेख नाही. ही मालमत्ता केजरीवालांनी आयोगापासून लपवली आहे का?

अरविंद केजरीवालांच्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. 2006 मधे केजरीवालांनी पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशन (पीसीआरएफ) या नावाने संस्थेची नोंदणी केली. संस्थेचा कारभार लाखो करोडो रुपयामधे आहे. या संस्थेच्या नावाने लोकांकडून देणग्याही गोळा केल्या जातात. या संस्थेची नोंदणी करताना ट्रस्ट डीड मधे केजरीवालांनी त्यांचा पत्ता 403-एल गिरनार, कौशाम्बी,गाझियाबाद, यु. पी. असा दिला आहे. याही मालमत्तेचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात कुठेच नाही.स्वाभाविक प्रश्न पडतो की, मग ही मालमता कुणाची आहे ?

केजरीवालांच्या प्रतिज्ञापत्रातील मालमत्ता विवरणात 11/44 इंदिरापुरम गाझियाबाद येथील मालमत्ता ही 222.9 वर्ग मी. दाखवली आहे. या मालमत्तेची किंमत 55 लाख दाखवली आहे. मात्र गाझियाबाद इंदिरापुरम ( अभयखंड) भागातील सरकारी रेडी रेकनरचा दर हा प्रति वर्ग मी. 63000/-रु. इतका आहे. याचाच अर्थ 222.9 वर्ग मी. मालत्तेची रेडी रेकनर नुसार किंम्मत ही 1 कोटी 40 लाख रु. इतकी येते. केवळ मी कोट्य़ाधीश आहे हा शेरा मिळु नये म्हणून केजरीवालांनी मालमत्तेची किम्मत कमी दाखवली का? मालमत्तेची वास्तव किम्मत न दाखवून केजरीवाल निवडणूक आयोगाची पर्यायाने जनतेची फसवणूक तर करत नाहीत ना?

अरविंद केजरीवालांच्या दिल्ली व आसपासच्या भागामध्ये 4 मालमत्ता आहेत. 1) अभय खंड -2 इंडिया रेवेन्यु सर्विसेस ऑफिसर्स को. सोसायटी, प्लॉट-44 इंदिरापुरम, गाझियाबाद यु.पी. 2) आर-902, गिरनार अपार्टमेंट,कौशम्बी, गाझियाबाद 3) 403-एल गिरनार, कौशाम्बी,गाझियाबाद, यु. पी. 4) बंगला क्र. 41 हनुमान रस्ता, नवी दिल्ली, 01. या 4 मालमत्ता असूनही त्यांना आम आदमी म्हणायचे का?

केजरीवालांच्या प्रतिज्ञापत्रात अरविन्द केजरीवाल यांचा मतदार क्रमांक हा विधानसभा क्र. 40, अनु क्र 600, भाग क्र. 47 असा दाखवला आहे. मात्र दिल्ली शासनाच्या संकेतस्थळावर अरविंद केजरीवाल यांचा मतदार क्र. हा विधानसभा क्र. 40, अनु क्र 579, भाग क्र. 47 असा दिला आहे. असा खोटा मतदार क्रमांक प्रतिज्ञापत्रात देउन केजरीवालांनी नेमके काय साधले?

केजरीवालांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांचा व्यवसाय हा राजकीय-सामाजिक कार्यकर्ता असा दाखवला आहे. 2012-13 चे त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाख 5 हजार दाखवले आहे. कोणत्या सामाजिक कार्यकर्त्याचे उत्पन्न वार्षिक 2 लाखावर असते? अरविंद केजरीवाल यांच्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, त्या संस्थेतून ते वेतन घेतात का? असतील, तर कोणत्या संस्थेतून वेतन घेतात? जर घेत असतील तर किती घेतात? की त्यांना अन्य मार्गाने पैसे मिळतात?

“मी स्वत: पारदर्शी व्यवहार करतो व दुसर्‍यांकडुन पारदर्शकतेची अपेक्षा करतो” असे म्हणणार्‍या केजरीवालांनी त्यांच्या पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या 2012 च्या ऑडिट रिपोर्ट मध्ये असे दाखवले आहे की देणगीदारांच्या माहिती अभावी संस्थेला देणगीरुपात मिळालेली 25 लाख 44 हजार रु ची देणगी ही 468 देणगीदारांना परत केली. आता या विधानातच विरोधाभास जाणवतो. जर देणगीदारांची माहितीच नाही तर मग देणगी कुणाला परत केली. आणि जर खरोखर मिळालेली देणगी परत केली असेल तर देणगीदारांची माहिती नसल्याने ती परत केली हा दावा खोटा ठरतो. याचाच सरळ अर्थ या ऑडिट रिपोर्टमधे पारदर्शकतेचा अभाव आहे. अथवा काहितरी काळबेरं असण्याची शक्यता आहे.

अरविंद केजरीवाल यांनी प्राप्ती कर खात्यात नोकरीला असताना 3 वर्षाची अभ्यास रजा घेतली होती. या रजेच्या काळात त्यांना पूर्ण वेतन मिळत होते. याकरीता त्यांनी शासनाला शपथपत्र लिहून दिले होते की अभ्यास रजा संपल्यानंतर पुढची 3 वर्षे मी नोकरी सोडणार नाही. पण पुढे जाउन त्यांनी राजीनामा दिला. राजीनामाच द्यायचा होता तर मग 3 वर्षे फुकटचे वेतन का घेतले? त्यांच्या 12 ( 1994-2006) वर्षाच्या प्राप्तीकर खात्यातील नोकरी दरम्यान आय आर एस अधिकारी असूनही त्यांची एकदाही दिल्लीबाहेर बदली झाली नाही. आय आर् एस असलेल्या त्यांच्या पत्नीचीही एकदाही दिल्लीबाहेर बदली झाली नाही. वास्तविक पाहता नियमाप्रमाणे अशा अधिकार्‍यांची दर 3 वर्षानी बदली होत असते. केजरीवाल यांच्याप्रमाणेच अतिशय प्रामाणिकपणे काम करणार्‍या अशोक खेमकांची 19 वर्षात 43 वेळा बदली झाली. आय ए एस अधिकारी अरुण भाटियांची अनेक वेळा बदली झाली मग असं काय गौडबंगाल आहे की केजरीवाल पतिपत्नींची एकदाही दिल्लीबाहेर बदली झाली नाही!

तुम्हाला जर आम आदमी पक्षाचा उमेदवारी अर्ज भरायचा असेल तर अर्जातील प्रश्न क्र. 13 हा तुम्ही केजरीवालांचे स्वराज हे पुस्तक वाचले आहे का व त्यावर तुमचे काय मत आहे ? असा आहे. याचा अर्थ आम आदमी पक्षात केजरीवालांच्या स्वराज पुस्तकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता स्वराज पुस्तकाच्या निर्मितीविषयी अधिक जाणून घेऊ.

श्री. अजयपाल नागर (पत्ता मु पो. बम्बावड, तालुका दादरी, जिल्हा गौतमबुध्द नगर, यु पी.) व्यवसायाने प्राथमिक शिक्षक आहेत. गेल्या 10-15 वर्षांच्या त्यांच्या सामाजिक जीवनाच्या अनुभवावरुन त्यांनी भारतीय राजव्यवस्था नावाचे हिन्दी पुस्तक लिहिले. फेब्रुवारी 2012 मध्ये त्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्याच दरम्यान जनलोकपाल चळवळ जोरात असल्याने अजयपालांनी आपले भारतीय राजव्यवस्था हे पुस्तक दिनांक 26 मार्च 2012 रोजी पोस्टाने अरविंद केजरीवाल यांना पाठवले.

बरेच दिवस केजरीवालांकडून काहीच उत्तर आले नाही. जुलै 2012 रोजी केजरीवालांच्या स्वराज या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुस्तक प्रकाशनानंतर साधारण 2/3 महिन्यांनी अजयपाल नागरांच्या वाचनात हे पुस्तक आले. आणि त्यांना धक्काच बसला. त्यांच्या भारतीय राजव्यवस्था या पुस्तकाची सरळ सरळ नक्कल म्हणजे स्वराज पुस्तक आहे, हे त्यांच्या लक्षात आले. (याचा अर्थ जे पुस्तक आम आदमी पक्षाची गीता आहे ते पुस्तक म्हणजे चक्क साहित्यचौर्याचा प्रकार आहे.) अरविंद केजरीवालांनी विश्वासघात केल्याची भावना त्यांच्या मनात घर करुन गेली.

अजयपाल नागरांनी दि. 18 डिसेंबर 2012 रोजी पोलिस उपमहानिदेशक कानुन व्यवस्था लखनौ यांच्याकडे अरविंद केजरीवालांच्या विरोधात तक्रार केली. तसेच नोएडा जिल्हा न्यायालयातही दाद मागितली आहे. भारताच्या राष्ट्रपतीनाही दि. 1 जानेवारी,2014 रोजी पत्र पाठवून न्याय देण्याची विनंती केली. अण्णा हजारे यांना पत्र पाठवले. खरच अजयपाल नागरांना न्याय मिळेल का ? खरोखर अरविंद केजरीवालांनी साहित्यचौर्याचा प्रकार केला आहे का ? याचे उत्तर केजरीवालांकडुन अजयपाल नागर यांना व भारतातील आम आदमीला मिळेल का?

सर्व राजकीय पक्षांना माहितीच्या अधिकारात आणले पाहिजे असे म्हणणारे अरविंद केजरीवाल स्वत: मात्र माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या पक्षाला दि. 30 ऑक़्टॉबर 2013 रोजी दिल्लीतील न्यायभूमी या स्वयंसेवी संस्थेच्या सचिवाने (राकेश अग्रवाल) माहितीच्या अधिकारात विचारलेल्या 13 प्रश्नांची उत्तरे देण्याचे पक्षाने सोईस्कररित्या टाळले. निवडणूक काळात केजरीवालांच्या प्रचारफेरी करीता किती पैसे खर्च झाले ? पक्षाला एकूण किती देणग्या मिळाल्या? किती खर्च झाले? सभासदांची माहिती, पक्षाच्या बॅंक व्यवहाराची माहिती, लोकसभा उमेदवारांची निवड पध्दती काय आहे? यांसारखे प्रश्न विचारले होते. स्वत:ला माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणवून घेणारे, आम आदमीच्या पैशातून पक्ष चालवणारे केजरीवाल आम आदमीलाच माहिती देण्याचे का टाळत आहेत?

अरविंद केजरीवालांच्या आणि मनीष सिसोदियांच्या सामाजिक/राजकीय जीवनाचा आर्थिक साथीदार जर कोण आहे, तर त्याचे उत्तर आहे अमेरिकेची फोर्ड फाउंडेशन. अरविंद केजरीवाल व मनीष सिसोदिया यांची दिल्लीस्थित एक स्वयंसेवी संस्था आहे. संस्थेचे नाव आहे कबीर. या संस्थेला फोर्ड फाउंडेशनकडुन 2005 साली 1 लाख 72 हजार अमेरिकी डॉलर आणि 2008 साली 1 लाख 97 हजार अमेरिकी डॉलर, 2011 साली 2 लाख अमेरिकी डॉलर देणगी रुपात मिळाले. 2006 साली अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया या दोघांना रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त झाला.वर्ष 2000 पासून उदयोन्मुख नेते (लिडर) या विभागाकरीता मिळणार्‍या रेमन मॅगसेसे पुरस्काराला पुन्हा फोर्ड फाउंडेशनच पुरस्कृत करते. फोर्ड फाउंडॆशन आणि अमेरिकी गुप्तचर संघटना सी. आय. ए. यांचे घनिष्ठ संबंध आहेत. याविषयी अधिक माहितीकरिता http://petras.lahaine.org/?p=87 या लिंक वर जाउन जेम्स पेट्रास (न्युयॉर्क बिनहॅम्टन विद्यापीठातील समाजशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक) यांचा The Ford Foundation and the CIA : A documented case of philanthropic collaboration with the Secret Police हा लेख वाचावा.

रेमन मॅगसेसे च्या संकेतस्थळावर जाउन अरविंद केजरीवाल यांची माहिती पाहिल्यास, त्या माहितीच्या सर्वात शेवटी व संदर्भामध्ये पहिला संदर्भ हा अमेरिकी गुप्तहेर संघटना सी आय ए चा सापडतो. आता याला केवळ योगायोग म्हणायचे का ? मॅगसेसे पुरस्कार मिळाला 2006 साली, त्याआधीपासून सी आय ए केजरीवालांची माहिती का मिळवत होती, असा प्रश्न पडतो.

असे हे स्वत:ला सत्याचा पुतळा किंवा तिसरे गांधी म्हणवुन घेणारे अरविंद केजरीवाल. त्यांनी वरील प्रश्नांची उत्तरे पारदर्शकतेचा महामेरु म्हणून द्यायला हवी.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?