या सरदारजींनी ते साध्य केलंय जे चक्क थॉमस एडिसनला देखील जमलं नव्हतं…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आज आपण सगळे रात्री उजेडात बसू शकतो ते थॉमस अल्वा एडिसन ह्यांच्या कृपेमुळे! त्यांनी प्रयत्न करत करत विजेच्या दिव्याचा शोध लावला आणि जगाला भयाण अमावस्येच्या रात्री सुद्धा उजेडात काम करता येऊ लागले.

फक्त विजेचा दिवाच नाही तर त्यांनी ग्रामोफोन, मोशन कॅमेरा, फिल्म, फोनोग्राफ, व्हिटास्कोप, मायमोग्राफ, कायनेटोफोन, क्वाड्रोप्लेक्स टेलिग्राफ, व्हॅक्युम डायोड, कार्बन मायक्रोफोन हे आणि असे असंख्य शोध लावून संपूर्ण मानवजातीचे आयुष्य अत्यंत सुकर आणि आधुनिक करण्यात मोलाचे योगदान दिले आहे.

म्हणूनच त्यांना फादर ऑफ इन्व्हेन्शन्स किंवा शोधांचे जनक असे म्हटले जाते.

 

edison inmarathi
thomsoninda.com

ते ज्या स्थानी आहेत, तिथे पोहचणे अनेक शास्त्रज्ञांचे स्वप्न असते. आणि ही कामगिरी करून दाखवणारे एक भारतीय संशोधक आहेत.

त्यांनी विविध शोध लावण्यात थॉमस एडिसन ह्यांच्या स्थानापर्यंत पोहोचण्याची कामगिरी तर केली आहेच, पण त्या ही पलीकडे जाऊन त्यांनी खुद्द थॉमस एडिसन ह्यांच्या पेक्षाही जास्त पेटन्ट मिळवून आज ते जगातील सातवे सर्वोत्तम इन्व्हेंटर झाले आहेत.

जगात भारताची मान उंच करणारे हे शास्त्रज्ञ आहेत सरदारजी गुरतेज संधू!

 

Gurtej-Sandhu inmarathi

 

गुरतेज संधू हे भारतीय वंशाचे संशोधक आहेत आणि त्यांनी आजवर १३२५ इतके पेटन्ट मिळवले आहेत जे थॉमस एडिसन ह्यांच्या पेक्षाही जास्त आहेत.

थॉमस एडिसन ह्यांच्या नावावर १०८४ इतके पेटन्ट आहेत. म्हणूनच गुरतेज संधू ह्यांचे नाव सर्वात जास्त उत्पादनशील संशोधनकांच्या (मोस्ट प्रॉलिफीक इन्व्हेंटर्स) यादीत सातव्या क्रमांकावर आहे.

सध्या गुरतेज संधू हे अमेरिकेत आयडाहो ह्या राज्यात वास्तव्याला आहेत आणि ते मायक्रॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचे उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिडेंट) आहेत. तसेच ते संशोधनाच्या कार्यात देखील व्यग्र असतात.

संधू ह्यांचा जन्म लंडन येथे झाला असला तरी त्यांचे शिक्षण भारतातच झाले. संधू ह्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या कौशल्यांना सगळीकडून मागणी होती. त्यांनी आयआयटी दिल्ली येथून त्यांचे पदवीचे शिक्षण घेतले.

ते इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. आणि त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलायना येथून १९९० साली भौतिकशास्त्रात पीएचडी मिळवली.

 

gurtej sandhu inmarathi
Idaho Statesman

पीएचडी झाल्यानंतर त्यांच्या हातात मोठ्या कंपन्यांकडून आलेल्या जॉब ऑफर्स होत्या. पण त्यांच्या एका प्रोफेसरांनी त्यांना सांगितले की,

“त्या मोठ्या कंपन्यांमध्ये तुला एका साच्यात काम करावे लागेल कारण सध्या तुझ्याकडे कामाचा अनुभव नाही. पण मायक्रॉनमध्ये गेलास तर तुला तुझ्या पद्धतीने काम करण्याचे स्वातंत्र्य मिळेल आणि सर्व प्रकारचे इंजिनियरिंग प्रॉब्लेम्स सोडवण्याचा अनुभव मिळेल. आणि जरी चुकून मायक्रॉन कंपनी बंद झाली तरी तुला दुसरी नोकरी नक्कीच मिळेल.”

त्यांना अनेक चांगल्या मोठमोठ्या अमेरिकन कंपन्यांत काम करण्याची संधी मिळाली असती. पण त्यांनी तेव्हा एक छोटेसे स्टार्ट अप असलेल्या मायक्रॉन टेक्नॉलॉजी असलेल्या कंपनीत काम करण्याचे ठरवले.

कारण त्या कंपनीत त्यांना स्वतःचे ज्ञान वापरण्याची आणि स्वतःबरोबरच कंपनीला देखील पुढे नेण्याची संधी मिळाली असती. म्हणून त्यांनी मायक्रॉन टेक्नॉलॉजीबरोबर काम करण्याचा निर्णय पक्का केला.

gurtej sandhu 1 inmarathi

गुरतेज संधू ह्यांनी त्यांचे पहिले काही पेटन्ट मायक्रॉनमध्ये काम करता करताच मिळवले.

त्यांना सुरुवातीपासूनच इंटिग्रेटेड सर्किट्स, इलेक्ट्रॉनिक सर्किट ह्यात रस होता. हे सर्किट्स एका सेमीकंडक्टिंग मटेरियल पासून बनवले जातात. ते Moore’s Law संदर्भात काम करीत होते.

ह्या दरम्यान त्यांच्या लक्षात आले की सर्किटच्या एका एरियामध्ये ट्रान्झिस्टर्सची संख्या दर वर्षी दुप्पट होते आहे.

ह्या चिप्स मध्ये किती मेमरी युनिट्स बसू शकतील हे त्यांनी शोधून काढले. त्यांच्या ह्या यशस्वी शोधानंतर जगभरातील चिप उत्पादकांना संधू ह्यांच्या पेटन्टमुळे खूप फायदा झाला आहे.

Gurtej-patent-wall- inmarathi

 

जेव्हा संधू ह्यांनी मायक्रॉनमध्ये काम करणे सुरु केले तेव्हा कंपनीची अवस्था फारशी चांगली नव्हती. पण संधू ह्यांनी स्वतःची प्रगती करता करताच कंपनीला सुद्धा परत उभे केले. आता मायक्रॉनचे रूपांतर एका रिसर्च हब मध्ये झाले आहे.

त्यांच्या सर्वोत्तम चिप्स आज ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जातात. आज चिप बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये मायक्रॉनचे नाव एका उंचीवर आहे.

त्यांच्यासह फक्त सॅमसंग आणि एसके हायनिक्स ह्या दोनच कंपन्या आज मार्केटमध्ये पाय रोवून उभ्या आहेत. ज्या कंपन्या पूर्वी ह्या व्यवसायात होत्या, त्यापैकी बहुतांश कंपन्या आज नामशेष झाल्या आहेत.

सध्या संधू सेल्फ ड्रायव्हिंग कारच्या संशोधनावर काम करीत आहेत. तसेच इतर सुद्धा मोठ्या प्रोजेक्ट्सवर त्यांचे काम सुरु आहे. त्यांनी ह्यात सुद्धा अनेक पेटन्ट मिळवले आहेत.

 

Gurtej-Sandhu 2 inmarathi

वॉशिंग्टन येथील एका बिझनेस फोरकास्ट प्रकाशित करणाऱ्या कीपलिन्गर नावाच्या एका मासिकाने त्यांच्या शोधांची दखल घेतली आहे. गुरतेज संधू ह्यांच्या शोधांविषयी असलेल्या त्या लेखात असे लिहिले आहे की,

“संधू ह्यांनी मायक्रोचीप्सना टिटॅनियमचे आवरण देण्याची एक नवी पद्धत शोधून काढली आहे. ह्या पद्धतीत धातू ऑक्सिजनच्या संपर्कात न येता त्याला टिटॅनियमचे आवरण देता येते. ह्याने ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन चिप्स खराब होण्याची शक्यताच संपते.

सुरुवातीला त्यांना त्यांचा हा शोध किती महत्वाचा आहे ह्याबद्दल फारशी कल्पना नव्हती. परंतु आता बहुतांश चिप बनवणाऱ्या कंपन्या संधू ह्यांनीच शोधून काढलेली पद्धत वापरतात.”

 

sandhu inmarathi
Asia Samachar

संधू ह्यांना त्यांच्या सॉलिड स्टड डिव्हाइसेस आणि तंत्रज्ञानामधील शोधांसाठी इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्सकडून (IEEE) अँड्र्यू एस ग्रोव्ह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्याबद्दल बोलताना IEEE ने पुढील उद्गार काढले आहेत.

“His pioneering achievements concerning patterning and materials integration have enabled the continuation of Moore’s Law for aggressive scaling of memory chips integral to consumer electronics products such as cell phones, digital cameras and solid-state drives for personal and cloud server computers.”

मायक्रॉन मध्ये काम करताना संधू ह्यांनी जे शोध लावले त्याचे पेटन्ट जरी कंपनीला मिळाले असले तरी संधू व त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना त्याचे क्रेडिट मिळाले.

प्रत्येक पेटन्टमागे त्यांना पूर्वी एक हजार डॉलर्स मिळत असत, आता त्यांना प्रत्येक पेटंट मागे दोन हजार डॉलर्स इतके मानधन (शेअर) मिळतात.

मायक्रॉन कंपनीचे बोईस स्टेट युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे. त्यामुळे संधू गेली पंधरा वर्षे इंजिनियरिंगचे विद्यार्थी आणि प्रोफेसर ह्यांना देखील मार्गदर्शन करीत आहेत.

GurjetWithStudents inmarathi

 

संधू ह्यांच्या पत्नीचे नाव सुकेश असून त्यांना दोन गुरित आणि सनी अशी दोन मुले आहेत. त्यांची दोन्ही मुले आज यशस्वी आयुष्ये जगत आहेत.

गुरतेज ह्यांच्याविषयी बोलताना लोक म्हणतात की ते अत्यंत प्रामाणिक व नम्र व्यक्ती आहेत. त्यांच्या आयुष्यात ते त्यांच्या कुटुंबाला आणि मित्रपरिवाराला अनन्यसाधारण महत्व देतात.

गुरतेज संधू ह्यांनी अशी कामगिरी करून दाखवली आहे की ज्यामुळे प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान वाटेल. त्यांच्या पुढील सर्व संशोधनासाठी त्यांना शुभेच्छा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?