'"हिंदुराष्ट्र" : हिंदूंना उपयुक्त की अपायकारक?

“हिंदुराष्ट्र” : हिंदूंना उपयुक्त की अपायकारक?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | इंस्टाग्राम

===

लेखक: डॉ अभिराम दिक्षित

===

मी हिंदु हितवादी आहे. या समाजाच्या हिताच्या चष्म्याने पाहिल्यास, हिंदु राष्ट्राच्या प्रस्थापित कल्पना, स्वप्ने आणि घोषणा या हिंदु समाजासाठी घातक आहेत, त्याच्या मुळावर येणाऱ्या आहेत असे माझे मत आहे. हिंदु राष्ट्राच्या काही पोप्युलर संकल्पना क्रमाने पाहुया. आणि शेवटी योग्य पर्याय निवडूया.

हिंदूची व्याख्या करण्यासाठी फार भानगडी करण्याची गरज नाही. ज्याचा जन्म दाखल्यावर हिंदु असे लिहिलेले असते आणि सज्ञान झाल्यावर दाखला बदलत नाही तो हिंदु होय.

 

hindu inmarathi
financialexpress.com

१. सध्याच्या भारताचे हिंदु राष्ट्र करणे हा एक पर्याय आहे. म्हणजे नेमके काय करायचे? सध्याची सेक्युलर घटना बदलायची आणि हिंदु कायदे आणायचे? असे काही जुने कायदे आणायचे म्हणजे काय? स्मृती पुराणे यातील वैवाहिक, सामजिक कायदे आणायचे काय?

इसीस ला ज्याप्रमाणे शरीयत नावाच्या जुन्या इस्लामी कायद्याचे राज्य आणायचे आहे. तसे काही कारायचे आहे काय? हरकत नाही.

पण असे केले तर भारताचे हजारो तुकडे पडतील. हिदू समाजात जाते जाते कुलाचार: हा नियम आहे. कायदा म्हणजे आचार. प्रत्येक जातीचा कुळाचार, कुळधर्म वेगळा आहे. स्मृती पुराणावर आधारित विषम कायदे गृहयुद्धातून भारताचे स्मशान बनवतील.

२. अखंड हिंदुराष्ट्र नावाचा अजून एक प्रकार ही अतिशय लोकप्रिय आहे.

भारत + पाकिस्तान + बांग्लादेश = अखंड भारत = ३०% हून जास्त मुस्लिम लोकसंख्या. हे लोकशाही मार्गाने मुस्लिम राष्ट्र बनेल.

त्यातील मुस्लिमाना हिंदु करण्याच्या किंवा संपवण्याच्या योजना कोणी बनवत असेल तर ते मूर्ख आहेत. अमानुष आहेत. ते शक्य नाही. योग्य ही नाही.

 

akhand hindu rashtra inmarathi
readersreadblog

३. तिसरा मुद्दा मुस्लिमकेंद्री आहे. मुस्लिमांचा मताधिकार काढुन घेणे हे काही उजव्यांचे दिवास्वप्न आहे. मुर्खपणा आहे.

मुस्लिम राष्ट्र्वादी नाहीत – हे खरे असले तरी हिंदुसुद्धा राष्ट्रवादी नाहीत हे ही सत्यच आहे…जर राष्ट्रवादी असणे हा मताधिकाराचा क्रायटेरिया लावला तर सर्व प्रथम हिंदुचा मताधिकार काढुन घेतला पाहिजे.

आता शहाणपणा असा की हिंदुना राष्ट्रीय बनवणे हा हिंदुच्या राष्ट्रवादाचा अर्थ असायला हवा. हिंदुच्या धार्मिक परंपरेत राष्ट्रीय काही नाही. एक तर स्वत:ची जात आणि त्यापुढे गेले कि थेट मानवतावाद हि हिंदु मानसिकता आहे.

अध्यात्म, अष्ट दर्शने आणि परसेप्शन वर उभे असलेले तत्वज्ञान फार तर मनोरंजन करेल. कोणतेही सामजिक – राष्ट्रीय तत्व शिकवू शकणार नाही.

राष्ट्रवाद हे आधुनिक मुल्य आहे. पारंपारिक नाही. बंधुत्व हा त्याचा पाया आहे. समता, बंधुता आणि व्यक्ति स्वातंत्र्य ज्या काळात युरोपला स्फुरले – त्याच काळात राष्ट्रवाद स्फुरला आहे.

जपानवर वर अणुबॉम्ब पडल्यावर तिथल्या उच्चवर्णीय समुदायाने यापुढे हजार वर्षे गवत खाउन जगण्याची आणि जपान मधील मागास घटकांचा विकास करण्यासाठी स्वत:ची सत्तास्थाने सोडण्याची भूमिका घेतली होती. याला राष्ट्रवाद म्हणतात.

 

japan inmarathi
mozfiles.com

हे बंधुत्व सांस्कृतिक राष्ट्रवादातून येणार नाही. त्यासाठी आधुनिक, बुद्धिवादी विज्ञाननिष्ठ विचार हवा. हिंदु समाजाचे सर्वपक्षीय सामजिक, राजकीय आणि बौद्धिक नेतृत्व पंगु आहे. त्यामुळे या हिंदु समाजाच्या हितार्थ उभे राहणे अधिक अधिक आवश्यक ठरते.

मुळात राष्ट्रवाद हा सुद्धा आपद्धर्म होय. मानवता हे चिरंतन सत्य आहे. आजच्या काळात मात्र राष्ट्रवाद आवश्यक ठरतो. एकमेकाच्या उरावर बसलेले देश आहेत. भारताला आणि हिंदु समाजाला नष्ट करण्याची प्रतिज्ञा घेतलेले सक्षम शत्रू आहेत.

इसीस, चीन, पाकिस्तान वा भारतातील कडवे इस्लामी, अतिलाल डावे हे सारे शत्रू – शत्रू म्हणून असताना, मानवतेच्या गप्पा मारणे मुर्खपणा आहे. राष्ट्र म्हणजे एकमय लोक. त्यांच्याशी शत्रुत्व घेणे सोपे नाही.

हिंदुना राष्ट्रीय कसे बनवावे हाच प्रश्न आहे. राष्ट्रवाद शत्रूकेंद्री असतो. शत्रू नसतील तेव्हा तो स्विच ऑफ केला पाहिजे.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादाला एक धनात्मक मुल्य आहे. ते मुल्य बंधुत्वाचे आहे.

राष्ट्रवाद ज्याप्रमाणे “परके कोण?” हे ठरवतो, त्याचप्रमाणे “आपले कोण?” हे सुद्धा ठरवत असतो. भारतातल्या नागरिकांना बंधु मानणे – त्यासाठी त्याग, सचोटी, प्रामाणीकपणे बंधुत्व दाखवणे हि राष्ट्रवादाची उपयुक्त बाजू आहे.

आधुनिक, बुद्धिवादी, समान संधी असलेल्या समतापूर्ण एकमय राष्ट्राची उभारणी करायची असेल, तर हिंदुना आधी राष्ट्रवादी बनवले पाहिजे. निदान त्याने ८०% काम पुर्ण होईल! हिंदुना राष्ट्रवादी बनवणे असा अर्थ घ्यायला हवा. हे काम प्रस्थापित प्रती – पुरोगाम्यांच्या आवाक्याबाहेरचे दिसते.

 

rss inmarathi
boomlive.in

—————————–
बटाट्याचे पोते आणि किराण्याचे दुकान
—————————–

डॉ आंबेडकर म्हणाले होते, हिंदू म्हणजे काय – तर किराण्याचं दुकान. किराण्याच्या दुकानात आपण गेलो; कांदे मागितले कांदे मिळतील; बटाटे मागितले बटाटे मिळतील; किराणा मागून बघा; किराणा मिळणार नाही. किराण्याच्या दुकानात किराणा सोडून सगळं मिळतंय. हिंदूंच्या बाजारात हिंदू सोडून सगळं मिळतंय !

कार्ल मार्क्सने तुच्छतेने शेतकऱ्यांना बटाट्याच्या पोत्यांची उपमा दिली आहे. पोत्यात बटाटे गुंडाळलेले असतात; पोते ओतले कि ते सैरावैरा पळू लागतात. मार्क्सची उपमा मोठ्या संख्येने शेतकरी असलेल्या हिंदु समजाला तंतोतंत लागू पडते.

एका बाजूला नाकाला फडकी बांधणारे अहिंसक आहेत, मंदिरात हजारो बोकडांच्या बळिप्रथेत रक्तमासाचा चिखल तुडवणारे काळुबाइचे भक्तही आहेत. एका बाजूला ब्रम्ह्चार्याचे स्तोम आहे दुसर्या बाजूला योनिपुजा आणि घटकंचुकिचा खेळ आहे.

“पीत्वा , पीत्वा , पुन: पीत्वा” अशा रीतीने दारू पिउन अवग्रहण, वमन आणि पतन हे सायुज्य मुक्तीचे टप्पे आहेत, असे सांगणारे शैव तांत्रिक आहेत. सुक्ष्मातुन खून करणारे सनातनी आहेत, योगसामर्थ्याने सिद्धी प्राप्त करणारे साधक आहेत आणि मनुष्य विष्ठा खाउन तसलेच दैवी सामर्थ्य प्राप्त करणारे वारली जमातीचे भक्तही आहेत.

 

hindu inmarathi
dawn.com

पोराच्या अमेरिकेतील शिक्षणासाठी तयारी म्हणुन त्याला मातृभाषेत बोलायला बंदी घालणारे मध्यम वर्गीय प्रेमळ पालक आहेत, पोलिसांचा मार खाण्यासाठी तयारी व्हावी म्हणून मुलाना लहानपणा पासून लाथा बुक्क्यांनी बडवणारे तितकेच प्रेमळ पालक पारध्यात ही आहेत.

अंबानीच्या शौचकुपाला सोन्याच्या सीटा आहेत म्हणे, कचरापेटीत वाकवाकून अन्नकण शोधणाऱ्या आणि … “बाई, केर आहे का हो? ” असे विचारणाऱ्या कंगाल लहान मुली रस्तोरस्ती फिरत आहेत. (स.ह.दे. २३३)

——————————

भारतीय राष्ट्रवादासमोरची सगळ्यात मोठी अडचण हिंदुच आहेत. अशा या बटाट्याच्या पोत्याविषयी आत्मियता ठेवणे आणि त्यांच्या हिताचा विचार करणे मला नैतिकदृष्टया योग्य वाटते. हिंदुच्या हिताचा विचार केला पहिजे.

राष्ट्रवाद हे एक उपयुक्त मुल्य आहे. त्यात इतरांचा द्वेष करण्याचे कारण नाही. आत्मियता महत्वाची . जर ८०% हिंदु समाजाला राष्ट्रवाद आणि बंधुत्व शिकवता आले. तर उरलेल्या २०% ना ते शिकवणे अगदीच सोपे आहे. हिंदु राष्ट्रवादाचा असा अर्थ घेतला पाहिजे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on ““हिंदुराष्ट्र” : हिंदूंना उपयुक्त की अपायकारक?

  • August 27, 2019 at 3:05 pm
    Permalink

    “हिंदू” हा शब्दच असंविधानिक आहे,” भारतीय ” हा एकात्मता दर्शवतो… हिंदूच राष्ट्रवादी अन्य राष्ट्रवादी असे होत नाही आता खरे हिंदुत्व जे विवेकानंद यांना अपेक्षित होते ते राहिले नाही….

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?