' महापुरात अडकलेल्या जीवांना मदत हाच एकमेव ‘गोल’ ठेऊन केरळ मधल्या फुटबॉल टीमची एकी! – InMarathi

महापुरात अडकलेल्या जीवांना मदत हाच एकमेव ‘गोल’ ठेऊन केरळ मधल्या फुटबॉल टीमची एकी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

अनेकदा मैदानावर एकेका गोलसाठी एकमेकांवर चढाई करणारे, तीव्र स्पर्धा करणारे फुटबॉल खेळाडू महापुरासारख्या भयानक संकटाच्या वेळी, मात्र आपापसातील स्पर्धा विसरून लोकांच्या मदतीसाठी एक झाले.

८ ऑगस्ट पासून केरळमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. २०१८ची परिस्थिती ओळखून काही लोकांनी आधीच सतर्क होऊन घरे सोडली पण, काहींनी मात्र घरातच थांबणे उचित समजले. पण, पाण्याची पातळी वाढू लागताच या घरातून मदतीसाठी आवाज येऊ लागले.

पाण्याच्या वाढत्या पातळीचा धोका तर होताच सोबत अनेक ठिकाणी भूस्खलनाचे संकट देखील होतेच. अशात सरकारी मदत येण्याची वाट पाहत बसणे शक्यच नव्हते. मात्र सलग दुसऱ्या वर्षीही आलेल्या पुराच्या संकटाने सगळ्या फुटबॉल खेळाडूना एकत्र आणले.

इतरवेळी दोन गटात स्पर्धा सुरु असली की, त्या त्या गटाचे फॅन्स आपापल्या संघाला चीअरअप करण्यासाठी टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत असतात, एकमेकांच्या नावाचा जल्लोष करत असतात.

परंतु, जेंव्हा पुराच्या आपत्तीत सापडलेल्या लोकांना हात देण्याची वेळ आली तेंव्हा मात्र ही गटातटाची स्पर्धा मागे पडून निव्वळ माणूस असल्याच्या भावनेतून धडपड सुरु झाली.

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे केरळमधील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. ८ ऑगस्ट पासून राज्यभरातून १०२ लोकांनी पुरामुळे आपला जीव गमावला आहे.

लोकांनी आपापली घरे सोडून दुसरीकडे राहायला जायला सुरुवात केली असली तरी, १,११९ मदत केंद्रातून तब्बल १,८९,६४९ लोकानी आसरा घेतला आहे.

 

Daring_footballers Inmarathi
New Indian Express

तब्बल ३०० कुटुंबं पुराच्या या पाण्यात अडकून होती. केरळच्या कास्मा फुटबॉल संघाने यात अडकलेल्या स्त्रिया, लहान मुले तसेच वृद्धाना बाहेर काढले आणि सुरक्षित ठिकाणी पोचवले.

पाण्याची पातळी दिवसेंदिवस वेगाने वाढत होती अशात सरकारी मदतीची वाट पाहण्या इतका वेळ नव्हता, मदत करणे आवश्यक होते, अशी माहिती कास्मा फुटबॉल संघाच्या शाबिब अली आणि अझीम शक्केरी यांनी दिली.

त्या संघाचे सर्व सदस्य एकत्र आले आणि त्यांनी ट्रकचा टायर, ट्यूब, लाकडी फळी, यांच्या सहाय्याने या लोकांना पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी पोचवले.

२०१८ ची पूर परिस्थिती पुन्हा उद्भवेल या भीतीने, ७ ऑगस्टच्या सकाळी अनेक लोकांनी घरातून बाहेर पडायला सुरुवात केली होती. परंतु, काहीजण घरीच राहिले.

एकदा पाण्याची पातळी वेगाने वाढण्यास सुरुवात झाल्यावर लोकांनी मदतीचा धावा करण्यास सुरुवात केली. शाबीब आली सांगत होता.

“गेल्यावर्षी झालेल्या एका फुटबॉल टूर्नामेंट मध्ये आम्ही एकमेकांशी परिचित झालो होतो. गेल्या रविवारी कॉन्फरन्स कॉल करून आम्ही एकमेकांशी बोललो आणि पूरग्रस्तांच्या सुटकेसाठी मदत कार्य करण्याचे ठरवले,”मॅंचेस्टर युनायटेड सपोर्टर्स क्लब केरळचा सेक्रेटरी लायन्स जॉस सांगत होता.

 

Kerala_Flood Inmarathi
The Logical Indian

वॉटसप ग्रुप तयार केल्यानंतर आणि पूरग्रस्तांना मदतीचे प्रयत्न सुरु झाल्यानंतर यासाठी जे काही साहित्य लागणार होते ते आम्ही पानम्पिली नगर येथे जमवण्यास सुरुवात केली.

मॅंचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल, चेल्सा, आर्सेनल, टॉटेनहॅम, बार्सिलोना, आणि रिअल माद्रिदच्या सर्व समर्थकांनी आम्हाला मदत करायला सुरुवात केली आणि आमच्या कामात सक्रीय सहभाग द्यायला सुरुवात केली.

“आम्ही सर्व वेगवेगळ्या संघातून खेळत असलो तरी, मॅचनंतर आमच्यात कसलीच इर्षा किंवा शत्रुत्व नसते. एकत्र येऊन जर आम्ही हे काम केले तर त्याचा जास्त चांगला परिणाम होईल असे आम्हाला वाटले,” चेल्सा फॅन्सचा सदस्य जॉस अॅंटोनी सांगत होता.

या प्रत्येक संघाचे समर्थक मदतीसाठी सोशल मिडिया वरून आवाहन करत आहेत. इतकेच नाही तर पूरग्रस्त लोकांसाठी गरजचे असणारे साहित्य देखील ते जमा करत आहेत.

“गुरुवार सुट्टीचा दिवस असतो. त्यामुळे यादिवशी आम्हाला जास्त मदत होईल अशी अपेक्षा आहे. राज्याच्या सर्व भागात फुटबॉल प्रेमी पसरलेले आहेत, वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून ते देखील मदत कार्य करत आहेत.

साहित्य वाहून नेता येईल अशा काही साधनांची आम्हाला गरज आहे,” अंजन कुमार हा आणखी एक फुटबॉल प्रेमी सांगत होता.

“यावर्षी पाणी कितपत वाढेल याचा लोकांना अंदाज आला नाही. काही लोक आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर चढून बसले होते. पण, पुराच्या पाण्याचा ओघ प्रचंड असल्याने आम्ही त्यांना तिथून बाहेर पडण्याची विनंती केली आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवले,” २४ वर्षांचा अर्षद सांगत होता.

 

Kerala in flood Inmarathi
deccanherald.com

“आसपासच्या ज्या घरात पाणी नसेल अशा ठिकाणी आम्ही या लोकांना पोचण्यास मदत केली,” सैदुमोन थंगल म्हणाला तो, सुद्धा बाजारातून मदतीसाठी लागणारे साहित्य एकत्र करत होता.

सोमवार पासून सुरु झालेल्या पावसाने मंगळवार पासून केरळच्या अनेक भागात थैमान घातले आहे. हवामान खात्याने राज्याच्या आणखी काही भागात मुसळधार पावसातही शक्यता वर्तवली असून मच्छिमारांनी बोटी समुद्रात नेऊ नयेत असा इशारा देखील दिला आहे.

“एकत्र येऊन काम केल्याने काम प्रभावी तर होतेच पण, सांघिक भावनेतून मिळणारे बळ आणि आनंद वेगळाच असतो. हा आनंद खूप महत्वाचा आहे. आमच्या एकत्र येऊन केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना प्रतिसादही चांगला मिळाला हे पाहून जास्त आनंद होत आहे.

राज्यभरातील फुटबॉल प्रेमींमध्ये देखील एकीची आणि सांघिक भावना वाढली. एकत्र आल्याचे परिणाम आणि त्याचे फायदे या निमित्ताने जाणवले.

इतर वेळी आम्ही वेगवेगळ्या संघाच्या माध्यमातून खेळणारे प्रतिस्पर्धी असलो तरी, जेंव्हा कोणतीही आपत्ती कोसळेल तेंव्हा मात्र आम्ही आधी माणूस आहोत आणि माणुसकी हाच आमचा खरा धर्म आहे, याची आम्हाला सदैव जाणीव राहील,” लिव्हरपूल सपोर्टर्स क्लब, केरळचा सदस्य सॅमसन सोमराज म्हणाला.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?