नासिक की नाशिक? ऐतिहासिक दस्तावेज देताहेत खात्रीपूर्वक उत्तर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लेखक : – अनुराग वैद्य 

===

प्रत्येक गावाला किंवा शहराला त्याचा एक इतिहास असतो तसेच त्या गावाला किंवा शहराला त्याचे मूळ नाव देखील असते. ‘नासिक शहर’ देखील असेच प्राचीन आहे.

मुळात सध्या सगळे लोकं ‘नासिक’ या शहराच्या नावाचा उल्लेख हा ‘नाशिक’ असा करतात परंतु या शहराचे मूळ नाव ‘नासिक’ असेच आहे. दक्षिणेकडची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गोदावरी नदीचा’ उगम हा त्र्यंबक गावाला लागून असलेल्या ‘ब्रम्हगिरी’ पर्वतावर होतो.

‘नासिक’ शहरात शिरताना गोदावरी नदीचे पात्र फार विस्तारलेले दिसते. ‘नासिक’ शहर हे भारतातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांंपैकी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे.

प्राचीन काळामध्ये ‘नासिक’ शहराचे उल्लेख हे नासिक्य, जनस्थान, त्रिकंटक, तसेच पद्मनगर असे देखील आढळून येतात. रामायणामध्ये आलेल्या उल्लेखानुसार दंडकाराण्यातील ‘जनस्थान’ म्हणजेच ‘नासिक’.

‘नासिक’ मधील ‘पंचवटी’ म्हणजे पाच ऋषीकुमारांचे प्रतिक असून हे शापित ऋषिकुमार प्रभू रामांच्या पावनस्पर्शाने मुक्त झाल्याचे मानतात अशी एक कथा आहे. राम, लक्ष्मण, सीता गोदावरीच्या तीरावर जनस्थानामध्ये पंचवटी येथे पर्णकुटी बांधून राहिले होते ते ठिकाण म्हणजेच ‘नासिक’.

 

City-Nashik Inamarathi
Deshdoot

रामाशी विवाह करण्याची अभिलाषा धरून आलेल्या शुर्पणखेचे कान आणि नासिका म्हणजे नाक, लक्ष्मणाने तलवारीने छाटून टाकले ते इथेच. म्हणून या स्थानाला ‘नासिक’ म्हणू लागले.

अशी एक उपपत्ती आपल्याला पाहायला मिळते. दुसरी उपपत्ती जी आहे ती अशी गोदावरीच्या तीरावरील नऊ टेकड्यांवर हे गाव वसले म्हणून ते ‘नवशिख’ पुढे त्याचा अपभ्रंश ‘नाशिक’ या नऊ टेकड्या आपल्याला नासिक शहरात आजही पाहायला मिळतात.

१) जुनी गढी २) नवी गढी ३) जोगवाडा टेक ४) पठाणपुरा टेक ५) म्हसरूळ टेक ६) डिंगरआळी टेक ७) सोनार अळी टेक ८) गणपती डोंगर ९) चित्रघंटा टेक.

कृतेत पद्मनगरं त्रेतयांंतू त्रिकंटकं |
द्वापारातु जनस्थान कलौ नासिक मुच्यते |
कशी पुरी च केदारी महाकलोथ नासिकम् |
त्र्यंबकं च महाक्षेत्रंं पंचदीपा इमे भुवि |

 

Trimbakeshwar_nj Inmarathi
Wikipedia

हा श्लोक पद्मपुराणातील असून प्रत्येक युगातील नासिकच्या नावाची माहिती आपल्याला यामध्ये मिळते. म्हणजेच पद्मपुराण जेव्हा लिहिले गेले त्याच्यापूर्वीपासूनच ‘नासिक’ हा उल्लेख सापडतो.

‘नासिक’ शहराचा जो प्राचीन इतिहास उपलब्ध आहे त्यामध्ये इ.स. पूर्व २ ऱ्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात ‘सातवाहनांची’ सत्ता उदयास आली त्याच्याही आधी ‘नासिक’ हे शहर संपूर्ण भारतात माहिती होते.

इ.स. पूर्व ५ व्या / ४ थ्या शतकात निर्माण झालेल्या वाड्.मयातून नासिकचा उल्लेख हा ‘नासिक्य’ असा आलेला आहे. कौटिल्याने देखील ‘नासिकचा’ उल्लेख हा ‘नासिक्य’ केलेला आहे. कात्यायनाच्या ‘वृत्तीकांत’ या ग्रंथात इ.स.पूर्व २५० मध्ये ‘नासिक्य’ हाच येतो.

नासिक आणि बौद्धधर्म यांचा संबंध हा प्राचीन काळापासून आपल्याला दिसून येतो. ‘महामायुरी’ या महत्वाच्या ग्रंथात ‘नासिक’ येथे सुंदरयक्ष असल्याचा उल्लेख आपल्याला मिळतो.

 

budhha-gautam-inmarathi
india.com

याच कालखंडामध्ये नासिक येथे संपूर्ण नासिक मध्ये प्रसिद्ध असलेली ‘त्रिरष्मी लेणी’ जिला लोकं पांडव लेणी संबोधतात त्या कोरल्या गेल्या. इ.स. १५० मध्ये प्रसिद्ध खगोलतत्ववेत्ता टाॅलेमी याने ‘नासिक’ शहराची नोंद हि ‘धर्मपीठ’ म्हणून केलेली आहे.

पतंजली याच्या महाभाष्य या ग्रंथात ‘नासिकचा’ उल्लेख येतो. जैन परंपरेनुसार जैनांचे आठवे तीर्थंकर ‘चंद्रप्रभ’ यांनी ‘नासिक’ येथे कुंतीविहार नावाचे मंदिर बांधले. हि नोंद इ.स. १४ व्या शतकातील ‘जीनप्रभूसूरींच्या’ ‘विविधतीर्थकल्प’ या ग्रंथामध्ये मिळते.

महानुभाव पंथाचे संस्थापक ‘चक्रधर स्वामी’ ‘नासिक’ मध्ये काही काळ फिरल्याचे संदर्भ हे यांच्या ‘स्थानपोथी’ या महत्वाच्या ग्रंथात मिळतात. स्वत: चक्रधर स्वामी हे नासिक येथे पंचवटी येथे वास्तव्यास होते.

 

Chakradhar swami Inmarathi
YouTube

या काळात त्यांनी रामनाथ, महालक्ष्मी, विनायक आदित्य, कपालेश्वर, या ठिकाणी भेटी दिल्या असे उल्लेख आहेत. नंतर ते गोवर्धन, त्र्यंबक, अंजनेरी, या ठिकाणी गेले आणि परत ‘नासिक’ येथे आले आणि ‘नासिक’ मधून बीड येथे ते निघाले असे उल्लेख आपल्याला मिळतात.

इ.स, १३४७ पर्यंत ‘नासिक’ यादवांच्या अधिपत्याखाली होते. त्यानंतर इ.स. १४९० सालापर्यंत येथे ‘बहामनी’ सत्तेने निर्विवाद वर्चस्व राखले. तेव्हा देखील उल्लेख ‘नासिक’ असाच सापडतो.

इ.स. १४९० सालानंतर बहामनी सत्तेची शकले उडाली त्यानंतर ‘नासिक’ हे शहर ‘अहमदनगरच्या निजामशहा’ याच्या ताब्यात इ.स. १६३६ पर्यंत होते.

इ.स. १६४४ मध्ये ‘समर्थ रामदास स्वामी’ पंचवटी येथील रामउपासकाला लिहिलेल्या पत्रामध्ये नासिकचा उल्लेख हा ‘जनस्थान’ असा करतात तो श्लोक पुढीलप्रमाणे:-

जनस्थान गोदातटी | परमपावन पंचवटी ||
येथे घडली कृपादृष्टी | रघुत्तमरायाची ||

 

Ramdas Swami Inmarathi
www.shrisamarthsevamandal.org

शिवाजी महाराजांच्या काळात देखील ‘नासिक’ हे दिसून येते. दक्षिणेची काशी असलेल्या ‘नासिक’ शहराचे नाव मोगल बादशहा औरंगजेब याने ‘गुलशनाबाद’ असे केले.

इ.स. १७६० ते १८१८ पर्यंत येथे मराठ्यांच्या राज्यात आपल्याला ‘नासिक’ हाच मूळ उल्लेख मिळतो. इ.स. १८१८ नंतर ‘नासिक’ शहरावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला तेव्हा देखील ‘नासिक’ हाच उल्लेख आपल्याला मिळतो.

इ.स. १८७० साली इंग्रजांनी ‘नासिक’ शहराला जिल्ह्याचा दर्जा दिला आणि जे गॅॅझेटीयर काढले त्याचे नाव देखील ‘बॉम्बे प्रेसिडेंसी नासिक डिस्ट्रीक्ट गॅॅझेटीयर’ असे ठेवले. एकंदरीत सगळे उल्लेख संदर्भ पहिले तर मूळ नाव हे ‘नाशिक’ असे नसून ‘नासिक’ आहे हे सिद्ध होते.

संदर्भग्रंथ:-

१) नासिक दर्शन:- पुरातत्व व वास्तूसंग्रहालये विभाग, महाराष्ट्र शासन.
२) इतिहास खंड १:- आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण:- संपादक डॉ. रा.श्री.मोरवंचीकर.
३) तपोभूमी नाशिक:- रमेश पडवळ
४) Bombay Presidency Nasik District Gazeteer:- 1883.
5) भारताचे संस्कृतीवैभव:- डॉ. शोभना गोखले
६) नासिक जिल्ह्याचे वर्णन:- दामोदर गणेश भालेराव आणि विठ्ठल खंडेराव क्षीरसागर, १९२४
७) सातवाहन नृपती आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख.:- वा. वि. मिराशी, १९७९
८) Cave Temples of India:- James Burgess and James Ferguson, 1870
९) दक्षिण काशी पैठण:- रा.श्री. मोरवंचीकर, १९८५
१०) महाराष्ट्र ज्ञानकोष:- श्री. व्यं. केतकर, १९२५
११) नाशिक दर्शन:- भारतीय इतिहास संकलन समिती, १९९१
१२) स्थानपोथी: एक पुरातत्वीय अभ्यास:- डॉ अरुणचंद्र पाठक

– अनुराग वैद्य

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?