' सामान्य भारतीयांमधील "हिरो"ला वेगवान चाक देणाऱ्या साडे तीन हजार कोटींच्या उद्योगाची कहाणी

सामान्य भारतीयांमधील “हिरो”ला वेगवान चाक देणाऱ्या साडे तीन हजार कोटींच्या उद्योगाची कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मंडळी, बालपणीचा काळ सुखाचा असं आपण नेहमीच म्हणतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा लहान मुलं आनंदून जातात. त्यांना तो आनंद मिळवून देण्यासाठी पालक नेहमीच झटत असतात.

आता मुलांना खूप साधनं मिळत आहेत, टीव्ही, मोबाईल, आयपॅड, विविध खेळणी, पण पूर्वीच्या मुलांना फार कमी खेळणी असायची. तरीपण आत्ताची मुलं आणि पूर्वीची मुलं यात एक कॉमन गोष्ट आहे की जी मिळण्यासाठी पूर्वीपण मुलं हट्ट करत होती आणि आजही करत आहेत.

तुम्ही म्हणाल, ‘काय हे? आत्ताची मुलं कुठे पूर्वीच्या गोष्टी वापरतात?’ पण आहे अशी एक गोष्ट की जी पूर्वापार चालत आली आहे.
प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. मूल लहान असताना त्याला खुळखुळा, मग लाइटवरची खेळणी, मग बाबा गाडी, मग तीन चाकी सायकल.

तीन चाकी सायकल चालवली नाही? अशी मुलं फार कमी बघायला मिळतील. लहान मुलांना तीन चाकी सायकल घेऊन द्यायचीच हा जणू नियमच झालाय.

या तीन चाकी सायकल वापरून तिचा पार खुळखुळा करून टाकल्यावर मुलाचा एकच हट्ट सुरू होतो, ‘‘मला सायकल कधी घेणार?’’ बघा आहे ना ही खरी गोष्ट? सायकल घेऊन द्यायला पालकही कुरकुर करत नाहीत आणि मुलंही सायकल नको असं कधीच म्हणत नाहीत.

 

Three Wheel Cycle Inmarathi

 

कोट्यावधी भारतीय मुलं ५ ते ८ वर्षांपर्यंतच्या काळात सायकल घेतात, ती शिकतात, कधीतरी धडपडतात. पण ती घेऊन बॅलन्सच्या चाकाशिवाय चालवायला लागेपर्यंत प्रयत्न अखंड सुरू असतात. पालकांना पण ती घेऊन देण्यात धन्यता वाटते.

कधी वाढदिवसाचे औचित्य साधून, तर कधी पहिल्या नंबरचं किंवा एखाद्या स्पर्धेचं बक्षीस म्हणून सायकल घेऊन दिली जाते. ही सायकल मग ती श्रीमंत कुटुंब असो किंवा सर्वसामान्य कुटुंब असो सायकल मिळवणे व ती चालवायला शिकणे हे मुलांसाठी व पालकांसाठी एक अतिशय आनंदाचा क्षण असतो.

या सायकलची निर्मिती कुणी केली माहीत आहे? कै. ओ. पी. मुंजाळ. हिरो सायकल्सचे ते संस्थापक होते. त्यांनी १९५६ मध्ये म्हणजेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतात हिरो सायकल्सची स्थापना केली. तेव्हा राष्ट्र पण नुकतंच स्वतंत्र झालं होतं त्यामुळे तेही तरुणच होतं.

तरुण मुलाला स्वातंत्र्य हवं असतं ते सायकल मुळे मिळतं तसंच तरुण राष्ट्राला पण स्वातंत्र्याची चाके हवी होती.

हिरो सायकल्स हा छोटासा बिझनेस होता, पण मुंजाळ यांच्या लीडरशीपने तो मोठा केला. त्यांच्या नेतृत्वाखाली जगातील सगळ्यात मोठी सायकल बनविण्यात त्यांनी यश मिळवले.

 

Hero Cycle Inmarathi

 

हीच हिरो सायकल कंपनी आता वर्षाला पाच मिलियन सायकल तयार करते. त्याचं प्राथमिक उत्पादनाचं युनिट लुधियानात आहे. २५० पेक्षा जास्त पुरवठादार आणि २८०० डीलरशिप आहेत. ही कंपनी जर्मनी, पोलंड, आफ्रिका आणि फिनलँड यासह ७० देशांमध्ये निर्यात करते.

हिरो मोटर्स कंपनी हाही मुंजाळ यांचा कौटुंबिक व्यवसाय असून ३,३०० कोटी रुपयांचा त्याचा व्यवसाय आहे त्याचे अध्यक्ष पंकज एम मुंजाळ आहेत. त्यांचा मुलगा अभिषेक मुंजाळ हा या कंपनीचा डायरेक्टर असून या कंपनीमध्ये मन लावून काम करत आहे.

भारतात सायकल बनविणार्‍या कंपन्या फार थोड्या आहेत. अभिषेक म्हणतो, ‘‘१०० पैकी ६ जण या व्यवसायात उतरतात.’’ पण हिरो सायकलने मात्र सगळ्यांच्या पलीकडे जाऊन विचार केला आहे आणि सायकलिंगची संस्कृती जपली आहे.

या व्यवसायाला सुरुवात कशी झाली? तर ओ. पी. मुंजाळ यांचा जन्म पाकिस्तानात झाला. जेव्हा त्यांनी सायकलचा व्यवसाय सुरू केला तेव्हा ते १६ वर्षांचे होते.

विभाजनानंतर पोटासाठी काहीतरी कामधंदा करण्याच्या हेतूने ओ. पी. मुंजाळ यांचे कुटुंब ब्रिजमोहन लाल मुंजाळ, दयानंद मुंजाळ आणि सत्यानंद मुंजाळ या भावांना बरोबर घेऊन अमृतसरला सायकलच्या स्पेअरपार्टचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आले.

 

O.P. munjal Inmarathi

 

नवीन नवीन प्रयोग करत राहिल्यामुळे काही वर्षांतच हा व्यवसाय वाढू शकला. त्यानंतर ओ. पी. मुंजाळ यांना सुट्टे भाग बनवायला जमू लागले. मग त्यांनी त्याची पूर्ण सायकल बनवून पाहिली आणि मग ते प्रगतीची शिखरे चढतच गेले, त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

अभिषेक मुंजाळ यांनी सांगितले की, ‘अल्प साधनं असूनही ओ. पी. मुंजाळ यांनी महत्त्वाकांक्षेमुळे यश मिळवले. स्वातंत्र्योत्तर देशाच्या वाटचालीसाठी स्वस्त आणि प्रभावी वाहतुकीचे साधन निर्माण करण्याकडे त्यांचे लक्ष होते.’’

१९७५ मध्ये ही कंपनी भारतातील सर्वांत मोठी सायकल उत्पादक कंपनी बनली तर १९८६ मध्ये एका दिवसात सर्वाधिक बाईक बनविल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदण्याचा मान मिळवला.

पूर्वीच्या काळी आत्तासारखा गाड्यांचा सुळसुळाट नव्हता सायकल जास्त प्रमाणात वापरली जायची. कमी खर्चात कुठेही जाता येत होतं आणि मुख्य म्हणजे बाकीच्या वहानांपेक्षा जलद. तेव्हा बैलगाडी, घोडागाडी ही साधनं होती किंवा जास्तीत जास्त चालत जाणे हा पर्याय होता.

त्यामुळे त्या पार्श्‍वभूमीवर हिरो सायकल आली आणि लोकांना दिलासा मिळाला. आताही जरी वाहतुकीची साधनं मोठ्या प्रमाणावर झाली आहेत तरी सायकल मागे पडलेली नाही.

 

Old model Inmarathi

 

लहान मुलांसाठी तर सायकल हा पर्याय वापरायला सोपा आणि सुरक्षित आणि आता बरीच मोठी लोकंही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सायकलचा वापर करताना दिसतात. त्यामुळे सायकल व्यवसाय वाढतच आहे कमी होत नाही.

चांगली व्यवस्थापन पद्धती, पारदर्शकता आणि त्रुटी तपासणी व त्यावर योग्य पर्याय निवडून काढण्यात हिरो सायकलला यश आले आहे त्यामुळे त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच आहे.

काही मोठ्या आणि जुन्या उद्योजकांना डिजिटलची लाट सर्वत्र असल्यामुळे उद्योगधंद्यात आव्हान वाटते, पण अभिषेकसारख्या तरुणाने हिरो सायकलबरोबर छान जुळवून घेतले आहे. व्यवसायात जर नवीन नवीन गोष्टी अ‍ॅड केल्या गेल्या तर फायदा नक्की होतो.

अभिषेक म्हणतात, ‘‘आम्ही ग्राहक आणि उत्साही लोकांशी नियमितपणे कनेक्ट राहतो, आमच्या पुढच्या पिढीतील हिरो स्प्रिंट स्टोअरमध्ये सिम्युलेटेड राइड्स आणि मोबाईल अ‍ॅप उपलब्ध आहेत ज्यामुळे खरेदीदारास दुरुस्ती व देखभालीचे वेळापत्रक बसल्या जागी मिळते.

फक्त नेट चालू पाहिजे. मग बाहेर जायची गरज नाही.’ जुन्या-नव्याची सांगड घालून त्यांनी व्यवसाय असा वाढवला आहे.  हिरो सायकल्स ही देशातील सर्वांत मोठी सायकल कंपनी आहे.

आर्थिक वर्षांत अजून जास्त व्यवसाय करण्याचा आणि नवीन नवीन प्रॉडक्टस् लाँच करण्याचा कंपनीचा मानस आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात कंपनीची वाढ ८-९ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर गेली आहे. पुढील सहा महिन्यात अशीच वाढ होण्याची कंपनीला अपेक्षा आहे.

 

new model Inmarathi

 

२०१८ मध्ये कंपनीने सुमारे ५ दशलक्ष सायकल्स विकल्या, त्यांनी एकूण उत्पादन ७ दशलक्षापेक्षा कमी केलं होतं.  पंकज मुंजाळ म्हणाले, ‘‘एप्रिल/मे पर्यंत आम्ही आमची १३००० सायकल बनविण्याची कॅपासिटी २०,००० नी त्यांची पार्टनर कंपनी जस्ट बाय सायकल्स बरोबर चेन्नईमध्ये सहा दुकाने उघडली आहेत.

राष्ट्रीय पातळीवर आता २५० दुकाने झाली आहेत आणि या आर्थिक वर्षाअखेर त्यांचा ४०० दुकाने उघडण्याचा मानस आहे.  मुंजाळ म्हणाले, ‘‘दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीमुळे आणि जीएसटीमुळे बाजारातील शेअरचा हिस्सा २७ टक्क्यांपर्यंत आला होता.

पण आता सर्व स्थिती पूर्ववत होत आहे आणि तो हिस्सा आता ३५ पर्यंत वाढला आहे. तो ३९-४० टक्क्यांपर्यंत कसा वाढेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणतात की, ‘दक्षिणेत विशेषत: चेन्नई आणि बंगळूरमध्ये लोक आरोग्य, करमणूक यासाठी पैसे खर्च जास्त करतात.

आम्ही आता नवीन इबाईक सुरू करत आहोत त्याची किंमत २७,००० आहे. तेव्हा तिथली लोकं ही विकत घेतील अशी आशा आहे. ई-बाईक युरोपमध्ये जास्त प्रमाणात चालतात त्यामुळे त्याचे डिझाईन युरोपमधून ते शिकत आहेत.

आपल्या बजेटमध्येही विद्युत वाहनांवर काही सवलती दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे विद्युत वाहनं घेणं कस्टमरच्या दृष्टीनं फायद्याचं ठरू शकेल व कंपनीचा बिझनेसही वाढेल.

मेहनत आणि ग्राहकाची नस सापडली की बिझनेस चांगला होताच. तसंच या हिरो सायकल्सचं आहे. त्यांना ग्राहकाला काय हवं याची योग्य कल्पना आलेली आहे आणि त्यासाठी सतत नवीन नवीन प्रयोग करण्याची म्हणजेच कष्ट करण्याचीही त्यांची तयारी आहे त्यामुळे त्यांचा उद्देश नक्कीच सफल होईल यात शंका नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?