२८ मुलाखतींमध्ये नकार मिळाल्यानंतर तिला सापडलेला मार्ग यशापर्यंत घेऊन गेलाय!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
लहानपणापासून शक्यतो, “तू हे करू शकत नाहीस” किंवा “तू हे करू शकणार नाहीस” हेच ऐकत ऐकत ती मोठी झाली. मग, ते बाहेर मुलांसोबत जाऊन खेळणं असो की शिक्षण असो. काही बाबतीत ती मुलगी आहे म्हणून बंधनं होती तर काही बाबतीत ती सक्षम नाही म्हणून.
पण, तिच्यातील दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे या सगळ्या अडथळ्यांवर मात करण्याची हिम्मत तिला मिळाली आणि आज गीताने राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेत चार पदके मिळवून सिद्ध करून दाखवलं की तुमची इच्छाशक्ती तीव्र असेल आणि काही करून दाखवण्याची जिद्द असेल तर नक्कीच तुमच्यापुढे गगन ठेंगणे आहे.
ही गोष्ट आहे मुंबईच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या गीता चौधरीची. गीता ५-६ वर्षांची असेल तेंव्हाच ती पोलिओच्या विळख्यात सापडली आणि तिला दिव्यांगत्व आले.
तिच्या या असक्षमतेमुळे तिला कोणत्याही खाजगी शाळेत प्रवेश मिळाला नाही, परंतु दहावी पर्यंतचे शिक्षण तिने सरकारी शाळेतून पूर्ण केले. इथेही तिला कोणी खेळायला सोबती नसे किंवा कोणी तिच्याशी मैत्री करत नसे.
दुपारच्या वेळेत जेंव्हा इतर मुले मैदानी खेळाचा आनंद लुटत तेंव्हा गीता फक्त त्यांच्याकडे पाहत खेळाचा आनंद लुटण्याशिवाय काहीही करू शकत नसे कारण, बहुतेक पालकांनी तिच्याशी खेळी नका अशा सख्त सूचना मुलांना दिलेल्या असत. अशातच तिचे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले.

दहावी नंतर गीताने घरीच थांबावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. कारण, तिला बाहेर पडून शिक्षण घेणं किंवा नोकरी करणं जमणार नाही असे त्यांचे मत होते. परंतु गीताला घरी बसून कुणावर ओझं बनून राहण्याची इच्छा नव्हती.
तिला पुढचे शिक्षण पूर्ण करून नोकरी करण्याची इच्छा होती. पण, वडिलांनी पुढील शिक्षणाला ठाम नकार दिला आणि पैसे देणे सुध्दा नाकारले.
पण, गीताच्या आईची इच्छा होती की गीताने पुढे शिकावं इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः स्वावलंबी बनावं. आईच्या प्रोत्साहनामुळे गीताने कॉलेजला अॅडमिशन घेतलं, पण पुढचा खर्च कसा पेलायचा हा तिच्या समोरील सर्वात मोठा प्रश्न होता.
कारण, तिच्या शिक्षणावर पैसे खर्च करणं म्हणजे अपव्यय आहे असा तिच्या वडिलांचा समज होता. त्यामुळे त्यांच्याकडून काही मदत मिळेल ही आशाच गीताने सोडून दिली. पुढील शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी तिने नोकरी करण्याचा निश्चय केला.
वर्तमानपत्रातील जाहिराती पाहून तिने नोकरींसाठी मुलाखती देणे सुरु केले. पण एकाही ठिकाणी तिची निवड करण्यात आली नाही. एका महिन्यात गीताने २८ ठिकाणी नोकरीसाठी मुलाखती दिल्या परंतु सर्व ठिकाणी ती नोकरी करण्यास असक्षम असल्याचे कारण देत तिला डावलण्यात आले.
समाजाने ती कोणतेही काम करण्यास सक्षम नाही हे स्वतःच ठरवून टाकले होते. अगदी शाळेत असल्यापासून हा अलिप्तपणा किंवा काठावर बसवण्याचा अनुभव तिने घेतला होता. पण, पुढील आयुष्यात तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं.

अशा सगळ्या बऱ्या-वाईट अनुभवांवर मात करताकरता शेवटी ती अशा ठिकाणीच पोहोचली आहे की आज ती संपूर्ण तारूणाईसमोर तिने स्वतःच्या संघर्षातून एक आदर्श निर्माण केला आहे.
व्हीलचेअर बास्केटबॉल चाम्पियान गीता चौधरी ही आजच्या तरुणाईसाठी एक आशेचा दीपस्तंभ ठरली आहे. अर्थात तिचा इथवरचा प्रवास निश्चितच सुकर, साधासोपा अजिबात नव्हता. आयुष्यातील वळणावर तिने अनेक चढ-उतार अनुभवले आहेत.
आपल्या या यशामागील रहस्य सांगताना गीता म्हणते, “समाजाने घालून दिलेल्या बंधनात अडकून राहण्याची मानसिकता तिच्या जनुकातच नव्हती.”
जन्मतःच संघर्षाची दोन हात करत मोठी झालेली गीता जन्मजात लढवय्यी आहे. अडथळे तर तिच्या पाचवीला पूजले होते त्यामुळे त्यांकडे दुर्लक्ष करण्यात किंवा त्यांना टाळण्यात काहीच अर्थ नव्हता. म्हणूनच तिने या सर्व अडथळ्यांना तोंड देत त्यांवर मात करण्याचा प्रयत्न केला.
वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत गीता सर्वसामान्य मुलांप्रमाणेच ठणठणीत होती. परंतु, सहाव्या वर्षी ती थोडी आजारी पडली. डॉक्टरांनी पोलिओचे निदान केले आणि त्यावरील उपचाराचा भाग म्हणून त्यांनी तिला एक इंजेक्शन दिले.
पण, यामुळे परिणाम उलटाच झाला आणि गीताच्या दोन्ही पायांची हालचाल कायमची थांबली. अनेक वर्षांचा उपचारानंतर तिला एका पायावर उभं रहाता यायला लागलं ज्यामुळे कुबड्यांच्या आधाराने चालता येणं शक्य झालं.

परंतु, या शारीरिक दुर्बलतेपेक्षाही सामाजिकदृष्ट्या तिची जी अवहेलना होत होती ती गीतासाठी अत्यंत खेदाची बाब होती. वडिलांच्या आणि इतर नातेवाईकांच्या तीव्र विरोधाला आणि उपहासाला न जुमानता गीताने पार्टटाईम जॉब करत आपले बीकॉम आणि एमकॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
यानंतर तिने जेंव्हा मुलाखती द्यायला सुरुवात केली तेंव्हा देखील तीच्या या परिस्थितीमुळे तब्बल २८ ठिकाणी तिला नकार ऐकावा लागला. इतक्यावेळा नकार पचवूनदेखील शेवटी तिने मार्केटिंगचा जॉब मिळवला.
अर्थात तिने नोकरी करण्याला देखील तिच्या वडिलांची समंती नव्हती, या कारणास्तव त्यांनी तिच्याशी बोलणे टाळले. घरातून किंवा नातेवाईकांकडून सतत उपहास आणि अवहेलना मिळाल्यानेच गीतामध्ये एक लढवय्या बाणा निर्माण झाला. तिच्यातील या गुणांना तिच्या अनेक मित्रमैत्रिणींकडून देखील प्रोत्साहन मिळाले.
अशाच मित्रमैत्रिणींमध्ये नेहमी तिच्या सोबत असणारा आणि प्रत्येक नकारात्मक गोष्टीवर मात करुन तिच्यातील चांगल्या गुणांना प्रोत्साहन देणारा मित्र म्हणजे सुजित. त्याची आणि तिची ओळख कॉलेजमध्ये असतानाच झाली.
“सुजित म्हणजे माझं प्रेम होतं. मी आयुष्यात काहीतरी मोठी गोष्ट मिळवण्यासाठीच जन्माला आलेली आहे असा त्याचा विश्वास होता. आई व्यतिरिक्त माझ्यात असा विश्वास निर्माण करणारा तो दुसरा व्यक्ती होता. मी सीए करावं अशी त्याची इच्छा होती.
माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही लग्न करणार होतो. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी नोकरीला लागले आणि तो त्याच्या करिअरसाठी बंगलोरला निघून गेला.

सगळं काही सुरळीत सुरु असताना दुर्दैवी अपघाताने सुजितला माझ्यापासून कायमचे दूर नेले.” आयुष्यातल्या सगळ्या अडचणींवर मात करत आयुष्याचे नवे स्वप्न सुरु होण्याआधीच ते दुभंगून गेलं होतं. या घटनेनंतर गीता पुरती कोलमडून गेली.
“तो प्रसंग माझ्याआयुष्यातील अत्यंत वाईट प्रसंग होता. सुजित म्हणजे माझी आधारवड होता आणि तोच कोसळून गेल्याने मी पुरती निराधार झाले होते. २०१२ मध्ये तो गेल्यानंतर माझ्या जीवनातील उरलीसुरली स्वप्ने देखील त्याच्यासोबतच निघून गेली.
या एका क्रूर घटनेने मला नैराश्याच्या खाईत लोटले. सततच्या नैराश्याने मला माझ्या घरच्यालोकांपासून देखील तोडलं त्यामुळे मला घरातून बाहेर पडून एकटी राहणं भाग पडलं.
तोपर्यंत मी रिलायन्स मनी मध्ये ब्रँच मॅनेजर पदावर पोहोचले होते.” गीता सांगते.
या घटनेनंतर नैराश्यातून बाहेर पडायला तिला जवळजवळ पाच वर्षांचा कालावधी जावा लागला. २०१७ मध्ये तिच्या आयुष्यात व्हीलचेअर बास्केटबॉलच्या रूपाने पुन्हा एक नवा आशेचा किरण उगवला.
२०१७ मध्येच तिने स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने नोकरीला राजीनामा दिला आणि व्हीलचेअर बास्केटबॉल संघात ती रुजू झाली.
या खेळामुळे तिचा हरवलेला आत्मविश्वास आणि जगण्याची जिद्द तिला पुन्हा मिळवून दिली. हळूहळू तिच्या खेळात तिने प्रगती साधण्यास सुरुवात केली आणि अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये गीताचे नाव चमकू लागले.
२०१८ हे वर्ष तर माझ्यासाठी खूपच महत्वाचे वर्ष ठरले. यावर्षी बँकॉक येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी माझी निवड झाली होती. आयुष्यात इतकी मोठी संधी मिळणे माझ्यासाठी अद्भुत आनंदाचा क्षण होता.” असे गीता म्हणते.

यानंतर गीताने मागे वळून पहिलेच नाही. आशिया पॅरागेम्स मध्ये देखील तिची निवड झाली आणि पॅरालाम्पिक स्पर्धेत देखील तिला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
आत्ता ती आपल्यातील क्षमता आजमावण्यासाठी अजून मोठा अवकाश शोधण्याचा प्रयत्न करत आहे. टेनिसमध्ये देखील सध्या ती आपले कौशल्य आजमावत आहे.
“आयुष्यभर मी फक्त हे करू नको ते करू नको हेच ऐकत आले. लोकांनी नेहमी मला काही करण्यापासून अडवले. परंतु, इतर कुणाच्या इशाऱ्यावर मी माझ आयुष्य अवलंबून ठेवलं नाही. आत्ता मी माझ्या प्रयत्नात यशस्वी झाले आहे असं मला वाटतं.
“स्काय इज द लिमिट” ही म्हण यथार्थपणे लागू होणाऱ्या अनेक महत्वाकांक्षी लोकांमध्ये गीता चौधरी या नावाचा देखील समावेश आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.