' ‘मृत्यू हेच अंतिम सत्य’ हे अधोरेखित करणारा, १३ प्रतिष्ठित लोकांचा अनपेक्षित मृत्यू! – InMarathi

‘मृत्यू हेच अंतिम सत्य’ हे अधोरेखित करणारा, १३ प्रतिष्ठित लोकांचा अनपेक्षित मृत्यू!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मृत्यू हे जगातील एक शाश्वत सत्य आहे. जन्माला येणारा प्रत्येक जीव कधी ना कधी मृत्यू पावणार असतो सत्य प्रत्येकालाच ठाऊक असतं. फक्त ती नेमकी वेळ कुणालाच माहित नसल्याने एखादी व्यक्ती अचानक मरण पावल्यास त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्यांना दुःख होतंच.

प्रचंड धक्का देखील बसतो. आत्ता चालता फिरता असणारा माणूस, आपल्याशी काही काळाअगोदर बोललेलं माणूस अचानक अनपेक्षितपणे आपल्यातून कायमचा निघून जातो हे वास्तव स्वीकारणंच अनेकदा कठीण होऊन बसतं.

त्यात जर का ती व्यक्ती जगात प्रसिद्ध असेल तर त्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरते. त्यावर अनेक तर्क वितर्क लढवले जातात. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अनैसर्गिक कारणाने झाला असेल, तर ती घटना स्वीकारणे प्रत्येकालाच जड जाते.

आजची सकाळ रसिकांसाठी अशीच एक दुःखद वार्ता घेऊन आली. 90s चा सगळ्यात प्रसिद्ध गायक आणि प्रेमालाही आवाज असतो हे सिद्ध करणारा कृषणकुमार कुन्नथ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने झालेला मृत्यु ही बाब सोशल मिडीयावर धडकली आणि जीवन किती क्षणभंगुर आहे हे विधान नव्याने सिद्ध झाले.

 

KK im

 

भारतातील अनेक प्रसिद्ध लोकांचा अनैसर्गिक मृत्यूच्या घटना आपण बघितलेल्या आहेत. त्यांच्या अनपेक्षित आणि अनैसर्गिक मृत्यूने सबंध देशात खळबळ उडाली होती.

१) सिद्धार्थ शुक्ला

बालिका वधूमधून पदार्पण केलेल्या सिद्धार्थचं रुप आणि त्याहीपेक्षा जास्त त्याचं फिटनेसवरील प्रेम प्रेक्षकांना आवडलं. त्यानंतर अनेक हिंदी मालिका, चित्रपट यांतूमन तो घराघरात पोहोचला. मात्र बीग बॉग १३ मधून तो भारतीयांच्या मनातील ताईत बनला.

 

sidhharth inmarathi

 

इतक्या फीट असलेल्या सिद्धार्थला वयाच्या अवघ्या चाळीशीत ह्रदयविकाराचा झटका ही बाब अनेकांना अजूनही खरी वाटत नाही.

मृत्युपुर्वी अखेरच्या दिवसापर्यंत तो कार्यरत होता.

२) सुशांत सिंग राजपूत

बॉलिवूडच्या चॉकलेटबॉय अशी नवी ओळख मिळवलेल्या सुशांत सिंगच्या मृत्युला एक वर्ष झालं असलं तरी अजूनही त्याच्या चाहत्यांचे दुःख कमी झालेले नाही.

 

sushant sing inmarathi

 

१४ जून २०२० रोजी राहत्या घरात गळफास लावून त्याने आत्महत्येचा मार्ग स्विकारला आणि त्यानंतर सुरु झाला तो चौकशीचा फार्स. बॉलिवूडमधील नेपोटिझम, ड्र्ग्स अशा अनेक विषयांचे कंगोरे असलेली ही केस मात्र गुलदस्त्यात आहे.

३) विलासराव देशमुख

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख ह्यांना २०११ साली सिऱ्हॉसिस झाल्याचे निदान करण्यात आले होते. पण त्यांच्या आजार आणि उपचारांविषयी कुठेही फार वाच्यता केली जात नव्हती.

ऑगस्ट २०१२ मध्ये त्यांना उपचारांसाठी मुंबईच्या ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे असे समजले की त्यांचे यकृत व मूत्रपिंड निकामी झाले आहे. त्यांना ६ ऑगस्ट रोजी एयर ऍम्ब्युलन्समधून तातडीने चेन्नई येथे लिव्हर ट्रान्सप्लांट साठी नेण्यात आले.

पण तिथे त्यांचं ऑपरेशन होण्याच्या आदल्या रात्रीच त्यांचं अनपेक्षितपणे निधन झालं. त्यांचे अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात येते.

 

vilasrao- Inmarathi

 

४) लाल बहादूर शास्त्री

स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान, जय जवान जय किसानचा नारा देणारे, साधी राहणी उच्च विचारसरणी ही उक्ती जगणारे लालबहादूर शास्त्री हे महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांचे कट्टर अनुयायी होते.

पंडित नेहरूंनंतर ते पंतप्रधान झाले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे अमूल्य योगदान आहे. पण त्यांचा मृत्यू हे आजही न उकललेले एक गूढ आहे.

ताश्कंद येथे गेलेले असताना ११ जानेवारी १९६६ रोजी त्यांचा हृदयविकाराने अकस्मात मृत्यू झाल्याचे सगळीकडे सांगण्यात आले. पण अनेकांना असा आजही दाट संशय येतो की त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्यांना कुणीतरी राजकीय हेतूने विषप्रयोग करून ठार मारले.

भारताचे पंतप्रधान असून आणि परदेशात असताना अचानक मृत्यू झाला असून देखील त्यांच्या पार्थिव शरीराचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले नाही.

 

shastri death inmarathi

 

तसेच शास्त्रीजींच्या मुलाने अधिकाऱ्यांना त्यांच्या शरीरावर काही ठिकाणी दिसत असलेल्या निळ्या रंगांच्या डागांविषयी तसेच त्यांच्या पोटावर असलेल्या कापल्याच्या व्रणांबाबत विचारलं होतं.

शास्त्रीजींचे पोटाचे कुठलेही ऑपरेशन झाले नसतानाही त्यांच्या पोटावर असे व्रण कसे आले? तसेच त्या निळ्या डागांचे काय?

ग्रेगरी डग्लस हे एक पत्रकार होते. त्यांनी सीआयए ऑपरेटिव्ह रॉबर्ट क्रॉली यांच्याबरोबर झालेल्या एका मुलाखतीत हे स्पष्ट केले होते की डॉक्टर होमी भाभा व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ह्यांच्या मृत्यूमागे सीआयएचा हात होता.

 

lal bahadur shastri InMarathi

 

५) नेताजी सुभाषचंद्र बोस

आपल्या देशातील सशस्त्र क्रांतिकारकांपैकी एक असलेले, आझाद हिंद सेनेचे जनक नेताजी सुभाषचंद्र बोस हे इंडियन नॅशनल काँग्रेसमधील प्रमुख नेते होते. त्यांचा मृत्यू हा आजही वादाचा विषय आहे.

आजही अनेकांना वाटतं की त्या तथाकथित अपघातात त्यांचा मृत्यू झाला नाही. कारण ज्या प्रकारे हा अपघात झाला त्यावरून असाच संशय येतो की हे नेताजींविरुद्ध रचलेलं एक षडयंत्र होतं. १९४५ साली नेताजी टोकियोला जात होते, ह्या प्रवासादरम्यानच त्यांचे विमान कोसळले

असं म्हणतात की ह्या अपघातातच जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. पण इतका मोठा अपघात होऊन सुद्धा ना त्यांचं पार्थिव शरीर सापडलं ना त्यांच्या मृत्यूचं प्रमाणपत्र सापडलं.

 

Netaji Inmarathi

 

अनेक लोक असंही म्हणतात की नेताजींनी स्वत:च या अपघाताची योजना रचली व त्यानंतर ते भूमिगत झाले. ते आधीही भूमिगत झाले होते. एक थियरी अशीही आहे की अपघातानंतर एका वर्षाने नेताजी त्यांच्या अंगरक्षकाला भेटले होते.

त्यानंतर ते फैझाबादला गेले व तिथे त्यांना लोक गुमनामी बाबा म्हणून ओळखत. गुमनामी बाबा नेताजींसारखेच दिसत असत. त्यांचा मृत्यू १९८५ साली झाला.

 

६) दिव्या भारती

निरागस डोळ्यांची, गोड चेहरा असलेली चुलबुली अभिनेत्री दिव्या भारतीचा मृत्यू आजही एक न उलगडलेले रहस्य आहे. अवघ्या एकोणिसाव्या वर्षी हे जग सोडून गेलेल्या दिव्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा अनेकांचा दावा आहे.

अनेकांचं असंही म्हणणं आहे की तिला अंडरवर्ल्ड विषयी काहीतरी मोठी माहिती कळली आणि त्यामुळे तिच्याच नवऱ्याने म्हणजे साजिद नाडियादवाला याने तिला खिडकीतून ढकलून देऊन तिचा खून केला.

कारण पाचव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवण्याचं तिच्याकडे काहीच कारण नव्हतं. नवं घर घेतल्यामुळे ती खुश होती. नैराश्य वगैरे तिच्या आजूबाजूलाही नव्हतं.

 

divya bharti InMarathi

हे ही वाचा – ज्ञानगंज : मृत्यूवर विजय मिळवणाऱ्यांची हिमालयातील रहस्यमय भूमी!

५ एप्रिल १९९३ रोजी दिव्या भारती संध्याकाळी तिच्या मुंबईस्थित घराच्या बाल्कनीतून पडली आणि त्यात डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं.

ती बाल्कनीच्या कठड्यावर बसलेली होती त्या बाल्कनीला ग्रील नव्हते, तिचा तोल जाऊन ती पडल्याचं सांगितलं जातं. ज्यावेळी हे घडलं त्यावेळी दिव्या बरोबर तिच्या घरात नीता लुल्ला, तिचा नवरा श्याम लुल्ला आणि दिव्याकडे घरकाम करणारी अमृता इतके लोक घरात होते.

पण कुणालाही ती नेमकी कशी पडली हे माहिती नाही. ती पडल्यानंतर सर्वांना लक्षात आले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिला लगेच कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण डोक्याला जबर मार लागल्याने ती वाचू शकली नाही.

ती नेमकी कशी पडली हे कुणालाही सांगता येत नसल्याने तिचा मृत्यू अत्यंत संशयास्पद आहे.

 

divya bharti 1 InMarathi

 

७) होमी भाभा

भारताच्या न्यूक्लिअर प्रोग्रॅमचे जनक डॉक्टर होमी भाभा हे भारतातील व जगातील सर्वात प्रसिद्ध असलेल्यांपैकी एक न्यूक्लिअर फिजिसिस्ट (परमाणु भौतिकशास्त्रज्ञ) होते २४ जानेवारी १९६६ रोजी फ्रांस मधील मॉँट ब्लॅक येथे झालेल्या एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

एका थियरीनुसार अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने रचलेलं हे षडयंत्र होतं. भारताची आण्विक प्रगती रोखण्यासाठी आणि हानी करण्यासाठी सीआयएने योजना आखून डॉक्टर होमी भाभा ह्यांना ठार केलं गेलं. त्यावेळी ते फक्त ५६ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूमुळे भारताचं खूप मोठं नुकसान झालं.

 

 

हे विमान चालवणारे हे भारताच्या सर्वोत्तम वैमानिकांपैकी एक वैमानिक होते आणि रेडियोवरील संभाषणानुसार विमान अगदी उत्तम स्थितीत होतं. हे विमान लगेज कंपार्टमेंटमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे कोसळलं असं सांगण्यात येतं.

या षड्यंत्रात/अपघातात डॉक्टर होमी भाभा व इतर ११६ जणांचे प्राण गेले.

 

Homi_Bhabha Inmarathi

 

८) श्यामा प्रसाद मुखर्जी

डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीचे प्रवर्तकांपैकी एक होते. त्यांनीच जनसंघाची स्थापना केली होती .१९५३ साली श्यामाप्रसाद मुखर्जी जम्मू काश्मीर येथे लागू झालेल्या परमिट सिस्टीमचा विरोध करण्यासाठी गेले होते.

तिथे त्यांना ११ मे १९५३ रोजी अटक करण्यात आली. त्यांना आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह तुरुंगात टाकण्यात आलं, पण नंतर गावाबाहेर असलेल्या एका घरात हलवण्यात आलं. तिथे त्यांची तब्येत ढासळू लागली.

१९ आणि २० जून रोजी त्यांची तब्येत अधिक बिघडली. त्यांना खूप ताप आला. त्यांना छातीत इन्फेक्शन झालं होतं. २२ जून रोजी ते बेशुद्ध झाल्यामुळे त्यांना इस्पितळात हलवण्यात आले. आणि एकाच दिवसात संशयास्पद परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची वारंवार मागणी करण्यात येऊन सुद्धा तत्कालीन सरकारने त्या मागणीकडे दुर्लक्ष केलं.

 

Dr-Shyama-Prasad-Mukharjee- Inmarathi

 

९) गोपीनाथ मुंडे

महाराष्ट्रातील लाडके आणि लोकप्रिय नेते गोपीनाथ मुंडे ह्यांचा मृत्यू सुद्धा असाच अनपेक्षित आणि संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. ३ जून २०१४ रोजी सकाळी दिल्ली विमानतळावर आपल्या गाडीतून जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं.

२०१४ च्या निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर त्यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांच्या पहिल्या मिटिंगसाठी ते जात होते. एका वेगात जाणाऱ्या गाडीने मुंडेंच्या गाडीला जोरात धडक दिली आणि त्यांना जोरदार झटका बसला.

त्यांना त्वरित AIIMS मध्ये दाखल करण्यात आलं पण नंतर त्यांची हृदयक्रिया बंद पडली. त्यांच्यावर CPR करण्यात आले पण त्यांचा जीव वाचू शकला नाही आणि सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

 

gopinath mundhe InMarathi

 

गाडीला अपघात झाला त्यात मुंडे ह्यांच्या मानेच्या हाडाला दुखापत झाली आणि त्यांच्या मेंदूचा रक्तप्रवाह थांबला. तसेच अपघातात बसलेल्या जोरदार झटक्यामुळे त्यांच्या यकृतास सुद्धा गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात येतं.

पोस्ट मॉर्टेम अहवालात असं सांगण्यात आलं की त्यांच्या यकृतास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना हृदयविकाराचा मोठा झटका आला. पण त्यांचा मृत्यू अत्यंत संशयास्पद स्थितीत झाल्याने त्यावर अनेक तर्कवितर्क केले गेले.

अनेकांनी तर असंही म्हटलं की त्यांचा खून झाला आहे. सत्य अजूनही बाहेर आलेले नाही.

 

१०) गुरु दत्त

कागज के फूल , प्यासा, साहिब बीबी और गुलाम, चौदहवी का चांद सारख्या उत्तमोत्तम कलाकृतींची भेट देणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय हरहुन्नरी कलाकार, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते गुरु दत्त ह्यांचाही मृत्यू असाच संशयास्पद परिस्थितीत झाला होता.

ते नैराश्याच्या खोल गर्तेत सापडले होते पण आश्चर्य म्हणजे त्यांच्या आजूबाजूच्या कोणालाही त्यांच्या नैराश्याची कल्पना सुद्धा आली नाही कारण आपल्या हसऱ्या चेहऱ्याखाली त्यांनी त्यांचे दुःख लपवून ठेवलं होतं.

 

gurudutt inmarathi

 

त्यांच्या पेडर रोड स्थित भाड्याच्या घरात १० ऑक्टोबर १९६४ रोजी त्यांचा मृतदेह सापडला. नैराश्यामुळे त्यांना दारूचं व्यसन जडलं होतं. आणि त्यात ते झोपेच्या गोळ्या मिसळून घेत असत. त्यांचा मृत्यू हा अपघाताने झाला की त्यांनी आत्महत्या केली हे एक न उलगडलेलं रहस्य आहे.

हे ही वाचा – मृत्यूशी झुंज देत असतानाही सातत्याने रुपेरी पडदा गाजवणारी महान अभिनेत्री!

११)  गुलशन कुमार

टी सिरीज या कंपनीचे मालक, निर्माते गुलशन कुमार दुआ हे त्यांच्या भजन आणि भक्तिगीतांसाठी प्रसिद्ध होते. १२ ऑगस्ट १९९७ रोजी अंधेरीतील जीतेश्वर महादेव मंदिराच्या बाहेर त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. ते रोज या देवळात जात असत.

ज्या दिवशी त्यांची हत्या झाली नेमक्या त्याच दिवशी उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या सुरक्षेसाठी नेमलेला त्यांचा सुरक्षारक्षक आजारी पडला होता. त्यांना ५ ऑगस्ट आणि ८ ऑगस्ट १९९७ रोजी खंडणी मागण्यासाठी फोन आले होते.

पैसे न दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली होती. पण गुलशन कुमार ह्यांनी खंडणी देण्यास साफ नकार दिला होता. गुलशन कुमार ह्यांना मारणारे रौफ व अब्दुल रशीद ह्यांनी महिनाभर आधीपासून गुलशन कुमार ह्यांच्यावर लक्ष ठेवलं होतं.

त्यांच्याबरोबर कायम सशस्त्र सुरक्षारक्षक असल्याने त्यांनी आधी काही केलं नाही.

१२ ऑगस्ट १९९७ रोजी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी गुलशन कुमार देवळातून दर्शन घेऊन बाहेर पडले तेव्हा त्यांच्या मारेकऱ्यांपैकी एक त्यांच्याजवळ येऊन म्हणाला “बहोत पूजा कर ली अब उपर जा के करना ” आणि त्यांच्यावर गोळीबार सुरु केला.

 

gulshan kumar inmarathi

 

त्यांनी आजूबाजूच्या घरात आसरा घेण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी भ्याड भूमिका घेत आपापली दारं बंद करून घेतली. गुलशन कुमार ह्यांचा गाडीचालक सूरज ह्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता मारेकऱ्यांनी त्याच्या पायांवर गोळ्या झाडल्या.

गुलशन कुमार ह्यांना तब्बल १६ गोळ्या लागल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूसाठी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, दाऊद इब्राहिम व डी कंपनी जबाबदार आहेत.

तसेच नदीम- श्रवण ह्या संगीतकार जोडगोळीपैकी नदीम सैफी ह्याचे गुलशन कुमार ह्यांच्याशी वैर होते त्यामुळे त्याने त्यांची सुपारी दिल्याचा आरोप केला जातो. डी कंपनी त्यांच्या खुनाच्या प्रयत्नात होतीच कारण त्यांनी अंडरवर्ल्डला (दाऊद इब्राहिमला) “प्रोटेक्शन मनी” (खंडणी) देण्यास साफ नकार दिला होता.

नदीम सैफी हा देश सोडून पळून गेला आणि आज दुबईमध्ये मोठा व्यवसाय करीत असल्याचं सांगितलं जातं. गुलशन कुमार गेल्यानंतर बॉलिवूडमध्ये अल्ला, मौला, रब्बा फेम सुफी गाण्यांचं आणि गझलांचं प्रस्थ वाढलं हे ही नाकारता येत नाही.

त्यामुळे बॉलिवूडचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध वारंवार अधोरेखित होतात.

 

१२) परवीन बाबी

बॉलिवूडमधील मॉडर्न अभिनेत्री म्हणून परवीन बाबीचं नाव घेतलं जातं. ती एक अत्यंत यशस्वी अभिनेत्री होती पण ती मानसिक रित्या फारच कमकुवत होती असं म्हणावं लागेल. तिचे खाजगी आयुष्य फार चांगलं नव्हतं. तिला पॅरानॉईड सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार होता.

तिच्या दारूच्या व्यसनामुळे तिला हा आजार जडल्याचं म्हटलं जातं. तसेच खाजगी आयुष्यात तिला नात्यांमध्ये आलेल्या अपयशामुळे सुद्धा मानसिक आजार जडला असावा. तिच्या नंतरच्या आयुष्यात ती एकटीच आयुष्य कंठत होती. तिच्या मुंबईच्या घरात ती एकटीच राहत होती.

 

Parveen-Babi-1 InMarathi

 

२२ जानेवारी २००५ रोजी तिच्या इमारतीत राहणाऱ्या लोकांनी पोलिसांत तक्रार केली की तिने घराबाहेर पडून असलेले दूध व वर्तमानपत्र गेले तीन दिवस उचललेच नाही. दार तोडून बघितले तेव्हा ती मृतावस्थेत आढळली.

पोलिसांचा अंदाज होता की तिच्या मृत्यूला ७२ तास उलटून गेले असावेत. तिला मधुमेह असल्याने तिच्या पायाला गँगरीन झालं होतं. आणि ती तिच्या बिछान्यावरच मृतावस्थेत सापडली. गँगरीनमुळे तिला चालत येत नसल्याने ती व्हीलचेअर वापरत असे.

ती एकटीच राहत असल्याने तिची काळजी घेणारे कोणीही नव्हते. पोस्ट मॉर्टममध्ये असे कळले की तिने ३ दिवस काहीही खाल्लं नसल्यामुळे त्यात मधुमेह असल्याने तिची तब्येत खालावून तिचा मृत्यू झाला असावा.

 

Parveen-Babi Inmarathi

 

१३. श्रीदेवी

बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार, मिस हवाहवाई म्हणून ओळखली जाणारी श्रीदेवी ही एक अत्यंत गुणी अभिनेत्री होती. वेळोवेळी तिनं तिच्या अभिनयाने रसिकांचे लक्ष वेधून घेतलं होतं.

अनेकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या श्रीदेवीचा अनपेक्षित मृत्यू हा अनेकांसाठी धक्कादायक होता. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबई येथे हॉटेल रूममधील बाथरूममध्ये असलेल्या बाथटबमध्ये ती तिच्या पतीस म्हणजेच बोनी कपूर ह्यांना मृतावस्थेत आढळली.

 

shree devi InMarathi

 

बोनी कपूर, श्रीदेवी व त्यांचं संपूर्ण कुटुंब दुबई येथे त्यांच्या भाच्याच्या लग्नासाठी गेले होते. लग्नात सहभागी झाल्याचे तिचे व्हिडीओ सुद्धा अनेकांनी बघितले आणि अचानक तिच्या मृत्यूची बातमी येऊन धडकल्यावर कुणाचाही त्यावर विश्वास बसला नाही.

पण नंतर दुर्दैवाने ही बातमी खरी असल्याचं संजय कपूर ह्यांनी सांगितलं आणि लोक शोकसागरात बुडालं. एखाद्या मोठ्या माणसाचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू हे कारण न पटण्याजोगं आहे.

 

sridevi inmarathi

 

सुरुवातीला तिच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक असं सांगितलं जात होतं, पण पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये तिचा बुडून मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. श्रीदेवीच्या अनपेक्षित एक्झिटमुळे लोकांना तिचा खरंच पाय घसरून, बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला, तिनं आत्महत्या केली की तिचा खून झाला ह्याबाबतीत संशय आहे.

===

हे ही वाचा – या तलावांजवळ गेलात तर तुमचं काही खरं नाही! ‘मृत्यूचं घर’ मानले जाणारे ९ तलाव

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?