'पूर आल्यानतंर काय करावं? काय करू नये? वाचा आणि सुरक्षित रहा...

पूर आल्यानतंर काय करावं? काय करू नये? वाचा आणि सुरक्षित रहा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

मंडळी, परवा पुराच्या पाण्यात महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली आणि उल्हास नदीच्या पुराने ट्रेन भोवती आपला विळखा इतका घट्ट केला की ट्रेनच्या फूट बोर्ड पर्यंत पाणी पोचले.

जवळपास सतरा तास या गाडीतील प्रवासी हतबल होऊन पुढे काय वाढून ठेवलंय या भीतीने हैराण झाले होते.अखेर बाजूच्या गावातील ग्रामस्थ, आपत्कालीन व्यवस्थापनेची तुकडी यांच्या एकत्रित प्रयत्नातून त्यांची सुटका करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर काही गोष्टींकडे आम्ही तुमचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत आहोत.सध्या ग्लोबल वॉर्मिंग तसेच काही मानवनिर्मित कारणांनी पावसाची स्थिती बदलत चालली आहे.

देश भरातील जाऊदे ,नुसते महाराष्ट्राच्या दृष्टीने बघायचे झाले तर एरवी अगदी सात जूनला वेळेवर येणारा मान्सून अलीकडे जुनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच पंधरा ते वीस दिवस उशिरा येऊ लागलाय. 

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर होणाऱ्या पेरण्या लांबू लागल्या. जुलै मध्ये म्हणजे आषाढ महिन्यात पाऊस धुवांधार कोसळू लागलाय.गेली किमान सात वर्षे हाच पॅटर्न चालू झालाय.

या नवीन पॅटर्ननुसार कमी कालावधीत पाऊस जोरदार कोसळतो व सलग टिकतो. चार दिवस ओळीने पाऊस आला तर नदी ,नाले ओढे भरभरून वाहू लागतात व पूर परिस्थिती निर्माण होते.

नाल्यांमधील कचरा साफ केलेला नसेल तर पाणी तुंबते आणि परिणामी रस्त्यांवर येऊन आजूबाजूच्या घरांमध्ये घुसते.

 

floods-bow-wave-inmarathi
heaa.com

अलीकडे बिल्डर्सनी जमिनी बळकवताना त्यावरील नाले किंवा ओढे एकतर बुजवलेत किंवा छोटे केलेत त्यामुळे त्यांची वहनक्षमता कमी झालीय.

नद्यांमध्ये भराव टाकून दिशा बदलवून टाकलीय किंवा वाळूचा उपसा झाल्याने नदीची धारणक्षमता कमी झालीय.या मुळे पूर येण्याचे प्रमाण वाढलंय.

मुंबई सारख्या ठिकाणी तर पाऊस चालू असताना समुद्राला भरती आली तर भरतीचे पाणी नाले किंवा जमीनीला उफाळे येऊन खोलगट भागात साठते आणि आजूबाजूच्या इमारतींमध्ये घुसते.

थोडक्यात स्थानिक पातळीवर पूरपरिस्थिती निर्माण होते. नदीला आलेला पूर एखाद्या वस्तीला नाही तर नदीकाठी असलेल्या अनेक गावांना विळखा घालतो आणि पूल पाण्याखाली गेल्यास रस्ते वाहतूक बंद होते आणि गावा गावातील संपर्क तुटतो.

मंडळी ही झाली पुराविषयीची जुजबी माहिती. सध्या आपल्याला हे बघायचंय की आपण आपल्या भागात पूर आल्यास कोणत्या गोष्टी करणे टाळायला हवे,आणि कोणत्या गोष्टी करायला हव्यात.

१. सर्वात पहिली गोष्ट पुराचे पाणी आपल्या भागात वाढत असेल तर दुर्लक्ष करू नये.

२. दुसरी गोष्ट घाबरून जाऊ नये. घाबरल्यामुळे हातून चुका घडू शकतात.

३. तिसरी गोष्ट भिंती ओल्या झाल्या असतील तर विनाकारण विजेची उपकरणे हाताळू नका. वायर उघडी असेल तर शॉक बसू शकतो.

४. चौथी गोष्ट पुराच्या पाण्यात कारण नसताना मुद्दाम मस्ती करण्यास जाऊ नये. एखादे उघडे गटार तुम्हास बुडवण्यास कारणीभूत ठरू शकते.

पाय घसरून नाकातोंडात घाण पाणी जाऊ शकते तसेच पायास एखादी जखम झाली असल्यास त्यात जंतुसंसर्ग होऊ शकतो.

 

Flood tips Inmarathi
DNA India

विशेषतः मधुमेही रुग्णांनी घाण पाण्यापासून पायांचा बचाव करावा.

५. पाचवी महत्वाची गोष्ट बरेच पट्टीचे पोहणारे पुराच्या पाण्यात पैजा लावून पोहायला उतरतात पण पाण्याचा प्रवाह जोरदार असेल तर वाहून जाण्याची शक्यता असते.

या व्यतिरिक्त आणखी एक धोका म्हणजे जंगली प्राणी अथवा साप किंवा मगरी पाण्याबरोबर येतात.त्यांच्यापासून जीवघेणे हल्ले होऊ शकतात.तेव्हा उगीचच फुशारक्या मारत पुराच्या पाण्यात उतरू नये.

6. सहावी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे नदीच्या पुरात किंवा समुद्राच्या कठड्यावर उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह आवरला पाहिजे. या सेल्फीच्या मोहापायी अनेक जणांचे बळी गेले आहेत.

आता सर्वात महत्वाचे. पूरपरिस्थिती लक्षात घेऊन प्रवास शक्यतो टाळावेत. तुम्ही कार चालवत असताना पुढे रस्त्यावर पाणी साठलेले दिसत असेल तर “कार काय आरामात निघेल”.

असा विचार करून कार पाण्यात घालू नका, तसेच अंडरपास शक्यतो टाळा. मुंबईत अनेकजणांचे जीव अशा पाण्याने तसेच अंडरपास मधील पाण्याने घेतल्याची अनेक ताजी उदाहरणे आहेत.

कार लॉक होऊन खिडक्या अथवा दारे न उघडल्या गेल्यामुळे कार मध्ये गुदमरून मृत्यू घडल्याच्या घटनाही काही कमी नाहीत.तेव्हा गाडीत मजबूत हातोडा तसेच एखादी मजबूत दोरी अथवा दोरखंड या दिवसात गाडीत असणे आवश्यकच आहे.

गाडीत फर्स्ट एड किट आणि महत्वाची औषधे ठेवणे आवश्यक आहे. कितीवेळ अडकावे लागेल याचा भरोसा नाही.
झाडाखाली आश्रय घेऊ नका विशेषतः रेन ट्री,

गुलमोहर सारख्या कमकुवत झाडांखाली अजिबात थांबू नका.

 

trees falling in floods inmarathi
BBC

या झाडांच्या फांद्या किंवा पूर्ण झाड कोसळू शकते.कंबरेच्या वर पाणी असेल तर शक्यतो पाण्यातून बाहेर पडावे. पण जाणे भाग असेल जसे मुंबईत बस किंवा लोकल बंद पडल्याने चालावे लागते तिकडे आधार घेऊन चालावे.

रेल्वे ट्रॅक वर चालत असाल तर मानवी साखळी करून चालणे योग्य. म्हणजे पाण्याचा जोर वाढल्यास कोलमडून पडणार नाही.

मंडळींनो, पूर परिस्थिती कशी असेल ते बघूनच काय गोष्टी करणे टाळावे हे आम्ही तुम्हाला आत्ता सांगितले, आता बघुया की कोणत्या गोष्टी करायला हव्यात ते.

सर्वात प्रथम पूर स्थानिक पातळीवरील आहे की नदीने गावाला वेढा घातलेला आहे हे बघून उपाययोजना कोणती करायची याचा विचार केला पाहिजे.

यासाठी टीव्ही आणि रेडिओ वरील बातम्यांचे पुराविषयीचे अपडेट लक्षात घेतले पाहिजेत यासाठी टीव्ही किंवा रेडिओ चालू ठेवले पाहिजेत.

आपल्या भागात पाणी भरण्यास सुरवात झाली असेल आणि साधारणपणे दरवर्षी अशी परिस्थिती उद्भवत असेल तर आपण आपल्या फोनची बॅटरी चार्ज करून ठेवली पाहिजे.

तसेच घरातील इमर्जन्सी लॅम्पसच्या बॅटरी चार्ज करून ठेवून जास्तीच्या बॅटरीज तयार ठेवल्या पाहिजेत. मेणबत्या तयार ठेवल्या पाहिजेत.

घरात कंदील अथवा तेलाचे दिवे वापरत असाल तर केरोसीन व अन्य तेल साठवून ठेवणे आवश्यकच कारण केव्हा वीज गायब होईल याचा नेम नाही.

पावसाळ्यात घरात पाणी घुसण्याची शक्यता असेल तर घरात अन्नधान्य तसेच आठवडाभर पुरतील एवढ्या भाज्या फळे व बिस्किटे तसेच खाण्याचे पदार्थ व दुधाचा साठा करून ठेवणे आवश्यक आहे.

तुम्ही औषधे नियमितपणे घेणारे असाल तर औषधांचा साठा करून ठेवा. तुम्ही तळमजल्यावर असाल तर अन्नपदार्थ व औषधे उंचावर ठेवायला हवेत.

म्हणजे दोन तीन फूट पाणी भरले तरी तुम्ही भूक भागवू शकता. तसेच एखादे फर्स्ट एड किट देखील तयार करून ठेवा.

 

emergency kit inmarathi
Stormguard Floodplan

तुमचा मजला पाण्याखाली जाईल असे वाटत असल्यास महत्वाची कागदपत्रे ,औषधे, कपडे ,अंथरूण पांघरूण तसेच खाद्यपदार्थ शक्यतो वरच्या मजल्यावरील लोकांकडे सुरक्षित ठेवा.

इतर सामान हलविणे शक्य असेल तर सुरक्षित ठिकाणी ठेवा.तुम्ही तळमजल्यावर असाल व पाणी भरलेच तर विजेची उपकरणे बंद ठेवा. पाणी जास्त भरले तर सुरक्षित जागेचा आश्रय घ्या.

शक्यतो नदीकाठावरील गावातील लोकांनी उंचावर असलेल्या घरांचा अथवा जागेचा आश्रय घेणे योग्य. शक्यतो नदीपासून दूर गेलेले योग्य.

पाणी भरल्यास आपले सामान सुरक्षित ठिकाणी हलवल्यावर शेजाऱ्यांच्या मदतीस जावे. वृद्ध व आजारी मंडळी तसेच लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवावे.

सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य द्यावे.

मंडळींनो, या टिप्स व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत ज्या पूर येण्यापूर्वी तुम्ही करू शकता.
नेहमी ज्या सखल किंवा खोलगट भागात दरवर्षी पुराचे पाणी भरत असते,तेथील लोकांनी थोडी काळजी आधीच घ्यायला हवी.

पुरापासून झालेल्या नुकसानभरपाई साठी आधीच पुर विमा काढून ठेवला तर पुरापासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळू शकते.

आजूबाजूच्या नाल्यांची नियमितपणे सफाई होते की नाही,तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व नाले खोलवर साफ केलेत की नाही यावर लक्ष ठेवून ग्राम पंचायत, नगरपालिका, किंवा महानगरपालिका यांच्याकडे तक्रार नोंदवून पाठपुरावा करून ते काम करून घेतले पाहिजे.

नदी पत्रातील गाळ काढला गेलाय याची खात्री करून घेतली पाहिजे. बिल्डर मंडळींनी नाल्यात भराव टाकून नाला अरुंद केला असेल किंवा बुजवायचा प्रयत्न करत असेल तर पोलिसांत तक्रार नोंदवून तसे करण्यापासून बिल्डरला रोखले पाहिजे.

 

rivers in floods inmarathi
St. Louis Public Radio

आपल्या वस्ती अथवा सोसायटी भोवती सीमा भिंत बांधून पाणी आत घुसणार नाही याची व्यवस्था केली पाहिजे. गेट मध्ये वाळूची पोती रचून पाणी आत येण्यास मज्जाव केला पाहिजे.

शक्यतो पुराचा अलर्ट आला असेल तर घरातील लोकांना आधीच दूर सुरक्षित ठिकाणी हलवले पाहिजे. मोडकळीस आलेल्या घरांना नोटीस आली असेल तर अशा जागा,वाडे सोडून देणे योग्य.

संकट केव्हा चाल करून येईल याचा नेम नाही हे लक्षात घेऊनच त्या प्रमाणे आखणी करणे योग्य. ज्या भागात वादळाचा त्रास होत असेल तेथे तर अगोदरच काळजी घेणे योग्य.

मंडळींनो आम्ही तुमच्या काळजीपोटी काही सूचना केल्या आहेत. तुम्ही त्या गांभिर्याने घेतल्यात तर तुम्हीच सुरक्षित राहू शकता. आपले संरक्षण आपणच चांगल्या प्रकारे करू शकतो हे लक्षात ठेवा.

प्रशासनाने सूचना दिल्यास त्याचे पालन अवश्य करा. प्रशासनाकडून गलथानपणा होत असेल तर विरोधाचा सूर उमटवत जा.

शेवटी एक अतिशय महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा.. “सीर सलामत तो पगडी पचास”।

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?