स्विस हॉटेलची भारतीयांना अपमानास्पद नोटीस – वाचा, नेमकं काय झालं होतं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

एका भारतीय कुटुंबाने बालीच्या एका हॉटेलच्या रुममधून प्रचंड प्रमाणात वस्तू चोरून नेल्याचा व्हिडीओ २ वर्षांपूर्वी सगळीकडे व्हायरल झाला होता. इन मीन अडीच मिनिटांच्या ह्या व्हिडीओमुळे संपूर्ण भारतीयांना जगापुढे शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली होती.

हे कुटुंब हॉटेलबाहेर पडताना हॉटेल स्टाफने त्याचे सामान तपासले असता त्यात हॉटेलच्या रूममधील शोभेच्या वस्तू, टॉयलेटरीज, इलेक्ट्रॉनिक वस्तू, टॉवेल्स आणि हँगर्स सारख्या वस्तू सुद्धा आढळल्या होत्या!

ह्या कुटुंबाने हॉटेलच्या मालकीच्या वस्तू बिनदिक्कत आपल्या बॅगमध्ये भरल्या आणि त्या घरी नेण्याचा त्यांचा इरादा होता.

व्हिडिओत असे दिसले की ती महिला वारंवार हॉटेलच्या लोकांना विनंती करतेय की आम्हाला जाऊ द्या, आमचं विमान चुकेल.

 

bali-tourists-steal Inmarathi
Mothership

 

तसेच तिचा नवरा सांगताना दिसला होता  की मी ह्या सगळ्याचे पैसे भरायला तयार आहे. पण हॉटेलच्या माणसांनी मात्र ह्या सगळ्याचे पैसे घेण्यास ठाम नकार दिला. भारतीयांची अशी फुकटेगिरी आणि बेशिस्त वर्तन आपल्याला काही नवीन नाही.

म्हणूनच रेल्वेत अगदी प्रसाधनगृहातील मग सुद्धा चेनने बांधून ठेवावे लागतात, डस्टबिन सुद्धा चोरीला जाऊ नयेत म्हणून साखळीला बांधून ठेवावे लागतात. तरीही लोक टॉवेल्स, पांघरुणे, उश्या ,नॅपकिन ढापतातच.

हँडवॉश, हॅन्ड शॉवर सुद्धा चोरीला गेल्याच्या घटना आपल्याकडे नवीन नाहीत. हॉटेलमध्ये गेल्यावर तर आपल्याच बापाचा माल असल्यासारखे लोक कटलरी उचलून नेतात. टॉयलेटरीज , स्लीपर्स घरी नेणे तर अगदीच सामान्य आहे.

 

five star amenities inmarathi
price travel

 

रेस्टोरंटमध्ये गेल्यावर भसाभसा टिश्यू वापरणे, बडीशोप मुठींनी भरून नेणे , हॉटेलच्या बुफेमधून डब्यात पदार्थ भरून नेणे ह्या गोष्टी तर लोक बेशरमीने करतातच पण ह्या कुटुंबाने मात्र हद्दच केली.

 

mukhwas inmarathi
the dim sum diaries

 

आपण भारतीय म्हणून जगात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतो, आपल्यामुळे अख्ख्या देशाला शरमेने मान खाली घालावी लागू शकते असा विचारच लोक करत नाहीत. असल्या लोकांना शिक्षा म्हणून ह्यांचे पासपोर्टच कॅन्सल करून टाकण्याची शिक्षा केली पाहिजे.

आपले हे वर्तन जगालाही पक्के ठाऊक आहे आणि ह्याचाच फायदा घेऊन लोक वर्णभेद करतात. सरळसरळ आपला अपमान करतात आणि आपल्या ह्या बेशरम “फुकट ते पौष्टिक” ही उक्ती जगणाऱ्या नागरिकांमुळे आपण त्यावर काही बोलू सुद्धा शकत नाही.

जग मात्र वाहत्या गंगेत हात धुवून घेत सरळसरळ आपला अपमान करणे सोडत नाही.

स्विस हॉटेलने एक भारतीयांसाठी एक अपमानास्पद नोटीस जारी केली होती. त्या नोटिशीत भारतीयांना उद्देशून असे लिहिले होते की ,”भारतीयांनो कृपया नाश्ता डब्यात भरून रूममध्ये नेऊ नका.”

 

swiss hotel inmarathi
the week

 

आपल्यापैकी अनेक लोक जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी आपली घाणेरडी फुकटेगिरी सोडत नाहीत. फुकट नाश्ता मिळतोय म्हटल्यावर भारंभार नाश्ता डब्यात भरून घेऊन तो नंतर खाण्याची सवय आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आहे. म्हणूनच आपल्यावर असल्या नोटीस वाचण्याची वेळ येते.

स्वित्झर्लंडचे भारतीयांना फार पुर्वीपासुन आकर्षण आहे. त्यात हिंदी सिनेमांनी सतत तिथे शूटिंग करून नकळत स्वित्झर्लंडची जाहिरातच केली आहे. दर वर्षी हजारो भारतीय लोक स्वित्झर्लंडला भेट देत असतात.

 

beautiful switzerland InMarathi

 

जेव्हा दोन देशांतील भिन्न संस्कृतीतील माणसे एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात मतभेद सुद्धा होतातच. एका ऑनलाईन टुरिस्ट फोरमवर भारतीय आणि चिनी पर्यटकांच्या अशोभनीय वर्तनाबद्दल तक्रार करण्यात आली आहे.

भारतीय आणि चिनी लोक म्हणे त्यांच्या डब्यांमधून पदार्थ भरून भरून नेतात किंवा एकच प्लेट दोघा तिघांत वाटून खातात.

२२ जुलै प्रसिद्ध हर्ष गोएंका ह्यांनी Gstaad ,स्वित्झर्लंड येथील एका हॉटेलमधील फोटो ट्विट केला होता. हा फोटो म्हणजे एका हॉटेलचे माहितीपत्रक होते. एका पत्रकाराच्या ट्विटला उत्तर देताना गोएंका म्हणाले की त्यांनी हे माहितीपत्रक बघितले आहे.

 

Swiss notice
Dailyhunt

 

हे माहितीपत्रक Gstaad येथील हॉटेल arc-en-ciel चे आहे आणि ते खास करून भारतीय पाहुण्यांसाठी आहे. ह्या माहितीपत्रकात असे लिहिले आहे की “कृपा करून हे नियम पाळावेत.” पहिला नियम सकाळच्या ब्रेकफास्ट बुफे विषयी आहे.

ह्यात असे लिहिलेय की ,“कृपा करून पदार्थ आपल्याबरोबर नेऊ नयेत. हे पदार्थ फक्त इथे बसून नाश्ता करण्यासाठीच आहेत.”

त्यानंतरचा नियम त्यांनी हे गृहीत धरून लिहिलाय की लोक आपल्याबरोबर काटे चमचे सुद्धा घेऊन जातात. त्यांच्यासाठी असे लिहिलेय की “कृपया हे लक्षात ठेवावे की इतर लोकांना सुद्धा हा चविष्ट नाश्ता करायचा असतो.

त्यामुळे ही कटलरी फक्त इथे वापरण्यासाठीच आहे (म्हणजे थोडक्यात ती आपल्याबरोबर घेऊन जाऊ नका).

त्यानंतरचा नियम अश्या लोकांसाठी आहे जे लोक पैसे एकाचेच भरतात आणि खाणे वसूल मात्र दोघांचे करतात. अश्या लोकांसाठी तिथे अतिरिक्त लोकांच्या खाण्यासाठीचे दर लिहिले आहेत.

 

indian girls party
love laugh mirch

 

तसेच मोठमोठ्याने बोलण्याची सवय असलेल्या लोकांना अशी सूचना करण्यात आली आहे की कॉरिडॉर मध्ये शांतता राखावी आणि बाल्कनीमध्ये असताना हळू आवाजात बोलावे.

हे माहितीपत्रक नेमके केव्हा जारी करण्यात आले होते ह्याविषयी माहिती मिळू शकली नाही. आता खरं तर हे माहितीपत्रक म्हणजे बाहेर असताना पाळायचे सर्वसामान्य शिष्टाचार आहेत पण लोक ते पाळत नाहीत म्हणून अश्या “स्विस पाट्या” त्यांना लावाव्या लागल्या असतील.

असल्या पाट्या तर आपल्या पुण्यात सुद्धा ठिकठिकाणी सापडतातच.

गोएंका ह्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ह्या माहितीपत्रकाचा फोटो पोस्ट केल्यावर इतर सोशल मीडिया युझर्सने सुद्धा ती पाहिली होती. अनेकांनी ते माहितीपत्रक पाहिल्याचे देखील सांगितले. काहींनी त्यावर हॉटेलने लिहिलेला माफीनाम्याचे फोटो देखील टाकले.

 

harsh goenka inmarathi
marketing mind

 

हा माफिनामा क्रिस्टियन मॅटी ह्यांनी लिहिला होता. अर्थात हे माहितीपत्रक सुद्धा आधी त्यांनीच लिहिले होते. क्रिस्टियन मॅटी ह्या त्या हॉटेलच्या मॅनेजर आहेत.

ह्या माफीनाम्यात त्यांनी पर्यटकांची माफी मागितली आहे व असे लिहिले आहे की ,”हे माहितीपत्रक फक्त माहितीसाठी होते. त्यात पर्यटकांचा अपमान करण्याचा कुठलाही उद्देश नव्हता. “भारतीय पर्यटक हे गैरवर्तन करतात” असे आम्हाला म्हणायचे नव्हते.

फक्त पदार्थ शेअर करण्यासाठीचे नियम काय आहेत हे आम्ही माहितीपत्रकातून सांगू इच्छित होतो. तसेच मध्यरात्रीनंतर गोंगाट होतो त्यामुळे इतर पर्यटकांना त्रास होतो त्यासाठी हे लिहिण्यात आले होते.”

ह्या माफीनाम्यात असे सुद्धा नमूद केले आहे की जेव्हा लोक ह्या माहितीपत्रकाला वर्णभेद समजून घेऊन गैरसमज करून घेऊ लागले तेव्हा लगेच हे माहितीपत्रक काढून टाकण्यात आले.

 

To-our-Jewish-Guests
Le News

 

हॉटेलने जरी त्याबद्दल जाहीर माफी मागितली असली तरी आपल्या पर्यटकांचे परदेशातील वर्तन फार चांगले आहे असे आपण छातीठोकपणे म्हणूच शकत नाही. हे माहितीपत्रक वाचल्यावर कुणालाही आधी पटकन राग येईल.

पण थोडा विचार केल्यास आपले आपल्यालाच कळेल की आपण स्वतःमध्ये सुधारणा करण्याची गरज आहेच. बऱ्याच वेळेला आपले लोकांचे वर्तन सार्वजनिक शिष्टाचारात बसत नाही.

आपण कुठेही जातो तेव्हा आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत असतो आणि आपल्या देशाचा मान राखणे आपल्याच हातात आहे. त्यामुळे आपल्याकडे लोकांना शिस्त लावण्याची प्रचंड आवश्यकता आहे हे कुणीही अमान्य करणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?