' हवेत उडत असताना अचानक ‘इंधन संपलं’…पुढे जे घडलं तर निव्वळ चमत्कारिक होतं! – InMarathi

हवेत उडत असताना अचानक ‘इंधन संपलं’…पुढे जे घडलं तर निव्वळ चमत्कारिक होतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

कल्पना करा तुम्ही विमानप्रवास करत आहात, आपल्या समोरच्या स्क्रीनवर मस्त मुव्ही चालू आहे. एअर होस्टेस नुकतीच डिनर सर्व्ह करून गेलीय.

डाईन विथ वाईनचा आनंद घेत समोरच्या मुव्हीचा आनंद घेत आहात आणि अचानक इमर्जन्सीची अनाऊसमेंट होतेय आणि तुम्ही खाडकन भानावर येताय.

काय करावे हेच तुम्हाला समजत नाहीय. इमर्जन्सी आल्यावर काय करायचं याच एअरहोस्टेसने दिलेले ट्रेनिंग तुम्ही आठवायचा प्रयत्न करताय आणि अचानक लाईट ऑफ होतात आणि विमानात डार्क अंधार पसरलाय.

तुम्हाला लक्षात येतंय की या पुढे जे काही घडणार आहे, ते निव्वळ रामभरोसे असणार आहे. हा कुठल्यातरी सिनेमातला सिन आहे असे वाटत असेल तर ते चूक आहे. ही खरीखुरी घडलेली घटना आहे. या विषयी माहिती घेण्यापूर्वी थोडं भूतकाळात डोकावून बघुया.

 

FearOfFlying
psychologytoday.com

मानवाच्या उत्क्रांती बरोबर अनेक जीवनावश्यक शोध मानवाने लावले. जसा मानव एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ लागला तशी त्याला वाहतुकीच्या काही साधनांची जरुरी पडली आणि त्यातूनच चाकांचा शोध लागला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

जसा चाकांचा शोध लागला तसा मानव व पशु यांनी ओढल्या जाणाऱ्या गाड्यांमधून सामान आणि मानव दोन्हीची वाहतूक सुरू झाली. पुढे यंत्रांचा शोध लागला आणि इंधनाचा देखील. मग इंधन वापरून गाड्या धावू लागल्या. वेग देखील वाढू लागला आणि यामुळे जास्त सामान व जास्त माणसं यांची वाहतूक सुलभ झाली. जलवाहतुकीने आणखी पुढचे पाऊल टाकले आणि समुद्रापार माणूस पोचला.

पुढे माणसाला आणखी दूर दूर जायची इच्छा होऊ लागली आकाश प्रवासाचे वेध लागले. त्यातून अमेरिकेच्या राईट ब्रदर्सनी विमानाचा शोध लावला आणि मानवाला गगन ठेंगणे झाले.

 

wright brothers
HistoryCollection.co

विमानप्रवासाने अंतर आणि वेळ दोन्ही जणू मिटवूनच टाकली. हजारों किलोमीटरचे अंतर हवाई मार्गाने जेमतेम काही तासांवर आणले. अंतराचे गणित जमले तसे वेळेची बचत हे सूत्र देखील मानवाच्या हाती लागले.

हळूहळू हा प्रवास सुरक्षित आहे हे लक्षात आल्यावर ही आता चैन न उरता गरज बनली परदेश प्रवासास जाणाऱ्यांसाठी. अशाच एका प्रवासास निघाले होते एअर कॅनडाचे बोइंग ७६७-२०० मॉन्ट्रीयलहून एडमंट येथे.

एअर कॅनडाच्या ताफ्यातील हे पहिलेच अत्याधुनिक असे विमान होते. फ्लाय बाय वायर सिस्टीम यात होती. इंधनाच्या मोजमापासाठी नवीन मॅट्रिक पद्धत वापरली होती. पायलटचे ट्रेनिंग या विमानाच्या सिम्युलेटरवर झालेले होते.

विमानाचा एक पायलट कॅनडाच्या एअरफोर्स मधून आलेला असल्याने अनुभवी होता. एक पायलट होता बॉब पिअर्सन तर दुसरा होता मॉरिस क्विंटल. या शिवाय फ्लाईट मेंटेनन्स इंजिनिअर रिक डीओन पण विमानात होता.

 

old pic of canada airways InMarathi
Getty Images

विमानाने उड्डाण घेतले. हवाईसुंदरींनी ड्रिंक्स आणि डिनर सर्व्ह केले. हवामान देखील छान होते. काही प्रवासी झोपायच्या तयारीत होते तर काही मुव्ही बघत होते.

इकडे वैमानिकाच्या केबिनमध्ये अचानक एक दिवा लुकलूक करू लागला. विमानाच्या इंधनाचा दाब कमी झाल्याची ती सूचना होती. मुख्य वैमानिक बॉब पिअर्सन ने ही गोष्ट सहवैमानिक मॉरिसच्या लक्षात आणून दिली.

असे फ्युएल प्रेशर कमी दाखवणे याचा अर्थ म्हणजे विमानाच्या टाकीत इंधनाची कमतरता आहे. दोघेही चकित झाले. मॉन्ट्रीयलहून निघताना इंधन पूर्ण भरले गेले होते मग तरीही असे चुकीचे रिडींग का येतेय हे दोघांना कळेना.

पण जर हे रिडींग बरोबर असेल तर याचा अर्थ पुढील प्रवास करता येणार नाही. थोडक्यात जवळचा एअरपोर्ट गाठून इमर्जन्सी लँडिंग करणे आवश्यक होते. त्यांनी लगेच एअरट्रॅफिक कंट्रोलरशी संपर्क साधला.

तिथे हजर असलेल्या ग्राउंड इंजिनिअर ने आकडेमोड करून इंधन पूर्ण भरले असल्याचा निर्वाळा दिला.

मग तर या दोघा वैमानिकांचे धाबेच दणाणले. इंधन पूर्ण भरले होते तर इकडे विमानातील रिडींग अपुरे इंधन असल्याचे दाखवत होते. म्हणजे एअर फ्युएल पंप लिक तर होत नसेल ना? असे बॉबच्या मनात आले.

Six_flight_instruments InMarathi
Wikiversity

एअर कॅनडाचा मेंटेनन्स इंजिनिअर रिक डीऑन तेथेच होता व त्याचे मत देखील जर फ्युएल पंप लिक झाला असेल तर परिस्थिती आणखीनच गंभीर बनेल असे होते.

त्यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलरला इमर्जन्सी लँडिंगची परमिशन मागितली. मॅप लोकेशनवर जवळील विमानतळ विनीपेग हा होता आणि तो कॅनडाच्या एअरफोर्सकडे होता. एअर ट्रॅफिक कंट्रोलर देखील बुचकळ्यात पडले.

त्यांचे ट्रेनिंग देखील या विमानाच्या सिम्युलेटरवर झालेले असल्याने त्यांना या परिस्थितीत काय सल्ला द्यावा हे समजेनासे झाले होते. शेवटी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत विनीपेग विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगची परवानगी द्यावी लागली व ते लगेच विनीपेगच्या विमानतळ अधिकाऱ्यांना बोइंग ७६७ च्या इमर्जन्सी लँडिंगची सूचना देण्यासाठी संपर्क करू लागले.

इकडे लँडिंगच्या तयारीत असलेल्या कॅप्टन बॉब ला अजून एक सूचना स्क्रीनवर दिसली की विमानाचे डावे इंजिन बंद पडलंय. हा तर मोठा धक्का होता पण आत्ता आहे त्या परिस्थितीत एक इंजिनाच्या भरवशावर उतरण्याची तयारी दोन्ही पायलटनी केली. दुसरा कोणताच पर्याय समोर नव्हता.

दोन पायलट, एक मेंटेनन्स इंजिनिअर विमानाचे क्रू मेंबर्स आणि प्रवासी यांच्यासह ६९ जणांचा जीव धोक्यात होता. त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा चालू झाली होती. पण एवढ्यावरच दुर्दैव थांबले नव्हते, आता उजवीकडील इंजिन बंद पडले.

एवढं अत्याधुनिक ४०० मिलियन डॉलर्स किंमतीचं विमान इंजिनविना जणू ग्लायडरच झाले होते. आकाराने अवाढव्य असलेले हे जम्बोजेट निव्वळ ग्लायडर पेक्षा वेगळे उरलेच नव्हते.

 

Aeroplane land
Twitter

दोन्ही पायलट क्षणभर हतबल झाले खरे पण तरीही आपण इमर्जन्सी लँडिंग करू शकू याचा विश्वास दोघांना होता.

प्रवाशांना इमर्जन्सी लँडिंगची सूचना देण्यात आली. सर्व प्रवासी एकदम हडबडले. काहींनी प्रार्थना सुरू केली. काहींनी आपल्या मुलांना किंवा मित्र अथवा नातेवाईक यांना पत्र लिहायला सुरुवात केली.

एका प्रवाशाने तर आपले मृत्युपत्र लिहायला सुरुवात केली. आपण या संकटातून वाचणार नाही असेच त्यांना वाटू लागले. विमानाचा क्रू त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. पण परिस्थिती आणखीनच गंभीर बनू लागली.

विमानाचे लाईट बंद झाले. विमानात ठार काळोख पसरला. प्रवाशांमध्ये गोंधळ वाढला, काही जण रडू लागले. पायलटसाठी आता एक आधार उरला होता. विमानाच्या पोटात रॅम एअर टरबाईन बसवलेले होते व त्यातून थोडीफार वीजनिर्मिती होत होती.

 

airplane black night InMarathi

 

त्या जोरावर केबिनमधील लाईट सुरू ठेवून विमानाची दिशा बदलणे व फ्लॅप वर कंट्रोल करणे शक्य होते. या उपकरणात बाहेरून येणाऱ्या हवेने पंख्याची पाती फिरून त्यातून वीजनिर्मिती होत होती.

बॉब पिअर्सन व मॉरिस क्विंटल दोघांनीही धीर सोडला नाही. विमानाचा वेग बराच कमी करून २५०० फूट प्रती मिनिट इतका खाली आणला. जे विमान ४१००० हजार फुटांवर होते ते खूपच खाली आले होते आणि वैमानिकांना शेवटचा मोठा धक्का बसला.

विमानाचे लँडिंग गियर जाम झाले. विमानातील हायड्रोलिक्स सिस्टीम बंद पडल्याने हा प्रॉब्लेम उद्भवला. लँडिंग गियर जाम म्हणजेच विमानाच्या पोटातून विमानाची चाकं बाहेर कशी येणार?

चाकं बाहेर नाही आली तर विमानाच्या पोटावर लँडिंग करावे लागणार आणि त्यापरिस्थितीत विमान धावपट्टीवर घासले जाऊन विमानाने पेट घेण्याची शक्यता होती. पण दोन्ही पायलट आहे त्या परिस्थितीत विनीपेग एअरपोर्ट गाठायचा प्रयत्न करत होते.

 

winnipeg-airport
ChrisD.ca

आता सह वैमानिक मॉरिस आकडेमोड करत असताना लक्षात आले की विनीपेग विमानतळ अजून १५ किमी दूर होता व आहे त्या स्थितीत एवढे अंतर कापणे शक्यच नव्हते. पण अगदी जवळ असलेल्या गिमाली एअरपोर्टवर उतरण्याचा प्रयत्न करणे एवढेच हातात उरले होते.

मॉरिसने बॉबला निर्वाळा दिला की त्याचे एअरफोर्समध्ये असताना याच विमानतळावर ट्रेनिंग झाले होते आणि या विमानतळाची त्याला चांगली माहिती आहे. दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या व गिमाली विमानतळावर उतरायची तयारी केली.

इकडे प्रवाशांचा गोंधळ आणि त्यांना सावरणारे क्रू मेंबर्स. दुसरीकडे बिना इंजिन आणि बिना चाकांचे विमान प्रवाशांसह सुखरूपपणे उतरवायची जबाबदारी खांद्यांवर घेतलेले दोन पायलट आणि काहीच करू न शकणारा मेंटेनन्स इंजिनिअर.

सगळं अनिश्चित होतं आणि काही चमत्कारच त्यांना वाचवू शकेल अशी परिस्थिती होती. गिमाली एअरपोर्ट वर वेगळीच स्थिती होती. त्या विमानतळाचा एक रनवे एअरफोर्सने एक ड्रॅग कार क्लब ला वापरायला दिला होता.

तिथे नुकतीच ड्रॅग कार रेस संपल्याने पब्लिक पिकनिक करत होते. काही महिलांनी बार्बेक्यू लावले होते, काही जण गप्पा मारत होते, काही गाणी आणि नृत्यात मग्न होते.

दोन युवक बाईक चालवत होते आणि अचानक त्यांच्या रोखाने भलेथोरले जम्बोजेट अचानक आकाशातून खाली उतरताना त्यांना दिसले. त्यांना क्षणभर काहीच कळेनासे झाले.

 

jambojet InMarathi

एअरफोर्सने हा रनवे रेसिंगसाठी दिल्याने इथे विमान उतरणे शक्यच नव्हते आणि एअरफोर्सची विमाने आकाराने लहान व वेगळीच होती. हे प्रवासी विमान दिसत होते आणि ते इथे काय करतेय असं डोक्यात येईपर्यंत ते झपाट्याने जमिनीकडे झेपावले देखील.

कसेबसे ते वेगात बाजूला झाले. कॅप्टन बॉबला पायलट केबिनमधून ते दोघे दिसत होते पण तो काही करू शकत नव्हता, एवढ्यात ते बाजूला झाल्याचे दिसले आणि बॉबने विमान तसेच उतरवले.

मॉरिस साठी विमानतळ नवखा नव्हता पण हा रनवे असा बदललाय याची त्याला तीळमात्र कल्पना नव्हती. रनवे वर कार रेसिंगच्या स्ट्रिप्स होत्या त्यावर उतरताना विमानाचे नाक स्ट्रीपच्या बाजूच्या गार्ड रेल वर आदळले.

प्रचंड मोठा आवाज झाला आणि विमान पोटावर घासले गेल्याने मागील बाजूकडून ठिणग्यांचा वर्षाव झाला. विमान गार्डरेल वर आदळल्याने ते बार्बेक्यू लावून ठेवलेल्या महिलांच्या दिशेने निघाले.

ह्या सर्व घटना काही सेकंदातच घडत गेल्याने लोकांची प्रचंड धावपळ उडाली होती. सर्वजण सुरक्षित ठिकाणी पळू लागले. प्रचंड गोंधळ आणि धावपळ या सर्वातून वाट काढत बॉब आणि मॉरिस विमान कंट्रोल करायच्या प्रयत्नात होते आणि अखेर ते विमान आहे.

त्या स्थितीत म्हणजे “पडलो तरी नाक वर” अशा स्थितीत उभे राहिले. नशिबाने विमानाने पेट घेतला नव्हता. बॉब आणि मॉरिस मोठी लढाई जिंकून विजयी झाले होते. ६९ जणांचे प्राण त्यांनी वाचवले होते.

 

gimli
National Post

विमानाचे नुकसान भरून आले असते पण जर प्राणहानी झाली असती तर ती काही परत आली नसती. अखेर त्यांचे प्रयत्न आणि जिद्द तसेच प्रसंगावधान यांच्या जोरावरच हा चमत्कार घडून आला होता.

वेळ न दवडता त्यांनी इमर्जन्सी डोअर उघडून त्याला असलेल्या घसरगुंडीवरुन प्रवाशांना खाली उतरवायला सुरवात केली. विमानाचे नाक वर व मागील बाजू खाली गेल्याने ही घसरगुंडी जास्तच उंच झाली होती.

तिथून उतरताना काहींना इजा झाली. काहींना विमान जमिनीवर आदळले तेव्हाच थोडे लागले होते पण फारसे काही वाईट न घडता सर्वच्या सर्व सुखरूप होते.

एव्हाना तेथील सर्वांनी विमानकडे धाव घेऊन मदतीस सुरवात केली. विमानाच्या पुढील भागात थोडीशी आग लागली होती ती कार क्लबच्या मेम्बर्सनी एस्टिंगविशर च्या साह्याने विझवली. सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

कॅप्टन बॉब आणि मॉरिस यांनी एअरट्रॅफिक कंट्रोलर यांना रिपोर्टिंग केले. प्रवासी आणि तेथील उपस्थित मंडळींनी कॅप्टन बॉब पिअर्सन आणि कॅप्टन मॉरिस यांचे सर्वांनी अभिनंदन आणि कौतुक केले.

 

Air traffic control
Skyguide

एक महा नाट्य संपुष्टात आले होते. पण मुळातच हे असे का घडले हा प्रश्न उरलाच होता. चौकशी अंती हे निष्पन्न झाले होते की मॉन्ट्रीयल विमानतळावर जेव्हा इंधन भरले गेले तेव्हा जुन्या सिस्टीम प्रमाणे पौंड या मापात ते भरले गेले होते.

या अत्याधुनिक विमानात किलोग्रामच्या वजनात इंधनाचा हिशोब केला जायचा. या विमानाला २१०० किमी प्रवासासाठी २०४०० किलोग्राम इतके इंधन हवे होते ते पाउंडच्या हिशोबात भरले गेल्याने म्हणजेच २०४०० पाउंड भरले गेल्याने किलोग्रामच्या हिशोबात ते ९१४४ किलो इतकेच भरले गेले होते.

इंधन भरणाऱ्यांनी नवीन मेट्रीक सिस्टीम ध्यानात घेतली नाही आणि जुन्या हिशोबात इंधन भरले. वैमानिकांनी देखील ऑन पेपर इंधन भरल्याचे रिपोर्ट वाचून घेतले होते पण ते पाउंड मध्ये की किलोमध्ये हे चेक केले नाही.

नवीन विमानाचे सिम्युलेटरवर शिक्षण झाल्याने व प्रॅक्टिकल ट्रेनिंग न झाल्याने काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले असावे. या घटनेनंतर ट्रेनिंगच्या बाबतीत एअर कॅनडाच्या प्रशासनाने ग्राऊंड स्टाफचे ट्रेनिंग तसेच वैमानिकांचे ट्रेनिंग याकडे लक्ष पुरवले.

बोइंग ७६७ नंतर दुरुस्त होऊन परत एअर कॅनडाच्या ताफ्यात सामील झाले.

२००८ साली एअर कॅनडाच्या ताफ्यातून ते विमान रिटायर झाले. मात्र लोकांना हा किस्सा कायमच आठवत राहिला. लोकांनी त्याचे नामकरण “गिमाली ग्लायडर” असे ठेवले.

६९ प्रवाशांचे प्राण ज्या विमानामुळे गोत्यात आले होते ते बोइंग ७६७ हे विमान अखेरपर्यंत “गिमाली ग्लायडर” या नावानेच ओळखले गेले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?