' या सुवर्णपरीचा जीवन प्रवास प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायक आहे – InMarathi

या सुवर्णपरीचा जीवन प्रवास प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायक आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

एक महिन्यामध्ये सलग ५ सुवर्णपदक मिळवणे असामान्य गोष्ट आहे. ते करून दाखवलंय आपल्या सुवर्णपरी हिमा दासने. वाऱ्याच्या वेगाने धावणारी १८ वर्षाची हिमा दास भारताची “सुपर गर्ल” म्हणून ओळखली जाऊ लागलीय.

सगळीकडे भारताच्या नावावर सन्मानाचे पदक घेऊन येऊन हिमाने नवीन रेकॉर्ड तर रचलेच आहेत सोबतच आपली मान अभिमानाने उंचावली आहे.

अर्थात हा प्रवास तिच्यासाठी अजिबात सोपा नव्हता.

दिवसभर अंग पिळवटून जाईपर्यंत मेहनत करून नंतर पोटभर जेवून मऊ गादीवर लोळण्याइतकं तर सोडा पण साधं धावताना पायात धावण्यासाठी उपयुक्त असणारे जोडे देखील हिमा घेऊ शकली नव्हती. तशी परिस्थितीही नव्हतीच म्हणा.

 

Hima_Das_inmarathi
Hindustan

“ढिंग एक्सप्रेस ते सुपर गर्ल”

हिमा दास आसाममधील ढिंग, नागाव या छोट्याश्या गावात लहानाची मोठी झाली. ५ भावंडात सर्वात लहान असलेली हिमा जोनाली दास व रणजित दास यांची मुलगी आहे.

हिमाचे आईवडील शेतकरी असून त्यांची भाताची शेती आहे. लहान असताना हिमा आपल्या वडिलांच्या शेतजवळच सामावसक मुलांसमवेत फुटबॉल खेळत असे.

तिचा कल फ़ुटबाँल मध्ये असला तरीही तिच्या धावण्याचा वेग पुष्कळ चांगला होता आणि हेच नेमके हेरले तिच्या प्रशिक्षक निपुण दास यांनी. त्यांनी तिला धावण्यामध्ये रस घेण्याचा सल्ला दिला. तो मानून तिने त्या दिशेने प्रयत्न सुरु केले.

सुरुवातीला यात भविष्य घडविण्याचा काहीएक मानस हिमाचा नव्हता पण निपुण दास यांनी तिला सल्ला दिल्यानंतरच प्रयत्न करून तिने जिल्हास्तरीय १०० आणि २०० मीटरशर्यतीत प्रथमतः सुवर्णपदक जिंकले.

निपुण दास द इंडियन एक्सप्रेस समोर म्हणाले की,

“तिच्या पायात अतिशय स्वस्त असे बूट्स होते आणि तरीही तिने सुवर्णपदक जिंकले. ती वायुवेगाने धावत होती. मी या आधी असे कौशल्य पाहिलेच नव्हते”.

गावामध्ये हिमाला सरावासाठी धावण्याचा ट्रॅक तर सोडाच पण साधी सपाट जमीन देखील नव्हती. ती त्यांच्या फ़ुटबाँल खळण्याच्या चिखल असलेल्या मैदानावर दिवसभर सराव करत असे.

 

hama inmarathi
DNA India

पुढे निपुण हिमाला घेऊन गुवाहाटीला आले त्यांनी तिला पुढचे प्रशिक्षण तिथे देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा ठामपणा पाहून हिमाच्या पालकांनी देखील यास संमती दर्शविली.

तिथे निपुण दास आणि त्यांचे सहप्रशिक्षक निबाजीत मालकर यांनी तिच्यातील कौशल्यावर खूप मेहनत घेतली.

यात तिचा खर्च देखील प्रशिक्षकांनी केला, सुरुवातीला २०० मीटरसाठी त्यांनी तिला तयार केले आणि नंतर ४०० मीटर च्या स्पर्धांमध्येही ती भाग घेऊ लागली.

हिमाने शालेयस्तरीय राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतलेला असताना रौप्यपदक जिंकले व त्यामुळे ती राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत हैद्राबादमध्ये सहभागी होऊ शकली.

तिथे तिने आणखी बक्षिसे मिळवली आणि पुढे अशियन युथ चॅम्पियनशिपसाठी मी मध्ये बँकॉकला दाखल झाली. तिथे तिचा ७ वा क्रमांक जरी आला असला तरीही ती नैरोबी येथील वर्ल्ड युथ चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरली. जिथे ती पदक मिळविणारी पहिली भारतीय ठरली.

पुढे पतियाला मधील राष्ट्रीय क्रीडा संस्था (NIS) मध्ये तिने तिचे पुढचे प्रशिक्षण सुरु ठेवले. तिने नंतर जाकार्तामध्ये झालेल्या अशियन गेम्स टेस्ट इव्हेंट्स मध्ये देखील सुवर्णपदक जिंकले.

 

hima das inmarathi
Outlook India

२०१८ च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम मध्ये तिचा ४०० मीटरच्या स्पर्धेत सहावा क्रमांक आला आणि हा क्षण खरोखरच तिच्यासाठी अभिमानास्पद होता. निबाजीत मालकर म्हणतात की,

“खुपश्या धावपटूंमध्ये हे दिसून येत नाही पण हिमामध्ये काहीतरी खास आहे, ती कधीच तिची चिकाटी कमी पडू देत नाही तिचा खेळ प्रत्येक शर्यतीत उत्तमोत्तम होत जातो.”

हिमाने यावर्षीच्या २ जुलैला युरोपमध्ये, ७ जुलैला कुंटो ऐथलेटिक्स मीट मध्ये, १३ जुलैला चेक गणराज्यमध्ये आणि १७ जुलैला टाबोर ग्रांप्री मध्ये वेगवेगळ्या स्पर्धेत सुवर्णपदक कमावले आहेत.

हिमा अशी पहिली भारतीय महिला आहे जिने फिनलंड मध्ये झालेल्या वर्ल्ड ऐथलेटिक्स चैंपियनशिपच्या धावपट्टीवर ४००मीटरची शर्यत ५१.४६ सेकंद मध्ये संपवून हे रेकॉर्ड आपल्या नावावर करून घेतले आहे. ज्यात तिने सुवर्णपदक जिंकले आहे.

एकेकाळी पायात चांगले बूट जिच्याकडे नव्हते आज तिच्या नावाने आदिदास कंपनीने एक बुटांची रेंज चालू केली. आदिदास प्रोत्साहन देत असलेल्या खुपश्या खेळाडूंमध्ये आता हिमा दासचे देखील नाव आले आहे.

 

daas inmarathi
indiatoday.in

अश्या आठवणीने हिमाचे डोळे अहरूंनी भरून येत नसतील तर नवलच! तिच्या आई जोनाली दास यांची यावरील प्रतिक्रिया विचारली असता ती म्हणते

“कॉमनवेल्थ गेम्स? ते काय असते? तू दूरदर्शनवरती दिसणार का? असे असेल तर ही चांगली गोष्ट आहे.”

रणजित दास म्हणतात,

“तिला सर्व प्रकारचे खेळ खेळायला आवडत असे पण, तिची आई तिला थांबवत असे कारण त्यामुळे तिच्या अभ्यासावर परिणाम होईल असे तिला वाटत असे. मी तिला त्यापासून कधीच परावृत्त केले नाही.”

यावर जोनाली दास म्हणतात, “तिला तिच्या वडिलांना मदत करायला आवडत असे तिने स्वयंपाकघरात मला फारशी मदत केली नाही, ती १५ मिनीटांपेक्षा जास्ती वेळ एकाजागी बसून अभ्यास करूच शकत नव्हती, त्यापेक्षा बाहेर जाऊन खेळण्याकडे तिचा कल असायचा.”

त्या दिवशी तिने तिच्या कुटुंबाला गर्व वाटावा अशी शर्यत जिंकली. तिचा खेळ ते दूरदर्शनवरती पाहू शकत असले तरी विजेच्या अभावी त्यांना ते जमले नाही.

 

hima inmarathi
Social Ketchup

यावर रणजित दास म्हणतात,

“त्या दिवशी मी काहीच खाल्ले नाही, पण ती जिंकल्यावरती मी जेवलो. तिने त्या रात्री आम्हाला कॉल केला आणि विचारले कि ‘देवता, तुम्ही माझी शर्यत पहिली का? तुम्ही झोपेत असताना मी जगाला हादरवून सोडले’.”

तिच्या या यशासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी देखील ट्विटरवरून तिचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. याशिवाय मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणतो की, “तुझी हि जिंकण्याची भूक, तरुणांसाठी प्रेरणा आहे”.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?