' कॉम्प्युटरपेक्षाही झटपट गणिते सोडविणाऱ्या शकुंतलादेवींची सुरस गोष्ट… – InMarathi

कॉम्प्युटरपेक्षाही झटपट गणिते सोडविणाऱ्या शकुंतलादेवींची सुरस गोष्ट…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही महिन्यांपुर्वी शकुंतला देवी हे नाव अनेक भारतीयांना ठाऊक नव्हतं. कारण त्यापुर्वी हे नाव लोकांपर्यंत कधी पोचलंच नव्हतं.

खरंतर त्यांनी तसं कोणतं अगाध समाजकार्य केलं नव्हतं की त्या लोकांच्या मनावर राज्य करतील. पण त्यांच्या अंगी एक अशी अद्भुत प्रतिभा होती की त्याची दखल भारतासह अख्ख्या जगाला घ्यावी लागली.

अहो, चक्क गुगलने त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त त्यांच डूडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली होती.

नक्कीच शकुंतला देवींनी असं काहीतरी करून ठेवलं होतं जे आकलना पलीकडलं होतं, ज्यामुळे गुगललादेखील त्यांना हा मान द्यावा लागला. चला तर जाणून घेऊया शकुंतला देवींची ती प्रतिभा ज्यापुढे गुगल देखील नतमस्तक झालं!

shakuntala-devi-marathipizza05

 

स्रोत

 

४ नोव्हेंबर १९२९ रोजी बंगलोरमध्ये शकुंतला देवी यांचा जन्म झाला. त्यांच कुटुंब म्हणजे पारंपरिक कन्नड ब्राह्मण! पण शकुंतला देवी यांचे वडील नव्या युगातले, त्यांनी आपल्या भिक्षुकीच्या पारंपरिक व्यवसायला आणि मंदिरातील परंपरागत पुजारी होण्याला नकार देऊन सर्कसमधील आडवाटेवरची नोकरी धरली.

शकुंतला देवी केवळ तीन वर्षांच्या होत्या तेव्हा, त्यांना खेळण्याच्या पत्त्यातील काही ट्रिक शिकवत असताना त्यांची कुशाग्र बुद्धी आणि अविश्वसनीय स्मरणशक्ती वडिलांच्या ध्यानी आली.

तेव्हा त्यांनी सर्कशीतील नोकरी सोडली आणि लहानग्या शकुंतलेला घेऊन तिच्या स्मरणशक्तीवर आधारीत रस्त्यावरचे खेळ करायला सुरूवात केली.

त्यावेळी शकुंतला देवी यांच कसलंही शिक्षण झालं नव्हतं. पण वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी म्हैसूर विद्यापीठामध्ये आल्या. येथे आपल्या कुशाग्र बुद्धीचे प्रदर्शन करीत त्यांनी सर्वांनाच चकित केले आणि इथून सुरु झाला त्यांच्या प्रसिद्धीचा प्रवास!

 

shakuntala-devi-marathipizza02

स्रोत

 

शकुंतला देवी १९४४ मध्ये लंडनला गेल्या. लंडनला गेल्यावर पुढे त्यांनी संपूर्ण जगामध्ये प्रवास केला आणि आपल्या बुद्धीमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार त्यांनी संपूर्ण जगाला चक्रावून सोडले.

१९७६ साली आपल्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी संगणकापेक्षाही अधिक वेगाने आकडेमोड पूर्ण करून त्याची उत्तरे परिक्षकांसमोर अचूक सादर केली.

१९८२ साली थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांच्या बुद्धिमत्तेची दखल घेतली. या कामगिरीचे वर्णन करताना असे वर्णन केले गेले आहे की १९८० मध्ये शकुंतला देवी यांनी संगणकालाही पराभूत करण्याची किमया करून दाखवली. ती घटना पुढीलप्रमाणे-

१८ जून १९८० मध्ये त्यांना 7,686,369,774,870 आणि 2,465,099,745,779 ह्या दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या. हे आकडे लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडले. त्यानंतर त्यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करून दाखवत केवळ २८ सेकंदामध्ये 18,947,668,177,995,426,462,773,730 हे उत्तर दिलं!

विचार करा १३ आकडी दोन संख्याचा गुणाकार त्यांनी फक्त २८ सेकंदात पूर्ण केला. त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना ह्युमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि शकुंतला देवी यांच नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये विराजमान झालं.

 

shakuntala-devi-marathipizza03

स्रोत

 

भारतात परतल्यावर १९८८ मध्ये त्यांना अमेरिकेतून बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठामधील मानसशास्त्र विभागाचं विशेष आमंत्रण आलं. या विभागातील प्राध्यापक आर्थर जेनसन यांनी त्यांच्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली.

१९९० सालच्या इंटेलिजन्स या प्रसिद्ध जर्नलमध्ये प्राध्यापक आर्थर जेन्सन यांनी शकुंतला देवी यांच्याविषयीचा तपशीलवार प्रबंध प्रकाशित केला.

प्राध्यापक जेन्सन यांनी देखील त्यांच्यावर असंख्य प्रयोग केले. कोणत्याही अवघड बहुअंकी संख्येचं धनमूळ काढणे किंवा कोणत्याही बहुअंकी संख्येचा सातवा किंवा आठवा घात काढायला सांगण्याची खोटी की शकुंतला देवी याचं उत्तर हजर असायचं.

जेन्सन यांनी आपल्या नोंदीत असं नमूद केलंय की,

मी पूर्ण आकडा लिहिण्यापूर्वीच त्या सांगितलेलं गणित झटक्यात सोडवायच्या.

आपल्या गणितीय प्रतिभेविषयी शकुंतला देवींनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. त्यामध्ये फलज्योतिष, पाककला आणि काही कादंबऱ्याचा देखील समावेश आहे. त्यांनी समलैंगिकतेविषयी लिहिलेलं एक अभ्यासपूर्ण पुस्तक अतिशय गाजलं होतं!

 

shakuntala-devi-marathipizza04

स्रोत

 

२०१३ सालच्या एप्रिल महिन्यात, वयाच्या ८३ व्या वर्षी बंगलोरमध्येच शकुंतला देवी यांनी अखेरचा श्वास घेतला आणि हा जगप्रसिद्ध ह्युमन कॉम्प्युटर काळाच्या पडद्याआड झाला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?