' भारत विरुद्ध न्यूझीलंड : आज टीम कोहलीची सरशी होणार की किवीज फायनलला जाणार?

भारत विरुद्ध न्यूझीलंड : आज टीम कोहलीची सरशी होणार की किवीज फायनलला जाणार?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

२०१९ ची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा दिवसेंदिवस उत्कंठापूर्ण होते आहे. भारताने चांगला खेळ करत व सांघिक खेळाचे प्रदर्शन करत सेमीफायनलला जागा पक्की केली आहे.

आज विश्वचषक स्पर्धेची सेमीफायनल मॅच आहे आणि भारतापुढे फायनलला जाण्यासाठी न्यूझीलंडचे आव्हान आहे.

ह्या विश्वचषक स्पर्धेत आजवर न्यूझीलंड ज्या प्रकारे खेळले आहे त्यावरून भारताला न्यूझीलंडला हरवून फायनलला जाणे शक्य आहे असेच वाटते. आजच्या मॅचमध्ये भारत जिंकण्याची शक्यता जास्त आहे.

साऊथ आफ्रिका जरी स्पर्धेबाहेर गेले असले तरी त्यांच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यावर विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनल मॅचमध्ये कोण कोणाविरुद्ध खेळणार हे ठरणार होते.

 

south africa inmarathi
india.com

बहुसंख्य भारतीयांची इच्छा होती की त्या मॅचमध्ये साऊथ आफ्रिका जिंकावी जेणे करून सेमी फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी होऊ नये.

संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत आजवर आपण इंग्लंड सोडल्यास दुसऱ्या कुठल्याही संघाशी सामना हरलो नाही म्हणूनच सेमीफायनलला इंग्लंडशी आपला सामना होऊ नये अशीच भारतीय चाहत्यांची इच्छा होती.

जेव्हा साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवले तेव्हा भारतीय चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. भारत श्रीलंका सामन्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये संजय मांजरेकर विराट कोहलीला म्हणाले होते की,

“माझी अशी इच्छा आहे की सेमीफायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडऐवजी न्यूझीलंडशी व्हावा.”

अनेक क्रिकेटतज्ज्ञ व चाहत्यांचे असे मत आहे की सेमीफायनलला पोहोचलेल्यांपैकी न्यूझीलंडचा संघ सर्वात कमजोर आहे. आणि त्यांच्या ह्या म्हणण्याला अर्थातच काही सबळ कारणे आहेत.

किवीजने नुकत्याच तीन मॅचेस गमावल्या आहेत. लीग मॅचेसमध्ये ते इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ह्या दोन्ही संघांकडून पराभूत झालेत.

आपल्याविरुद्धचा सामना अक्षरश: पाण्यात गेला. बांगलादेशने त्यांना पळता भुई थोडी केली आणि ते कसेबसे जिंकले. फक्त पाकिस्तानचे नशीब अत्यंत वाईट म्हणून किवीज आज टॉप फोरमध्ये स्थान मिळवू शकले.

 

New_Zealand_Cricket_Team inmarathi
Cricbuzz.com

पण न्यूझीलंडला आज हरवणे सोपे आहे अशातलाही भाग नाही. आणि कोहलीने हा सामना अगदी सहज घेऊ नये. अर्थात तो सुज्ञ आहे त्यामुळे तो न्यूझीलंडच्या संघाला कमी लेखणार नाही अशी आपण आशा करूया.

भारत आज सेमीफायनलिस्टच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. आपण अनेक सामने चांगल्याप्रकारे जिंकलो आहोत. पण आपल्याला मधल्या फळीची चिंता अजूनही सतावते आहे.

लोकेश राहुल आणि रोहित शर्मा खेळले तर आपल्याला मधल्या फळीची चिंता नसते. रोहित सध्या फॉर्ममध्ये आहे.(टचवुड) पण म्हणून मधल्या फळीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणे आपल्याला परवडण्यासारखे नाही.

ह्या स्पर्धेतली आपली न्यूझीलंडविरुद्धची मॅच पावसामुळे पाण्यात गेली. पण ह्या वर्षाच्या सुरुवातीला आपण न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेलो तेव्हा तिथे आपली दाणादाण उडाली.

त्यांनी आपल्याला एकदिवसीय मालिकेत ४-१ असे पराभूत केलेले आपण विसरून चालणार नाही.

त्या मालिकेत आपल्याला मधल्या फळीचे दुखणे जास्त प्रकर्षाने जाणवले. हॅमिल्टनच्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आपल्याला ९२ धावांवर गारद केले होते आणि त्यानंतर झालेल्या वेलिंग्टनच्या सामन्यात १८ धावांवर ४ बाद अशी आपली अवस्था झाली होती.

 

new zealand inmarathi
Indian Weekender

त्यातून आपल्याला विजय शंकर आणि अंबाटी रायुडूने तारले होते. पण हे दोघेही सध्या संघात नाहीयेत.

ह्या आधी ओव्हलला झालेल्या वॉर्म अप मॅचमध्ये भारत व न्यूझीलंड एकमेकांपुढे उभे ठाकले होते तेव्हा त्या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आपली ३९ वर ४ बाद अशी अवस्था केली होती. आणि आपला संपूर्ण संघ १७९ धावांत गारद केला होता.

सध्या ट्रेंट बोल्टच्या स्विंग गोलंदाजीचे आपल्यापुढे मोठे आव्हान आहे. आपली फलंदाजांची सेना स्विंग गोलंदाजीपुढे कधी कधी चाचपडते हे मागील दोन वर्षांत काही वेळा आपण बघितले आहे.

पण असे असले तरीही ओल्ड ट्रॅफोर्ड वर होणारी ही मॅच भारत जिंकणार असा अंदाज अनेक क्रिकेटप्रेमी आणि तज्ज्ञ लोक वर्तवत आहेत.

त्यांच्या मते ब्लॅककॅप्सचे मनोबल आज काहीसे डळमळीत असेल कारण ह्या आधीच्या तिन्ही मॅच ते हरले आहेत. आपण ह्या आधीच्या मॅचेस चांगल्या फरकाने जिंकून सेमीफायनलला पोहोचलो आहोत.

विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीला चांगल्या फॉर्ममध्ये असणारा न्यूझीलंडचा संघ गेल्या काही मॅचेसमध्ये ढेपाळला आहे असे दिसते आहे. त्यांनी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान विरुद्धच्या तिन्ही सामन्यांत चांगला खेळ केला नाही.

त्यांच्या चांगल्या नेट रन रेटच्या जोरावर ते कसेबसे सेमीफायनलला पोहोचले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्यांच्या सामन्यात सुद्धा केन विल्यमसनने पराभवाच्या जबड्यातून सामना कसाबसा न्यूझीलंडच्या बाजूने खेचून आणला.

 

kane inmarathi
outlook india

अर्थात प्रत्येक दिवस काही सारखा नसतो. आणि प्रत्येक सामना देखील वेगळा असतो. तरीही गेल्या दहा दिवसात झालेले तीन पराभव न्यूझीलंड संघाच्या जिव्हारी निश्चितच लागले असणार.

तसेच आजवरचा त्यांचा सेमीफायनलमध्ये जिंकण्याचा रेकॉर्ड सुद्धा फारसा बरा नाही.

सुरुवातीला चांगले खेळून, चांगल्या संघाच्या पायात पाय अडकवून त्यांना हरवून त्यांना स्पर्धेतून बाहेर काढणे आणि नंतर स्वत: सेमीफायनलला ढेपाळणे ही न्यूझीलंडची खोड जुनीच आहे. मागच्या सात विश्वचषक सेमीफायनल सामन्यांत त्यांनी फक्त एकदाच विजय मिळवला आहे.

त्यामुळे आजच्या सामन्यात न्यूझीलंड त्यांच्या जुन्या सवयीप्रमाणे नांगी टाकतात की काही वेगळा इतिहास निर्माण करतात ह्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे सध्या न्यूझीलंडला सलामीवीरांच्या फॉर्मची समस्या सतावते आहे.

जेव्हा त्यांच्या पहिल्या मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध त्यांनी नाबाद १३७ धावा केल्या तेव्हा त्यांना बघून असे वाटले होते की मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुनरो हे सलामीवीर सगळ्याच संघाच्या गोलंदाजांवर भारी पडणार!

पण कुठे माशी शिंकली कोण जाणे आणि जशी जशी स्पर्धा पुढे जाऊ लागली तसा तसा न्यूझीलंडच्या ह्या सलामीवीरांचा खेळ बिघडू लागला. सध्या तर त्यांचे ऍव्हरेज सगळ्यात कमी आहे.

सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री ह्याचे ऍव्हरेज व स्ट्राईक रेट सद्यस्थितीत न्यूझीलंडचा सलामीवीर हेन्री निकोल्सपेक्षा जास्त आहे. हेन्री निकोल्सने सध्या कॉलिन मुन्रोची जागा घेतली आहे.

 

henry inmarathi
hindustantimescom

सलामीवीरांचा फॉर्म अचानकपणे जाणे हे न्यूझीलंडच्या मागील विश्वचषक स्पर्धेतील पराभवामागील आणखी एक कारण आहे.

आज गप्टिल आणि निकोल्स किंवा मुनरो हे बुमराह आणि कंपनीच्या भेदक गोलंदाजीचा सामना करणार आहेत. आणि बुमराहची आजवरची प्रगती बघता न्यूझीलंडच्या सलामीवीरांसाठी हा सामना अवघड असल्याचे दिसून येत आहे.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपल्या टॉप ऑर्डरने विश्वचषक स्पर्धेतील आपल्या सर्वच विरोधी संघांना टेन्शन दिले आहे.

तसेच सध्या आपली स्पिनची जादू देखील जोमात आहे. (परत टचवुड!)रोहित, राहुल आणि विराट ह्यांनी विरोधी संघातील गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतलाय.

ह्या तिघांचाही फॉर्म सध्या सुदैवाने चांगला आहे. ह्या पहिल्या सेमीफायनलमध्ये त्यांच्याकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी ते निश्चितच प्रयत्न करतील.

फलंदाजांकडून जश्या आपल्या अपेक्षा वाढल्या आहेत तसेच आपल्या गोलंदाजांनी सुद्धा भेदक मारा करत आपल्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

जसप्रीत बुमराहने अगदी नेमक्या वेळेला विकेट्स काढून सांघिक खेळात त्याचे महत्वाचे योगदान दिले आहे आणि त्याच्या जोडीला कुलदीप यादव व युजवेंद्र चहल ह्यांनी फिरकीची जादू करत प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटिंग लाईनला भगदाड पाडण्याचे काम अगदी चोख केले आहे.

 

india-vs-new-zealand-inmarathi
foxsports.com

न्यूझीलंडचे फलंदाज आपल्या फिरकीपुढे गडबडून जातात त्यामुळे आज त्यांच्यापुढे आपल्या फिरकीच्या जोडगोळीचे मोठे आव्हान आहे.

तर ह्या सर्व कारणांमुळे आज आपण जिंकण्याची शक्यता जास्त आहे. अर्थातच क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत काहीही सांगता येत नाही. केव्हाही खेळ पालटू शकतो. त्यामुळे न्यूझीलंड संघाला कमी लेखून चालणार नाही.

“मे द बेस्ट टीम विन” असं काही आपण म्हणणार नाही. कारण आपल्याला आपलाच संघ जिंकायला हवा आहे. तेव्हा “ब्लीड ब्ल्यू” म्हणत आपल्या संघासाठी चिअर करायला तयार व्हा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?