' या मराठमोळ्या दिग्दर्शकाने ६० वर्षांपूर्वीच बर्लिन चित्रपट महोत्सव गाजवला होता

या मराठमोळ्या दिग्दर्शकाने ६० वर्षांपूर्वीच बर्लिन चित्रपट महोत्सव गाजवला होता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

व्ही शांताराम उर्फ शांताराम बापू उर्फ शांताराम राजाराम वणकुद्रे ह्यांना कोण ओळखत नाही? ह्या महान दिग्दर्शकांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर चित्रपटांची भेट दिली.

त्यांचे डॉक्टर कोटणीस की अमर कहानी, नवरंग, पिंजरा, चानी, इये मराठीचिये नगरी, झुंज, झनक झनक पायल बाजे, अमर भूपाळी, आणि दो आँखे बारह हाथ हे चित्रपट अजूनही चित्रपट रसिकांच्या आठवणीत आहेत.

१९५७ साली आलेला “दो आँखे बारह हाथ” हा चित्रपट म्हणजे एक अत्यंत उत्कृष्ट कलाकृतीचा एक उत्तम नमुना होता.

आदिनाथ हा तरुण जेल वॉर्डन पॅरोलवर बाहेर आलेल्या सहा धोकादायक कैद्यांचे हृदयपरिवर्तन करून त्यांना चांगले आयुष्य जगायला शिकवतो.

 

do ankhe barah hath inmarathi
youtue.com

त्यांना स्वतःबरोबर शेतात राबून शेती करायला शिकवतो, प्रेमाने त्यांना सद्गुणी बनवतो. त्यांच्या कष्टाने शेतात भरपूर पीक येते.

खलनायकाची माणसे त्यांच्या शेताची नासधूस करायला येतात पण आदिनाथ त्या माणसांना कडवी झुंज देतो आणि त्यात जखमी होऊन अखेर त्याचा मृत्यू होतो.

पण तो ह्या पूर्वायुष्यात खुनी असलेल्या पाषाणहृदयी कैद्यांचे हृदयपरिवर्तन करण्यात यशस्वी होतो.

चित्रपटाच्या शेवटचं “ए मालिक तेरे बंदे हम” हे गाणं ऐकून डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही इतका ह्या चित्रपटाचा प्रभाव आपल्या मनावर होतो.

आणि हे श्रेय जाते शांताराम बापूंच्या अभिनय, दिग्दर्शनाला, ग दि माडगूळकरांच्या कथा व पटकथेला, मन्ना डे आणि वसंत देसाई ह्यांच्या संगीताला, भरत व्यास ह्यांच्या शब्दांना आणि अर्थातच लतादीदींच्या स्वर्गीय आवाजातील गाण्यांना!

इतके दिग्ग्ज लोक ह्या चित्रपटासाठी एकत्र आले म्हटल्यावर हा चित्रपट “कल्ट क्लासिक” असणारच ह्यात शंका नाही.

 

V shantharam inmarathi
hindipanda.com

ह्या चित्रपटाचे नाव “दो आँखे बारह हाथ” असल्याचे कारण म्हणजे ह्या सहा खुनी कैद्यांच्या बारा हातांना चांगले काम देऊन त्यांचे हृदयपरिवर्तन करून त्यांना परत चांगले आयुष्य देण्याची संधी देणाऱ्या आदिनाथ ह्यांचे आशेने युक्त असे डोळे!

शेवटच्या सीनमध्ये ह्या कैद्यांचे हृदयपरिवर्तन झालेले बघून समाधानाने आकाशातून त्यांच्याकडे बघतात असे आहे.

ह्या चित्रपटाने समाजाला कैद्यांकडे बघण्याची एक नवी दृष्टी दिली. कितीही भयानक गुन्हा केलेला गुन्हेगार असला तरी शेवटी तो माणूस आहे आणि प्रेमाने व धीराने त्याचेही हृदयपरिवर्तन होऊ शकते.

तो सद्गुणी होऊन कष्ट करत चांगले आयुष्य जगू शकतो त्यामुळे कैद्यांनाही एक संधी द्यायला हवी असा विचार ह्या चित्रपटाने मांडला.

गुन्हेगार आणि कैद्यांशी कसे वागायला हवे ह्याबाबतीत समाजाने विचार करण्याची गरज आहे असा संदेश ह्या चित्रपटाने दिला.

सुरुवातीला शांताराम बापूंच्या सगळ्या मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी अगदी तंत्रज्ञांनी सुद्धा “दो आँखे बारह हाथ” ला विरोध केला होता. त्यांचे मत होते की असा चित्रपट बनवायला नको.

 

v shanta inmarathi
jiosaavn.com

हा चित्रपटाच्या आधी शांताराम बापूंनी “झनक झनक पायल बाजे” बनवला होता आणि त्या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले होते.

त्यामुळे शांताराम बापूंच्या निकटवर्तीयांना असे वाटत होते की शांताराम बापूंची यशस्वी घोडदौड अशीच कायम राहावी आणि त्यांनी असेच चित्रपट तयार करावेत.

पण शांताराम बापूंना चाकोरीत अडकून राहणे आवडत नसल्यामुळे त्यांनी “दो आँखे बारह हाथ” करण्याचे ठरवले. खरे तर तेव्हा टेक्निकलर चित्रपटांना सुरुवात झाली होती.

“झनक झनक पायल बाजे” हा रंगीत चित्रपट होता पण बापूंनी “दो आँखे बारह हाथ” मात्र कृष्णधवल ठेवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्यांना ह्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, “ही त्या विषयाची गरज आहे.”

“दो आँखे बारह हाथ” साठी कॅमेरामन म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या त्यागराज पेंढारकरांनी ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानची एक आठवण सांगितली.

ह्या चित्रपटात एका दृश्यात कैद्यांना जमिनीची मशागत करण्यास सांगितले असते कारण त्या कोरड्या नापीक जमिनीतून भरघोस पीक घेण्याचे आव्हान त्यांना दिलेले असते.

ह्या दृश्यात कैदी मशागत करताना अगदी अधीरपणे पावसाची वाट बघत आकाशाकडे डोळे लावून बसलेले असतात. ह्या दृश्याचे चित्रीकरण करण्याच्या वेळेला शांताराम बापूंना आकाशात काळे ढग येताना दिसले आणि त्यांनी पाऊस कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी शॉट रेडी करण्याची घाई केली.

 

shanta inmarathi
indiatvnews.com

सगळ्यांची ही मेहनत सार्थकी लागली कारण फायनल शॉटमध्ये खऱ्याखुऱ्या पावसात हे कैदी आनंदाने बेभान होऊन नाचताना दिसतात.हे दृश्य अगदी अस्सल वाटते कारण ह्यात निसर्गाचे सौंदर्य अगदी अचूक टिपले गेले आहे.

फक्त हेच दृश्य नव्हे तर ह्या चित्रपटातील प्रत्येक दृश्य हे असेच अस्सल वाटते कारण प्रत्येक दृश्याची कल्पना अगदी काळजीपूर्वक करून ती प्रत्यक्षात अमलात आणली आहे.

ह्या चित्रपटातल्या प्रत्येक कलाकाराने त्याचे त्याचे पात्र पडद्यावर अगदी जिवंत उतरवले आहे आणि भूमिका चोख पार पाडली आहे. जेलर आणि कैदी ह्यांच्यातले संवाद अगदी प्रभावीपणे चितारले आहेत.

खास करून जेव्हा जेलर कैद्यांना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी सोडून देऊन नव्याने चांगले जीवन आणि सरळमार्गी आयुष्य जगण्याचा सल्ला देतो ती दृश्ये अगदी प्रभावी झाली आहेत.

कैदी व त्यांचे “बाबूजी” ह्यांच्यातील काही संवाद आणि दृश्ये खूप हृदयस्पर्शी आहेत. ह्या चित्रपटातील “ए मालिक तेरे बंदे हम” ही प्रार्थना तर त्या काळी अनेक शाळा कॉलेज आणि जेलमध्ये सुद्धा म्हटली जात असे आणि अजूनही काही ठिकाणी म्हटली जाते.

 

ह्या चित्रपटात शांताराम बापूंनी भूमिका केली तेव्हा ते ५६ वर्षांचे होते.पण त्यांच्याकडे बघून कुठेही असे वाटत नाही की ते पन्नाशीत आहेत. ते तिशी फार तर पस्तिशीच्या घरात असतील असे आपल्याला वाटते.

ह्या चित्रपटात एक दृश्य आहे ज्यात जेलर बाबूजी त्यांच्या शेतात घुसलेल्या बैलाशी दोन हात करतात. ह्या दृश्याचे चित्रीकरण करत असताना शांताराम बापू खरंच जखमी झाले होते.

त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती आणि डॉक्टरांना भीती वाटत होती की आता त्यांना त्या डोळ्याने बघता येणार नाही. पण शांताराम बापू त्या हि दुखण्यातून उठले आणि त्यांचा डोळा पूर्णपणे बरा झाला.

“दो आँखे बारह हाथ” बॉम्बे ओपेरा हाऊसमध्ये तब्बल ६० आठवडे चालला.

ह्या चित्रपटामुळे शांताराम बापू व त्यांच्या संपूर्ण टीमचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप कौतुक झाले. ह्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तसेच सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचे देखील बक्षीस मिळाले.

 

berlin inmarathi
inext.com

आंतरराष्ट्रीय स्तरावर बेस्ट फॉरेन मोशन पिक्चर ऑफ १९५८ म्हणून सॅम्युएल गोल्डविन इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड (आज आपण ज्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड म्हणतो) मिळाले.

तसेच बर्लिन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील ह्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

आज हे सगळे प्रतिष्ठित पुरस्कार परळच्या राजकमल कलामंदिर स्टुडिओच्या मोठ्ठ्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये दिमाखाने विराजमान आहेत. हे पुरस्कार आपल्या देशात होऊन गेलेल्या महान कलाकार व त्यांनी आपल्याला दिलेल्या अजरामर कलाकृतींचा वारसा सांगतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?