'वंचित बहुजन आघाडीमधून बंडखोरी करून बाहेर पडणारे लक्ष्मण माने आहेत कोण?

वंचित बहुजन आघाडीमधून बंडखोरी करून बाहेर पडणारे लक्ष्मण माने आहेत कोण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अतिशय प्रभावशाली कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधीच फूट पडत असल्याचे दिसते आहे.

“वंचित समाज व बहुजन समाजाच्या असलेल्या ह्या आघाडीत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी घुसखोरी केली असून आता ही आघाडी वंचितांची राहिलेली नाही.”

असा खळबळजनक आरोप प्रसिद्ध दलित साहित्यकार आणि वंचित बहुजन आघाडीचे महत्वाचे नेते असलेल्या लक्ष्मण माने ह्यांनी केला आहे.

त्यांनी हे वक्त्यव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ह्यांना उद्देशून केले असून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ह्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच वंचित बहुजन आघाडीत उभी फूट पडत असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

vanchit inmarathi
hindustantimes.com

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मण माने ह्यांनी त्यांना प्रकाश आंबेडकर ह्यांची कामाची पद्धत त्यांना पटत नसल्यामुळे ह्यापुढे त्यांच्याबरोबर काम करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे.

खरं तर वंचित बहुजन आघाडीसारख्या पक्षात चक्क संघाच्या लोकांना स्थान देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनीच आता राजीनामा द्यायला हवा असे म्हणत लक्ष्मण मानेंनी प्रकाश आंबेडकरांवर जाहीर टीका केली आहे.

माने ह्यांनी पक्षाध्यक्षांचाच राजीनामा मागत पक्षात बंडखोरी केली असल्याचे दिसून येते आहे.

“लोकसभा निवडणुकीत सांगलीहून वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर ह्यांनी निवडणूक लढवली होती. पडळकर हे संघाचे कार्यकर्ते असून देखील प्रकाश आंबेडकरांनी त्यांना वंचित तर्फे उमेदवारी दिली.

आणि आमच्याशी काहीही चर्चा न करता, आमचे मत न घेता त्यांनी पडळकरांना पक्षाचे प्रवक्ते केले,”

असा आरोप लक्ष्मण माने ह्यांनी आंबेडकरांवर केला आहे. प्रकाश आंबेडकरांना त्यांनी वंचितचे अध्यक्ष केले पण आंबेडकरांच्या कामाची पद्धत चुकीची असल्याने आता त्यांच्याबरोबर काम करणे शक्य नसल्याने आपण त्यांच्यापासून दूर होत असल्याचे लक्ष्मण मानेंनी जाहीर केले.

 

laxman mane inmarathi
maharashtratimes.com

“मी कट्टर आंबेडकरवादी आहे. मी कधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना किंवा भाजपाचे समर्थन करू शकणार नाही. प्रकाश आंबेडकर जी भूमिका घेतात त्यामुळेच त्यांच्यावर व वंचितवर भाजपाची टीम बी असल्याचे आरोप होतात,” अशी टीका मानेंनी केली.

प्रकाश आंबेडकरांची कामाची पद्धत पटत नसल्याने आपण त्यांच्याबरोबर काम करू शकत नाही व त्यामुळे प्रवक्तेपदाचा राजीनामा देत आहोत असा आशय असलेला राजीनामा मानेंनी आंबेडकरांकडे सोपवला असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच वंचितच बहुसंख्य कार्यकर्ते आपल्या बरोबर असल्याचे देखील मानेंनी सांगितले.

इतके दिवस वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते असलेले दलित साहित्यकार लक्ष्मण माने कोण आहेत?

दलित साहित्यकार म्हणून प्रसिद्ध असलेले लक्ष्मण माने त्यांच्या “उपरा” नावाच्या पुस्तकामुळे “उपराकार” असेही ओळखले जातात.त्यांचा जन्म कैकाडी समाजात १ जून १९४९ साली सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात सोमंथळी ह्या लहानश्या गावी झाला.

 

laxman inmarathi
jayhind.com

त्यांच्या वडिलांचे नाव बापू माने होते. माने हे लेखनाबरोबरच भारतातील भटके विमुक्त लोक व मागासवर्गीय ह्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्या कल्याणासाठी कार्य करतात.

समाजातील वंचित व उपेक्षित जनतेचा आवाज ते लेखनातून व्यक्त करतात आणि त्या विषयावरील त्यांचे पुरोगामी व परिवर्तनवादी विचार ते त्यांच्या लेखनातून मांडतात.

त्यांच्या उपरा ह्या साहित्यकृतीचे भाषांतर हिंदीत “पराया” ह्या नावाने प्रसिद्ध झाले आहे.तसेच गुजराथी, तमिळ, मल्याळम, फ्रेंच व इंग्रजी भाषेत लेखील ह्या पुस्तकाचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे.

उपरा ह्या त्यांच्या आत्मचरित्रासाठी १९८१ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर १९८४ साली त्यांनी बंद दरवाजा हे पुस्तक देखील लिहिले. लक्ष्मण मानेंना समता व भाईशैलेंद्र अशी दोन अपत्ये आहेत.

त्यांनी साहित्यक्षेत्रात उध्वस्त, खेळ साडेतीन टक्क्यांचा, पालावरचं जग, प्रकाशपुत्र, भटक्याचे गारुड, क्रांतिपथ, विमुक्तायन असे योगदान दिले आहे.

त्यासाठी त्यांना २००५ साली आंबेडकर व्याख्याता पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार (लेखन व समाजसेवेसाठी), सर होमी भाभा फेलोशिप, न. चिं. केळकर पुरस्कार, भारती विद्यापीठ पुरस्कार व २००८ साली पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

 

upara inmarathi
raashi.com

तसेच ते अस्मितादर्श साहित्य संमेलन (१९८७),आदिवासी साहित्य संमेलन (१९८९),आंबेडकरवादी दलित साहित्य संमेलन (२००१),दुसरे राज्यव्यापी समतावादी साहित्य संमेलन, कऱ्हाड(२०१०) ह्या संमेलनांचे अध्यक्ष देखील होते.

माने २००६ साली ऑक्टोबर महिन्यात हिंदू धर्म सोडून नवयान बौद्ध धर्माचा स्वीकार करणार होते.

त्यानिमित्त प्रख्यात मराठी लेखक डॉक्टर यशवन्त मनोहर ह्यांनी लक्ष्मण मानेंना विविध पत्रे लिहिली. ती वीस पत्रे “धम्मपत्रे: लक्ष्मण माने ह्यांना” ह्या पुस्तकात संग्रहित करून प्रकाशित झाली आहेत.

माने ह्यांनी ठरवल्याप्रमाणे २७ मे २००७ रोजी त्यांनी व त्यांच्याबरोबर त्यांच्या ४२ पोटजातींतील १ लाख भटक्या विमुक्त प्रवर्गातील समर्थकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

माजी आमदार लक्ष्मण माने ह्यांच्यावर त्याच्या संस्थेच्या जकातवाडी येथील आश्रमशाळेतील स्वयंपाकी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता.

 

police mane inmarathi
dnaindia.com

ह्याच आश्रमशाळेत काम करणाऱ्या पाच स्त्रियांनी मानेंवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. मानेंवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

मानेंनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

तपासाअंती १९ ऑक्टोबर २०१६ रोजी सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला की अस्लम जमादार, सलिमा मुल्ला, विजय कदम व आनंद देशमुख ह्या आश्रमशाळेतील शिक्षकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हे खोटे आरोप मानेंवर करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले.

ह्या आरोपांत कोर्टाला काहीही तथ्य दिसत नसल्याने कोर्टाने लक्ष्मण मानेंना सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले होते.

मानेंच्या राजीनाम्यामुळे वंचित बहुजन आघाडीत फूट पडल्याचे दिसून येत आहे.

आता आगामी विधासभा निवडणुकीसाठी माने स्वतंत्र पक्ष स्थापन करतात की दुसऱ्या पक्षात (राष्ट्रवादी काँग्रेस) प्रवेश करतात ह्याची उत्सुकता व चर्चा सध्या राजकीय गोटात सुरु आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?