' तिवरे धरण फुटलंच कसं? डोळे उघडणारं वास्तव

तिवरे धरण फुटलंच कसं? डोळे उघडणारं वास्तव

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

रत्नागिरी जिल्ह्यतील चिपळूण-कराड रस्त्याजवळ दुर्गम भागात भेंदवडी गाव आहे. घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसाचे पाणी तेथील तिवरे धरणात येते. गेल्या काही दिवसांपासून या टापूमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.

त्यामुळे सुमारे २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले हे धरण मंगळवारी रात्री ओसंडून वाहू लागले आणि साठलेल्या पाण्याच्या दाबाने अचानक फुटले. पाण्याचा लोंढा धरणाच्या भिंतीच्या बाजूलाच असलेल्या भेंदवाडीमध्ये घुसला. पुरामुळे वाडीच वाहून गेली.

या वाडीतील १४ घरे उद्ध्वस्त झाली. ग्रामस्थांना बचावाची संधीही मिळाली नाही. तसेच त्यांच्या घरांचा मागमूसही राहिला नाही.

ह्या दुर्घटनेत २५ जण वाहून गेले असून, सकाळपर्यंत १३ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. इतर लोक अजूनही बेपत्ता आहेत. धरणाला मे महिन्यापासूनच गळती लागली होती.

गळतीमुळे धरण फुटण्याची शक्यता असल्याने या परिसरातील नागरिकांनी याबाबत निवेदनही दिले होते. पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. धरणाची दुरुस्ती वेळीच न केल्याने ही दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

 

tivre 1 inmarathi
तर ह्या दुर्घटनेनंतर अनेक सुजाण नागरिकांनी सोशल मीडियावर सरकरप्रती आपला रोष प्रकट केला. अनेकांनी मात्र ह्या प्रकरणाची चिकित्सा करत, कोकणातील जमिनीवास्तव समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

फेसबुकवर ओमकार गिरकर आणि पंकज दळवी ह्यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कोंकणातील पटबंधाऱ्यांच्या अवस्थेबद्दल भयानक वास्तव मांडलं आहे.

ओमकार गिरकर यांची फेसबुक पोस्ट….

====

तिवरे ? असे अनेक टाईमबॉम्ब कोकणात टिकटिकत आहेत !

“याला जबाबदार कोण?” या फेसबूककर व कथित समाजसेवकांच्या आवडत्या प्रश्नाचं उत्तर आधीच देऊन टाकतो ?

“मूग गिळून गप्प राहणारे अभियंते”

जेव्हा एखादा अभियांत्रिकी तथ्य न जाणणारा नेता/ लोकप्रतिनिधी / प्रशासकीय उच्चपदस्थ त्याची ताकद वापरून एखादी अभियांत्रिकी दृष्टीने चूकीची असणारी गोष्ट करायला सांगतो तेव्हा सौम्य शब्दांत, आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करून ती गोष्ट कशी सर्वांना हानीकारक आहे हे सांगणं आपलं कर्तव्य आहे.

वकील आरोपीच्या बाजूनेही असतात आणि फिर्यादीच्या बाजूनेही. तुम्ही तुमची मतं ठामपणे मांडली पाहीजेत ज्याला अभियांत्रिकी तथ्याच्या आधार असेल.

तपशील न देता सांगतो. एका इस्पीतळाबाबत घेतलेल्या निर्णयासाठी हायकोर्टाच्या वाऱ्या करायची वेळ आली आहे. तरीही, लोकांचा जीव धोक्यात न घातल्याबद्दल मी आणि माझे वरीष्ठ समाधानी आहोत.

 

TIWARE 1 INMARATHI

 

हीच गोष्ट मी ठामपणे लोकप्रतिनिधींच्या एका समितीसमोर मांडली. आश्चर्य म्हणजे सुरूवातीला या प्रकरणाची कसून माहीती काढणाऱ्या एका लोकप्रतिनिधीने मला समितीसमोर खुला पाठींबा दिला. नंतर समितीमधील अनेकांनी त्यांना दुजोरा दिला.

भलेमोठे प्रकल्प मग ती धरणं असोत वा रिफायनऱ्या .. कोकणासाठी विशेषतः दुर्गम असलेल्या दक्षिण रायगड आणि रत्नागिरी तसंच पालघरसाठी योग्य नाहीत. याची अनेक कारणं आहेत. कधीतरी प्रेझेंटेशन बनवून व्हीडीओ अपलोड करतो.

आम्ही छोटे छोटे विकेंद्रीत जलसाठे निर्माण करायच्या मागे याचसाठी आहोत की कोकणातील पाणलोट क्षेत्रं प्रचंड उतारांची आणि मोठ्या प्रमाणात गाळ आणि इतर गोष्टी घेऊन येणारी आहेत.

उतारावरून वेगाने येणारी गोष्ट दमदार आघात करते हे सांगायला शिक्षणाचीही गरज नाही. कोकणातील मातीची धरणं (earthen dam) बांधताना कोकणातल्या लाल मातीला पाणी लागलं की तिचं लोणी होतं हे सांगायला हवंय का ?

याच चमत्कारीक गुणामुळे हायवे पूर्ण व्हायला त्रास आहे. कोकणात वर्षभर दमटपणा असल्याने मुंगीसारखे जीव मातीत घरं आणि लहान बोगदे मातीत तयार करतात. हेच बोगदे पुढं धरणांच्या भगदाडांमध्ये रूपांतरीत होतात.

 

TIWARE 2 INMARATHI

 

धरण बांधताना बॉरो पीट (जिथून माती भरावासाठी उचलली जाते) धरणाच्याच परीसरात कुठेतरी असतात. कंत्राटदारांनी हे लक्षात घ्यायला पाहीजे की तुम्ही कोकणात आहात. इथं मातीत अजूनही जीव आहे.

जैवविविधतेने समृद्ध असलेला हा कोकण पट्टा आहे. या मातीत कुजणारे अनेक जैव घटक असतात. जे कालांतराने पाण्याच्या संपर्कात येऊन कुजतात आणि वेगवेगळे वायू तयार करतात.

हा वायू धरणाच्या शरीरातून बाहेर येण्यासाठी वाट तयार करतो. परिणामी, पाण्याला धरणामधून वाट मिळते.

कैक लिहीता येईल यावर. सध्या झालंय काय. की जो हुशार, अनुभवी अभियंता तो कंत्राटदार असं न होता ज्याच्याकडे पैसा तो कंत्राटदार. आणि या पैशेवाल्या कंत्राटदाराला फक्त नफा दिसतो.

इंजीनिअर नोकरी वाचवण्यासाठी मालक म्हणेल त्याला होयबा करणार. अरे बाबांनो आजचं मरण उद्यावर ढकलणे इतकाच प्रकार होतो हा. रिस्क तर घ्यायलाच पाहीजे. पण, निस्तरता येईल इतकीच.

तूर्तास, जलसंपदा खातं फॉर्मात असताना कोकणात अजस्त्र धरणांच्या रूपानं टाईमबॉम्ब लाऊन ठेवणाऱ्या अभियंता मित्रांनी सावध रहावं. हवामान बदलामुळं मान्सूनचा कालावधी बदलून पावसाची तीव्रता वाढलेली आहे.

कमी वेळात जास्त पाऊस पडला की F = ma या साध्यासोप्या सूत्रानुसार काय परीणाम होतील हे माहिती आहेच.

=====

पंकज दळवी यांची फेसबुक पोस्ट…

====

तीवरे धरणं फुटले, लोक मेली अजून काही गायब आहेत. मीडियाच्या बातम्या ग्राफिक्स ने धरणं कसं फुटलं याच्या होतं आहेत. धरणं सहयाद्रीच्या पायथ्याशी दसपटी विभागात येत.

नोव्हेंबर २०१८ ला धरणाला मोठी गळती असल्याबद्दल स्थानिकांकडून लेखी पत्रव्यवहार पाटबंधारे विभागासह स्थानिक आमदार यांच्याशी करण्यात आला होता पण याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले होते.

चिपळूण मधील स्थानिक आमदार सदानंद चव्हाण हे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरणं बांधणारे कंत्राटदार आहेत, तीवरे धरणाच मुख्य कंत्राट त्यांच्याच मालकीच्या खेमराज कनष्ट्रक्शन प्रा.लि.च असल्याची माहिती पुढे येतेय.

आता स्ट्रक्चर ऑडिट झाले होते पण पाऊसच खुप पडला, त्यामुळे धरणं फुटल, असा त्यांच्या समर्थकांकडून युक्तिवाद होईल तर त्यांच्यासाठी “पाऊस कोकणात जेवढा पडतो तेवढाच पडलाय यंदाही आणि धरणं फक्त २३% भरलं होतं आणि साधारणपणे १२ वर्षे जुनं होत.”

अशा दुर्घटना झाल्या की, ह्यावर “तुम्ही राजकारण करता” अस टीकाकारांना बोललं जातं पण ह्या पडद्या मागच्या बाजू लोकांपर्यंत पोहचल्याच पाहिजेत.

हाच शिवसेनेचा आमदार आहे जो खडपोली MIDC (कृष्णा अँटीऑक्ससिडेंट आग) दुर्घटना झाली तेंव्हा गप्प होता, कारण कंपणीत कंत्राट त्याच्याच चमच्यांची होती.

 

TIWARE 4 INMARATHI

आज धरणं दुर्घटना झाली त्यावर पण पत्रकारांकडून विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत नाहीये, तेंव्हा राजकारण होणारं कारण वाहून गेलेली माणसं ही यांच्याच गलिच्छ राजकारणामुळेच वाहून गेलेत.

धरणं, ब्रीज, रस्ते यांची काम व्यवस्थित-चांगल्या दर्जाची करण्यापेक्षा राम मंदीर बांधू ह्या घोषणेवर निवडून यायचं सोपं असतं.

संबंधीत दुर्घटनेवर कोडगेपणाने यांवर संबंधीत अधिकारी-राजकारणी श्रद्धांजली वाहून मोकळे होतील पण त्यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद होण तितकंच आवश्यक.

दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांना आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सहवेदना.

====

अश्या प्रकारे ह्या पोस्टच्या माध्यामातून जो मुख्य प्रश्न उपस्थित होतो आहे, तो हाच की सरकार सामन्य जनतेची काळजी करते का ?

 

TIWARE 5 INMARATHI

नुकत्याच भिंती कोसळण्याच्या घटनांनंतर धरण फुटण्यापर्यंतच्या घटना बघता सामान्य माणूस शहरात असो वा गावात जीव मुठीत घेऊन आयुष्य जगतोय आणि ह्या प्रकरणांच्या बाबतीत सरकार गांभीर्य दाखवत नसल्याचे दिसून येत आहे.

अजून किती बळींची सरकार वाट बघणार आहे ?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “तिवरे धरण फुटलंच कसं? डोळे उघडणारं वास्तव

 • July 4, 2019 at 10:52 pm
  Permalink

  खूप छान वस्तु स्थिती मांडली आहे

  Reply
 • July 5, 2019 at 9:48 am
  Permalink

  Corret analisis.I support your team.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?