' अडथळ्यांची शर्यत पार करत तिने जे सिद्ध करून दाखवलंय ते भल्याभल्यांना जमलेलं नाही – InMarathi

अडथळ्यांची शर्यत पार करत तिने जे सिद्ध करून दाखवलंय ते भल्याभल्यांना जमलेलं नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण खूप वेळा म्हणतो ‘मला खरं तर हे करायचं होतं, पण परिस्थिती नव्हती किंवा घरातील वातावरण तसं नव्हतं.’ खरं तर आपल्या मनात जिद्द असेल तर आपण काही करू शकतो.

पण आपल्या अपयशाचं खापर दुसर्याच्या माथी कसं मारायचं हे आपल्याला बरोबर माहीत असतं. त्यात आपण कारणं सांगण्यात तरबेज असतो.

पण खरंच जर आपल्याकडे जिद्द असेल तर परिस्थिती, वातावरण काही आड येत नाही हे दाखवून दिलंय एका लहान खेड्यातील शेतमजुराची कन्या सरिता गायकवाड हिने.

अॅथलेटिक्स मध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकून ते सिद्ध करून दाखवलंय. पाहुया या अडथळ्यातून सुवर्णपदकाकडे असा प्रवास असलेल्या सरिताची कथा.

 

sarita inmarathi

 

सरिता गायकवाड हिचा जन्म अंबा गावात 1 जून 1994 साली झाला. ती गुजरातमधील, डांग जिल्ह्यात एका आदिवासी कुटुंबात जन्मली. डांग हे गाव निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. गुजरातचं स्वित्झर्लंड म्हणूनही ते ओळखले जाते.

पावसाळ्यात तेथील सौंदर्य खूपच अप्रतिम दिसते. परंतु तेथील आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची आहे.

तिथे प्राथमिक सुविधासुद्धा नाहीत. आज जेव्हा बाकीचे लोक इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत तेव्हा डांगमधील लोकांना साधं वर्तमानपत्रसुद्धा वाचायला मिळत नाही.

अशा डांग जिल्ह्यातील अंबा गावात सरिताचा जन्म झाला. या गावात रस्ते किंवा वाहतूक साधने नाहीत. जर प्रवास करायचा असेल तर बस मिळविण्यासाठी आधी ४ ते ५ किमी चालणे आवश्यक आहे. गावात मोबाईल फोनला रेंज मिळत नाही जर आपल्याला रेंज हवी असेल तर डोंगरावर जावे लागते.

काही गावात हल्ली पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे, नाहीतर इतके दिवस डोंगर उतरून पाणी आणण्यासाठी जावे लागत असे.

तिथे वीज आहे, परंतु ती अनिश्चित आहे. कधी असेल कधी नसेल सांगता येत नाही. अशा दुर्गम खेड्यातील मुलीने आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात भारताचे नुसते प्रतिनिधीत्वच केले नाही तर गुजरात आणि संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असे सुवर्ण पदकही मिळवले.

 

sarithaaa inmarathi

 

म्हणतात ना ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ तसेच काहीसे सरिताचे आहे. सरिता म्हणजे नदी. आई-वडिलांनी तिचे जे नाव ठेवले त्याचे तिने सार्थक केले.

नदी आपल्या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी अविरत धावत असते व शेवटी सागराला जाऊन मिळते. त्याचप्रमाणे या सरिताने देखील अडथळे पार करून सागराप्रमाणे अफाट यश मिळवले.

प्राथमिक सुविधा नसताना हे शिखर गाठणं सरिताला मोठे आव्हान होतेच, पण सर्वात मोठे आव्हान होते ते आर्थिक परिस्थितीचे.

सरिताची आई रामुबेन आणि वडील लक्ष्मणभाई हे शेतमजूर आहेत, तरीही त्यांनी आपल्या मुलांना योग्य शिक्षण देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली, खूप त्रास सहन करावा लागला, पण त्यांनी तो केला.

त्यामुळे सरिताला तिच्या पालकांचा अभिमान आहे आणि आपल्या यशात आपल्या पालकांचा सिंहाचा वाटा हे ती प्रामाणिकपणे कबूल करते.

सरिताला एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. तिचं देदीप्यमान यशाने आनंदी झालेले सरिताचे वडील म्हणतात, ‘‘आमच्या कुटुंबात कमाई कमी होती आणि आम्हाला चार मुलं शिकवायची होती.

अडचणी असूनही आम्ही आमच्या परीने सर्वोत्तम प्रयत्न केला आणि आता मुलांनी आम्हाला अभिमान दिला आहे.’’ आई-वडिलांना असा आनंद देणारी सरिता खरोखरीच धन्य!

 

gaikwad inmarathi

 

सरिताचं प्रशिक्षण डोंगराळ भागात झालं. त्यामुळे ती कणखर बनली. तिला आणि तिच्या कुटुंबीयांना पाणी आणण्यासाठी दररोज डोंगरावर चढणे आवश्यक होते. त्यामुळे कठोर परिश्रम आणि समोर असणार्या आव्हानांना तोंड देताना सरिता खूप काही शिकली.

शालेय शिक्षणाबरोबर तिने खोखो मध्येही उत्कृष्ट कामगिरी केली. अॅथलेटिक्स खेळण्यापूर्वी तिने इतर अनेक राष्ट्रीय खेळांच्या स्पर्धेतही भाग घेतला.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला पदवी मिळवायची होती, त्यामुळे त्या वेळी ती अॅथलेटिक्सबद्दल विचार करू शकली नाही. 

एमआरडीएसई आर्ट्स आणि कॉमर्स महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर सरिताच्या प्रशिक्षकाने तिला अॅथलेटिक्स चालू करण्यास सांगितले, जी तिच्या त्या क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात होती.

सरिता गायकवाडने धावण्यास सुरुवात केली आणि खोखोत मिळवलेल्या यशाप्रमाणे या ट्रॅकवरही ती यशाच्या शिखरावर पोहोचली.

अॅथलेटिक्ससाठी सरिताची निवड केली गेली, पण सरिताची आर्थिक परिस्थिती बेताची होती त्यामुळे मोठ्या मोठ्या स्पर्धांत भाग घेण्यासाठी लागणार्या आवश्यक वस्तू तिच्याकडे नव्हत्या.

धावण्यासाठी बूट आणि त्यांनी नेमून दिलेला आहार यासाठी लागणार्या खर्चाची तिच्या कुटुंबाची क्षमता नव्हती. पण महाविद्यालयातील अधिकार्यांना तिच्याबद्दल खात्री होती म्हणून त्या अधिकार्यांनी तिला बूट दिले आणि आहारासाठी लागणारी आर्थिक मदतही केली.

 

sari inmarathi

 

सरिताला लहानपणापासून अतिशय गरिबीत आणि कष्टात दिवस काढण्याची सवय झाली होती. साहजिकच पायात चप्पल वगैरे गोष्टी तिला नव्या होत्या. एका स्पर्धेत सरिता जिकल्यानंतर तिच्या बद्दल बोलताना तिचे मुख्य प्रशिक्षक जयमल नाईक म्हणाले,

‘‘सरिता बूटशिवाय धावत होती, आम्ही तिला बूट घालायला सांगितले, पण ती त्याची तिला सवय नव्हती, म्हणून ती बुटांशिवाय धावली आणि शर्यत जिंकली.’’

म्हणजेच सरिताला अगदी आवश्यक सुविधासुद्धा लहानपणापासून मिळाल्या नव्हत्या. आपल्याला दोन मिनिटं साध्या रस्त्यातून चपलांशिवाय चालता येत नाही. आणि तिच सरिता डोंगरदर्यांतून अनवाणी चालत असेल.

पण या स्पर्धेनंतर मात्र तिने बुटांचा सराव केला. नॅशनल चॅम्पियनशिपच्या कोचच्या सल्ल्यानुसार तिने मेहनत करायला सुरुवात केली.

आणि ‘खेळ महाकुंभ’ ही स्थानिक स्पर्धा सरकारने चालू केली त्यानिमित्ताने तिला पहिली संधी मिळाली. त्यात तिला पाच सुवर्णपदक मिळाली.

तेव्हा ती म्हणाली,

‘‘मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा २५००० रुपये मिळाले. यापूर्वी मी फक्त शेकड्यामध्ये पैसे मिळवले होते. माझ्या पालकांनी मला साहाय्य करण्यासारखी त्यांची परिस्थिती नव्हती, परंतु रोख बक्षिसाने माझ्या मनात आशा निर्माण झाली आणि मग मी परत मागे न पाहण्याचा विचार केला.

माझ्या कुटुंबाला मदत करणेही माझे प्रथम कर्तव्य होते आणि अॅथलेटिक्सने मला ते मिळवून दिले.’’ नंतर ती यशाची पायरी चढतच राहिली.

 

s g inmarathi

 

त्यानंतर नडियाद क्रीडा प्राधिकरणाने सरितामधील स्पार्क ओळखला आणि त्यांनी तिला प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवडले. नडियादमध्ये दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर, सरिता यांना राष्ट्रीय कॅम्पट पटियालामध्ये नोंदणी करण्याची संधी मिळाली.

सरिताने राष्ट्रीय स्तरावरील ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि शेवटी सरिताला ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ गेम्ससाठी संधी मिळाली.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये सरिता पदक मिळविण्यात अपयशी ठरली तरी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने चांगली कामगिरी केली आणि यश मिळवले.

२०१८ मध्ये आशियाई गेम्समध्ये सरिता गायकवाड हिने चांगली कामगिरी बजावली. जकार्तामध्ये आयोजित झालेल्या २०१८ च्या एशियन गेम्समध्ये तिने ४४०० मीटर टीम रीलेमध्ये जिंकून अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक मिळवले.

सुवर्ण पदक मिळवणारी ही गुजरातमधील पहिली मुलगी आहे. तिला ‘डांग एक्सप्रेस’ म्हणून सुद्धा ओळखले जाते.

 

sari inmarathi

 

येणा-या ऑलिंपिंक स्पर्धेसाठी सरितावर सर्वांची भिस्त असेल. तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

तर अशा या खडतर परिस्थितीतून वाटचाल करणार्या सरिताची कथा खरंच प्रेरणादायी आहे. आज शहरातील मुलांना सर्व सोयी-सुविधा मिळत आहेत पण तरीही मुलं भरकटत आहेत.

त्या सोईंचा योग्य वापर करण्याऐवजी दुरुपयोग करत आहेत. अशा वेळी सरितासारख्या अशा कष्टाळू मुलांचा खरंच खूप अभिमान वाटतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?