भानामती, काळी जादू, करणी भारतातल्या या ७ ठिकाणी हा प्रकार आजही चालतो!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
भारत हा पूर्वीपासूनच अंधश्रद्धाळू लोकांचा देश आहे. सतीप्रथा, जातीव्यवस्था, सामाजिक असमानता अशा कितीतरी अंधश्रद्धा इथे पूर्वी प्रचलीत होत्या आणि आजही आहेत.

यातील काही कुप्रथांना मूठमाती मिळाली असली तरी, देशाच्या काही भागात काळ्या जादूची प्रथा आजही पाहायला मिळते. कधी समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी तर कधी कुठला तरी हव्यास पूर्ण करण्यासाठी काळ्या जादूचा आधार घेतला जातो.
मानवी मन भयाने आणि स्वार्थाने पछाडलेले असते अशा वेळी जर डोके भानावर नसेल तर लोकं काहीही करण्यास तयार होतात. काळी जादू कधीकधी निष्पाप लोकांच्या जिवावरील संकट बनते.
आज २१ व्या शतकातही जेंव्हा आपण नरबळी सारख्या घटना एकतो तेंव्हा अंगावर काटा येतो. काळ्या जादूच्या या प्रथेचा आजही इतका प्रभाव आहे की, अलीकडे देखील अशा घटना आपल्याला ऐकायला मिळतात.
आजही काही ठिकाणी या नरबळी देण्याच्या प्रथेचे पालन केले जाते. जाणून घेऊया या अशाच काही अघोरी ठिकाणांची माहिती.
१. कुशभद्रा नदी, ओडीसा.
ओडीसा हे भारतातील एक अत्यंत गरीब राज्य आहे. इथे ४०% जनता दारिद्र्यरेषेखालची आहे. अठराविश्व दारिद्र्य आणि त्यात निरक्षरतेची भर यामुळे हे लोक चटकन काळ्या जादुकडे आकर्षित होतात. राज्याचा हा भाग आजही काळ्या जादूसाठी कुप्रसिद्ध आहे.

कुशाभद्र नदीवरील लियाखिया पुलाखाली २० पेक्षा अधिक मानवी कवट्या आणि काही जनावरांची हाडे आढळून आली. यासोबत कपड्याचे काही तुकडे देखील होते. यावरून इथले लोक काळी जादू करीत असावेत असा अंदाज लावता येतो.
२. पेरीनगोत्तुकरा, केरळा.
देशातील सर्वाधिक म्हणजे ९०% साक्षरता असणारे हे राज्य अशी ख्याती असली तरी इथे देखील काळ्या जादुसारख्या अघोरी प्रथेचे मोठे प्रस्थ आहे. या राज्यातील काही भागात अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा आहे.
पेरीनगोत्तुकरा हे येथील काळ्याजादूसाठी कुप्रसिद्ध असणारे एक गाव. या गावाच्या आर्थिक उलाढालीत या काळ्या जादूचा मोठा वाटा आहे.

या काळ्या जादुमध्ये एक चट्टान किंवा कुट्टीचट्टान वापरला जातो आणि त्यासोबत विष्णूच्या काळ्या अवतारातील एक मूर्ती वापरली जाते. हा विष्णू बैलावर बसून येतो आणि दैनंदिन जीवनातील संकटे दूर करतो किंवा अधिकाधिक संकटे पेरतो अशी अंधश्रद्धा आहे.
ही पूजा करण्यासाठी साधूंना भरपूर पैसे दिले जातात. ही पूजा करताना अंगात येण्याचे प्रकार देखील घडतात. यात तांत्रिक पूजेचे अवडंबर माजवले जाते.
३. सुलतानशाही, हैदराबाद.
आंध्रप्रदेश आणि तेलंगणा ही राज्ये देखील अंधश्रद्धेसाठी ओळखली जातात. इथे लैंगिक क्रियेद्वारे काळी जादू करण्याची प्रथा आहे. वैवाहिक स्थैर्य मिळवून देण्याचा किंवा वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्याचा दावा करणारे अनेक भोंदू बाबा इथे आहेत.

लोकं जेंव्हा या बाबांकडे आपल्या समस्या घेऊन जातात तेंव्हा हे बाबा समस्या दूर करण्याचा आव आणून त्या महिलांना आपल्याशी लैंगिक संबध ठेवण्यास भाग पडतात. असे लैंगिक शोषण करणारे फक्त बाबाच आहेत असे नाही तर काही अम्मा देखील आहेत.
अशा अम्मा स्त्रियांना आपल्या मुलांशी शारीरिक संबध ठेवण्यास भाग पडतात.
गरीब मुलीना श्रीमंत अरब नवरा मिळवून देण्याच्या आमिषाने देखील काळी जादू केली जाते. अंधश्रद्धेचे इतके अघोरी प्रकार सुरु असून देखील आंध्रप्रदेश राज्यात याविरोधात एकही कायदा नाही.
४. मोघुलपुरा, छत्रीनाका आणि शहलीबंदा, जुने हैदराबाद
जुन्या हैदराबादमधील काही भाग काळ्या जादूच्या प्रथेसाठी कुप्रसिद्ध आहे.
इथे असे अनेक बाबा आणि साधू आहेत जे त्यांच्या अलौकिक शक्तीने लोकांच्या आयुष्यातील चिंता, नैराश्य किंवा पिशाच्च बाधा दूर करण्याचा दावा करतात. असा दावा करून लोकांना लुबाडणे हा त्यांचा व्यवसायच बनला आहे.

हे भोंदू बाबा आधी लोकांच्या भावनांशी खेळतात. त्यांच्यामध्ये एकदा मानसिक गंड निर्माण केला की, असे लोक छोट्यातील छोट्या संकटाच्या काळातही सतत बाबांचाच धावा करतात.
अशा प्रकारे लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्याची कलाच या बाबांना अवगत असते. लोकांच्या कमकुवत मानसिकतेचा फायदा घेऊन त्यांना लुबाडतात.
५. वाराणसी येथील स्मशानभूमी, उत्तरप्रदेश.
हिंदू पुराणांनुसार वाराणसी हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल पण, वाराणसीच्या या पवित्र घाटावर काळ्या जादूची अघोरी प्रथा आजही चालते. वाराणसीतील भयानक अघोरी साधू इथे आजही काळी जादू करून लोकांना फसवतात.

भारतीय संस्कृतीतील हे अघोरी साधू म्हणजे एक अनाकलनीय गूढच आहे. ते उघड उघड नरबळी देतात किंवा मृतदेहाशी शरीरसंबंध ठेवण्याचा असे अघोरी प्रकार करतात. मानवी रोगांवर इलाज म्हणून ते “मानवी तेलाचा’ वापर करतात.
६. निमताला घाट, कलकत्ता.
भारतात आजही काळ्या जादुसारख्या प्रथेचे किती वर्चस्व आहे याची प्रचीती कलकत्त्यासारख्या मेट्रोसिटीमध्ये जेंव्हा आपल्याला काळ्या जादूचा प्रभाव आढळल्यावर निश्चितच येते. कलकत्त्यातील निमताला घाट हा अंत्यसंस्कारासाठी प्रसिद्ध आहे.

हिंदू पुराणांनुसार एखाद्या मृत व्यक्तीचे अंतिम विधी या घाटावर केल्याने त्यांना स्वर्गप्राप्ती होते. याच घाटावर काळी जादू देखील चालते. अघोरी साधू रात्रीच्या वेळी या ठिकाणी जाऊन गुप्तपणे काळ्या जादूचे प्रयोग करतात.
अगदी चीतेतील उरलेले मांस देखील हे साधू भक्षण करतात. त्या ठिकाणच्या अघोरी, दुष्ट शक्तींची ताकद रात्रीच्या वेळेस वाढलेली असते आणि ते त्याचवेळी काम करतात असे त्यांचे मत आहे.
७. मेयोंग, आसाम.
आसाम हे पूर्व भरततील छोटेसे राज्य काळ्या जादूच्या कुप्रथेसाठी ओळखले जाते. काळी जादू मेयोंगच्या भूमीत कधीपासून प्रचलित आहे हे आज कोणालाही सांगता येणार नाही पण, इथे काळी जादू ही मेयोंगच्या लोकांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे.

इथल्या काळ्या जादूचे किस्से देखील तितकेच भन्नाट आहेत. इथे लोकं हवेत गायब होतात किंवा अचानक त्यांचे प्राण्यात रुपांतर होते. तुम्ही कधी या भागात गेलाच तर काळ्या जादूचे किस्से तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळतील.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.