' “अश्लील मुर्त्या हटाव!” : शिवसेना नगरसेवकाचा सु-संस्कारी आदेश – InMarathi

“अश्लील मुर्त्या हटाव!” : शिवसेना नगरसेवकाचा सु-संस्कारी आदेश

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

दुकानदार उत्पादनांच्या विक्रीसाठी विविध संकल्पना वापरत असतात. त्यापैकी एक म्हणजे कपड्यांच्या दुकानात आढळणारे स्त्री आणि पुरुष देहाचे पुतळे सर्वसामान्यांना चांगलेच परिचित आहेत. ते सर्वत्र दिसतात मात्र मुंबईत आता त्यावर अनधिकृत असा शिक्का लागला आहे.

एक मतप्रवाह असा आहे की, स्त्री देहाच्या पुतळ्यांवर केवळ अंतर्वस्त्रे ठेवून त्यांचे प्रदर्शन केले जाते. हे चुकीचे असून असे पुतळे आता दुकानांच्या दर्शनी भागात नको.

तेव्हा महापालिकेने असे असभ्यपणे प्रदर्शन करणाऱ्या दुकान, मॉल, शो रूमवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.  

 

mannequins inmarathi
Mashallah News

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कायदा समितीने मुंबई महानगरपालिकेला  पुढील १५ दिवसांत मुंबईतील महिलांच्या अंतर्वस्त्रांचे प्रदर्शन करणारे अनधिकृत पुतळे काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई महानगर पालिकेतील कायदा समितीच्या अध्यक्षा आणि शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी सांगितले की, यांत जे दोषी आढळतील त्या व्यक्तींच्या दुकानांचे परवाने रद्द करावेत.

म्हात्रे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “सदर प्रस्ताव सहा वर्षांपूर्वी कायदे समितीसमोर समोर आला आहे.” “यांत असं दिसतं की बृहन्मुंबई महानगरपालिकेला अशाप्रकारे महिलांच्या अंतर्वस्त्रांचे प्रदर्शन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नाही.”

 

mannequins 1 inmarathi
Public Radio International

स्त्रियांसाठी  ही फारच लाजिरवाणी  बाब आहे. आमचा आक्षेप असे अंतर्वस्त्र असलेल्या पुतळ्यांना नाही तर सार्वजनिक ठिकाणी त्याच्या प्रदर्शनाला असल्याचे शीतल म्हात्रे यांनी सांगितले.

दुकानाच्या आतमध्ये असे पुतळे असतील तर हरकत नाही पण दुकानाच्या बाहेर, रस्त्यांच्या कडेला, भिंतीवर आणि झाडांवर असे महिलांच्या अंतर्वस्त्रांचे प्रदर्शन करणारे अनधिकृत पुतळे दिसतील तर ते बेकायदेशीर आहे.

“यामागे दुकानदारांना त्रास देण्याचा कुठलाही हेतू नसून बेकायदेशीर प्रदर्शन करणारे पुतळे आढळल्यास प्रथम त्यांना ताकीद दिली जाईल आणि जर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले तर परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल.”

शिवसेनेचा भाग असलेली युवा सेना देखील या निर्णयाच्या समर्थन करण्यासाठी पुढे सरसावली आहे. आम्ही आधुनिक मानसिकता बाळगतो मात्र रस्त्यांवर अशा प्रकारे स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांचे प्रदर्शन करणे थांबवले पाहिजे.

 

yuvasena inmarathi
Livemint

स्त्रियांना यामुळे लाजिरवाणे वाटू शकते त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या निर्णयाचे समर्थन करत असल्याचे युवा सेनेच्या प्रतिनिधींनी सांगितले. 

मात्र या निर्णयाला दुसरी बाजू  देखील आहे. व्यवसायाने वकील असलेल्या आणि महिला कार्यकर्त्या आभा सिंह यांनी शिवसेनेच्या आदेशाला “प्रतिगामी”  म्हटले आहे.

“दुकानात वेशभूषा प्रदर्शित करणे पूर्णपणे प्रचारात्मक आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून आहे, कामुकतेला प्रोत्साहन देणे हा त्यामागील हेतू नाही. म्हणूनच हे महिलांच्या कायद्यांतर्गत समाविष्ट होणार नाही.”

दुकानांच्या दर्शनी भागातील महिलांच्या वस्त्रांचे प्रदर्शन करणाऱ्या पुतळ्यांवर बंदी आणण्याची मागणी काही नवीन नाही. सहा वर्षांपूर्वी देखील हा मुद्दा उपस्थित झाला होता.

 

mannequins 2 inmarathi
aljazeera.com

त्यावेळी नगरसेविका रितू तावडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता त्यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांचे या मागणीला समर्थन होते. मात्र महापालिका कोणत्या नियमाअंतर्गत यावर कारवाई करेल याबाबत महापालिका प्रशासन संभ्रमावस्थेत होते.

सभ्य – असभ्य याची व्याख्या सुस्पष्ट नसल्याचे कारण पुढे करत बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यावेळी यावर स्पष्ट निर्णय घेतला नव्हता. 

एकीकडे मुंबईतील महिलांच्या अंतर्वस्त्रांचे प्रदर्शन करणारे अनधिकृत पुतळे काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अनेकजण याला हा शिवसेनेचा नैतिक पोलिसगिरी करण्याचा प्रकार असल्याचे सांगत या निर्णयावर टीका केली आहे.

 

shivsena inmarathi
Hindustan Times

एकीकडे पावसाळा आला आहे, रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे आहे, असे असतांना दुसराच मुद्दा उकरून काढला जात असल्याच्या भावना अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

मुंबईतील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी महापालिका अनेक चांगल्या निर्णयांची अंमलबजावणी करू शकते.

रहदारी चा प्रश्न असो वा अतिक्रमणाचा या प्रश्नांवर काम करण्याऐवजी काय सभ्य आणि काय असभ्य आहे हे महापालिका का ठरवत आहे असा प्रश्न अनेकजण उपस्थित करतांना दिसता आहेत.

 

bmc problems inmarathi
Mumbai Live

तेव्हा हा संस्कारी आदेश अनेकांना तितका महत्वाचा वाटत नाही. या आदेशाची संभावना “चुकीचे प्राधान्यक्रम” अशी करत नेटकऱ्यांनी महापालिकेचे कान टोचले आहेत.

तेव्हा महापालिका प्रशासन या संस्कारी आदेशाची किती अंमलबजावणी करते आणि किती प्रदर्शन करते यांवर या आदेशाचे भविष्य अवलंबून आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?