' ‘गेम ऑफ थ्रोन्स’पेक्षा ही इंग्लिश टीव्ही सिरीज तुम्हाला जास्त आवडू शकते! – InMarathi

‘गेम ऑफ थ्रोन्स’पेक्षा ही इंग्लिश टीव्ही सिरीज तुम्हाला जास्त आवडू शकते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – विक्रम इडके
===

तुम्हाला असं कधी वाटतं का की, आपल्या सभोवताली जे जग आपण पाहातो त्याच्या दृश्य पातळीच्या आतसुद्धा खूप काहीतरी आहे?

किंवा, आसपासचं जग जरी सारखंच वाटत असलं तरीही त्यात काहीतरी बदल झालाय आणि तो बदल मनाला जाणवतोय पण तरीही त्यावर बोट ठेवता येत नाहीये?

हे आणि असे आपल्या अस्तित्वावर आणि स्थानावरच प्रश्न उपस्थित करणारे प्रश्न पडले की जन्माला येतात कारस्थानांचे सिद्धांत अर्थातच कॉन्स्पिरसी थियरीज. त्यातले बहुतांशी निरर्थक असतात, पण काही खरेसुद्धा असतात.

एक विशिष्ट कारस्थानाचा सिद्धांत घेऊन त्या भोवती कथा गुंफणे काही नवीन नाही. परंतु याच घासून गुळगुळीत झालेल्या समीकरणाला जेव्हा ‘नोलान’ नावाचा चलांक येऊन मिळतो तेव्हा सारे बीजगणितच बदलून जाते, काहीतरी अव्याख्येय, दैवी होऊन जाते.

मी येथे बोलतोय ते ‘मेमेंटो’ (२०००) च्या कथेमागील आणि ‘द डार्क नाईट ट्रिलॉजी’ (२००५-१२), ‘द प्रेस्टीज’ (२००६) आणि ‘इंटरस्टेलर’ (२०१४) यांच्या पटकथांमागील अद्वितीय मेंदू जोनाथन नोलानबद्दल!

आणि ते समीकरण म्हणजे जोनाथन नोलानच्या बुद्धीची सुरेख उपज ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ (२०११-१६) ही सर्वांगसुंदर मालिका!!

 

person of interest inmarathi
mouthshut.com

जोनाथनने त्याचा भाऊ व निर्विवादपणे या शतकातील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या ख्रिस्तोफर नोलानसोबत केलेले काम तर विलक्षण आहेच.

परंतु मी त्याचा खऱ्या अर्थाने फॅन झालो ते ‘वेस्टवर्ल्ड’ (२०१६ -) पाहिल्यानंतर. अरेषीय मांडणी, चित्रभाषेतूनही चित्रांच्या पलिकडचा संदेश पोहोचवणारी रचना, प्रश्न पडायला आणि उत्तरं शोधायला भाग पाडणारं कथानक,

इंटेलिजंट तरीही अत्यंत भावस्पर्शी कथा, उच्चतम दर्जाचा अभिनय, एक जरी चौकट चुकली तरी पुढे काहीच समजणार नाही इतकी बांधीव पटकथा, सुरुवातीला विचित्र वाटणारं परंतु लक्ष दिलं तर गणित सुटल्यासारखा निखळ आनंद देणारं संपादन,

अत्युच्च छायांकन, अर्थवाही संगीत, काळाशी केलेला खेळ व त्यातून तयार होणारा जगावेगळा प्रभाव आणि सगळं काही संपल्यावर आता आपल्यापुढे पसरलेल्या या विस्तीर्ण आयुष्याचं करायचं काय असं वाटायला लावणारी पोकळी निर्माण करण्याची क्षमता;

असे खास ‘नोलान’च्या शैलीचे एकूण एक गुण त्यात होते. त्याच वेळेपासून ‘पीओआय’ ठाऊक होती मला. पण मी ती पाहायचे टाळायचो. का? याचं कारण होतं त्याचं कथाबीज!

 

jonatahn nolan inmarathi
vulture.com

एक बेफाट पैसा असलेला आणि साक्षात बृहस्पतीच म्हणावा अशा बुद्धीचा अब्जाधीश हॅरोल्ड फिंच (मायकेल इमर्सन) एक मशिन बनवतो. ही मशिन कोणत्याही आतंकवादी हल्ल्याची पूर्वसूचना देऊ शकत असते.

इतकेच नव्हे तर आतंकवाद्यांना लक्षावधी माणसांमधून वेगळे ओळखूही शकत असते. तो ही मशिन सरकारला देतो. हे करण्यासाठी अर्थातच त्या मशिनला सबंध देशावर नजर ठेवावी लागणार!

या टेहळणीतून तिला फक्त आतंकवादी हल्लेच समजतात असं नाही, तर तिला इतर गुन्ह्यांचाही आधीच पत्ता लागतो, खास करून जीवघेणे गुन्हे! पण सरकारला या गुन्ह्यांना आधीच रोखण्यात रस नाही.

त्यासाठी पोलिस आहेत. त्यांना रस आहे तो फक्त ९/११ नंतर पणास लागलेल्या अमेरिकेच्या सुरक्षिततेची काळजी करण्यात! फिंच ही मशिन सरकारला तर देतो, पण तिचा वाममार्गी वापर होऊ नये, असेही त्याला वाटत असते.

 

Person of Interest Inmarathi
TVLine

शिवाय सगळ्याच नागरिकांवर सरकारने का होईना नजर ठेवणे, त्यांच्या क्षणोक्षणाची माहिती ठेवणे, हे बेकायदेशीरच! त्यासाठी फिंच एक व्यवस्था करतो.

मशिन तिच्याकडे असलेली कोणतीच माहिती कधीच उघड करणार नाही, तर फक्त सर्वोच्च प्राधान्याच्या गुन्ह्यातील व्यक्तीचा सोशल सिक्युरिटी नंबर तेवढा देईल. तो गुन्हेगार आहे की गुन्ह्याचा बळी हे सुद्धा समजणार नाही, ते यंत्रणेने शोधायचं.

मशिन जसे आतंकी हल्ल्याचे नंबर्स देते, ज्यांना रिलेव्हंट नंबर्स म्हटलं जातं, तसंच इतर गुन्ह्यांचेही नंबर्स देते, ज्यांना इर्रेलेव्हंट नंबर्स म्हटलं जातं. मशिन रोज रात्री सगळा डेटा, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित काही भाग वगळता, पुसून टाकते, जेणेकरून तो कधीच कुणाच्याही हाती पडू नये.

सरकारला इर्रेलेव्हंट नंबर्सशी काहीच देणेघेणे नाही, म्हणजे ते गुन्हे नाहीत का? आहेत की! अतिशय हिंसक गुन्हे आहेत ते. पण मग त्या लोकांचं काय करायचं? या साठी फिंच कुणाच्याही नकळत मशिनमध्ये बॅकडोअर प्रोग्रॅम करतो.

सगळे इर्रेलेव्हंट नंबर्स त्याला मिळत राहातात. ते गुन्हे रोखण्यासाठी तो एक्स-सीआयए ऑपरेटिव्ह जॉन रीझला (जिम कॅव्हिएझेल) कामावर ठेवतो. आणि दोघं मिळून एकेका गुन्ह्याला रोखू लागतात.

 

person of interest 2 inmarathi
IndieWire

हे कथाबीज जेव्हा मला समजलं तेव्हा माझ्या मनात पहिला विचार आला तो हा की, अरे ही तर बॅटमॅनची स्टोरी! म्हणजे बॅटमॅन हा टेक्नॉलॉजिकल जिनियस बिलियनेयर आहे आणि तो त्याचा वापर करून वास्तवाच्या भूमीवरही खलनायकांना रोखतो.

इथे त्यांनी काय केलंय, तर बॅटमॅनला दोन लोकांमध्ये विभागलंय. फिंच हा तंत्रज्ञानाचा जादूगार आहे तर रीझ हा मानवी शारीरिक ताकदीचा आविष्कार आहे.

दोघं मिळून तेच करताहेत जे बॅटमॅन करतो! असं गिमिक बघण्याची माझी जरा सुद्धा इच्छा नसल्यामुळे मी ही मालिका बघणं अनेक वर्षे टाळलं. आणि जेव्हा मी ती पाहिली, तेव्हा मला एक गोष्ट पक्की समजली की मी एक नंबरचा मूर्ख होतो!

पीओआयचं बीज बॅटमॅनसारखं नक्कीच आहे, पण तिची मांडणी ही बॅटमॅनपेक्षा अनेक कोस दूर आहे.

किंबहूना पहिल्या काही भागांमध्ये काहीतरी विलक्षण धक्कातंत्र असलेला क्राईम-फायटिंग शो वाटणारी ही मालिका पहिला सीझन अर्धा व्हायच्या आतच इतक्या गहन प्रश्नांकडे व कथानकांकडे वळते की मेंदू चक्रावून जातो.

 

person of interest 3 inmarathi
Hollywood Reporter

हे गूढाकाशात खोल खोल शिरणे जे सुरू होते ते थेट शेवटच्या सीझनच्या शेवटच्या भागाच्या शेवटच्या प्रसंगानंतरही सुरूच राहाते. आणि सांगतो! प्रत्येक भागात, होय प्रत्येक भागामध्ये किमान चार-सहा तरी मेंदूचा भुगा करणारे ट्विस्ट्स आहेत.

किंबहूना जिथे कोणत्याही रहस्यमय मालिकेच्या भागाचे ट्विस्ट्स संपून रहस्य उलगडते त्याच्या पलिकडे त्या त्या भागाची आणि बहुतांशी वेळा सबंध मालिकेचीच मिती बदलून टाकणारा ट्विस्ट पीओआयमध्ये आहे!

या बाबतीत तिची तुलना नोलानच्याच ‘मेमेंटो’शी होऊ शकते. ग़जिनीमुळे संजय रामस्वामीला एसटीएमएल झाला, त्याची कल्पना मेली; संजयने त्याचा बदला घेतला की सिनेमा संपतो. पण ‘मेमेंटो’ तिथे संपत नाही, तो त्याच्याही पुढे जाणारा एक ट्विस्ट देतो.

तसेच ट्विस्ट्स पीओआयमध्ये पदोपदी आहेत! त्यामुळेच क्राईम-फायटिंग मालिका म्हणून सुरू झालेली पीओआय कधी टिव्हीवर प्रसारित झालेल्या सर्वश्रेष्ठ सायन्स-फिक्शन मालिकांपैकी एक होऊन बसते, याचा लक्ष न देणाऱ्याला पत्ताही लागत नाही!

बरं हे सगळं अरेषीय (नॉन-लिनियर) मांडणीत बरं का! त्यामुळे काळाशी खेळ करण्याचा नोलान बंधूंचा छंद या मालिकेतही पुरेपूर दिसून येतो. गंमत म्हणजे, सिनेमात हे करणे त्या मानाने खूपच सोपे असते.

 

nolan brothers inmarathi
Conversations About Her

कारण सगळे मिळून जास्तीत जास्त तीन-चारच तास लक्षात ठेवायचे असतात. पण १०३ भागांच्या मालिकेत हे लक्षात ठेवणे तर जाऊच द्या, लिहिणेसुद्धा केवढे कठिण असेल कल्पना करा! विशेष म्हणजे या मालिकेत एक सुद्धा प्रसंग उगाचच नाहीये.

४३ मिनिटांचा एक एपिसोड पण प्रत्येक एपिसोड चित्त्यासारखा वेगवान. आणि अतिशय प्रचंड वेगाने घटना घडत असूनही असे कधीच, अगदी एकदा सुद्धा जाणवत नाही की काहीतरी घाई झालीये.

कारण, प्रत्येक प्रसंगाला त्या प्रसंगाची जितकी गरज आहे तितकाच वेळ देऊन मांडलेला!

त्यामुळे ४३ मिनिटांचाच एक भाग पाहिला तरीही एखादा दोन-अडिच तासाचा चित्रपट पाहिल्याची भावना होते, इतका तो सशक्त आणि भरीव असतो! आणि असे एक-दोन नव्हे तर तब्बल १०३ एपिसोड्स आहेत पीओआयमध्ये!

सगळ्यांत विलोभनीय गोष्ट म्हणजे, कुठे थांबायचं हे त्यांना पक्कं ठाऊक आहे! या मालिकेत प्रत्येक पात्राला महत्त्व आहे.

कोणतंच पात्र पोकळ नाही, तर प्रत्येकाला उद्दिष्टं आहेत, सकस बॅकस्टोरीज आहेत आणि त्यांच्या प्रत्येक क्रियेचा मालिकेच्या एकूणच कथानकावर काही ना काही परिणाम होतोय. फक्त तो कधी आणि कसा, हे प्रचंड अनपेक्षित आहे!

 

PERSON OF INTEREST INMARARTHI
PopOptiq

मुख्य दोन पात्रेच नव्हे तर ताराजी हेन्सन (कार्टर), केव्हिन चॅपमन (फ़स्को), अॅमी अॅकर (रूट), साराह शाही (शॉ), एन्रिको कोलँतोनी (एलायास), जॉन ग्रीअर (जॉन नोलान) या आणि मालिकेतील एकूण एक पात्रांनी अनुपमेय सुंदर काम केलेय.

एलायास आणि फ़स्को यांची पात्रे तर स्क्रिनरायटिंग करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने अभ्यासायलाच हवीत अशी झालीयेत!

ही मालिका नुसती ट्विस्ट्सपुरतीच आहे का? तशी ती असती, तरीही ती आजवरच्या सर्वश्रेष्ठ मालिकांच्या यादीत कुठे ना कुठे नक्कीच असली असती. पण पीओआय तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही.

वर म्हटल्याप्रमाणे पहिला सीझन निम्मा व्हायच्या आतच ते त्यांच्या विषयांत इतके खोल खोल शिरू लागतात की विचार करता करतानाही आपला दम तुटू लागतो. वाटतं की हा, हे यांचं अंतिम स्थान आहे.

आणि असं वाटे वाटेपर्यंतच मालिका त्याच्याही पलिकडच्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर चाचपू लागते. नोलानचे सिनेमे किती जरी तांत्रिकदृष्ट्या स्वर्गाहून सुंदर असले, तरीही ते का चालतात माहितीये का? कारण, त्यांत मांडलेले प्रश्न हे वैश्विक असतात!

न्यूयॉर्कमधील एखाद्या माणसाला त्या चित्रपटातून जी संवेदना जाणवेल तीच अहमदनगरमधील एखाद्या माणसाला जाणवू देण्याची त्यांच्यात क्षमता असते, म्हणून त्याचे सिनेमे जगभरात चालतात.

ते तांत्रिकदृष्ट्या जितके कौशल्यपूर्ण असतात, त्याहून जास्त त्यांच्या कथा भावनिकदृष्ट्या शक्तिशाली, हेलावून सोडणाऱ्या असतात. नेमकं हेच ही मालिका टिव्हीच्या क्षेत्रात करते.

 

person of interest 5 inmarathi
YouTube

त्यामुळे ती प्रश्न विचारत जितकी खोल खोल जाऊ लागते तितकीच आपल्याला जास्त जास्त उत्कंठा तर वाटू लागतेच पण त्या सोबतच भितीसुद्धा वाटू लागते.

कारण, त्यांनी विचारलेले, विचारत असलेले आणि विचारू पाहाणारे एकूण एक प्रश्न आपल्या जगाशी नव्हे नव्हे आपल्या अस्तित्वाशी निगडीत आहेत!

जगाच्या वर वर दिसणाऱ्या छानशा आवरणाखाली काय चालू आहे याची त्यांनी त्यांच्या काल्पनिक विश्वात दिलेली उत्तरे ही आपल्याला खऱ्या विश्वात भिती वाटायला लावण्याइतकी सच्ची आणि शक्यतेच्या कोटीतील आहेत!

त्यांची हाताळणी ही नोलानच्या नेहमीच्या अरेषीय शैलीसोबतच स्टिव्हन किंगच्या एखाद्या गूढकथेपासून (टेरा इनकॉग्निटा) ते ‘रन लोला रन’सारख्या (१९९८) एकाच घटनेच्या अनेक पैलूंवर प्रकाश पाडण्यापर्यंत (इफ-देन-एल्स) सातत्याने प्रयोगशील होत राहाते.

आता या ट्विस्टच्या पलिकडचा ट्विस्ट सांगतो. हे सगळं चालू असतानाही मालिका त्यांची विनोदबुद्धी एका क्षणासाठीदेखील सोडत नाही!

आणि सांगतो, ‘पीओआय’ ही त्या अपवादात्मक मालिकांपैकी आहे जिच्या अनेक एपिसोड्सनी आणि अनेक पात्रांनी (ते एका भागाव्यतिरिक्त परत कधीच येण्याची शक्यताही नसताना) माझ्या डोळ्यांतून वारंवार पाणी काढलंय.

संवेदनशील असाल, तर पीओआयचा प्रत्येक एपिसोड भावनिकदृष्ट्या हलवून सोडणारा आहे!

चांगल्या कथेचं महत्त्व केव्हा, तर त्यातील खलनायक सगळ्यांत चांगला असेल तेव्हा! पीओआयमध्ये एकच कुणी चांगला खलनायक नाही, तर चांगल्या खलनायकांची मालिकाच आहे. या बाबतीत तिची तुलना ‘गेम ऑफ थ्रोन्स’शी (२०११-१९) होऊ शकते.

 

game of thrones inmarathi
BGR.com

पण जीओटी नंतर नंतर पात्रपरिपोषाच्या बाबतीत पारच गंडलं. पीओआयचे खलनायक मात्र ओळीने एकाहून एक भयंकर आहेत. एक खलनायक बेफाट वाटत असतानाच कुणीतरी त्याच्याहूनही तुफान असा येतो की आधीचा अगदीच चिंधीचोर वाटू लागतो!

मानवी मनाच्या इतक्या कंगोऱ्यांचा असा शोध क्वचितच कुणा टिव्ही मालिकेने घेतला असेल. पीओआयमधील प्रत्येक पात्राला अनेक स्तर (लेयर्स) आहेत आणि सुष्ट वा दुष्ट म्हणावं असं त्यांच्यात कुणीच नाही.

किंबहूना कुणीतरी चांगलं-चांगलं वाटत असतानाच ते गपकन काहीतरी भयानक करून जातात आणि कुणीतरी अगदीच खलबुद्धीचा पुतळा वाटत असतानाच काहीतरी अनपेक्षित चांगलं करून जातात.

या मालिकेचे सगळ्यांत मोठे वैशिष्ट्य जर कोणते असेल, तर ते हे की तिच्यात नग्नता नगण्य आहे आणि रक्तपात जरी असला तरीही रक्त वा बीभत्सपणा अगदीच क्वचित आहे.

आजच्या नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि टोरेण्टच्या युगात आपल्यासमोर हजारो मालिका उपलब्ध आहेत. त्यातील शेकडो दर्जेदारसुद्धा आहेत. पण आपल्या प्रत्येकाची अशी कोणती ना कोणती एकच मालिका असते जी सगळ्यांपेक्षा खास असते, सगळ्यांहून श्रेष्ठ असते.

 

person of interest 6 inmarathi
Ars Technica

मी जीओटीचा केवढा मोठा चाहता आहे, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. परंतु माझ्यासाठी ती खास मालिका, ती सर्वश्रेष्ठ मालिका मात्र ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ आहे.

या मालिकेने माझा सिनेमा, मालिका यांच्या तांत्रिक अंगांबद्दलचा, त्यांचे लेखन, दिग्दर्शन, छायांकन, संपादन, नेपथ्य, संगीत, बजेटच्या मर्यादेतही केले जाणारे दर्जेदार काम अशा अनेक बाबतींमधला दृष्टीकोनच बदलून सोडला.

तुम्हालाही ती माझ्या इतकीच आवडेल अशी खात्री नाही देत मी. कारण, प्रत्येकाच्या संवेदना वेगळ्या असतात. पण मी खात्रीने सांगतो, तुम्हालाही ती प्रचंड आवडेल, भरून व भारून टाकेल आणि त्या सोबतच निर्वात वाटावं एवढं रितंदेखील करून सोडेल!!

===

 

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?