सरकारी नोकरी मिळवण्यात अपयश आल्यानंतर ९ वर्षांनी तो थेट आयएएस झाला…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

शिक्षण संपवून चांगली नोकरी मिळवणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं. सरकारी नोकरी मिळवणं हे तर महाकठीण.. गुलबकावलीचं फूल मिळणं जितकं कठीण तितकी सरकारी नोकरी मिळवणं अवघड असते.

किती परीक्षांचे अडथळे पार करत हे सरकारी नोकरीचं पदक गळ्यात पडतं..

त्या परीक्षा इतक्या कठीण असतात की अपयशामुळे काही लोक मधूनच प्रयत्न सोडून देतात.

पण काही लोक नेटाने प्रयत्न करत यशस्वी होतात. ही कहाणी आहे अशाच एका अपयशी माणसाच्या यशाची.. ज्यानं अपयशानंतर नऊ वर्षांनी IAS परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरी मिळवली.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षा या अत्यंत कठीण असतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी पद मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतात.

 

upsc inmarathi
quora.com

पण ती वाट इतकी बिकट असते की प्रशासकीय अधिकारी होईपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.

मनानं मजबूत आणि अतिशय हुशार लोक या सेवेत रुजू होऊ शकतात यासाठी प्रचंड तयारी व मानसिक ताकदीने या परीक्षेत उतरावं लागतं आणि खूप कमी लोक यशस्वी होतात.

आज जी कहाणी तुम्ही वाचणार आहात ती आहे तमिळनाडू मधील एका माणसाने मिळवलेल्या यशाची…ज्याला बाकीच्या लोकांप्रमाणे प्रशासकीय सेवेचा वापर करून जनतेची सेवा करायची तीव्र इच्छा होती.

तो आहे ..के. एलंबाहवाथ. त्याची इच्छा होती की, प्रशासन विभाग हा जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावा आणि लवकरात लवकर लोकांचे प्रश्न मार्गी लागावेत.

के. एलंबाहवाथचा जन्म तामिळनाडू मध्ये तंजावर जिल्ह्यात १९८२ साली एका सामान्य कुटुंबात झाला. महसूल विभागात काम करणारे वडील आणि शेती सांभाळत काही समाजकार्य करणारी आई.. असं हे साधंसं कुटुंब होतं…

 

K-Elambahavath-2 inmarathi
thebetterindia.com

ज्यांचं आयुष्यही अतिशय साधारण होतं, जिथं पैशाचा पाठिंबा नव्हता की मोठमोठ्या लोकांशी त्यांचे संबंध नव्हते. त्याचं लहानपण इतर मुलांसारखंच होतं. खेळायचं…आईला शेतीच्या कामात मदत करायची.

त्याला तीन बहीणी होत्या, ज्या त्याच्यापेक्षा मोठ्या होत्या. त्याच्या कुटुंबाला शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं.

त्यामुळे शेतीपेक्षा तो शिक्षणावर जास्त लक्ष देत होता. मात्र सारं सुरळीत चालू असतानाच तो १२ वी मध्ये असताना त्याचे वडील वारले. जे त्याच्या कुटुंबाचा कणा होते. जे महसूल विभागात नोकरी करत होते. त्यांच्या मृत्यूनंतर सगळी जबाबदारी एलंबाहवाथवर आली.

त्याला आपलं शिक्षण पूर्ण करायचं होतं पण जवळ पैसा नव्हता. मग पहीलं काम होतं ते नोकरी मिळवायची होती.

महसूल विभागात ग्रामविकास अधिकारी असलेले वडील निवर्तल्यानंतर निव्वळ शेतीवर उपजीविका होणं कठीण आहे हे लक्षात घेऊन त्याने अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला. त्यासाठी त्याला त्याचं शिक्षण बंद करावं लागणार होतं.

नोकरी साठी अर्ज केल्यावर त्याला समजलं की त्याला ते पद मिळवायला अर्जासोबत २० प्रकारचे कागदपत्रं जोडावी लागतात. आणि आटापिटा करुन ते कागदपत्र सादर केले पण तरीही त्याला नोकरी मिळाली नाही.

 

ElamBahavath K inmarathi
KenFolios.com

प्रशासकीय कारण दाखवून त्याचा अनुकंपा तत्त्वावर नोकरीचा अर्ज रद्द करण्यात आला. अनेक जण त्या रांगेत उभे होते. त्यातील फक्त पंधरा जण या कार्यवाहीला फाटा देऊन निवडले गेले. हे काय आहे हे समजलेच नाही.

बरं ही समस्या त्यांच्यासारख्या खूप जणांपुढे होती. मग त्याने ही समस्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगायचं ठरवलं.

जिल्हाधिकारी, कमिशनर, सेक्रेटरी सारी दारं ठोठावली. रोज दुपारपर्यंत तो शेतात काम करायचा आणि नंतर कलेक्टर आॅफीसमध्ये रोज खेटे घालायचा. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

तो सांगतो,

“मी २४ वर्षाचा झालो पण मला लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, त्यांची भरती याबाबत काही माहीत नव्हतं. माझ्या आजूबाजूला असलेले माझे मित्र, त्यांचे पालक मेडिकल, इंजिनीअरिंग च्या भजनी लागले होते. आणि मी मात्र दिशाहीन होतो.”

मग दूरस्थ शिक्षण पद्धतीतून त्यानं आपलं शिक्षण पूर्ण करायचा निर्णय घेतला. कारण घर चालवण्यासाठी नोकरी करणं गरजेचं होतं. त्याचबरोबरीने त्यानं स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय घेतला.

 

K-Elambahavath-1 inmarathi

 

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या आणि त्या उत्तीर्ण झाला.पण त्यासाठी सारी मेहनत त्याची एकट्याची होती. ना कसला क्लास ना कसलं कोचिंग… लोकांना आश्चर्य वाटायचं, जो माणूस कधीच काॅलेजला गेला नाही तो प्रशासकीय अधिकारी कसा बनू शकतो?

पण त्याचा स्वतःवर विश्वास होता. तो सांगतो, “लोक इथं प्रशासकीय अधिकारी बनण्याची जिद्द बाळगून येतात. पण मी मात्र वैफल्यग्रस्त होऊन इकडे वळलो होतो.”

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्याने ६ वेळा झालेली नेमणूक नाकारली.तरीही ज्यूनिअर असिस्टंट डेप्यूटी सुपरीटेंडंट पोलिस म्हणून ७ वर्षं नोकरी केली.

पण यावर तो समाधानी नव्हता. कारण त्याला मुलकी अधिकारी नाही तर सनदी अधिकारी व्हायचं होतं.. आपण ते करु यावर विश्वास होता.

मग त्यानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या. मुलाखतीत तीन वेळा नापास झाला. पण जिद्द सोडली नाही. चिकाटीने प्रयत्न करत राहीला. चौथ्या वेळी मात्र पास झाला आणि त्याची प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.

 

Elambahawat K inmarathi
KenFolios.com

ही गोष्ट आहे २०१४ मधील. २०१५ मध्ये तो प्रशासकीय अधिकारी बनला २१७व्या क्रमांकावर होता तो. अतिशय प्रदीर्घ काळ या यशापयशाचे हिंदोळे खात राहणं साधं काम नाही.

मनावर येणारा प्रचंड ताण, दुसऱ्या बाजूला चालू नोकरीत असलेली जबाबदारी या सर्वाचा समतोल साधत केलेला हा प्रवास दमवणारा होता पण परिश्रम घेतले त्याचं सार्थक झालं होतं.

मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर काहीही अशक्य नाही हेच ही कथा दाखवते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?