' १८ व्या वर्षी विधवा होऊनही 'तिने' जे कर्तुत्व गाजवलं त्यासाठी तिला एक सलाम!

१८ व्या वर्षी विधवा होऊनही ‘तिने’ जे कर्तुत्व गाजवलं त्यासाठी तिला एक सलाम!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

भारतात पूर्वी स्त्रियांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. हळूहळू समाजसुधारांच्या अथक प्रयत्नांनी स्त्री शिक्षणाचे बीज रोवले गेले. त्यांच्याच प्रयत्नांमुळे आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने शिक्षण घेत आहेत. काम करत आहेत.

पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रांमध्ये सुद्धा आज महिला भक्कमपणे पाय रोवून उभ्या आहेत. तरीही अनेक मुलींना आज शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अजून आपल्याला बरेच पुढे जायचे आहे.

 

woman empowerment inmarathi
united nations india

 

पण ज्यांनी ह्या सगळ्या सुधारणेची सुरुवात केली त्यांच्यामुळे व महिलांच्या शिकण्याच्या जिद्दीमुळे आज आपण बरीच सुधारणा झालेली बघत आहोत. अजूनही काही क्षेत्रे अशी आहेत ज्यात पुरुषांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते.

पूर्वी इंजिनियरिंग हे असेच पुरुषांचे क्षेत्र समजले जात असे.

त्याच क्षेत्रात जाऊन ,ते शिक्षण घेऊन पहिली भारतीय महिला इंजिनियर होणे काही सोपे नव्हते. त्या स्त्रीचे त्या काळच्या प्रथेप्रमाणे पंधराव्या वर्षी लग्न झाले. अठराव्या वर्षी तिला मातृत्व लाभले. पण तिच्या संसारातला हा आनंद फार टिकला नाही.

तिच्या मुलीच्या जन्मानंतर काहीच महिन्यांत तिचे पती काही कारणाने स्वर्गवासी झाले आणि एकल पालकत्वाची जबाबदारी तिच्यावर आली.

पदरात चार महिन्यांचे बाळ घेऊन ही महिला नंतर पुरुषांच्या क्षेत्रात आली आणि भारतातील पहिली महिला इंजिनियर झाली.

ए ललिथा ह्यांच्यासाठी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्यात त्यांच्या अवघ्या चार महिन्यांच्या मुलीची जबाबदारी अचानक त्यांच्यावर आली होती आणि ही जबाबदारी निभावून न्यायला त्यांच्या सोबतीला त्यांचे पती नव्हते.

त्यांच्या अकाली निधनाने ए ललिथा ह्यांच्यावर दुःखाची मोठीच कुऱ्हाड कोसळली होती.

हे ही वाचा –

===

 

a lalitha inmarathi
newsbytes

 

सप्टेंबर १९३७ साली त्यांच्या मुलीचा जन्म झाला आणि चारच महिन्यात ए ललिथा ह्यांच्या पतीचे निधन झाले आणि श्यामला (ललिथा ह्यांची मुलगी) ची जबाबदारी एकट्या ललिथावर आली.

त्याकाळच्या प्रथेप्रमाणे त्यांचे केशवपन केले गेले आणि त्यांचे निरस आणि कठीण आयुष्य सुरु झाले. त्याकाळी विधवांना ज्याप्रमाणे जसे चार भिंतीत वाळीत टाकल्याचे आयुष्य जगावे लागत असे तसेच ललिथा ह्यांचेही आयुष्य सुरु झाले.

ह्या आयुष्यापासून विधवांची सुटका नव्हती. पण मरण येत नाही म्हणून बिचाऱ्या आला दिवस ढकलून आयुष्य कंठत असत. तेच ललिथा ह्यांचेही झाले. त्याकाळी मद्रास (आताचे चेन्नई)मध्ये सतीप्रथा नव्हती.

पण विधवांना मात्र वाळीत टाकल्याचे आयुष्य जगावे लागत असे. त्यांच्यावर अनेक बंधने घातलेली असायची. आधीच आयुष्याचा जोडीदार गमावल्याचे दुःख, त्यात समाज व घरच्यांची अशी वागणूक, त्यामुळे विधवांचे जीवन नरकासमान होते.

ललिथाची अवस्था सुद्धा काही ह्यापेक्षा वेगळी नव्हती. पण मरेपर्यंत असेच आयुष्य कंठायचे नाही असे ललिथाने ठरवले.

त्या काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या होत्या. धैर्यशील होत्या.

आपले सगळे दुःख बाजूला सारून, समाजाच्या सगळ्या कुप्रथा झिडकारून त्यांनी विधवेचे नरकप्राय जीवन जगण्यास नकार दिला आणि शिक्षण घेण्याचे ठरवले. आणि शिक्षण सुद्धा कुठले तर त्यांनी चक्क अभियंता होण्याचे ठरवले.

 

a lalitha 2 inmarathi
blush

 

तेव्हा हे क्षेत्र पुरुषांचेच अशी धारणा होती आणि त्यात पुरुषांचेच वर्चस्व होते. तरीही मागे न हटता ललिथाने इतक्या लहान वयात इतका मोठा निर्णय घेतला आणि पुरुषांचे वर्चस्व असलेल्या इंजिनियरिंगच्या क्षेत्रात भारतातील पहिली महिला अभियंता होण्याचे ठरवले.

२७ ऑगस्ट १९१९ रोजी ललिथाचा जन्म झाला. सात भावंडांत ललिथाचा पाचवा क्रमांक होता. त्यांचे कुटुंब हे त्याकाळच्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय तेलुगू कुटुंबाप्रमाणेच होते जिथे मुलांच्या शिक्षणाला मुलींच्या शिक्षणापेक्षा जास्त महत्व दिले जात होते.

ललिथाचे भाऊ इंजिनियर झाले होते आणि बहिणींना मात्र प्राथमिक शिक्षण घेऊन लग्नाच्या बेडीत अडकवले गेले होते. त्या काळच्या प्रथेप्रमाणे ललिथाचेही लग्न वयाच्या १५व्या वर्षी झाले.

तरी त्यातल्या त्यात ललिथाचे वडील तिच्या शिक्षणाच्या बाबतीत आग्रही होते आणि तिचे लग्न झाले तरी तिचे शिक्षण थांबता कामा नये असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी तिला दहावी पर्यंत शिकवले.

ललिथा ह्यांची कन्या श्यामला छेनुलू ह्या सध्या अमेरिकेत वास्तव्याला आहेत. द बेटर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आईच्या आठवणींना उजाळा दिला.

त्यांनी सांगितले की कसे त्यांच्या आईला त्यांना एकटीने वाढवताना अनेक अडचणी आल्या, त्यांनी कसे अभियंता होण्याचे ध्येय पूर्ण केले.

श्यामला म्हणतात, “जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले,तेव्हा माझ्या आईला खूप त्रास भोगावा लागला. माझ्या आजीने तिचे सोळावे अपत्य गमावले होते आणि त्याचा सगळा राग तिने माझ्या आईवर काढला. आई सुद्धा तेव्हा लहानच होती.”

“आज मला कळते की माझ्या आईने तेव्हा कसे दिवस काढले असतील! पण इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा माझ्या आईने हार मानली नाही, ती समाजाच्या जाचक रुढींपुढे झुकली नाही. त्याही परिस्थितीत तिने शिक्षण सुरु ठेवले आणि एक मानाची नोकरी मिळवली. “

त्या काळात स्त्रियांसाठी मेडिकल हे क्षेत्र जास्त योग्य समजले जात असे. पण ह्या क्षेत्रात उतरले तर दिवस-रात्र असे न बघता सतत काम करावे लागत असे. त्यात जेव्हा गरज पडेल तेव्हा कामावर रुजू व्हावे लागत असे.

ललिथा ह्यांना मध्यरात्री सुद्धा केव्हातरी आपल्या लहानग्या बाळाला एकटे सोडून कामावर जावे लागेल ह्याची कल्पना असल्याने त्यांनी जाणीवपूर्वक मेडिकल हे क्षेत्र निवडले नाही.

त्यांना टिपिकल ९ ते ५ च्या नोकरीची गरज होती जेणे करून त्यांना उरलेला वेळ त्यांच्या मुलीसाठी देता येईल.

म्हणूनच ललिथा ह्यांनी त्यांचे वडील पप्पू सुब्बा राव आणि आपल्या भावांप्रमाणेच अभियंता होण्याचे ठरवले. त्यांनी हा मनसुबा त्यांच्या वडिलांना सांगितलं आणि वडिलांनी त्यांना सहकार्यच केले.

हे ही वाचा –

===

 

la;itha 1 inmarathi
.thebetterindia.com

 

ललिथा ह्यांचे वडील तेव्हा कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ,गिंडी (CEG ), मद्रास विद्यापीठ येथे इलेक्ट्रिक इंजिनियरिंगचे प्राध्यापक होते. त्यांनी केसी चाको (कॉलेजचे प्राचार्य) आणि आरएम स्टेथम , डायरेक्टर ऑफ पब्लिक इंस्ट्रक्शन ह्यांच्याशी चर्चा केली.

ह्या दोघांनीही ललिथा ह्यांना कॉलेजमध्ये प्रवेश देण्याविषयी अनुकूलता दर्शवली. CEG च्या इतिहासात पहिल्यांदाच एक मुलगी त्यांच्या कॉलेजमध्ये इंजिनीयरिंगसाठी प्रवेश घेत होती.

जसे प्राध्यापक ललिथा ह्यांच्या शिक्षणासाठी अनुकूल होते तसेच त्या कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा ललिथा ह्यांच्या शिक्षणाला पाठिंबाच दिला. ललिथा ह्यांच्या वर्गमित्रांनी कायम ललिथा ह्यांना सहकार्य केले.

त्यांच्या कॉलेजमध्ये शेकडो मुलांमध्ये ललिथा एकटी मुलगी होती तरीही त्यांच्या कॉजेमधील एकाही मुलाने ललिथा ह्यांना वेगळी, दुय्यम वागणूक दिली नाही.

त्याकाळी मुलींच्या शिक्षणाला इतका विरोध असताना देखील मुलांनी आपल्या कॉलेजमधील एकमेव वर्गमैत्रिणीच्या इंजिनियरिंगच्या शिक्षणासाठी सहकार्य करणे आणि तिला त्रास होणार नाही ह्याची काळजी घेणे हे अत्यंत कौतुकास्पद आहे.

तसेच कॉलेज अधिकाऱ्यांनी ललिथा ह्यांच्यासाठी वेगळ्या होस्टेलची देखील सोय केली. जेव्हा ललिथा हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत होत्या तेव्हा श्यामला त्यांच्या मामांकडे राहत असत. ललिथा दर शनिवारी रविवारी येऊन श्यामलाची भेट घेत असत.

 

lalitha 2 inmarathi
thebetterindia.com

 

जरी त्या घरच्यांना सांगत असत की मी मजेत आहे,तरीही हॉस्टेलमध्ये त्यांना खूप एकटेपणा जाणवत असे. तेव्हा ललिथा ह्यांच्या वडिलांना वाटले की इतर मुलींना सुद्धा इंजिनियरिंगचे शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले पाहिजे.

त्यांनी CEG मध्ये मुलींना खुला प्रवेश देण्याची जाहिरात केली. त्यानंतर लीलम्मा जॉर्ज आणि पी के थ्रेसीया ह्या दोन मुलींनी सिव्हिल इंजिनियरिंगच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला. त्या ललिथा ह्यांना एक वर्ष ज्युनिअर होत्या.

तरीही ह्या तिघीही एकत्रच इंजिनीअर झाल्या कारण तेव्हा दुसरे महायुद्ध सुरु होते आणि कॉलेजने कोर्सचा कालावधी थोडा कमी केला होता.

CEG मधून पदवी मिळवल्यानंतर ललिथा ह्यांनी काही काळासाठी सेंट्रल स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन,शिमला येथे काम केले शिवाय त्यांच्या वडिलांबरोबर सुद्धा काम केले.

राव (ललिथा ह्यांचे वडील) ह्यांनी जेलेक्ट्रोमोनियम (इलेक्ट्रिक म्युझिकल उपकरण), इलेक्ट्रिक फ्लेम प्रोड्युसर आणि स्मोकलेस ओव्हन ह्यांचा शोध लावला.

ह्या सगळ्या प्रयोगांसाठी ललिथा ह्यांनी त्यांच्या वडिलांबरोबर काम केले होते.

वडिलांच्या वर्कशॉपमध्ये काम करत असतानाच त्यांनी इतर ठिकाणी नोकरी शोधणे सुद्धा सुरूच ठेवले होते आणि नऊ महिन्यांनी त्यांना असोसिएटेड इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज ,कोलकाता येथे नोकरी मिळाली.

ललिथा ह्यांचे बंधू सुद्धा कोलकाता येथे वास्तव्याला होते. आणि त्यांनाही श्यामला ह्यांच्या वयाचा मुलगा होता. श्यामला व त्यांच्या मामेभावाचे चांगले पटत असे.

म्हणून बऱ्याच वेळा त्या श्यामलाला आपल्या भाऊ व वहिनी ह्यांच्या घरी सोडून मग कामावर जात असत. मामा व मामीच्या मायेत व मामेभावंडांबरोबर श्यामलांचे बालपण गेले.

ललिथा ह्यांच्या जिद्द व चिकाटीमुळे त्यांना पुढेही यश मिळत गेले. १९६४ साली त्यांना न्यू यॉर्क येथील इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वूमन इंजिनियर्स अँड सायंटिस्ट्स (ICWES) साठी जाण्याचे आमंत्रण मिळाले.

ह्याच वेळी श्यामला ह्यांना कळले की आपली आई किती मोठी आहे आणि स्त्रीशिक्षणाच्या इतिहासात त्यांचे किती मोठे योगदान आहे.

 

a lalitha degree inmarathi

 

श्यामला सांगतात की ,”माझ्या आईकडून मी शांतपणाचा गुण घेतला. लोक काहीही बोलले तरी त्यांना आपल्या कृतीतून उत्तर द्यायचे हे मी तिच्याकडून शिकले.”

माझ्या आईने कधीही दुसरे लग्न केले नाही पण मला कधीही वडिलांची उणीव जाणवू दिली नाही. तिचा असा ठाम विश्वास होता की लोक आपल्या आयुष्यात काहीतरी कारणाने येतात आणि ते कारण संपले की ते आपल्या आयुष्यातून निघून सुद्धा जातात.

जेव्हा माझ्या पतीने त्यांना दुसऱ्या लग्नाविषयी विचारले तेव्हा तिने गमतीत उत्तर दिले की ,’आता परत एका म्हाताऱ्या माणसाची काळजी घ्यायची? नको रे बाबा!’ अशी माझी आई होती.”

आपल्या संपूर्ण आयुष्यात ललिथा ह्यांनी दोन गोष्टी कसोशीने पाळल्या. त्या म्हणजे श्यामला कायम तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या सानिध्यात कशी राहील आणि ह्या पुरुषांच्या वर्चस्व असलेल्या क्षेत्रात त्यांचे स्त्री असणे कधीही ह्यांच्यासाठी अडथळा बनणार नाही.

भारतीय स्त्रियांसाठी एक आदर्श निर्माण करणाऱ्या ललिथा एक उत्तम इलेक्ट्रिकल इंजिनियर होत्या आणि त्यांनी पुढील पिढीतील मुलींसाठी एक नवा मार्ग उपलब्ध करून दिला.

अश्या हुषार व कर्तबगार असणाऱ्या ललिथा ह्यांचे वयाच्या अवघ्या ५५व्या वर्षी ब्रेन एन्युरीझम (मेंदूत रक्तवाहिनीत गाठ निर्माण होणे) ने निधन झाले. पण त्यांनी पाडलेला पायंडा हा येणाऱ्या पिढींसाठी एक आदर्श आहे.

भारतातील पहिल्या महिला अभियंता ललिथा ह्यांना विनम्र अभिवादन!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “१८ व्या वर्षी विधवा होऊनही ‘तिने’ जे कर्तुत्व गाजवलं त्यासाठी तिला एक सलाम!

  • September 3, 2019 at 9:38 am
    Permalink

    Inspirational srory!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?