' “हिंदीमुळे इतर भाषा मरतात”: या प्रचारावर एका अस्सल मराठीप्रेमीचं विवेचन विचारात टाकतं – InMarathi

“हिंदीमुळे इतर भाषा मरतात”: या प्रचारावर एका अस्सल मराठीप्रेमीचं विवेचन विचारात टाकतं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – सुचिकांत वनारसे 

खडीबोली, ब्रिजभाषा, मैथिली, मारवाडी आणि इतर अनेक भाषा हिंदीमुळे मरण पंथाला लागल्या आहेत तसेच हिंदी मराठीला गिळून टाकेल, असा प्रचार केला जातोय.

काही फॅक्टस :

■ मैथिली ही वेगळी भाषा आहे. उत्तर बिहार, नेपाळमध्ये बोलली जाते. ती टिकवणे, वाढवणे त्या भाषिकांचं काम आहे.

■ मराठीच्या ५२ पेक्षा जास्त अधिकृत नोंद झालेल्या बोली आज अस्तित्त्वात आहेत, तशाच हिंदीच्या बोलीपण आहेत.

हिंदीच्या बोली :

– अवधी, भोजपुरी, बाघेली, बागरी, ब्रजभाषा, बुंदेली, छत्तीसगढी, गढवाली, हरियाणवी, कंनौजी, कांगडी, खडीबोली, खोरठा, कुमाऊनी, कुरमाली, मगही, मारवाडी, मेवती, नागपुरी.

(संदर्भ : विकिपीडिया, माझ्याकडे नागपुरी हिंदीचं वेगळं व्याकरणाचं पुस्तक पण आहे.)

 

Hindi inmarathi
ohfact.com

■ कुठे बोलल्या जातात : बिहार, छत्तीसगढ, हरयाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि दिल्ली.

■ हिंदी (अधिकृत भाषा) : भारत आणि फिजी

■ हिंदी (अल्पसंख्यांकांची भाषा) : मॉरिशस, सुरीनाम, गयाना, त्रिनीनाद, टोबॅगो

■ हिंदी भाषकांची संख्या :

२००१ सेन्सस :

१) ४२ कोटी २० लाख लोकांची मूळ भाषा हिंदी, अमेरिका – ८,६३०७७, मॉरीशस – ६,८५,१७०, दक्षिण अफ्रीका – ८,९०,२९२, यमन – २,३२,७६०, युगांडा – १,४७,०००, सिंगापुर – ५,०००, नेपाळ – ८ लाख, जर्मनी – ३०,०००, न्यूजीलैंड – चौथी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा.

हिंदीच्या विविध बोली आणि त्यांच्या भाषिकांची संख्या २००१ च्या सेन्ससनुसार.

खडीबोली-हिंदुस्तानी – २४ कोटी, हरयाणवी – ९८ लाख, ब्रज भाषा – १५ लाख, कंनौजी – ९५ लाख, बुंदेली – ५६ लाख, अवधी – ४५ लाख, छत्तीसगढी – १ कोटी ६० लाख, बाघेली – २ कोटी ६० लाख, भोजपुरी – ५ कोटी १० लाख, मगधी – १.३ कोटी, खोरठा – ८० लाख, नागपुरी – ५१ लाख, कुर्माली – ५ लाख, मारवाडी – ८० लाख, माळवी – ५० लाख, लाम्बाडी – १५ लाख, हरौती – २९ लाख, गोद्वरी – ३० लाख, बागरी – २० लाख, कुमाऊनी – २० लाख, गढवाली २ लाख ४० हजार.

 

census inmarathi
scroll.in

अशी भाषा मरू शकते का? तरीही अनेक हिंदी प्रेमी हिंदी मरते आहे म्हणून गळा काढत असतात. कारण प्रत्येक भाषाप्रेमींमध्ये, भाषेत कालौघात होणारे बदल स्वीकारण्याची मानसिकता नसणारा एक गट असतोच.

भाषेचं जुनं रूपच मनावर गोंदलेलं असतं त्यातून हे लोक बाहेर पडत नाहीत. त्यामुळे ५० वर्षांपूर्वीची आणि नंतरची बदल झालेली भाषा आपलीच आहे, हे स्वीकारणे त्यांना अवघड जाते.

५० वर्षांपूर्वीची भाषा आणि १०० वर्षांपूर्वीची भाषा यातपण फरक होता हे मात्र हे लोक धूर्तपणे लपवतात किंवा असा विचार त्यांच्या ध्यानीमनीदेखील नसतो.

भाषा प्रवाही असते त्यात बदल घडणारच! मॉरिशस, सुरीनाम, गयाना, त्रिनीनाद, टोबॅगो मधली हिंदी, दिल्लीतली हिंदी, काशीतली हिंदी सारखीच असेल का? तर नाही! तिथल्या स्थानिक भाषांचा/बोलींचा त्यावर प्रभाव पडणारच. पण या सर्व भाषा हिंदीच!

मी लहानपणी माझ्या बाबांना पेशवे पार्कला जाऊ म्हणायचो, अर्थ होता प्राणी संग्रहालयात जाऊ. आता आपण म्हणतो सर्पोद्यानला जाऊ, अर्थ आहे सर्पोद्यान आणि प्राणी संग्रहालय दोन्ही.

पण सरळ प्राणी संग्रहालय हा अवजड शब्द कुणीच वापरत नाही. माझी मुलगी म्हणते बाबा आपण झु बघायला जाऊ! झु सर्वात सोपा शब्द!!! भले इंग्रजी असेल..पण ‘प्राणी संग्रहालय’ असा शब्द अगोदरही बोलताना वापरात नव्हता पुढेही असणार नाही, अजून काही दशके लिखाणात असू शकेल.

 

train inmarathi
edutics.com

त्यामुळे बोलताना झु हा शब्द स्वीकारायला मला हरकत नाही. पण प्रत्येकजण याच विचारांचा असेल असेही नाही. आज मी ३८ वर्षांचा आहे, लहानपणापासून क्रिकेट, बॅट, बॉल शब्द वापरतो आहे. अगदी खेडेगावात मोठा झालो तरीही.

मी कधीही घरात चेंडूफळी खेळायला जातो, बाबा मला चेंडू घेऊन द्या, म्हणालो नाही. बॅट-बॉलच म्हणालो.

आता बॅट, बॉल शब्द मराठी मानले पाहिजेत पण काही लोक अजूनही त्यावर इंग्रजी शिक्का मारत राहतील आणि म्हणतील मराठी संपते आहे, असेच हिंदी संपते आहे म्हणणारे अनेक आहेत.

पण इंग्रजी मात्र प्रत्येक देशातून हजारोंनी शब्द उचलते, इकडे आम्हाला महाराष्ट्रामध्येच आल्याच्या जागी मराठवाड्यात अद्रक बोलले जाते हे खपत नाही, नागपूरमधला हिंदीचा मराठीवरचा प्रभाव खपत नाही.

पण इंग्रजी भाषा मात्र शब्द उचलताना अजिबात दुजाभाव करत नाही हे विशेष! ना भारतीय, आफ्रिकन, चायनीज शब्द उचलल्याने इंग्रजी संपली, आज इंग्रजी जगात अग्रस्थानी आहे.

पण जर तुम्ही बोलताना भाषाच वगळली, मराठी भाषिक असून हिंदीतून बोलत राहिलात, हिंदी भाषिक असून फ्रेंचमधून बोलत राहिलात तर मात्र प्रकरण भाषेच्या दृष्टीने गंभीर होईल. त्यामुळे आपण अशा सर्व अपप्रचारातल्या तांत्रिक बाजू समजून घ्यायला हव्यात.

 

marathi-language-marathipizza
india.com

देशात सर्वात जास्त खडीबोली-हिंदुस्तानीचे भाषिक आहेत. अशीच अवस्था महाराष्ट्रात मराठीची आहे. महाराष्ट्रात पुणेरी मराठी प्रमाण मानली जाते वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे, चित्रपट, शालेय शिक्षण अशा सर्वच ठिकाणी प्रमाण मराठी वापरली जाते. त्यामुळे इतर अनेक बोली संपण्याची शक्यता भाषातज्ञ वर्तवत असतात त्याचे काय?

हे म्हणजे शेंबूड आपल्या नाकाला अशी अवस्था झाली! अहिराणी, कोकणीसाठी लढणारे गटपण आहेत, अहीराणी जगातील सर्वात जास्त शास्त्रोक्त भाषा आहे असे म्हणणारे तज्ञपण आहेत.

मराठीमुळे आमच्या बोली संपत आहेत अशी ओरड करणारे पण आहेत.

मराठीने कोणता भाषिक अजेंडा राबवला आहे का? तर नाही, तसाच हिंदीने कोणताही भाषिक अजेंडा या बोली संपवण्यासाठी राबवलेला नाही.

भाषा दोन पद्धतीने मोठी होते, १. सरकारी आश्रय २. लोकांची पसंती. हिमाचल, उत्तराखंडची अधिकृत भाषा संस्कृत आहे म्हणून लोक संस्कृत बोलायला लागले का? तर नाही.

म्हणजे अनेकदा सरकारी आश्रय असूनदेखील फायदा होत नाही. हिंदी वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, चित्रपट यामुळे हिंदी-खडीबोली मोठ्या प्रमाणात बोलली जाते. सतत हिंदीने या भाषा संपवल्या म्हणून अपप्रचार करण्यात आणि लोकांची दिशाभूल करण्यात काहीही अर्थ नाही.

मुळात या हिंदीच्या बोली आहेत हे आपण लक्षात ठेवायला हवे, जश्या मराठीच्या वऱ्हाडी, नागपुरी, हळबी, अहिराणी, झाडीबोली, डांगी, कोकणी या बोली आहेत.

प्रमाण मराठीचा या बोलींना जो धोका आहे तसाच धोका खडीबोलीचा हिंदीच्या इतर बोलींना आहे.

 

language issue marathipizza 00

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंदी मराठीला गिळून टाकेल असा आरोप : मराठीला हिंदीने गिळून टाकायला काय मराठी हिंदीची बोली आहे का? जे लोक मराठीला नाकारून हिंदी-इंग्रजी जवळ करतात हा दोष त्यांचा आहे, भाषांचा नाही.

हिंदी-इंग्रजी भाषा कधी म्हणाल्या मराठी सोडा म्हणून? हा मराठी लोकांचा त्यातही खासकरून शहरी भागातील काही मराठी लोकांचा भाषिक न्यूनगंड आहे. त्याला तुम्ही-आम्ही काही करू शकत नाही, त्यांचं प्रबोधन हाच उपाय.

अनेक हिंदी भाषिकदेखील इंग्रजी वेडे असतात तीच मानसिकता दाखवणारा हिंदी मिडीयम चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता.

सर्वात शेवटी : अल्पसंख्यांक भाषा असते त्यावेळी अर्थातच तिचे वापरकर्ते कमी असतात परिणामी त्या भाषेत दर्जेदार साहित्य निर्माण होण्याची शक्यता कमी असते.

त्याचवेळी जी बहुसंख्यकांची भाषा असते त्या भाषेत अधिकाधिक उत्कृष्ट साहित्य निर्माण होत असेल, चांगले चित्रपट, नाटके निर्माण होत असतील, चांगली दर्जेदार वर्तमानपत्रे असतील तर अर्थातच अशा भाषेकडे लोकांची ओढ असणे अगदीच नैसर्गिक आहे.

लोकांची ही मानसिक गरज आहे, ती भागवली गेली नाही तर त्यांच्या आयुष्यात पोकळी निर्माण होईल.

त्यात अनेक मराठीभाषिकांना हिंदी सहज समजते, शाळेत नाहीत गेला तरीही समजते, त्यामुळे मराठी वापरकर्ते काही गोष्टींसाठी हिंदीकडे जाणार! ज्यांना उत्कृष्ट संगीत ऐकायचं आहे, ते जुनी मराठी गाणी ऐकतील, हिंदी गाणी ऐकतील, निवडक तमिळ, तेलुगु गाणी ऐकतील.

नवीन मराठी गाणी कोण ऐकेल? अजय-अतुल सोडले तर मेलडी कोण देतंय? मी तरी ऐकणार नाही, पण भाषावेडासाठी कानाला हेडफोन लावून अशी निकृष्ट नवीन मराठी गाणी ऐकत राहिलात तर मेंदू हँग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

ajay atul inmarathi
marathiboli.com

भाषा माणसांसाठी असते माणसे भाषांसाठी नसतात. विनाकारण अमुक भाषा वापरा, अमुक भाषा वापरू नका ही सक्ती तुम्हाला करता येणार नाही. अशी सक्ती करणे लोकशाहीच्या विरुद्ध आहे.

लोकांना मराठी वापरासाठी आग्रह, मराठी शाळांमध्ये शिकण्यासाठी आग्रह, वृत्तपत्र-वृत्तवाहिन्यांना स्वच्छ मराठी वापरण्यासाठी आग्रह, नियम तोडले जात असतील तर नियम दाखवून देणे (उदा, त्रिभाषा सूत्राचे उल्लंघन), नवीन नियम हवे असतील तर त्याकरता सरकारकडे मागणी करणे(द्विभाषासुत्रासाठी मागणी), न्यायव्यवस्थेकडे भाषेवर होणाऱ्या अन्यायासाठी न्याय मागणे, दर्जेदार भाषिक कलाकृतींची निर्मिती याच मार्गांचा अवलंब अपेक्षित आहे.

हे सूत्र सर्वच भारतीय भाषांना लागू होते, द्वेष पेरून उत्तरे मिळणार नाहीत! मार्गही निघणार नाहीत…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?