' धर्मातील चुका दाखवताना टीका कशी करावी? – InMarathi

धर्मातील चुका दाखवताना टीका कशी करावी?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक  – कौस्तुभ अनिल पेंढारकर 

टीका करण्याचे दोन हेतु असतात.

1. ज्याच्यावर टीका करतोय त्याचं प्रबोधन करण्यासाठी

2. ज्याच्यावर टीका करतोय त्याच्याबद्दल इतरांचं प्रबोधन करण्यासाठी.

या दोन्ही टीकांमध्ये फरक असतो. दोन्हीचा सूर वेगळा ठेवावा लागतो.

पहिल्या प्रकारातील टीका करताना शब्दरचना जपून करावी लागते; सूर शांत आणि समजावणीच्या सुरातला ठेवावा लागतो. हेत्वारोप होणार नाही याची शक्य तेवढी काळजी घ्यावी लागते. या प्रकारच्या टीकेत नुसतं टीका करून भागत नाही, उपाय/पर्याय सुचवावे लागतात.

टीका ज्याची करतो त्याच्याबद्दलची आपुलकीची भावना व्यक्त करावी लागते. चुकीचा अर्थ काढण्यासाठी वाव देऊन चालत नाही. आवाज चढवून, संयम सोडून, उपयोग होत नाही.

मांडणी रंजकही असावी लागते. नाहीतर ज्यांनी ऐकावी असं वाटतं ते झोपून जातात. यात ज्याची टीका होते त्याला ‘तू मूर्ख आहेस’ असं स्पष्टपणे सांगून चालत नाही.

याने एकतर तो उसळून टीकाकाराला पूर्णपणे नाकारतो किंवा आपण खरंच मूर्ख आहोत असं मानून स्वतःचा सगळा स्वाभिमान सोडून देतो. या दोन्ही प्रतिक्रियांतून काहीच सकारात्मक साध्य होत नाही.

 

blame inmarathi

 

दुसऱ्या प्रकाराची टीका ही इतरांना ज्याच्यावर टीका होतेय त्याच्याबाबत माहिती देण्यासाठी करायची असते. ही अत्यंत निर्विकारपणे करावी लागते. यात कुठेही टीका होणाऱ्याविषयी आपपरभाव दिसून येता कामा नये.

टीकेचा निष्कर्ष मांडणीच्या सुरुवातीपासून आडून आडून दिसत राहतो. त्यामुळे याही बाबतीत हेत्वारोप कमीत कमी व्हावा याची काळजी घ्यावी लागते. तिऱ्हाईतांना सांगताना टीकाकारानेही तिऱ्हाईताच्याच भूमिकेत असायला हवं.

चांगलं आणि वाईट, आशा आणि निराशा, याबाबत संतुलन राखायचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा. संतुलन राखताना मुद्दाम ओढाताण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

अशाप्रकारची टीका करताना पहिल्या प्रकारच्या टीकेच्या मानाने टीकाकाराला बरीच मोकळीक असते. त्यामुळे या टीकेत टीका होणाऱ्याबद्दलचं टीकाकाराचं मत इतरांना पटवून देणं तसं सोपं असतं.

 

 

blame 2

 

समाजातल्या बऱ्यावाईटाची चिकित्सा समाजाच्या भल्यासाठी समाजातील घटकांनीच मोठ्या प्रमाणावर करायला हवी. ती करताना त्यांचा हेतु स्पष्ट हवा. तरच समाज ती चिकित्सा स्वीकारतो (खपवून घेतो). अशी चिकित्सा करण्याची मोकळीक मुळात त्या समाजात असायला हवी. ती नसली तर तसं वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अशा वेळी बाहेरच्यांची मदत घेताना त्यांचा मदत करण्यामागचा हेतु जाणून घ्यावा.

आदर्श समाजरचनेत दोन भिन्न समाजांनी आत्मावलोकनासाठी एकमेकांचं आपल्याबाबतचं मत विचारात घ्यायला हवं. सांस्कृतिक देवाणघेवाण जशी नकळत राहणीमानात होते, तशीच ती विचारसरणीतही होत असते.

म्हणून वैचारिक देवाणघेवाण मुद्दाम ठरवून केली नाही तर आपोआप सुविचारांऐवजी अविचारांची देवाणघेवाण होणं जास्त होण्याच्या शक्यता वाढतात.

त्यामुळे समाजात जेवढे विचाराधारित समुदाय आणि जेवढे त्यांचे तत्त्वज्ञानाचे विभिन्न प्रकार असतील, तेवढ्या त्या सगळ्यांच्या सभ्य आणि सुसंस्कृत आणि सुशिक्षित प्रवक्त्यांची वारंवार आपापसांत चर्चा व्हायला हवी.

ही चर्चा त्या त्या समुदायापर्यंत पोहोचत राहायला हवी. त्यानुसार विचारांची आणि आचारांची जाणीवपूर्वक देवाणघेवाण व्हायला हवी.

भारतात हिंदू प्रबोधनाचा मक्ता कैक वर्षं स्वतःला हिंदू न म्हणवणाऱ्यांनी आपल्याजवळ घेऊन ठेवलेला आहे. त्यांपैकी कित्येकांच्या हेतुबद्दल शंका यावी असंच त्यांचं वर्तन राहिलेलं आहे.

दुसरं म्हणजे हिंदू समाजातील टोकाचे घटक असणाऱ्यांनी समाजाचं प्रतिनिधित्व स्वतःजवळ घेऊन ठेवलेलं आहे. त्यामुळे बहुसंख्य हिंदू समाजाजवळ स्वतःचं प्रबोधन आणि स्वतःचं संस्कृती जतन यांपैकी कशाचीच मोकळीक राहिलेली नाही.

एखाद्या अतिरेकी विचारसरणी असलेल्या कंपूचा अनुयायी/सहभागी झाल्याशिवाय हिंदूंना काहीच साध्य करता येत नाही. अशामुळे प्रबोधन करण्याबाबत आणि संस्कृतीजतनाबाबतही बहुसंख्य हिंदू समाज उदासीन झालेला आहे. यातूनच सोईनुसार कधी स्वतःचं सगळं वाईट, कधी स्वतःचं सगळं चांगलं अशा भूमिका लोक घेत सुटलेले आहेत.

हे बदलायचं असेल तर बहुसंख्य हिंदूंसाठी विश्वसनीय असा ‘प्रबोधनकर्ता गट’ उदयाला येणं ही काळाची गरज आहे. या गटाने पद्धतशीरपणे कोणत्याही प्रकारचा द्वेष न पसरवता योग्य प्रबोधन आणि योग्य संस्कृतीचं जतन करण्याची मक्तेदारी स्वतःजवळ घ्यायला हवी.

 

religion-marathipizza

स्रोत

 

आपल्या धर्मात काय चांगलं काय वाईट हे आपल्याला ठरवायची अक्कल नाहीये का? आपल्यातल्या चुकीच्या गोष्टींकडे बोट दाखवणारा कोणीतरी फुरोगामी येण्याची वाट का बघत बसावी?

हिंदू ‘संस्कृती जतनाचा’ मक्ता राजकीय आणि ‘अराजकीय’ गुंडांनी घेऊन ठेवलाय.

हिंदू ‘प्रबोधनाचा’ मक्ता हिंदूहित न जपू पाहणाऱ्या फुरोगाम्यांनी घेतलाय.

आपण या दोन्ही गोष्टींची मक्तेदारी स्वतःपासून सुरुवात करून आपल्या समाजातल्या सभ्य घटकांच्या हाती एकटवायला हवी. ‘बदल आत्मसात करणं, दुसऱ्याचं चांगलं ते घेणं’ ही खरी आपली हिंदू संस्कृती. तिचं आपण जतन करायला हवं आणि ज्या अनिष्ट रूढी आहेत त्या आपणच बंद करून/करवून फुरोगाम्यांचीही तोंडं बंद करून टाकायला हवी.

आपण आपलं नाक स्वच्छ केलं की इतर शेंबड्यांवर हसायचा आपल्याला नैतिक अधिकार मिळेल. तेव्हा आपण म्हणू शकू, की पाहा आम्ही तर सुधारलो, आता तुमची पाळी!

मुख्य गोष्ट – हिंदू रूढींवर होणारी टीका नेहमी वस्तुनिष्ठपणे होते. मग ते खरे पुरोगामी करत असतील किंवा खोटे. पण ते हिंदूंबद्दल बोलत असताना हिंदूंबद्दलच बोलतात. अशामुळे टिकेचा विषय भरकटत नाही आणि चर्चा शक्य होते. अशा चर्चेतून विचार प्रवर्तनही होतं आणि काहीजणांचं प्रबोधनही होतं.

ख्रिस्ती इस्लाम धर्मांची चिकित्सा करायला घेतली की फुरोगामी मुद्दाम ‘हिंदूही काही कमी नाहीत’ असं म्हणून हिंदू धर्मातील अनिष्ट रूढींची उदाहरणं देत सुटतात. अशामुळे विषय भरकटतो.

टीका वस्तुनिष्ठपणे व्हायला हवी. म्हणून ख्रिस्ती आणि इस्लामी धर्मातील रुढींवर टीका करताना हिंदूंशी तुलना करून फुरोगाम्यांना आयता कोलीत देऊ नका. अशाने फक्त तू तू मै मै वाढतं, ध्रुवीकरण वाढतं, असंतोष वाढतो, पण प्रबोधन होत नाही.

ख्रिस्ती आणि मुस्लीमांना स्वतःचं भलं समजत नाही म्हणून आपणही त्यांच्याच पंक्तीत बसायची गरज नाही. त्या पातळीवर आपल्याला आणायचा पद्धतशीर प्रयत्न फुरोगामी आणि सांप्रदायिक गुंड गेली कित्येक वर्षं करतायत. हे होऊ देऊ नका. तेव्हा तुलना शक्यतो टाळा. स्वतंत्र चिकित्सा करा.

ख्रिस्ती रुढींवर फुरोगामी बोलत नाहीत ना? न बोलोत, आपलं तोंड कोणी शिवलंय का? बोला. पण तुलना न करता, नाहीतर विषय भरकटेल.

पण ही चिकित्सा करायची कशी? यामागे हेतु कोणता? समाजाचं स्वतःच्या अनिष्ट मानसिकतेबाबत प्रबोधन करायचं म्हटलं तर ते समाजातल्याच घटकांनी करायला हवं.

ख्रिस्ती आणि इस्लामी धर्मग्रंथांची चिकित्सा म्हणून स्वतः अनुक्रमे ख्रिस्ती आणि इस्लाम समाजातील सदस्यांनी करायला हवी. भारताबाहेर ख्रिस्ती समाजात ती मोठ्या प्रमाणात झालीये, होते आहे.

मग हिंदूंनी काय करावं? त्यांचा काय संबंध या धर्मग्रंथांशी? तर काही नाही आणि म्हणूनच त्यांनी केलेली टीका ही ज्या समाजावर केली त्या समाजातले घटक ती का म्हणून स्वीकारतील? अजिबात स्वीकारणार नाहीत.

धर्मग्रंथ हे काही हिंदूंचे संदर्भ ग्रंथ नव्हेत. आपला संदर्भग्रंथ कोणता? तर भारताचं संविधान. म्हणूनच आपण इतर ख्रिस्ती, इस्लामी किंवा इतर समाजांवर जी काही टीकाटिप्पणी करू, संविधानाच्या संदर्भाने करावी. हाच एक योग्य आणि प्रभावी मार्ग आहे. आज खरा पक्षपात होतो तो याबाबतीत.

बहुतांश हिंदू हे धर्मग्रंथ आणि संविधान यामधील पर्याय निवडा म्हटल्यावर छातीठोकपणे संविधानावर हात ठेवायला तयार होतील. हे इतर धर्मांबाबत होईलच याची खात्री नाही देता येत. (कदाचित लेखकाचा परधर्मीयांशी थेट संबंध कमी आल्याने त्याचं असं चुकीचंही मत असू शकेल). तर हा पक्षपात कमी होण्याच्या दृष्टीने स्वतः हिंदूंनी प्रयत्न करायला हवेत.

आधी आपली संविधानासाठीची निष्ठा कृतीतून आणि मग वाच्यतेतून (हा क्रम आवश्यक) सिद्ध करावी. आणि मग ती निष्ठा इतरांनीही पाळावी यासाठी प्रशासनावर दबाव आणावा.

याचसोबत केवळ संविधान माथी मारून खरं वैचारिक प्रबोधन साध्य होणार नाही याची जाणीव असल्याने, ज्या त्या समाजातील प्रबोधकांना त्या त्या समाजात प्रबोधन घडवून आणण्यासाठी हिंदूंनी पाठबळ पुरवावं. अशाप्रकारे अंतिमतः सगळ्या अनिष्ट रुढी, आणि त्यांचं भांडवल करणाऱ्या अनिष्ट माणसांची तोंडं एकदाची बंद होतील.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?