' या तरुणीच्या अफलातून शोधकार्यामुळे लाखो स्वच्छता कामगारांचे कष्ट वाचणार! – InMarathi

या तरुणीच्या अफलातून शोधकार्यामुळे लाखो स्वच्छता कामगारांचे कष्ट वाचणार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पर्यावरणाचा विचार करून आणि घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्यांना सोपे जावे म्हणून ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा ठेवा असे जवळपास सगळ्याच नागरिकांना आवाहन केले जाते. पण इतके कष्ट कोण घेणार? घेतला कचरा की टाकला कचऱ्याच्या डब्यात!

मग ते प्लास्टिक असतो, डायपर असो, चहाचा चोथा असो की उरलेले अन्न! सगळे एकाच डब्यात टाकून आपण मोकळे होतो.

पण त्या कचऱ्याचे वर्गीकरण करताना, त्याचे व्यवस्थापन करताना, तो कचरा रिसायकल करताना घनकचरा व्यवस्थापनासाठी काम करणाऱ्यांना किती त्रास होत असेल हा विचार आपण करत नाही.

कचराकुंडी दिसली की नाकाला रुमाल लावणे इतकेच आपल्याला माहित आहे. तुमच्या आमच्या ह्या आळसामुळे आणि दुर्लक्ष करण्यामुळे पर्यावरणाचे किती नुकसान होत आहे ह्याचा आपण विचार करायला हवा आहे.

 

kachara inmarathi

 

आपल्या एका छोट्याश्या प्रयत्नामुळे कचरा व्यवस्थापन करणाऱ्यांचे किती कष्ट वाचतील, तसेच पर्यावरणाची हानी कमी होईल हा विचार आपण कधी करणार आहोत काय माहित!

लोकांचा हाच आळस आणि घाणेरड्या सवयी डोळ्यापुढे आणून बंगळुरूच्या एका विद्यार्थिनीने तेविसाव्या वर्षी असे यंत्र तयार केले ज्यामुळे कचरा व्यवस्थापन करणाऱ्यांचा बराच भार हलका होऊ शकेल. हे यंत्र ओला आणि सुका कचरा वेगळा करते.

निवेधा केमिकल इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असतानाच तिच्या कार्यामुळे एका स्थानिक मासिकात झळकली होती. ती तेव्हा बंगळुरूच्या आर व्ही कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये शिकत होती.

तिने व तिच्या मित्रमंडळाने त्यांच्या कॉलेजजवळची एक कचऱ्याने भरलेली गल्ली उत्स्फूर्तपणे स्वच्छ केली होती.

महिनोंमहिने त्या गल्लीची स्वच्छता झालेली नव्हती आणि तिथून येता जाताना लोकांना कचऱ्याचा घाणेरडा वास असह्य होऊन अक्षरश: नाक मुठीत धरून जावे लागत असे. कचऱ्यामुळे हा भाग डासांचे माहेरघर झाले होते. त्यामुळे त्या भागात राहणाऱ्या लोकांना आजार होऊ नयेत म्हणून कायम खिडक्या बंद करून घुसमटत राहावे लागत होते.

तिथले लोक असे घुसमटत राहत होते पण काहीच हालचाल करायला तयार नव्हते. त्यामुळे ह्या कॉलेजतरुणांनीच बदल घडवायचे ठरवले आणि कम्बर कसून कामाला लागून त्यांनी ती संपूर्ण गल्ली स्वच्छ केली.

 

nivedha engineering inmarathi

 

त्यासाठी लोकांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्याबद्दल मासिकात देखील छापून आले. पण दुर्दैवाची बाब अशी की आठवड्याभरातच लोकांनी तिथेच परत कचरा जमा करून परत त्या गल्लीचे कचराकुंडीत रूपांतर केले.

हे सगळे बघून तिने BBMP च्या ऑफिसमध्ये तक्रार केली आणि विचारले की त्या ठिकाणी कारवाई का केली गेली नाही?

तेव्हा त्या अधिकाऱ्याने तिला सांगितले की,

“तिथे स्वच्छता करून उपयोग नाही. कारण तिथले लोक स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणायलाच तयार नाहीत. इतके सांगून आणि जनजागृतीचे प्रयत्न करून सुद्धा हे लोक कचरा वेगवेगळा ठेवायलाच तयार नसतात.

एका कचऱ्याच्या पिशवीत लहान मुलांचे खराब डायपर्स, घट्ट बांधलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत टाकून दिलेले अन्न , मृत जनावरे असे काहीही एकत्र सापडते. अश्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि व्यवस्थापन कोण कसे करू शकेल?”

ह्यानंतर निवेधाने दारोदार जाऊन कचरा वेगवेगळा ठेवण्याबाबतीत जनजागृतीचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या लक्षात आले की कचरा जेव्हा गोळा केला जातो तेव्हाच बरीच गडबड केली जाते.

लोकांनी जरी त्यांच्या घरी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवला असला तरीही कचरा गोळा करणारी व्यक्ती जर अप्रशिक्षित असेल तर ते लोक सगळा कचरा एकत्र करतात.

 

nivedha engineering 1 inmarathi

 

काही कामगार भंगार विकताना त्याचे वजन जास्त भरावे म्हणून कचरा एकत्र करून विकतात. मग तिने सध्याच्या कचरा व्यवस्थापनावर अनेक सर्व्हे केले.

एका मुलाखतीत तिने सांगितले की, “भारतात दररोज सुमारे १.७ लाख टन कचरा तयार होतो आणि त्यापैकी ९५ टक्के कचऱ्याचे वर्गीकरण केलेले नसते. दिल्लीतील कचराभूमीची वाईट अवस्था कुणापासूनच लपलेली नाहीये आणि आता बंगळुरूमध्ये देखील कचऱ्याचा व्यवस्थापनासाठी जागा कमी पडतेय.

हा सर्व्हे करताना माझ्या लक्षात आले की अश्या प्रकारे सर्वच प्रकार एकत्र असलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कुठलेच तंत्रज्ञान अस्तित्वात आलेले नाही.

ह्या अश्या एकत्र कचऱ्याची विल्हेवाट लावणे अशक्य आहे. मी विचार केला की माझ्यासारखी मध्यमवर्गीय विद्यार्थिनी ह्यावर काय उपाय काढू शकेल?”

पण कुणीतरी ह्यावर विचार करून उपाय शोधणे गरजेचे होते. म्हणूनच निवेधाने खूप प्रयत्न आणि विचार करून ट्रॅशबोट नावाचे हे यंत्र तयार केले.

हे सेमी ऑटोमॅटिक यंत्र काहीच मिनिटांत कचऱ्याचे वर्गीकरण करते. निवेधाच्या ह्या शोधाला राज्यपातळीवर तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

 

nivedha engineering 2 inmarathi

 

ह्या यंत्राचा शोध कसा लागला हे सांगताना निवेधा म्हणते की,

“२०१६ साली मी ह्यावर विचार करायला सुरुवात केली. सहा महिन्यांत मी एक लहानशी सिस्टीम तयार केली. ह्यात कचऱ्यातील आर्द्रतेच्या अंशावरून तो कचरा बायोडिग्रेडेबल आहे की नॉन बायोडिग्रेडेबल आहे ठरते. बायोडिग्रेडेबल कचऱ्यात ९० टक्के आर्द्रता असते आणि नॉनबायोडिग्रेडेबल कचऱ्यात ४० टक्क्यांपेक्षाही कमी आर्द्रता असते.”

तिने सुरुवातीला १ किलो वेस्ट प्रोसेसिंग मॉडेलचा प्रोटोटाइप तयार केला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तिने ५० किलो कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी मशीन तयार करायचे ठरवले पण त्यासाठी तिच्याकडे पुरेसे आर्थिक पाठबळ नव्हते.

आर्थिक मदतीसाठी म्हणून तिने Elevate १०० साठी अप्लाय केले. हा फ्लॅगशिप प्रोग्रॅम कर्नाटक सरकारद्वारे चालवला जातो आणि ह्या प्रोग्रॅममधून टॉप १०० नावीन्यपूर्ण स्टार्टअप्सना आर्थिक मदत केली जाते.

निवेधा सांगते की , “एखादी कंपनी कशी उभी करतात ह्याविषयी मला काहीही कल्पना नव्हती. पण मी कंपनी सुरु केली आणि लगेच Elevate १०० साठी अप्लाय केले.

माझी स्पर्धा ३५०० स्टार्टअप्स बरोबर होती. ह्यातील अनेक कंपन्या मोठ्या होत्या. त्यांचा बिझनेस अनेक देशांमध्ये आधीच सुरु होता. पण सुदैवाने सर्वोच्च १०० कंपन्यांमध्ये माझ्याही कंपनीची निवड झाली. “

ह्याच दरम्यान तिच्या परीक्षेचाही निकाल लागला. तिचा कॉलेजमधून नववा क्रमांक आला तसेच तिका कॅट आणि XAT मध्येही चांगला स्कोअर आला. त्यामुळे ह्या स्कोअरचा उपयोग करून तिला खरं तर स्वतःचं भविष्य सुरक्षित करता आलं असतं.

तिने तिच्या आईला सांगितले की तिने हा प्रोजेक्ट थोडा पुढे ढकलून, आधी एखादी नोकरी करून, थोडे पैसे कमावून मग नंतर हा प्रोजेक्ट करण्याचे ठरवले आहे.

 

nivedha engineering 3 inmarathi

 

तेव्हा तिच्या आईने तिला सांगितले की,

“हा प्रश्न सोडवण्यासाठी इतर कुणीच प्रयत्न करत नाहीये. हा प्रश्न एक दिवस आपल्याच जीवावर उठेल. त्यामुळे तू ह्या प्रोजेक्टवर काम करायला हवे. माझ्याकडे जे थोडेफार पैसे आहेत, त्यातून मी तुला नक्की मदत करेन. निवेधा, तुला यश मिळाले नाही तरी हरकत नाही. पण प्रयत्न नक्कीच कर!”

तिच्या आईने तिला प्रेरणा दिली. आणि निवेधाने Elevate 100 कडून मिळालेली आर्थिक मदत वापरून त्या मशीनचे काम सुरु केले. तिने पन्नास किलो कचऱ्याचे वर्गीकरण एका तासात होईल असे मशीन तयार करून ते एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये बसवले.

त्या अपार्टमेंटमध्ये १५० घरे आहेत. ह्या प्रयोगामुळे तिला मशीमध्ये ओव्हरलोड आणि अप्रशिक्षित कामगारांमुळे काय समस्या येऊ शकतील ह्याची कल्पना आली.

पण हा प्रयोग लहान प्रमाणावर असल्याने त्याचा मोठा प्रभाव पडू शकला नाही.

म्हणून तिने २५० किलो कचऱ्याचे वर्गीकरण करणारे मशीन तयार करायचे ठरवले. हे मशीन तिने महापालिकेच्या कचराभूमीवर इन्स्टॉल केले.

“वेस्ट सप्लाय चेनचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आले की कसे आपल्या घरातून कचरा गोळा करून तो लहान ट्रक्समधून तो कलेक्शन सेंटरला नेला जातो आणि नंतर तो कचराभूमीवर मोठ्या ट्रक्समधून नेला जातो.

मी विचार केला की मी मोठ्या ट्रक्सचे काम मी कमी करू शकले तर बरं होईल. ह्याने सरकारचे लाखो रुपये वाचू शकतील आणि त्या कचऱ्यापासून आपण काहीतरी तयार करू शकू आणि हा कचरा लँडफिल्समध्ये जाणार नाही. “

हे सगळे साध्य करण्यासाठी तिने स्थानिक नगरसेवकाची मदत घेतली आणि तिला डम्प यार्ड मध्ये तिचे युनिट लावण्यासाठी जागा आणि विजेचे कनेक्शन मिळाले.

पहिल्या दिवशी तिने जेव्हा मशीनचे प्रात्यक्षिक करून दाखवले तेव्हा तिने त्या सर्वांना बघायला बोलावले ज्यांनी ज्यांनी तिला हे मशीन काम करणार नाही असे छातीठोकपणे सांगितले होते.

 

nivedha engineering 4 inmarathi

हे ही वाचा – जखम झाल्यास नुसती हळद न लावता करा हा उपाय… भारतीय शास्त्रज्ञाचा भन्नाट शोध!

तिने सांगितल्याप्रमाणे तिथल्या माणसाने कचऱ्याची पिशवी मशीनमध्ये टाकली आणि लगेच मशीन पूर्णबंद पडले. मोटर खराब झाली. तिला माहीतच नव्हते की त्या पिशवीत काय आहे. नंतर तिला कळले की त्या पिशवीत मोठा दगड होता.

तिची आठ महिन्यांची मेहनत अशी वाया गेली. पण त्यातून तिला ही शिकवण मिळाली की हे मशीन “इडियट प्रूफ” बनवणे सगळ्यात महत्वाचे आहे.

त्यावेळी सौरभ जैन ह्यांनी निवेधाला मार्गदर्शन केले. सौरभ जैन हे सीए आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत. त्यांच्या इंजिनियरिंगच्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी निवेधाच्या मशीनमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा अभ्यास करून त्यावर उपाय सुचवले. त्यांनी कायम तिला प्रोत्साहन दिले.

त्या दोघांनी एकत्र त्या डम्पिंग ग्राउंडवरच्या मशीनवर आठवडाभर काम केले. तेव्हा त्यांना ह्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आले आणि त्यांची सीए फर्म सोडून निवेधाच्या कचऱ्याविरुद्धच्या लढ्यात तिच्याबरोबर लढण्याचे ठरवले.

रोज सौरभ आणि निवेधा सकाळी लवकर डम्पिंग ग्राउंडवर जात असत आणि रात्री उशिरापर्यंत तिथे काम करत असत. असे पाच महिने काम केल्यानंतर त्यांनी मशीन बनवले.

मागच्या वर्षी त्यांच्या ट्रॅशकॉन टीममध्ये आणखी काही लोक सामील झाले. हे लोक सुद्धा असेच ध्येयाने झपाटलेले होते आणि त्यांनी त्यांच्या बक्कळ पैसे कमवून देणाऱ्या नोकऱ्या सोडून दिल्या व केवळ हे ध्येय साध्य करण्यासाठी ते डम्प यार्डमध्ये काम करू लागले.

निवेधाच्या टीमने अखेर मोठ्या प्रयत्नांनी मशीन पूर्ण तयार केले आणि महानगरपालिकेच्या कचेरीत ते मशीन सुरु केले.

आता तयार झालेले मशीन हे इडियट प्रूफ तर आहेच, शिवाय ते कचऱ्याचे नव्वद टक्क्यांपर्यंत यशस्वीपणे वर्गीकरण करू शकते. तुम्ही ह्यात अगदी विविध प्रकारचा कचरा एकत्र टाकला तरी ट्रॅशबोट त्या कचऱ्याचे काही मिनिटांतच वर्गीकरण करून तो कचरा रिसायकल करते.

सध्या हे मशीन ५०० किलो, २ टन, ५ टन आणि १० टन अश्या चार प्रकारांत उपलब्ध आहे.

 

nivedha engineering 6 inmarathi

 

जेव्हा सर्व प्रकारचा कचरा एकत्र असलेली एखादी कचऱ्याची पिशवी ह्या मशीनच्या डम्पिंग बिनमध्ये टाकली की ती फाडून उघडली जाते आणि त्यातील वस्तू ह्या मॅग्नेटिक सेपरेशन सिस्टीममध्ये वर्गीकृत होतात.

ह्याठिकाणी बॅटरीज, इतर धातूच्या वस्तू आणि दूषित पदार्थ वेगळे केले जातात. त्यानंतर उरलेल्या वस्तू लोडींग कन्व्हेयरवरून श्रेडींग युनिटमध्ये नेल्या जातात.

तिथे सगळ्या वस्तूंचे बारीक तुकडे होतात आणि हवेच्या प्रेशरने बायोडिग्रेडेबल कचरा हा वेगळ्या भागात साठतो आणि नॉनबायोडिग्रेडेबल कचरा वेगळ्या ठिकाणी भरला जातो. ह्या सगळ्याचे पुढे रिसायकलिंग करणे सोपे जाते. बायोडिग्रेडेबल कचऱ्यापासून बायोगॅस किंवा नैसर्गिक खत तयार केले जाते. व नॉनबायोडिग्रेडेबल कचऱ्यापासून रिसायकल्ड बोर्ड्स बनवले जातात.

ह्या बोर्ड्सपासून पुढे टेबल, खुर्च्या, रुफिंग टाईल्स, पार्टीशन वॉल्स आणि इतर वस्तू तयार होतात. आजपर्यंत सरकार कचऱ्याच्या वर्गीकरणावर आणि व्यवस्थापनावर करोडो रुपये खर्च करीत होते.

पण आता ह्या संपूर्ण झिरो वेस्ट सिस्टीममध्ये कचऱ्याचे वापरता येण्यासारख्या वस्तूंमध्ये रूपांतर केले जाते.

सध्या निवेधाची कंपनी पिडीलाईट ह्या मोठ्या कंपनीबरोबर काम करते आहे. त्यांनी रिसायकल केलेले बोर्ड्स पिडीलाईट सुतारांपर्यन्त पोहोचवते. ह्या बोर्डसचे मार्केट हे फक्त भारतातच नव्हे तर अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात सुद्धा आहे.

हे रिसायकल्ड बोर्ड्स हा प्लायवूडला एक उत्तम पर्याय आहे. कारण हे वॉटर रेझिस्टंट आहेत, तसेच ह्याला वाळवी सुद्धा लागत नाही आणि मार्बलसारखे दिसते.

 

nivedha engineering 5 inmarathi

हे ही वाचा – ऋषी की वैज्ञानिक? हे प्राचीन हिंदू ऋषी मुळात शास्त्र संशोधन करणारे वैज्ञानिक होते!

ह्या मशीनची किंमत नऊ लाखांपासून सुरु होते. आणि मशीनच्या क्षमतेवर ह्या मशीनची किंमत ठरते.

“सोसायट्या हे युनिट त्यांच्या भागात बसवून बायोगॅस तयार करू शकतात, खत त्यांच्या बागेसाठी वापरू शकतात किंवा विकू शकतात आणि जो नॉन बायोडिग्रेडेबल कचरा आहे तो आम्हाला विकून पैसे सुद्धा कमावू शकतात,”

असे निवेधा म्हणते.

त्यांचा पहिला मोठा प्रोजेक्ट हा अदानी पोर्ट, मुंद्रा, गुजरात येथे सुरु झाला आहे. सुरुवातीला त्यांना काही तांत्रिक अडचणी आल्या. पण त्यांच्या क्लाएंटच्या सहकार्याने त्यांचे काम आता सुरळीत सुरु झाले आहे.

आता त्यांचे पुढचे मोठे प्रोजेक्ट म्हणजे एयरपोर्ट ऑथरिटी ऑफ इंडिया बरोबर काम करणे हे आहे. सुरुवातीला चेन्नईच्या विमानतळावर जो कचरा तयार होतो, त्याचे वर्गीकरण आणि रिसायकलिंग ट्रॅशकॉन द्वारे करण्यात येईल. ह्या प्रोजेक्टची अंमलबजावणी पुढील काही महिन्यांत होणार आहे.

निवेधा म्हणजे की,

“हे मशीन तयार झाल्यावर मला ह्यासाठी समाधान वाटले की आता कचरा गोळा करणाऱ्या महिलांवर कचऱ्यात हात घालून त्याचे वर्गीकरण करण्याची वेळ येणार नाही. आता त्या मानाने फक्त ह्या मशीनच्या सुपरवायझर्स म्हणून काम करतील.”

असे हे मशीन सगळीकडे बसवले गेले आणि त्याचा व्यवस्थितपणे उपयोग केला गेला तर भारतातल्या घाणीची, अस्वच्छतेची आणि कचऱ्याची समस्या फार मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होईल.

आणि आपल्या स्वप्नातला स्वच्छ भारत खरंच सत्यात उतरेल. निवेधा आणि तिच्या संपूर्ण टीमला मोठ्ठा सॅल्यूट!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?