' राजू शेट्टींच्या पराभवाचं विश्लेषण करणारा हा लेख खूप व्हायरल होतोय!

राजू शेट्टींच्या पराभवाचं विश्लेषण करणारा हा लेख खूप व्हायरल होतोय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

कोल्हापूरच्या हातकणंगले मतदार संघाचा लोकसभा निवडणुकीचा निकालाची आज सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्या मागचं कारण ही तसं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी पराभव केला असून हा निकाल अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. 

राजू शेट्टी दीर्घकाळ ह्या मतदारसंघाचे खासदार राहिले होते. शेतकरी वर्गात त्यांच्या विषयी कमालीची आस्था होती. त्यामुळेच त्यांचा झालेला पराभव हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरतो आहे.

 

raju shetty inmarathi
eSakal

राजू शेट्टींच्या ह्या पराभवाची समीक्षा करणारी हि पंकज पाटील यांनी लिहलेली फेसबुक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

===

जाती साठी, माती साठीत

“राजु शेट्टी यांनी आपली ‘शेतकरी’ ही जात सोडली नसती तर कदाचित ते पराभूत झाले नसते आणि झाले असते तरी पराभवाचे एवढे दुख झाले नसते. राज्यभरात शेतकरी आमचा नेता लढला म्हणुन खांद्यावर घेऊन नाचले असते”.

 

raju shetty 1 inmarathi
ABP Majha – ABP Live

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांच्या पराभवानंतर या पराभवाचे विश्लेषण करतांना वंचीत आघाडीने घेतलेली (खाल्लेली)मते याच्या बरोबरीने ते या निवडणुकीत त्यांच्या जातीचा मुद्दा महत्त्वाचा ठरल्याची चर्चा माध्यमे व जनतेत मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहे.

अनेकांनी माध्यमामधुन लेख लिहुन या विषयाला वाट करुन दिली आहे .या लेखात राजु शेट्टी यांना मराठा समाजाच्या शेतकऱ्यांनी मतदान केले नाही म्हणुन शेट्टी हरल्याचे म्हणले आहे. या लेखामुळे मुळे चळवळी व जातीवाद हा विषय ऐरणीवर आला आहे.

मुळात राजु शेट्टी नी शेतकरी चळवळ सुरु केल्यापासुनच सगळ्या शेतकऱ्यांना राजु शेट्टी ची जात माहिती होती तरी सुध्दा शेतकरी राजु शेट्टी वर प्रचंड प्रेम करतात.

राजु शेट्टी या नावातच त्यांची जात महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या जातीपेक्षा वेगळी आहे हे ‘शेट्टी ‘नाव उच्चारल्या पासुन कळते. मग याच शेतकऱ्यांनी शेट्टींना सुरुवातीपासून म्हणजे जिल्हा परीषद पासुन जात न पाहता शेतकऱ्यांचा आवाज म्हणुन निवडुन दिले होते.

एकदा आमदार दोनदा खासदार ही शेतकऱ्यांनी जात न पाहता केले एवढेच नाही तर राजु शेट्टी यांच्या ईशाऱ्यावर लाखो शेतकरी जात पात न पाहता रस्त्यावर उतरले नेत्याच्या शब्दाखातर जीव ही दिले.

शेतकरी चळवळीत कधीही जात पाहिली जात नाही राज्यभरात राजु शेट्टींना मानणाऱ्या कार्यकर्त्यात बहुतांश कार्यकर्ते हे जातीने मराठा आहेत.

राजु शेट्टी हे शेतकरी चळवळीतील राजकीय सजग नेतृत्व आहे.

२००४ साली शरद जोशी पासुन वेगळे होतांना भाजपासारख्या जातीयवादी पक्षासोबत जाणार नाही, अशी पुरोगामी भुमिका घेऊन त्यांनी स्वाभीमानी शेतकरी संघटना स्थापन करुन वेगळी चुल मांडली.

पण त्याला भाजपाच्या विरोधापेक्षा स्थानिक राजकारणाची जोड जास्त होती.

त्या विधानसभा निवडणुकीत राजु शेट्टी स्वतःच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ताकदीवर निवडुण आले.पाच वर्षात शेतकरी प्रश्नावर रान उठवुन चांगले संघटन बांधले.

ऊसदरावर घेतलेल्या आक्रमक भुमिकेमुळे कोल्हापुर ,सांगली,सोलापुर या पट्ट्यात प्रचंड लोकप्रियता लाभली.

२००८ च्या सुमारास शेतकरी संघटनेत झालेल्या वादामुळे सदाभाऊ खोत सारखा राज्यभर शेतकऱ्यांना परिचीत चेहरा त्यांना सहकारी म्हणुन लाभला. तीन जिल्ह्यापुरती मर्यादित स्वाभिमानी सदाभाऊ राज्यभर घेऊन गेले.

 

sadabhau khot inmarathi
India’s Fastest Hindi News portal

सदाभाऊ सोबत रविकांत तुपकर सारखा आक्रमक युवा कार्यकर्ता राजु शेट्टींना मिळाल्यामुळे विदर्भ मराठवाड्यात मराठा शेतकऱ्यांच्या भरवशावरच स्वाभिमानी चांगलेच बाळसे धरु लागली होती.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत हातकंणगलेत सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांनी राजु शेट्टींना भरभरुन मतदान दिले व ते खासदार झाले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मातब्बर नेत्या विरुद्ध सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आपला प्रतिनिधी लोकसभेत पाठवला .

२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांचा साठलेला प्रचंड असंतोष सोबत हवा म्हणुन गोपीनाथ मुंडे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेतले.

भाजपाच्या जातीयवादामुळे शरद जोशींची साथ सोडणारे राजु शेट्टी एका रात्रीत भाजपामय झाले व नरेंद्र मोदीचा जयजयकार करु लागले. या निवडणुकीत ही राजु शेट्टी चांगले मतदान घेऊन खासदार झाले.

 

sharad joshi inmarathi
Loksatta

देशात व राज्यात भाजपा सरकार आले. राजु शेट्टींना असे वाटले की राज्याचे व देशाचे कृषी धोरण ठरवतांना त्यांना प्राधान्य मिळेल, पण तसे न होता कृषी धोरण किसान संघ ठरवु लागला.

त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊंना आमदार व मंत्री केल्यानंतर जिल्ह्यात शिष्टाचाराचा मोठा प्रश्न उभा राहु लागला, शिष्टाचारात खासदारापेक्षा मंत्री भारी पडु लागला.

मंत्र्याच्या घरादारात कार्यकर्ते रतीब घालु लागले व नाही म्हणले तरी भाजपा सरकारने शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी केले.

एफआरपीचा कायदा कठोर राबवुन ऊस दराचा प्रश्न सौम्य केला. हमीभाव,सरकारी खरेदी,शेतकऱ्यांना मदत अशा अनेक गोष्टीमुळे शेतकऱ्यांचा प्रश्न सौम्य करण्यात सरकार यशस्वी झाले .

या सगळ्या भानगडीत आपले महत्व संपुण जात असल्याचे वेळीच लक्षात आल्याने राजु शेट्टी यांनी सरकारशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला व आत्मक्लेश यात्रा सुरु केली आणि चळवळीचे राजकारण सुरु झाले.

 

puntamaba inmarathi
IndiaToday

राज्य सरकारने मे महिन्यात काढलेल्या शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेवरुन जनतेचे लक्ष पुणतांबा आंदोलनावर वळवले व पुणतांबा आंदोलन रातोरात राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचले.

शेती प्रश्नाचा फारसा संबध नसलेले कार्यकर्ते सरकारने रातोरात राज्यस्तरीय शेतकरी नेते झाले. रातोरातच हे आंदोलन संपवुन टाकले.

राज्यातील शेतकरी नेतृत्वाचा राजु शेट्टीचा एकाधिकार संपवुन सुकाणु समितीच्या नावाने शेकड्याने शेतकरी नेते तयार करण्यात सरकार यशस्वी झाले. शेट्टी चा एकाधिकार संपल्याबरोबर शेती संबधी अनेक प्रश्न लटकवण्यात सरकार यशस्वी झाले.

ऊस दर ,दुध दर ,कर्जमाफी अनेक स्थानिक प्रश्न घेऊन छोट्या छोट्या संघटनांनी आपले सवते सुभे मांडले.

नाशिक मधुन रेशनकार्ड, निराधारांच्या पगारी,सरकारी गायरान व वनजमिनी मागणाऱ्या दहा हजार शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईवर धडकवुन शेतकरी चळवळीचा केंद्रबिंदु वळवण्यात सरकार यशस्वी झाले.

कधीकाळी शेतकरी चळवळीचे अर्ध्वयु राहिलेले पाशा पटेल,सदाभाऊ खोत,लक्ष्मण वडले हे सरकारचे प्रतिनिधी म्हणुन शेतकऱ्यांसमोर येऊ लागले शेतकऱ्यांची सरकारवरची नाराजी कमी होऊ लागली.

 

Pasha-Patel inmarathi
tezsamachar.com

नियमण मुक्ती ,दिडपट हमी भाव ,पिकविमा,सरकारी योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत,एफआरपीचा कायदा, साखर कारखान्यावर आरआरसी, दुधाचे अनुदान अशा अनेक गोष्टीमुळे शेतकरी रस्त्यावर उतरेनासे झाले.

चार दोन कार्यकर्ते रस्त्यावर येऊन प्रतिकात्मक आंदोलन करण्यापुरत्या शेतकरी संघटना मर्यादित झाल्या. सर्वच शेतकरी नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने ओढुन ताणुन आंदोलनांचा प्रयत्न करण्यात आला पण तोही यशस्वी झाला नाही .

२०१९ च्या निवडणुकांसाठी भाजपा विरुध्द सर्व अशी व्युहरचना सुरु झाली यात राजु शेट्टी यांनी जानकर, मेटे,आठवले या युती मधल्या जुन्या सहकाऱ्यासह मोदीविरोधात जाण्यासाठी बोलणी सुरु केली पण युतीतल्या सहकाऱ्यांनी युती सोडण्यास नकार दिला.

नंतर आंबेडकर यांची वंचीत आघाडी ही चाचपुन पाहिली पण निवडणुकीचे गणित जमत नाही असे दिसल्यावर मोदीचा विरोध म्हणुन शेवटी नाईलाजाने आघाडीकडे पावले वळवली व फारसे आढेवेढे न घेता या आघाडीत सामील झाले .

सुरवातील हातकणंगले , वर्धा, बुलढाणा या जागासाठी आग्रही असणारे शेट्टी हातकणंगले वर समाधानी झाले एक वर एक फ्री प्रमाणे सांगलीची जागा न मागता मिळाली.

तिकीट मिळेल या आशेने स्वाभीमानी सोबत आलेले सुबोध मोहिते व अनेक वर्ष स्वाभीमानीसाठी लढणारे रवीकांत तुपकर नेत्याच्या प्रेमापोटी बलीदान देऊन मोकळे झाले.

ज्या साखर कारखानदारांनी लाठ्या काठ्या हाणल्या ,जीवघेणे हल्ले केले ,ज्यांच्या विरुध्द स्वाभीमानीचा लढा होता त्या साखरकारखानदारांच्या गाडीत राजु शेट्टी दिसु लागले.

ज्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी आपले तारुण्य जाळले अशा नेत्यांच्या दारात उभे टाकावे लागु लागले .वीस वर्षे ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्या घरी जातांना शेतकरी अडखळु लागले.

राजु शेट्टीच्या आघाडीला पाठिंबा देण्याच्या निर्णयाचा विरोध ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य व मराठवाड्यातील ऊस आंदोलनाचे शिलेदार प्रल्हाद इंगोले यांनी राजीनामा देऊन केले.

नांदेड मतदार संघातील आघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या कारखान्याकडे शेतकऱ्यांची कोट्यवधी रु थकबाकी वसुल झाल्या शिवाय त्यांना पाठिंबा देणार नसल्याचे सांगुन त्यांनी स्वाभीमानीच्या पदांचा राजीनामा दिला .

राजु शेट्टी नी बुलढाणा व वर्धा या जागा मागितल्या पण आघाडीने त्या न देता सांगलीची जागा न मागता दिली. सांगलीला स्वाभीमानी कडे उमेदवार नसल्याने ती जागा वसंतदादा चे वारस विशाल पाटील या कारखानदाराला दिली.

वसंतदादा कारखान्याकडे शेतकऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे कोट्यवधी रु बाकी होती. ही बाकी देण्यासाठी वसंतदादा साखर कारखाना चालवणाऱ्या कंपनीने शेतकऱ्यांच्या ऊसबिला पोटी दिलेले दिड कोटी रु थकवले.

 

swabhimani shetkari sanghtana inmarathi
DNA India

ज्या ऊसाच्या घामाच्या दामासाठी स्वाभीमानी कारखानदारा विरुध्द पंधरा वर्षे लढली तीच स्वाभीमानी बुडव्या कारखानदारांचे झेंडे घेऊन प्रचार करतांना पाहुन शेतकरी स्वाभीमानी पासुन दुर झाले असावेत.

राजु शेट्टीच्या निवडणुकीसाठी तत्वाच्या तिलांजलीचा शेतकऱ्यांनी निषेध करत त्यांना मतदान नाकारले व राजु शेट्टीचा शहाण्णव हजारापेक्षा जास्त मताने पराभव झाला.

यात शेतकऱ्यांनी राजु शेट्टी ची जात पाहिली नाही तर राजु शेट्टीनी आपली शेतकरी ही जात सोडल्यामुळे राजु शेट्टी वर पराभवाची वेळ आली.

दुसरीकडे शेतकरी चळवळीचे दुसरे नेते माजी आमदार वामनराव चटप यांना ही आघाडीकडुन चंद्रपुरच्या जागेसाठी निमंत्रण आले २०१४ च्या निवडणुकीत चटप यांनी काँग्रेसच्या उमेदवाराईतकेच मतदान घेतले होते.

काँग्रेस कडे सक्षम उमेदवार नव्हता जातीच्या मताचे गणित चटप यांच्या बाजुने होते आघाडीने निवडणुकीसाठी लागणारा सगळा खर्च उचलण्याची हमी घेतली एवढे सगळे म्हणल्यावर कुठलाही राजकारणी या निमंत्रणाला नाकारुच शकत नव्हता.

पण वामनराव चटपांनी निमंत्रकांना निक्षुन सांगितले चाळीस वर्षे काँग्रेसच्या विरोधात लढलो आता काँग्रेसचा झेंडा खाद्यावर घेऊ शकत नाही. सत्तेसाठी तडजोडीचे राजकारण नको.

भाजपाचे निमंत्रण ही तेवढ्याच तडफदार पणे नाकारुन पदापेक्षा तत्व महत्त्वाचे असल्याचे दाखवुन दिले.

तत्वासाठी खासदारकी कि खासदारकी साठी तत्व हा प्रश्न राजु शेट्टी पुढे ही उभा राहीला होता पण खासदारकी साठी तत्व सोडल्यानेच राजु शेट्टी यांना पराभव पत्कारावा लागला.

 

raju shetty 2 inmarathi
Livemint

राजु शेट्टी यांनी आपली शेतकरी ही जात सोडली नसती तर कदाचित ते पराभूत झाले नसते आणि झाले असते तरी पराभवाचे एवढे दुख झाले नसते. राज्यभरात शेतकरी आमचा नेता लढला म्हणुन खांद्यावर घेऊन नाचले असते.

तुम्ही तुमची जात सोडली कृपया शेतकऱ्याची जात काढु नका.

सुधीर बिंदू
शेतकरी संघटना
सोनपेठ

===

अश्या प्रकारे, या दीर्घ पोस्टच्या माध्यामातून राजू शेट्टी यांच्या पराभवाची विस्तीर्ण उकल करण्यात आली आहे. आता प्रश्न उपस्थित होतो आहे कि शेतकाऱ्यांचा आवाज असलेला नेता म्हणून प्रसिद्ध असलेले व दीर्घ संघर्षातून वर आलेले राजू शेट्टी या पराभवातून काही शिकतात की नाही.

तसेच पुन्ह्या नव्या दमाने ताकदीने शेतकरी प्रश्न घेऊन संघर्ष करतात कि नाही, हे बघण्यासारखं असणार आहे..

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?