' पत्रकार विचारवंतांच्या अंदाजांच्या इतके विपरीत निकाल का लागले? वाचा अभ्यासपूर्ण विवेचन – InMarathi

पत्रकार विचारवंतांच्या अंदाजांच्या इतके विपरीत निकाल का लागले? वाचा अभ्यासपूर्ण विवेचन

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आज २०१९ च्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. २०१४ च्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये कुठलीही घट होण्या ऐवजी त्यात वाढच झाली आहे.

यामुळे मोदी आणि भाजपावर लोकांचा विश्वास कायमच नसून तो वाढल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर कॉंग्रेस पक्षाची देशभरात वाताहत झाली आहे.

पाच वर्षाच्या कालावधीत भाजपावर कॉंग्रेसने अनेक गंभीर आरोप केले, राहुल गांधींच्या नेतृत्वात कॉंग्रेसने तीन राज्यात सत्ता मिळवली असून देखील केवळ सहा महिन्यांच्या कालावधीत असं काय घडलं कि देशाने पुन्हा मोदींच्या बाजूने कौल दिला आहे?

 

Congress-President-Rahul-Gandhi-3-770x433-removebg

पाच वर्षात सरकार विरोधी वातावरण निर्माण करण्यात विरोधी पक्ष कमी पडलेत का ? विरोधक जनतेच्या प्रश्नांना समजून घेऊ शकले नाहीत का ?

कॉंग्रेस व विरोधी पक्ष कुठे चुकले याचं विश्लेषण करणारी फेसबुक पोस्ट  शीतल पाटील श्रीगिरी यांनी लिहली आहे.

===

निवडणुकीत मतदान करताना सामान्य मतदार सहसा दगडापेक्षा वीट मऊ हा न्याय लावत असतो. विकासाच्या बाबतीत निदान पहिल्या टर्ममध्ये लोक फार आक्रमक नसतात; सरकारी यंत्रणेत बदल हळूहळू होतात हे त्यांना मान्य असते.

२५ -३०  टक्के कामे झाली तरी लोक सहन करतात. राज्यकर्त्यांचे हेतू चांगले आहेत, दिशा योग्य आहे असे वाटले तरी पुरते.

अशावेळी एखादा मोठा गैरव्यवहार झाला नसेल, जनमानस अगदीच बिथरेल असे विवादास्पद, देशाला हानिकारक आहेत असे वाटणारे निर्णय घेतले नसतील, विरोध करणाऱ्यांची विश्वासार्हता कमी असेल, तर TINA फॅक्टर बऱ्यापैकी काम करतो.

 

congress bjp_inmarathi
NewsClick

काँग्रेस बरीच वर्षे सत्तेत होती, तेव्हाही सगळ्या मुद्द्यांवर सगळे कायम संतुष्ट असायचे असे नव्हे, पण देशहिताच्या दृष्टीने काँग्रेस हा सगळ्यात चांगला विकल्प आहे असे लोकांना वाटायचे. ती जागा आता नरेंद्र मोदींच्या भाजपाने घेतली आहे.

सतत व्यक्तिगत टीका करणे हा एक आत्मघातकी सापळा ठरतो; विशेषतः जेव्हा टीका करणाऱ्याचे स्वतःचे रेकॉर्ड फार चांगले नसते.

भाजप आणि मोदींबद्दल काठावर सहानुभूती असलेले मतदार त्यांच्यावर अविरत सुरू असलेल्या व्यक्तिगत टीकेमुळे उलट ठामपणे त्यांच्या बाजूला गेले.

स्वतःचा जाहीरनामा थोडा आधी जाहीर करून काँग्रेसने त्यातल्या विकासाधरित मुद्द्यांवर जास्त प्रचार करायला हवा होता.
तसे झाले नाही.

उलट सेडिशनचा मुद्दा स्पष्टपणे मांडता न आल्यामुळे बुमरँग झाला.

एअरस्ट्राईक्स च्या बाबतीतही भारतीय वायुसेनेच्या निवेदनावर विश्वास न ठेवता पुरावे मागण्याच्या अहमिकेमुळे सरकार नव्हे, तर विरोधी पक्षाच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण झाली.

सरकारविरोधी ते देशविरोधी अशी विरोधकांची प्रतिमा होत गेली.

 

opposition leader inmarathi
The Economist

बऱ्याच आघाड्यांवर सरकारची कामगिरी असमाधानकारक होती. पण सगळा प्रचार व्यक्तिगत ट्रोलिंगभोवती फिरत राहिला. राहुल गांधींनी मोदींना भ्रष्टाचारी म्हणणं, ही व्यूहनीती सफल होणं शक्य नव्हतं.

उलट मोदींनी स्वतःभोवती सगळा प्रचार फिरवत ठेवला, आणि त्यांचे व्हिकटीम कार्डही प्रभावी ठरले.

ट्रोलिंग करणारे इकडे मीम्स बनवून हसत होते, पण सामान्य मतदात्यांवर त्यांच्या सर्व विधानांचा, कृतीचा सकारात्मक परिणाम होत होता. विरोधी पक्षाकडे असा व्यक्तिगत करिष्मा असणारा कुठला नेता नव्हता; मोदींविरोध हे एकच कार्ड त्यांच्याकडे होते.

काँग्रेसचे शीर्ष नेतृत्व हा त्यांचा सगळ्यात मोठा drawback आहे.

दुसरं म्हणजे भाजपाकडे पक्षासाठी काम करणाऱ्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची फौज आहे. तर काँग्रेसचे शिलेदार मात्र पक्ष वापरून स्वतःचे वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक हितसंबंध जोपासण्यात गुंतलेले दिसतात.

 

dynasty politics inmarathi
Reuters UK

पुढे जाऊन भाजपाचेही काँग्रेसीकरण होईल, पण आज तरी त्यांच्याकडे प्रभावी संगठन आहे.

काँग्रेसचा तिसरा drawback आहे तो त्यांचा थिंक टॅन्क आणि मोदींचे एलिट, लिबरल, विचारवंत विरोधक. हस्तिदंती मनोऱ्यातले हे विचारवंत लोकांची नस पकडण्यात सातत्याने अपयशी ठरत आहेत.

जो आपल्या बाजूचा नाही तो मूर्ख, अंधभक्त, ही प्रचारनिती अतिशय हानिकारक ठरली आहे.

ज्यांची मतं मिळाल्याशिवाय निवडणूक जिंकणं शक्य नाही त्या मतदारांमधल्या बहुतांश लोकांना तुच्छ लेखण्याचे काम सर्व माध्यमांमधून अव्याहत सुरू होते.

वरून हे लोक अपेक्षा करत होते की जनतेने या संकुचित, कट्टर विचारांध, सतत द्वेषाने पछाडलेल्या लोकांना विचारवंत, लिबरल समजून यांनी सांगितलेल्या पक्षाला निवडून द्यावं.

 

shashi-tharoor-digvijay-singh-INMARATHI
Deccan Chronicle

सर्वसामान्य जनतेचे परसेप्शन सगळ्यात निर्णायक असते, आणि ते समजून घेऊनच राजकीय अजेंडा बनवावा लागतो.

लोकांना शहाणे, सजग करायचे असते, पण ते शांतपणे, चिकाटीने, मवाळ भाषेत, न चिडता, न हिणवता,… निवडणूक तोंडावर असताना मतदारांची अक्कल काढायची नसते.

इथल्या मोदीविरोधक/ काँग्रेसी IT सेलच्या प्रचाराने भाजपचा तोटा कमी, फायदा जास्त झाला.

पण आधीच खूप शहाणे असणाऱ्यांना हे व्यवहारिक शहाणपण येईल आणि ते आपली रणनीती बदलतील, ही शक्यता कमीच आहे.

ईव्हीएम चा मुद्दा मांडला गेला आणि पुढेही मांडला जाईल. यात गंमत अशी आहे की की बरेच शासकीय कर्मचारी/तंत्रज्ञ या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असतात आणि त्यांनी जवळून ही सिस्टम पाहिलेली असते.

प्रत्यक्ष संभाषणांमध्ये त्यांच्या म्हणण्यावर लोक जास्त विश्वास ठेवतात; आणि आजपर्यंत कुठल्या कर्मचारी, तंत्रज्ञ यांनी या प्रणालीवर संशय व्यक्त केलेला नाहीय, मग व्यक्तिगत आयुष्यात तो कुणाचाही समर्थक/विरोधक असो.

सशक्त विरोधी पक्ष ही सक्षम लोकशाहीसाठी अतिशय आवश्यक गोष्ट आहे; सध्याची झापडबंद काँग्रेस ते करू शकेल ही शक्यता कमी वाटत आहे.

 

CONGRESS LEADERS INMARATHI
Outlook India

आजच्या निकालानंतर ही सगळ्यात जास्त काळजी वाटण्यासारखी गोष्ट आहे.

देशाला डोळस, प्रासंगिक, सुज्ञ आणि सक्षम विरोधी पक्षाची सगळ्यात जास्त गरज भासणार आहे. जो ही जागा भरेल, तो २०२४ चा प्रबळ दावेदार असेल.

===

अश्याप्रकारे शीतल पाटील श्रीगिरी यांनी कॉंग्रेसच्या व इतर विरोधी पक्षांच्या पराभवाची केलेली कारण मीमांसा, खूप बोलकी असून या पराभवातून काँग्रेसजन काय शिकतात हे भविष्यच सांगेल.

परंतु एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस कसं कार्य करते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?