' ...आणि अमेरिकेने चित्तथरारक योजनेद्वारे क्यूबाच्या तावडीतून लहान मुलांना सोडविले!

…आणि अमेरिकेने चित्तथरारक योजनेद्वारे क्यूबाच्या तावडीतून लहान मुलांना सोडविले!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : शुभंकर सुशील अत्रे

===

लहानपणी पंचतंत्र वगैरे मधल्या बोधकथांची पात्रं असायची, तशीच ही दोन नावं आहेत… अंकल सॅम आणि पीटर पॅन!

 

Uncle-Sam-inmarathi
syracusenewtimes.com

 

यातला अंकल सॅम म्हणजेच ‘द युनाईटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’. असं म्हणतात, की १८६२ च्या अमेरिका-ब्रिटन युद्धात अमेरिकन सैन्याला बीफ पुरवणाऱ्या ‘सॅम्युएल विल्सन’ या व्यापाऱ्याने, ते बीफ घेऊन जाणाऱ्या खोक्यांवर ‘यु.एस.’ अशा शिक्का मारला होता,

ती सरकारी मालमत्ता आहे या भावनेने; आणि तेव्हापासून अमेरिकेचं नाव ‘अंकल सॅम’शी जोडलं गेलं. आता, यातला ‘पीटर पॅन’ म्हणजे या अंकलचा क्युबन पुतण्या!

१९५९ साली क्युबा मध्ये असलेल्या फुलहेन्सीओ बटीस्टाचं सरकार उलथवण्यात फिडेल कॅस्ट्रोला यश मिळालं आणि क्युबा मध्ये फिडेलचं कम्युनिस्ट सरकार स्थापन झालं.

 

fidel castro inmarathi
Sputnik International

 

या क्रांतीची सुरुवात फिडेलने १९५३ साली केली होती आणि १९५९ नंतर २००८ मध्ये आपला भाऊ राऊल याच्याकडे सत्ता सुपूर्द करेपर्यंत फिडेल क्युबाचा सत्ताधीश होता.

बटीस्टा हा मुळात अमेरिकेचा वरदहस्त असलेला सत्ताधीश होता, त्यामुळे त्याला पाडल्यावर फिडेलला निकडीची गरज भासली, ती म्हणजे ‘आपला’ विचार (अजेंडा, प्रोपोगंडा, इनडॉक्ट्रीनेशन…अनेक शब्द आहेत) लोकांमध्ये पसरवायची, रुजवायची, लादायची!

अर्थात, हे सगळं स्वाभाविकच होतं. पण त्यातूनच एक वेगळी घटना उत्पन्न झाली.

 

batista inmarathi
en.wikipedia.org

 

१९९९ साली लिहिलेल्या तिच्या पुस्तकात ‘यवोन कोंदे’ म्हणते, की १९६० साली क्युबाचा शिक्षणमंत्री म्हणाला होता,

“The teacher has an unavaoidable obligation to transmit revolutionary thinking to the students.”

याशिवाय, विद्यार्थ्यांना जबरदस्तीचे शस्त्रप्रशिक्षण, अमेरिकाविरोधी गाणी आणि घोषणा यांचा सराव, अशा गोष्टींचं बाळकडू क्युबामध्ये सर्रास दिलं जाऊ लागलं, असंही कोंदे लिहिते.

यावरून त्याकाळची एकूण परिस्थिती लक्षात यायला हरकत नाही. यामुळे, क्युबाच्या जनतेत चलबिचल सुरु झाली होती.

आपली मुले या ‘इंडॉक्ट्रीनेशन’चे बळी होऊ नयेत असं त्यांना वाटत होतं. सुरुवातीला ही भावना, ज्यांनी कॅस्ट्रो विरोधात लढा दिला होता, त्यांच्यात जास्त होती; आणि नंतर नंतर ती सगळीकडे पसरत गेली.

यातून तोडगा काढण्यासाठी अमेरिकन सरकार आणि ‘कॅथोलिक वेल्फेअर ब्युरो’ यांनी मिळून एक मोहीम आखली. तिचंच नाव, ऑपरेशन पीटर पॅन किंवा ऑपरेशन पेड्रो पॅन! या वेल्फेअर ब्युरोच्या फादर ब्रायन वॅल्शच्या मायामी मधल्या कचेरीत नोव्हेंबर, १९६० मध्ये एका मुलाला घेऊन एक क्युबन माणूस आला.

 

pedro pan inmarathi
Diocese of St. Augustine

 

त्या मुलाला त्याच्या पालकांनी अमेरिकेत पाठवलं होतं, पण तिथल्या नातलगांची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्याला तिथे ठेवणं शक्य नव्हतं, आणि कॅथोलिक ब्युरोकडे त्याची जबाबदारी घेण्याची मागणी केली गेली. त्या मुलाचं नाव होतं ‘पेड्रो’.

क्युबातून अमेरिकेत पाठवलं गेलेल्या पहिल्या हजर मुलांपैकी पेड्रो एक होता, त्यामुळे त्याचं नाव या ऑपरेशन ला दिलं गेलं.

कॅस्ट्रो सरकारच्या या प्रकारापासून क्युबन मुलांची सुटका करायला पुढे सरसावलेल्या अमेरिकेला, फक्त क्युबन पालकांची गाऱ्हाणी हेच कारण होतं, अशातला भाग नाही. कॅस्ट्रोच्या अमेरिकाविरोधी विचारांचं विष जागीच थांबवायची आयती संधी अमेरिकेला मिळत होती.

त्यामुळे १९६० ते १९६२ पर्यंत १४,००० च्या वर क्युबन मुलांना विमानांच्या फेऱ्यांनी क्युबातून ‘मायामी’त आणलं गेलं. त्या काळात क्युबामध्ये अमेरिकन एम्बसी नव्हती.

त्यामुळे या ऑपरेशनच्या अंतर्गत येणाऱ्या मुलांसाठी सरकारने खास व्हिसामुक्ती लागू केली. क्युबा मध्ये या ऑपरेशनला मदत करणाऱ्या लोकांचं एक जाळंही तयार झालं होतं.

 

pedro pan cuba 1 inmarathi
babalublog.com

 

१९६२ मधल्या ‘क्युबन मिसाईल क्रायसीस’मुळे (क्युबामध्ये रशियाने ठेवलेल्या अणुशक्ती मिसाईल्सवरून पेटलेला अमेरिका-सोव्हिएत युनियन मधला वाद) अमेरिका आणि क्युबामधलं दळणवळण बंद झालं, तेव्हा या ऑपरेशन पीटर पॅन ला पूर्णविराम मिळाला.

या मोहिमेमध्ये क्युबातून आणल्या गेलेल्या मुलांना ‘पीटर पॅन’ किंवा ‘पेड्रो पॅन’ म्हणतात. वर उल्लेखलेली यवोन कोंदे, हीही एक पीटर पॅन होती. या मुलांचे वय ४ ते १६, या दरम्यान होतं.

इतक्या लहान वयात आपल्या पालकांना सोडून दूर जावं लागलेल्या या मुलांनी आपापल्या परीने आपले अनुभव नोंदवून ठेवले आहेत. ज्यांचे नातेवाईक आधीपासून अमेरिकेत होते, त्यांना त्यांचे पालक अमेरिकेत येऊन पोहोचेपर्यंत तिथे जाऊन राहणं सुखकर होतं.

पण, अनेकांना ही सोय नव्हती. त्यातील काही जणांना कॅथोलिक चर्चच्या अनाथाश्रमांत पाठवलं गेलं, आणि काही जणांना दत्तकघरी.

अर्मांडो विझ्कायनो, एक पीटर पॅन, लिहितो की त्याला अमेरिकेत, या ऑपरेशनचा अध्वर्यू असलेल्या फादर वॅल्शसोबत ठेवलं गेलं आणि त्याचा सहवास सुखकर होता.

याउलट एलोईझा नावाची पीटर पॅन लिहिते की, न्यूयॉर्क मधल्या एका अनाथाश्रमात तिला आणि तिच्या बहिणीला पाठवलं गेलं; आणि दोन महिन्यांत एका घरात त्या दोघी दत्तक गेल्या. त्या घरात त्यांना भावनाशून्य वागणूक मिळाली.

 

pedro pan cuba 2 inmarathi
The Black Vault

 

मर्सिडीज डॅश म्हणते की, ती मायामीमध्ये ज्या कुटुंबासोबत राहत होती, ते श्रीमंत असूनही तिला आणि तिच्या मोठ्या बहिणीला पावडरचं दुध आणि टीनच्या डब्ब्यातलं प्रक्रिया केलेलं मांस खाऊ घालायचे, जे सरकार पुरवत होतं.

बहुतेक मुलांना काही कपडे आणि खेळणी यांशिवाय काही आणू दिलं गेलं नव्हतं. काहींचे पालक अमेरिकेत आले आणि ते कुटुंब अमेरिकेत राहू लागलं; तर, काहींना या ऑपरेशननंतर पालकांना बघताच आलं नाही.

२०१५ मध्ये जेव्हा अमेरिका-क्युबा संबंध शिथिल झाले, तेव्हा काही पीटर पॅन्सना आपल्या घरी, आपल्या मायदेशी परतायची ओढ लागली. तर काहींना त्यात रस उरला नाही. परंतु, या पीटर पन्सनी मिळून सन १९९१ मध्ये ‘ऑपरेशन पेड्रो पॅन ग्रूप, इंकॉर्पोरेटेड’ नावाची सेवाभावी संस्था उभारली.

क्युबामधल्या परिस्थितीतून आपल्या मुलांना वाचवण्यासाठी मनावर दगड ठेवून त्यांना अमेरिकेत पाठवणाऱ्या पालकांना, त्यांचं स्वागत करणाऱ्या देशाला, आणि या मोहिमेचे सूत्रधार असलेल्या फादर वॉल्शना धन्यवाद देण्यासाठी या संस्थेची उभारणी केली गेली.

अनाथ किंवा निराधार मुलांच्या मदतीसाठी प्रयत्न करणे; ‘क्युबन चिल्ड्रन्स ऑपरेशन’चा भाग असलेल्या लोकांना शोधून एकत्रित करणे; ऑपरेशन पेड्रो पॅनचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणे, असे हेतू या संस्थेचे होते आणि स्वतः फादर वॉल्श २००१ पर्यंत तिचे अध्यक्ष होते.

 

pedro pan cuba 3 inmarathi
Our Place in the World: A Journal of Ecosocialism

 

अशा प्रकारे राजकीय ‘इंजेक्शन’ पासून आपल्या मुलांना वाचवण्यासाठी अधीर झालेल्या पालकांच्या मागणीने आणि अमेरिकन सरकार व कॅथोलिक वेल्फेअर ब्युरोच्या पुढाकाराने एक प्रचंड मोठं ‘चिल्ड्रन्स एक्झोडस’ ऑपरेशन पीटर पॅनच्या रूपात जगाला पाहायला मिळालं.

संदर्भ:
१) https://news.nationalgeographic.com/2015/08/150814-cuba-operation-peter-pan-embassy-reopening-Castro/
२) https://insider.si.edu/2017/07/pedro-pan-childrens-exodus-cuba/
३) https://www.history.com/topics/cold-war/fidel-castro
४) https://www.history.com/topics/cold-war/cuban-missile-crisis
५) https://eguides.barry.edu/c.php?g=754119&p=5403148
६) http://www.pedropan.org/
७) https://www.britannica.com/topic/Uncle-Sam

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?