' ज्यूंची कत्तल करणाऱ्या नाझी खुन्याला इस्त्राईलने असे पकडून फासावर लटकवले होते – InMarathi

ज्यूंची कत्तल करणाऱ्या नाझी खुन्याला इस्त्राईलने असे पकडून फासावर लटकवले होते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आतापर्यंत दोन महायुद्धे झाली. प्रत्येक महायुद्धाने जगाला कधीही विस्मृतीत जाणार नाही असे काळे दिवस दिले. इतिहासाच्या पानावरील अमानुष क्रौर्याच्या काही नोंदी आजही सामान्य माणसाला अंतर्बाह्य हलवून टाकतात.

 

second world war inmarathi
The National

जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी शहरावरील अणुबॉम्बचा हल्ला आणि हिटलर या जर्मन हुकुमशहाने लाखो ज्यूंची केलेली कत्तल या घटना म्हणजे क्रौर्याची, दहशतीची परिसीमा होती. क्रूरकर्मा अशी हिटलरची ओळख याच युद्धामुळे झाली.

छळछावण्या, यातनाघरे हे शब्द त्याच्यामुळे अस्तित्वात जणू आले आहेत .

केवळ ज्यू असणे हा दोष असलेले लाखो ज्यू स्त्री, पुरुष, वृद्ध, महिला हिटलरच्या तिरस्काराचे बळी ठरले. त्यांचा अनन्वित छळ झाला.

जगण्याचीच दहशत निर्माण व्हावी इतके अत्याचार सहन केलेल्या त्या निरपराध माणसांच्या मनात हा छळ करणाराबद्दल चीड निर्माण झाली नाही तरच नवल.

 

adolf hitler inmarathi
History on the Net

पण द्वेष, तिरस्कार यांसारखीच पश्चात्ताप ही देखील एक स्वाभाविक भावना आहे. हातून रागाच्या भरात खून झाल्यावर पशात्ताप करणारे गुन्हेगार असतात.

प्रश्न पडतो, लाखो निरपराध लोकांच्या रक्ताने हात बरबटलेले असताना, या कत्तलीला जबाबदार असणाऱ्या हिटलरच्या टीममधील सहकाऱ्यांच्या काय भावना असतील ?

अॅडॉल्फ आईशमन हा एस एस संघटनेचा सदस्य, ज्याचा प्रत्यक्ष कत्तलीत सहभाग नसला तरी ज्यूंना यातनाघरापर्यंत पोहचवण्यात याचा सहभाग जास्त आहे.

युद्धसमाप्तीनंतर हा कोठे होता, कोणत्या रुपात होता, याचा कसा शोध घेण्यात आला नि खटला चालवून शिक्षा दिल्यानंतर त्याच्या काय भावना होत्या? चला तर पाहू या या प्रश्नांची उत्तरे.

 

adolf eichmann inmarathi
BBC

हिटलरच्या ज्यू द्वेष्टेपणाचे स्वरूप अधिकाधिक भीषण होत होते. त्यांची हकालपट्टी कायदेशीर ठरावी म्हणून त्याने स्वतःच्या सोयीनुसार कायदे बदलले. त्यांचे मतदानाचे हक्क काढून घेण्यात आले. त्यांना सरकारी नोकऱ्यातून बाद करण्यात आले.

ज्यू लोक देशाबाहेर पडल्यास त्यांचे जर्मन पासपोर्ट रद्द होतील असा कायदा करण्यात आला.

त्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक ठरवण्यात आले. नंतर त्यांना स्वतंत्र ज्यू राष्ट्रासाठी स्थलांतरित करण्यात येत आहे असे सांगून त्यांना जर्मनीच्या बाहेर काढले गेले.

देश ज्यू विरहित करणे हे जणू हिटलरचे अंतिम ध्येय ठरले, आणि ज्यूंच्या स्थलांतर करण्यात मुख्य भूमिका निभावली.

परदेशगमनाची कागदपत्रे तयार करणे हे खूप वेळखाऊ काम होते. आईशमनने ही कामे झपाट्याने उरकली. तो हिटलरप्रमाणे ज्यू द्वेष्टा नव्हता, तरीही या संहारात ज्यूंच्या स्थलांतराच्या नावाखाली त्यांना यातनाघरापर्यंत पोहचवण्याचे काम करताना त्याने चांगले वाईट याचा विधिनिषेध बाळगला नाही.

 

nazi inmarathi
Al Jazeera

आपले ज्यांनी काडीचेही नुकसान केले नाही अशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरताना त्याच्या सदसद्विवेकबुद्धीने त्याला हाक दिली नाही, कारण यात मिळणारा पैसा आणि पदोन्नती याचा त्याला मोह पडला होता.

श्रीमंत ज्यूंना त्यांच्या जीव वाचवण्याच्या बदल्यात अक्षरशः लुटले गेले.

धार्मिक उच्चपदस्थ व्यक्तींनी देखील आईशमनला सहकार्य करताना त्यांच्याकडे असलेले त्यांच्या भागातील ज्यूंचे नाव नि संपत्तीच्या माहितीसह पत्ते बिनबोभाट दिले, ज्यामुळे ज्यूंची रवानगी यातनाघरात करणे सोपे झाले. या आठवणी जे ज्यू युद्धानंतर बचावले त्यांच्या मन, मेंदूवर कोरल्या गेल्या.

इस्राएलचे तत्कालीन पंतप्रधान बेन गुरियन यांच्या एजंट्सनी १५ वर्षे आईशमनचा शोध घेतला. कित्येक वर्षे आईशमनच्या ठावठिकाण्याबद्दल वेगवेगळी माहिती मिळत गेली.

काहींना तो इजिप्तमध्ये दिसला, काहींना कुवैतमध्ये. त्याचे अस्तित्व हे एक रहस्य बनून राहिले होते.

 

ben gurion inmarathi
Matzav.com

अखेर ऑक्टोबरमध्ये इस्राएल रेडिओने खबर दिली की आईशमन कुवैतमध्ये तेलाच्या कंपनीत कर्मचारी म्हणून राहत होता. १४ वर्षे आपली ओळख लपवण्यात यशस्वी झालेला आईशमन अखेर नि अखेर २३ मे रोजी इस्राएलच्या सिक्युरिटी फोर्सच्या ताब्यात सापडला.

इस्राएल कोर्टात न्यायनिवाडा सुरु असताना आईशमनचे वर्णन ‘ राक्षस’, ‘ रक्ताची तहान असलेला विकृत’ असे केले गेले. ज्यूंच्या ६० लाखाहून अधिक बांधवांच्या कत्तलीस कारणीभूत ठरलेला त्यांचा अपराधी सापडला होता.

तो जर्मन असला तरी त्याचा खटला इस्राएलमध्ये चालवण्याच्या त्यांच्या निर्णयामागे कदाचित ज्यूंना त्यांच्या भूमीत ‘न्याय’ मिळवून देण्याची असावी.

खटला सुरु असताना एका धक्कादायक साक्षीने आईशमनच्या व्यक्तिमत्वातील काळे रंग अधिक गडद केले.

जोएल ब्रँड, तेव्हाचा ज्यू नेता होता. त्याने सांगितले की जर्मनीने हंगेरी ताब्यात घेतल्यानंतर हंगेरीमधील ज्यूंची सुटका करण्याच्या बदल्यात आईशमनने खूप मोठी लाच मागितली होती.

 

joel brand inmarathi
Holocaust Education & Archive Research Team

त्याने मागितलेली रक्कम उभी करण्यात जोएलला अपयश आले. तो वृत्तीने क्रूरकर्मा नव्हता तरी माणसाची लालसा त्याला किती विकृत बनवते याचे हे उदाहरण होते.

आईशमनला फाशीची शिक्षा होईल याची सर्वांना खात्री होती. तो ज्यूंचा अपराधी होता. ज्यूविरहीत देश या हिटलरच्या धोरणाला त्याने सक्रीय पाठींबा दिला होता.

लहान मुले, वृद्ध, स्त्रिया, पुरुष यांचा आधी छळ करून मग त्यांची कत्तल करणाऱ्या यंत्रणेचा भाग झाला होता.

त्यांनी या जगात राहायचे की नाही याचा निर्णय त्याने नि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला होता.

त्याचे पकडले जाणे हा कदाचित नियतीचा न्याय असेल. पण कित्येक वर्षे स्वताची ओळख लपवत स्वताचा जीव वाचवत तो अज्ञातवासात राहिला, त्या वर्षांनी त्याला जगण्याची किंमत समजावून दिली असावी.

 

adolf_eichmann_trial_inmarathi
SpecialOperations.com

त्या काळात त्याला आपण केलेले कृत्य किती अधम होते याची जाणीव करून दिली असावी. स्वतःच्या मरणाच्या दर्शनाने त्याला ज्यूंच्या मृत्युच्या भीतीच्या सहवेदनेची ओळख करून दिली असावी.

युद्धातल्या रक्तपाताने युद्धाची निरर्थकता लक्षात येऊन करुणेचे महात्म्य जाणलेल्या बुद्धाप्रमाणे त्याला साक्षात्कार झाला असावा. पण आपल्याला मृत्युदंड मिळणार आहे हे कळून देखील तो विचलित झाला नाही. त्याने आक्षेप दर्शवला नाही.

त्या काळात युद्धातील ज्यूंच्या हत्याकांडामुळे जर्मन तरुण पिढीमध्ये अपराधाची भावना होती. आपल्या मृत्यूमुळे न्याय दिला जाऊन ही भावना कमी होईल अशी त्याची धारणा होती. त्याने ती शिक्षा विनातक्रार स्वीकारली.

तिरस्कार, अत्याचार नि आक्रोशाने भरलेले एक पर्व संपले. उरल्या आठवणी!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?