' ‘शिवाजीचा मावळा मी, तुझा कौल हवाय कुणाला?’ वाचा ‘या’ योद्ध्याची शौर्यकथा – InMarathi

‘शिवाजीचा मावळा मी, तुझा कौल हवाय कुणाला?’ वाचा ‘या’ योद्ध्याची शौर्यकथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि सगळीकडे जणू स्वराज्याचे नवचैतन्य सळसळू लागले. पण म्हणतात ना चांगल्या गोष्टीला देखील विरोधक असतात त्याप्रमाणे अनेक वतनदारांचा शिवरायांच्या स्वराज्याला विरोध होता.

या साऱ्या मंडळींना शिवरायांनी स्वराज्याचे महत्त्व सांगितले. अनेक जण स्वराज्यात सामील झाले. तर अनेक जणांनी आपला विरोध कायम ठेवला. त्यापैकी एक होते जावळीचे मोरे घराणे… जे आदिलशाही दरबारी सरदार होते.

‘‘तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, जर उदईक येत असाल तर आजच या!’’ जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्‍या चंद्रराव मोर्‍यांनी शिवाजी महाराजांना डिवचले.

हा मग्रुरीचा जबाब ऐकून महाराज संतापले. मोर्‍यांना अखेरची संधी मिळावी म्हणून महाराजांनी एक पत्र मोर्‍यांना धाडलं ‘जावळी खाली करुन, हात रुमालांनी बांधून भेटीस येणे!’ पण चंद्रराव व हणमंतराव गुर्मीला आलेले, कारणच तसे होते.

कारण त्यांच्या ताब्यात होते जावळीचे खोरे! जावळी म्हणजे वाघाची जाळी. जावळीचे खोरे म्हणजे महाबिकट मुलुख. जावळीच्या खोर्‍यात उतरणे म्हणजे मृत्यूच्या खाईत उतरण्यासारखे होते.

==

हे ही वाचा : महाराजांच्या एका शब्दाखातर आपल्या प्राणांची बाजी लावणारे महावीर तानाजी!

==

jawali inmarathi

 

महाराजांचे कान्होजी जेधे, हैबतराव शिळीमकर, संभाजी कावजी कोंढाळकर, नांदलनाईक यांना तातडीचे हुकूम सुटले. निवडक धारकरी जावळीच्या कीर्र जंगलात घुसले. एकदम भयंकर कालवा उठला.

चर्तुबेट, जोर, शिवथर आणि खुद्द जावळीवर एकाचवेळी मराठ्यांचा छापा पडला. चंद्रराव, प्रतापराव, हणमंतराव आणि सगळी मोरे मंडळी धावली.

दोन्ही बाजूंकडून मराठेच आपापसात लढू लागले, पण स्वराज्यासाठी त्यांचा नाइलाज होता. संभाजी कावजी कोंढाळकरांनी हणमंतराव मोरे यांना ठार केले. प्रतापराव मोर्‍यांनी लपत छपत विजापूरचा रस्ता धरला.

खास चंद्रराव जावळी हातची जातेय हे पाहून रायरीकडे पळाले. पण जावळीच्या पूर्व बाजूने हत्यारांचा खणखणाट आणि आरोळ्याचा आवाज अजूनही येत होता.

राजेंनी विचारले काय आहे हा प्रकार..

”राजे चंद्ररावांचा एक सरदार आपल्या कोणालाच ऐकना झालाय, गेली ६ तास अखंड पट्टा फिरवतोय.. कोणालाच जवळ येऊ देइना. आत्तापर्यंत याने ५०-६० मावळे मारले आपले, आणि कित्येक जायबंद केले. एक एक दर्दी धारकरी कार्दळीसारखा कापून काढतोय तो.. मुरारपंत नाव त्याचे..”

राजे घोड्यावर स्वार होऊन घटनास्थळी दाखल झाले. मावळ्यांना थांबायचे आदेश दिले. मावळे थांबले पण मुरारपंत एवढे बेहोषीने लढत होते. पट्ट्यांची सुदर्शन चक्रासारखे वलये दिसत होती.

राजानी कणखर व तितक्याच ताकदीच्या आवाजाने आज्ञा केली…

“मुरारपंत थांबावे….”

==

हे ही वाचा : एका दिवसासाठी “शिवाजी महाराज” बनून अजरामर झालेला शिवबांचा मावळा…!

==

shivaji-maharaj-marathipizza

 

पंत थांबले …

राजे म्हणाले …”पंत ज्यांच्यासाठी लढत आहात ते गुप्त वाटेने पळून गेले. जावळीवर आता आमची हुकुमत आहे.”

पंत म्हणाले –

“असे तुम्ही समाजात असाल, पण हा मुरार अजून जिवंत आहे.. स्वामिनिष्ठा मेलेली नाही.”

राजे उद्गारले–

“पण हीच निष्ठा सत्कारणी लावा, पिढीजात जहागीराचे आम्ही पुत्र, बसून खाल्ले तरी ७ पिढ्या पुरून उरेल. पण आम्ही हा स्वराज्याचा डाव मांडलाय तो आमच्या रयतेसाठी..

३५० वर्षे गुलामगिरीत पिचत पडलेला हा महाराष्ट्र स्वतंत्र करून देव धर्माचे राज आणण्यासाठी आमचा हा खटाटोप आहे. यासाठी आमचा जीव गेला तरी आम्ही ते नशीब समजू.

तुमच्यासारखे निष्ठावंत धारकरी स्वराज्यात सामील झाले तर आई जगदंबेची कृपा समजू आम्ही… बघा विचार करून.

नाहीतर आम्ही तुमच्यावर जबरदस्ती नाही करणार. आपली योग्यता आम्ही ओळखतो. तुम्हास आम्ही उपद्रव करणार नाही. तुम्ही खुशाल इथून सहीसलामत जावू शकता.”

अश्याप्रकारे शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोर्यांच्या तुर्यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते ‘मुरारपंत’.

 

murarbaji inmarathi

 

मुरारबाजींची इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध घटना म्हणजे दिलेरखानाशी अखेरच्या श्वासापर्यंत दिलेला लढा. स्वराज्यावर औरंगजेबाचे सरदार मिर्झाराजे जयसिंह ह्यांच्या रूपात नवीन संकट घोंगावत होते.

मिर्झाराजांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले, त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते. या नामुष्कीची चाहूल लागताच महाराजांनी मिर्झाराजांसोबत बोलणी सुरू केली पण मिर्झाराजांनी महाराजांना दाद दिली नाही.

त्यानंतर मोगल सरदार दिलेरखानाने इ. स.१६६५ च्या आषाढात पुरंदरला वेढा घातला. दिलेरसारखा संतप्त सेनानी पुरंदर घेण्याची प्रतिज्ञा करून अक्षरश: अहोरात्र पुरंदरला धडका देत होता.

जेव्हा दिलेरखानाने पुरंदराला वेढा दिला तेव्हा त्याला पुरंदराचे अभेद्यपण लक्षात आले असावे आणि पुरंदर घ्यायचा असेल तर आधी वज्रगड ताब्यात येणे अतिशय आवश्यक आहे हे त्या मुत्सद्दी सेनानीने ओळखले नसेल तरच नवल.

दिलेरखानाने कपिलधारेच्या बाजुने वज्रगडावर तीन तोफा चढवण्यास सुरुवात केली.

वज्रगडाचे तत्कालिन किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभू आणि त्यांचे बंधू बाबाजी बुवाजी प्रभू यांनी अवघ्या तीनशे मावळ्यांच्या मदतीने दिलेरखानाला निकराची लढत दिली.

 

anglo maratha war inmarathi

 

१५ दिवस जिवाच्या आकांताने किल्ला झुंजवला, पण दिलेरखानांच्या तोफांच्या मार्‍यापुढे गडाचा वायव्य बुरूज ढासळला आणि गड दिलेरखानाच्या ताब्यात गेला. मुघलांच्या लांबपल्ल्याच्या तोफांपुढे पुरंदरची शक्ती असलेला वज्रगड पडला.

आता वेळ पुरंदरची! पुरंदराच्या अस्तित्वाला बसलेला हा सगळ्यात मोठा धक्का होता. पण मुरारबाजी याही अवस्थेत तो तडफेने लढवत होते.

१६ मे १६६५ या दिवशी मुरारबाजींच्या मनात एक धाडसी विचार आला. ते धाडस भयंकरच होते. गडावरून सुमारे सातशे योद्धे सोबत घेऊन उत्तरेच्या बाजूने एकदम मोगलांवर अन् खुद्द दिलेरखानवरच तुटून पडायचे असा हा विचार होता.

त्याला एक कारणही होते. एकाच वर्षापूर्वी सिंहगडाभोवती मोर्चे लावून बसलेल्या जसवंतसिंह या मोगली राजपूत सरदारावर सिंहगडच्या मराठी किल्लेदाराने अवघ्या काहीशे मावळ्यांच्यानिशी असाच भयंकर धाडसी हल्ला गडातून बाहेर पडून चढविला होता. तो पूर्ण यशस्वी झाला होता.

मार खाऊन जसवंतसिंह आणि मोगली फौज उधळली आणि पळून गेली होती. हे मुरारबाजींना माहीत होते. हीच कल्पना आताही वापरली तर?

नाहीतरी पुरंदर शेवटच्या घटका मोजतोय, कधीही मोगलांच्या ताब्यात जाऊ शकतो. प्रयत्न यशस्वी झाला तर इतिहास घडेल. मुरारबाजींनी एकदम दिलेरखानाच्याच रोखाने गडावरून खाली झेप घेतली. भयंकर कल्लोळ उडाला.

 

war-inmarathi

==

हे ही वाचा : महाराजांचे असेही शूर-वीर – येसाजी कंक नामक एक रांगडी हिंमत!

==

मुरारबाजीचे या आगीतील शौर्यतांडव पाहून खान त्याही स्थितीत विस्त्रित झाला. खुश झाला. त्याने मुरारवरील मोगली हल्ला स्वत:च हुकूम देऊन थांबविला. तो निथळता मुरार खानासमोर काही अंतरावर झुंजत होता. तो थांबला.

दिलेरखानाने त्याला मोठ्याने म्हटले ,

“एय बहाद्दूर , तुम्हारी बहादुरी देखकर मैं निहायत खुश हुँआ हूँ। तुम हमारे साथ चलो। हम तुम्हारी शान रखेंगे!”

हे ऐकून मुरारबाजी भयंकरच संतापले. हा खान मला फितुरी शिकवतोय. याचाच त्यांना भयंकर संताप आला. मुरारबाजीने त्याच संतापात जबाब दिला.

“मी शिवाजीराजाचा शिपाई. तुझा कौल घेतो की काय?”

आणि मुरारबाजी दिलेरच्या रोखाने तुटून पडले. पुन्हा युद्ध उसळले. मुरारबाजी आता आपल्याशीच लढायला येतोय हे पाहून खानाने धनुष्यबाण हाताशी घेतला.

धनुष्याचा दोर अगदी कानापर्यंत खेचून मुरारबाजीच्या कंठाचा वेध घेतला. बाण सोडून मुरार बाजीला ठारही केले. एक महान तेज सूर्यतेजात मिसळले गेले. हे तेज म्हणजेच महाराष्ट्र धर्माचे तेज.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?