' ढग असताना रडारला विमान शोधता येत नाही का? समजून घ्या वैज्ञानिक उत्तर – InMarathi

ढग असताना रडारला विमान शोधता येत नाही का? समजून घ्या वैज्ञानिक उत्तर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

लेखक – अनुप कुलकर्णी

===

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान म्हणाले, “ज्या दिवशी बालाकोट मध्ये एअरस्ट्राईक केली गेली त्या दिवशी तिथले वातावरण वाईट होते. आकाश ढगांनी भरले होते आणि पाऊसही सुरू होता. एक्स्पर्ट लोकांच्या मतानुसार एअरस्ट्राईकची तारीख बदलायला हवी होती. पण मी म्हणालो की, आकाशात ढग असतील तर आपली विमाने पाकिस्तानी रडार पासून वाचण्याची शक्यता वाढेल. आणि याच गोष्टीचा फायदा हल्ल्यासाठी होऊ शकतो.”

या विधानावर वादंग होणार नाही तरच नवल! ट्रोलर्सना आयते कोलीत मिळाल्यासारखे झाले. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर लोटला. सामान्य नागरिकांपासून नेते मंडळींपर्यंत सर्वांनीच यावर बऱ्या वाईट प्रतिक्रिया दिल्या. एकंदरीत हा विषय फारच गाजला आणि अजूनही गाजतोय.

आता आपल्याला प्रश्न पडतो की, पंतप्रधान बोलले ते चूक की बरोबर? खरंच ढगांमुळे रडारच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो का? की ढग, पाऊस वगैरे गोष्टी रडारच्या ‘व्हिजिबिलिटी’ वर फरक पाडू शकत नाहीत? नेमकं काय खरं?

मोदींच्या विधानात तथ्य आहे की नाही हे कळण्यासाठी रडार प्रणाली कशी चालते नि त्यावर कशा-कशाचा परिणाम होऊ शकतो हे समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे, आधी जाणून घेऊ की रडार म्हणजे काय आणि ते नेमके कसे काम करते.

रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग या शब्दांचे लघुरुप म्हणजे ‘रडार’.

हे ही वाचा –

===

 

radar inmarathi
bbc.co.uk

सूक्ष्मतरंगांचा वापर करून एखाद्या गतिमान वस्तूचा ठावठिकाणा शोधण्याचे काम रडारचे असते. याद्वारे विमान, स्पेसक्राफ्ट, मिसाईल्स, बोट किंवा कार सुद्धा शोधता येते. इतकंच नाही तर हवामानाची स्थिती सुद्धा यावरून कळते. रडारचा वापर प्रामुख्याने सुरक्षा यंत्रणांद्वारे केला जातो.

प्रत्येक देशाने आपापले रडार तैनात केले आहेत. यामुळे त्यांना स्वतःची लढाऊ विमाने तर दिसतातच पण आपल्या हद्दीत घुसणारी दुसऱ्या देशांची विमाने/मिसाईल सुद्धा कळतात.

म्हणजेच रडार हे देशाच्या सुरक्षेचे एक अविभाज्य अंग आहे असे म्हटले तरी चालेल.

आपण जेव्हा आपल्या डोळ्यांनी एखादी वस्तू पाहतो तेव्हा पाहण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर करत असतो. रात्रीच्या अंधारात टॉर्च वापरली जाते. आपण “पाहतो” म्हणजे नेमकं काय होत असतं? तर –

एखाद्या वस्तूवर पडणारा प्रकाश परावर्तित होऊन आपल्या डोळ्यात शिरतो आणि आपल्याला ती वस्तू ‘दिसते’.

रडार सुद्धा अगदी याच पद्धतीने काम करते! फक्त इथे प्रकाशाच्या जागी रेडिओ वेव्हज वापरल्या जातात. भल्या मोठ्या अँटिनातून या रेडिओ वेव्हज चहूकडे फेकल्या जातात. ज्या दिशेकडे एखादी वस्तू (अर्थातच, विमान, मिसाईल इ!) असेल, त्या वस्तूवर या वेव्ह्ज आदळून परत येतात. रिसिव्हर्स त्या वेव्ह्जना पकडून तिकडून वस्तू येत असल्याचा अंदाज बांधतात.

 

हेच तंत्र विमानांमधे देखील वापरलं जातं. एखादे विमान अंधारातून जात असेल तर त्याच्या वैमानिकाला आसपास दुसरे विमान आहे हे कसे दिसणार? अश्या वेळी रडार कामी येते. रडार द्वारे विशिष्ट रेंज मध्ये रेडिओ वेव्हज प्रसारित केल्या जातात. त्या वेव्हज एखाद्या वस्तूला धडकून परत आल्या की तिथे ती वस्तू आहे, याचा पत्ता लागतो.

आता यात सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो तरंगांच्या वेगाचा. जमिनीवर असणारे रडार आकाशात अँटेनाद्वारे प्रकाशाच्या वेगाने तरंग फेकत असते.

दुष्मन देशाचे फायटर विमान त्याच्या टप्प्यात आले तर त्या विमानाची गती आणि दिशा किती आहे याचा अंदाज परावर्तीत होऊन आलेल्या तरंगांवरून लावता येतो.

समजा, विमानाचा वेग रडारच्या वेव्हपेक्षा जास्त असेल तर त्याचा पत्ता लागणे शक्यच नाही.

तर रडार म्हणजे काय आणि त्याचे काम कसे चालते हे आपण पाहिले. आता येऊ मूळ मुद्द्याकडे. पंतप्रधान बोलले त्यात कितपत तथ्य आहे ते आपण तपासून पाहू या.

कसं आहे, हवामानामुळे मोबाईलची रेंज गेली किंवा टाटा स्कायचा सिग्नल गेला इथपर्यंत ठीक आहे. पण देशाची सुरक्षा ज्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते त्या रडारवर हवामान परिणाम करते का?

उत्तर आहे – होय! खराब हवामानाचा परिणाम रडारच्या कार्यक्षमतेवर होतो!

तापमान, आर्द्रता, पाणी आणि धूळ हे घटक रडारच्या कार्यामध्ये अडथळा आणू शकतात. यापैकी एक किंवा अनेक घटक एकत्र आल्यास नक्कीच रडार योग्य क्षमतेने काम करू शकत नाही.

जेव्हा रेडिओ वेव्हज गरम तापमानातून किंवा आर्द्र वातावरणातून प्रवास करतात तेव्हा त्या सरळ न जाता काही प्रमाणात वाकल्या जातात. त्याला ‘डक्टींग’ असे म्हटले जाते.

हे डक्टींग जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढे रिझल्ट्स चुकीचे येणार हे पक्के आहे.

हे ही वाचा –

===

 

semanticscholar.org

पाणी आणि धूळ यांचाही वाईट परिणाम रडार वर होतो. पाण्यातून किंवा धुळीतून वेव्हज जाताना त्यांची शक्ती शोषली जाते. त्याचा परिणाम म्हणून वेव्हज पूर्ण ताकदीने आपल्या टारगेटवर धडकून परत येऊ शकत नाहीत आणि रिझल्ट अर्थातच मिळत नाही.

रडारची रेंज जर कमी असेल तर कार्यक्षमता जास्त असते. परंतु खूप मोठ्या रेंजमध्ये काम करताना हवामानाचा निश्चितच मोठा परिणाम होत असतो. आणि विमान किंवा मिसाईल शोधण्याचे काम हे मोठ्याच रेंजमध्ये करावे लागते. हे सर्वच रडारना लागू आहे.

अर्थात, थोडेसे ढग जमा झाले – जरासं ढगाळ वातावरण आहे म्हणून रडार चं काम लगेच ढेपाळलं – असा अर्थ काढणं हास्यास्पद ठरेल. तेवढ्याने रडारच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही. पण मुसळधार पाऊस किंवा दाट धुकं असेल तर मात्र निश्चितच परिणाम होतो.

म्हणजेच, पंतप्रधान बोलले त्यात तथ्य आहेच. टेक्निकली, खराब वातावरणामुळे रडार पासून वाचण्यास मदत होतेच. परंतु त्या दिवशी खरंच किती मुसळधार पाऊस होता, धुकं जमलं होतं का या फॅक्टस बघून मग ठरवता येईल त्या दिवशीच्या वातावरणाचा आपल्याला खरोखर लाभ झाला की नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. |आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?