' “या” नोबेल विजेत्याने पत्नीला मृत्यूनंतर लिहिलेलं, नितळ-पारदर्शी पत्र – तरुणांनी यातून शिकायला हवं! – InMarathi

“या” नोबेल विजेत्याने पत्नीला मृत्यूनंतर लिहिलेलं, नितळ-पारदर्शी पत्र – तरुणांनी यातून शिकायला हवं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पत्र! पत्र संवादाचे उत्तम माध्यम तर आहेच, पण काहीजण या माध्यमाचा उपयोग इतक्या सुंदर रीतीने करतात की पत्र या प्रकाराला उत्तम साहित्यप्रकार म्हणायला काहीच हरकत नाही. अब्राहम लिंकन यांनी मुलाच्या शिक्षकाला लिहिलेले पत्र सर्वश्रुत आहे.

जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या मुलीला, इंदिराला तुरुंगातून लिहिलेली पत्रे देखील सुंदर आहे.

एरवी स्त्री द्वेष्टे, माणूसघाणे किंवा माणसांना टाळणारे म्हणून प्रसिद्ध असलेले जी.ए. कुलकर्णी देखील पत्रातून खूप बोलत. त्यांचा आणि पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांचा पत्रव्यवहार देखील’ प्रिय जी ए’ या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला आहे.

हे झाले बापलेक, शिक्षक-पालक किंवा दोन समवयस्क बुद्धिमान व्यक्तींमधील पत्रव्यवहाराबद्दल. पण पत्रातील एक आवडता पत्रप्रकार म्हणजे प्रेमपत्र. हा सर्वात प्रसिद्ध पत्रप्रकार.

 

love letter inmarathi
Dating & Relationships – LoveToKnow

समोर थेट प्रपोज करण्याची हिम्मत नसेल तर लव्ह लेटरचाच आधार. याचा एक फायदा म्हणजे समोर उभे राहून बोलायचे नसल्याने तत-पप होत नाही. भीतीने गांगरून गेल्याने कोणता मुद्दा बोलायचा राहून गेला ही हुरहूर राहत नाही.

मुक्त हस्ताने शब्दांची उधळण करत, प्रसंगी सौंदर्याचे वर्णन करताना अतिशयोक्तीचा वापर करत होकार मिळण्याची शक्यता अधिक असते. शिवाय सुरक्षिततेचा फायदा असतोच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

उगा भडकून पोरीने श्रीमुखात भडकावली तर? आपण त्या क्षणी समोर नसायला हवे. पत्राचा असा दुहेरी फायदा असतो, पत्रातील मजकूर आवडला तर होकार, नाही आवडला तर आपण समोर नसतोच तिच्या.

प्रेमपत्र प्रकाराची गंमत अशी की अशा वेळी लेखन प्रकारातले ओ की ठो कळत नसलेले देखील प्रेमपत्र लिहितात. काही ज्यांना लेखनाचे अंग आहे त्यांच्याकडून लिहून घेतात.

पण कसेही करून ‘मन की बात’ तिच्यापर्यंत पोहचवतात. काही पत्र फार सुंदर असतात. त्यात तिच्या रूपाचे कौतुक असतेच, पण आश्वासन देखील असते सोबतीचे. काही पत्रातून नात्यातील कोवळीक, हळूवारपणा, विश्वास आणि गहिरेपणा जाणवत राहतो.

असेच एक फार सुरेख प्रेमपत्र आहे एका वैज्ञानिकाने आपल्या पत्नीस लिहिलेले.

 

loveletter-inmarathi

हो, प्रेमपत्र फक्त प्रेमिकेलाच, तेही लग्नापूर्वी लिहायचे हा काही नियम नाही. पत्र आपण त्याला लिहितो जो आपल्यापासून दूर असतो. मनाने नव्हे, तर शरीराने. पण या पत्राचे वैशिष्ट्य म्हणजे यातील ‘ती’ केवळ काही किलोमीटर्स अंतर दूर असलेल्या कोणत्या गावी गेलेली नाही तर जिथून परत येण्याची शक्यताच नाही अशा ठिकाणी गेली आहे.

ती आता त्याला नाकी डोळी, हाती पायी असे शरीर अस्तित्व दाखवत भेटण्याची सुतराम शक्यता नाही, कारण ती या जगातच नाही.

जगातच नसलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीला ती आपल्याबरोबर आहे कल्पून लिहिलेले हे पत्र म्हणजे त्यांच्यातील उत्तम सह्जीवनाचे, प्रेमाचे घडवलेले नितळ दर्शनच! होय, नितळ शब्द इथे अत्यंत अचूक ठरतो.

स्वच्छ पाण्यातून तळ दिसावा इतके सुंदर, निरोगी आणि दृढ त्यांचे नाते. तिचे नसणे त्याला छळत असणारच असे वाटावे इतके ते एकमेकात गुंतलेले आहेत.

पण गंमत म्हणजे तिच्या जिवंत असतानाचे असणे त्याच्यात इतके भिनले आहे की तो तिला पत्र लिहितो, सोळा महिन्यांनी…!

मन मारून, तडजोड म्हणून एकमेकांशी संसार करणारी कित्येक जोडपी पाहिलीत, पटत नाही म्हणून धाडकन घटस्फोटाचा निर्णय घेणारी देखील पाहिलीत..

या पार्श्वभूमीवर या दोघांचे हे एकरूप नाते इतके स्वच्छ, नितळ, पारदर्शी आहे की पत्र लिहिणारा तो, आणि जिला लिहिले पण आता अस्तित्वात नसलेली ती अशा दोघांच्याही प्रेमात पडायला होते.

रिचर्ड फिनमन त्याचे नाव. तो एक शास्त्रज्ञ! शास्त्रज्ञ असतात तसा विक्षिप्त, कोरडा, रुक्ष तो त्याच्या पत्रातून तर मुळीच जाणवत नाही. तो बायकोवर प्रचंड प्रेम करतो इतकेच जाणवत रहाते त्याच्या शब्दातून.

richard feyman inmarathi
Wikipedia

जिग सॉं चे तुकडे एकमेकात अचूकपणे बसावेत तसे त्यांचे नाते. त्यांना सोल मेट्स म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अर्लिनचे त्याच्या बुद्धिमत्तेवर प्रेम, तर त्याला ती तिच्या समजूतदार असण्याने आवडायची.

त्याच्या लक्षातही न आलेल्या किती तरी गोष्टी टी समजून घ्यायची, अगदी त्याचे लक्षात न येणे देखील. एकमेकांपासून दूर राहण्याचा प्रसंग आलाच तर ते पत्रातून संवाद साधत असत.

त्यांनी परस्परांना पुष्कळ पत्र लिहिली, पण तिच्या मृत्युच्या १६ महिन्यांनंतर त्याने तिला लिहिलेले पत्र म्हणजे त्याच्या आत्म्याने तिच्या आत्म्याशी साधलेला संवादच म्हणावे लागेल.

१७ ऑक्टोबर १९४६.

प्रिय अर्लिन,

खूप आवडतेस तू मला. माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर.

मला माहित आहे तुला हे ऐकायला किती आवडते. पण खरं सांगू? फक्त तुला ऐकायला, वाचायला आवडतं म्हणून नाही म्हणत मी हे. मी हे लिहितो कारण मी जेव्हा लिहितो की मला तू खूप आवडतेस, तेव्हा आतून, खूप आतून ते आवडण पसरत जातं माझ्यात… काहीतरी उष्ण, जिवंत झिरपत जावं तसं.

यावेळी खूप उशीर केला ना ग मी, तुला पत्र लिहायला? मागचं केव्हा लिहिलं होतं? बापरे.. जवळजवळ दोन वर्षे झाली. पण तू समजून घेशील.

तुला माहित आहे ना… मी किती हट्टी, किती वास्तववादी आहे. पत्र लिहिण्याला काही अर्थच नाही असे वाटत होते मला तेव्हा. पण आता मला कळून चुकलंय.. ज्या ज्या गोष्टी करायला उशीर झाला, नि होतोय त्या करण्याची हीच योग्य वेळ आहे.

मला तुला सांगायचंय की माझं प्रेम आहे तुझ्यावर… मला प्रेम करायचंय तुझ्यावर, आणि करेन कायम.

 

feynman arline inmarathi
Brain Pickings

तू जिवंत नसताना असं तुझ्यावर प्रेम करणं, याचा अर्थ काय असेल गं? अवघड जातंय मला हे समजून घेणं. पण मला ना अजूनही तुझी काळजी घ्यायची आहे. तुला आरामात ठेवायचे आहे. हे उलट तुझ्याकडून देखील हवे आहे.

म्हंजे तू सुद्धा माझावर प्रेम करायला हवं आहे मला. तू माझी काळजी घ्यायला देखील हवं आहे.

मला काही प्रॉब्लेम्स असावेत असे वाटते, म्हणजे तुझ्याबरोबर ते कसे सोडवायचे याची चर्चा करता येईल. तुझ्याबरोबर काही छोटे छोटे प्रोजेक्ट्स पण करायचे आहेत.

गंमत म्हणजे तू असेपर्यंत जाणवले नव्हते की आपण मिळून हे करू शकतो. काय करावं बर ?

ए, तुला आठवतं? आपण मिळून कपडे बनवायला शिकलो होतो, किंवा.. चायनीज शिकलो होतो. आता मी काही करू शकत नाही का? नाही. तुझ्याशिवाय एकटा आहे मी. आपण जे जे काही केलं, अगदी वेडी साहसे सुद्धा, त्यामागे कल्पना आणि प्रेरणा तुझीच होती.

तू आजारी होतीस तेव्हा किती काळजी करायचीस! तुला वाटायचं मला ज्याची गरज आहे ते तू देऊ शकत नाहीस, तुला द्यावे वाटत असूनही. खरं तर तुला अशी काळजी करण्याची काहीच गरज नव्हती.

मी सांगितलं नं तुला, तुझ्यावर इतकं, आणि इतक्या वेगळ्या प्रकारे प्रेम केलं मी. आता ते इतकं स्पष्टपणे खरं आहे…

मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर की मी दुसऱ्या कोणावर प्रेम करेन या शक्यतेच्या मार्गावर तूच उभी राहतेस आडवी. पण तू अशी आडवी यावीस हि माझीच इच्छा आहे. तू, इतर कोणाही जिवंत व्यक्तीपेक्षा अशी मृत, अशीच अधिक चांगली आहेस.

 

feynman_arline 1 inmarathi
Brain Pickings

मला माहित आहे… मल मूर्ख म्हणशील. तुला मला सुखी पाहायचं आहे आणि माझ्या सुखाच्या मार्गात यायचे नाही. मी पैज लावून सांगतो, तू गेल्याच्या दोन वर्षानंतरही मला एकही गर्लफ्रेंड नाही ( तुझ्या व्यतिरिक्त ) याचे तुला आश्चर्य वाटत आहे. पण याला काही इलाज नाही.

तू किंवा मी, कोणीच काही करू शकत नाही. खरं तर असे का हे मलाही समजले नाही. कारण पुष्कळ सुंदर मुली भेटल्या, आणि मला एकटेही राहायचे नाही, आणि तरीही, दोन तीन भेटीत त्या राखेसारख्या भासतात.

माझ्याजवळ उरते फक्त तू. तूच खरी आहेस. माझ्या प्रिय पत्नी, तू मला खूप खूप आवडतेस. माझे माझ्या बायकोवर प्रेम आहे, आणि ती या जगात नाही.

ताजा कलम –

हे पत्र पाठवले नाही म्हणून नाराज होऊ नकोस प्लीज, मला तुझा नवीन पत्ता ठाऊक नाही गं!

हे पत्र वाचताना राहून राहून ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी…. अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी’ हे गाणे आठवत होते.

असे एकमेकांवर खूप प्रेम करणारांच्या नशिबी विरह येऊ नये असे कितीही वाटले तरी शेवटी निसर्गनियम… कोणीतरी आधी साथ सोडणे अपरिहार्य असते.

पण या पत्रातील रिचर्ड गाण्यातील राजा सारखा अगतिक वाटत नाही, उलट त्याला तिचे प्रेम इतके भरभरून मिळाले आहे की त्या प्रेमात तो तिचे निराकार अस्तित्व शोधू शकतो, म्हणूनच तिच्याशिवाय असहाय्य, अगतिक न होता राहू शकतो.

दोघांच्या प्रेमाच्याच प्रेमात पडायला होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?