'या योध्याने तीन महिने चिवट झुंज दिली आणि वसईचं बंदर मराठ्यांच्या ताब्यात आलं!

या योध्याने तीन महिने चिवट झुंज दिली आणि वसईचं बंदर मराठ्यांच्या ताब्यात आलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

पहिल्या बाजीरावच्या काळात अनेक लढाया मराठ्यांनी जिंकल्या त्यापैकी एक म्हणजे वसईची लढाई.

चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या लढाईत मराठा सैन्याने नेत्रदीपक यश मिळवले.

५ मे १७३९ ला पोर्तुगीज सैन्य मराठ्यांसमोर शरण आले. या विजयाच्या स्मृती आपण जागवल्याच पाहिजे!

वास्को द गामा हा एक पोर्तुगीज खलाशी युरोप पासून भारतापर्यंत पहिल्यांदा समुद्रयात्रा करणारा आपल्याला चांगलाच परिचित आहे.

त्याने इ.स. १४९८ मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला आणि कालिकत बंदरात तो उतरला.

पोर्तुगीजांचा हा भारताशी आलेला पहिला संबंध इथेच थांबला नाही. लवकरच त्यांनी आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आणि १५०९ मध्ये ते पहिल्यांदा कोकणात आले.

१५३४ ला सुरतच्या सुलतानशी तह करून वसई येथे त्यांनी आपला मुख्य तळ बनवला.

वसईमध्ये मुख्य ठाणे असलेल्या पोर्तुगीजांची सत्ता रेवदंडा, कल्याण, ठाणे आणि मुंबईच्या सात बेटांपर्यंत पसरलेली होती.

तेथील किल्ला बळकट करत त्यांनी आपला कडक अंमल सुरु केला.

 

vasai fort inmarathi
TripSavvy

 

वसई हे आधीपासूनच व्यापारासाठी प्रसिद्ध होते. त्यामुळेच पोर्तुगीजांना तिथे आपली सत्ता असणे आवश्यक वाटत होते.

येथील बंदरातून पोर्तुगीज धान्ये, मासे, लाकूड, बांधकामाचे दगड आणि घोडे युरोपात निर्यात करीत. शिवाय जहाजबांधणी देखील होत असे.

इतकेच काय निसर्गाचं वरदान लाभलेल्या या प्रदेशात शेती देखील फायद्याचीच होती.

पोर्तुगीज सत्ता असलेल्या एकूण प्रदेशापैकी हा वसईचा प्रदेश सर्वाधिक उत्पन्न देत होता यावरूनच हा प्रदेश किती संपन्न होता हे वेगळे सांगायला नको.

पोर्तुगीज इथे सत्ता गाजवत होते. मात्र त्यांचे धर्माबद्दलचे असहिष्णू धोरण स्थानिकांच्या मनात भीती निर्माण करत होते.

पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात पोर्तुगीज सत्तेला वेसण घालणे गरजेचे असल्याचे अनेकदा प्रकर्षाने पुढे येत होते. मात्र समोर शत्रू देखील कमी नव्हते.

अशातच १७३७ मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा कोकणात उतरले. त्यांनी “ठाण्याचा कोट व आसपासचा परिसर” जिंकला.

मात्र त्यांना दुसऱ्या मोहिमेवर जाणे निकडीचे ठरली आणि ही मोहीम आटोपती घ्यावी लागली.

अखेर डिसेंबर १७३८ मध्ये चिमाजी अप्पा पुन्हा एकदा कोकणात उतरले आणि पोर्तुगीज सत्ताधीशांची पकड ढिली झाली ती कायमचीच.

या मोहिमेत चिमाजी अप्पांसोबत मातब्बर सरदारही सोबत होते त्यात मल्हारराव होळकर, राणोजीराव शिंदे, जानोजीराव, मानाजी आंग्रे,  गिरमाजी कानिटकर, नारो शंकर दाणी यांचा समावेश होता.

 

chimaji appa inmarathi
Wikipedia

 

पोर्तुगीज कागदपत्रांनुसार, चिमाजी आप्पांसोबत ४० हजार पायदळ, २५ हजार घोडदळ, ४००० सैनिक भूसुरुंग पेरण्यात प्रशिक्षित होते शिवाय तोफखाना, ५००० उंट आणि ५० हत्ती यांचाही समावेश होता.

पुढे साष्टीतून (सध्याचे ठाणे व आजूबाजूचा सहसष्ट गावांचा प्रदेश) देखील त्यांना रसद मिळाली.

एकूण १ लाख सैन्य पोर्तुगीजांसमोर उभं होतं. शत्रूने आपल्यासमोर काय संकट उभं आहे हे जाणून वांद्रे, वर्सोवा आणि डोंगरी हे प्रदेश आधीच रिकामे केले.

फक्त वसई, दीव, दमण आणि उरण राखण्याची त्यांची तयारी होती. मार्च महिन्यात मानाजी आंग्रे यांनी उरण देखील ताब्यात घेतले.

ठाणे आणि धारावी ताब्यात असण्याचा दुसरा अजून एक अर्थ होता की लहानशी होडी देखील वसईला मराठ्यांच्या नजरेला चुकवून जाऊ शकत नव्हती.

एप्रिल महिन्यापर्यंत पोर्तुगीजांच्या भोवती फास घट्ट आवळला गेला होता.

मात्र ही लढाई एकतर्फी मात्र अजिबात नव्हती. फेब्रुवारी मध्ये मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली.

ही अवाढव्य फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला.

मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी केली. वेढ्यासोबतच मराठ्यांनी किल्ल्यावर गनिमी काव्याने हल्ले चालू ठेवले.

अशाच एका हल्ल्यात पोर्तुगीजांचा सेनापती सिल्व्हेरा दि मेंझेस मृत्युमुखी पडला.

तरीही पोर्तुगीजांनी चिकाटीने लढा चालू ठेवला .मोहीम सुरु होऊन तब्बल तीन महिने लोटले होते मात्र वसईचा किल्ला अजून दाद देत नव्हता.

 

maratha portuguese inmarathi
Pinterest

 

पोर्तुगीजांकडे असणारा आधुनिक तोफखाना आणि बंदुकी व इतर शस्त्रास्त्र यामुळे त्यांचे चांगलेच फावले होते. शिवाय किल्ल्याची मजबूत तटबंदी भेदणे देखील सहज शक्य नव्हते.

शत्रूने प्रतिकार चालू ठेवला. यांत मराठ्यांचे बरेच नुकसान देखील परंतु मराठ्यांनी आपला वेढा सैल होऊ दिला नाही. 

मात्र १ मे रोजी मराठा सैन्याने प्रयत्नांची शर्थ केली आणि एका तटबंदीखाली सुरुंग पेरून एक प्रचंड बुरुज उडवला.

यादरम्यान अजून एक सुरुंग पेरला मात्र तो उडला नव्हता त्याचदरम्यान मराठे त्या पडलेल्या खिंडाराकडे धावले आणि सुरुंगही उडाला.

यांत अनेक मराठ्यांना प्राण गमवावे लागले. पुढे सलग तीन दिवस ही धुमश्चक्री सुरु होती.

तटबंदी भेदण्याचा मराठे प्रयत्न करत होते तर बुरुजावरून पोर्तुगीजांचा तोफखाना आग ओकत होता. बुरुजावरून जळके ओंडके सोडून देखील शत्रू प्रतिकार करत होता.

अखेरीस मराठा सैन्याने शर्थ करत सेंट सॅबेस्टियन हा बुरुज उडवला आणि मराठ्यांचा किल्ल्यात शिरण्याचा मार्ग मोकळा झाला.

अखेरीस ५ मे १७३९ ला संध्याकाळी शरण आले. पोर्तुगीज व्हॉइसरॉय पांढरे निशाण धरून चिमाजी आप्पांपुढे गेला.

आप्पांनी त्यांना जीवनदान दिले आणि सैन्य घेऊन किल्ला सोडण्यास सांगितले. एक आठवड्यानंतर पूर्णपणे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात येऊन वसईच्या किल्ल्यावर भगवे निशाण फडकले.

 

chimaji appa darbar inmarathi
Tate

 

वसईबरोबर लहान मोठे वीस किल्ले, साडेतीनशे गावे आणि मोठ्या प्रमाणावर दारुगोळा मराठा सैन्याला मिळाला.

अर्थात खरी कमाई म्हणजे बळजबरीने होणारे धर्मांतरण थांबले, प्रत्येकाला आपल्याला हवा तो धर्म पाळण्याची मुभा मिळाली.

अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला. मराठ्यांचे सैन्य आधुनिक पाश्चिमात्य सैन्यांशीही टक्कर घेऊ शकते, हे या लढाईने स्पष्ट झाले.

वसई ताब्यात आली तेव्हा बेसिन हे पोर्तुगीज नाव बदलून बाजीपूर असे त्याचे नामकरण करण्यात आले.

वसईच्या लढाईपूर्वी चिमाजी आप्पांनी पोर्तुगीज गव्हर्नर ला बळजबरीने धर्मांतरण न करण्याची ताकीद दिली होती.

त्याकडे दुर्लक्ष होते आहे असे पाहून चिमाजी आप्पांनी दम भरला होता की,

“जर तुमचे हे धर्मांतराचे प्रकार थांबले नाहीत, तर मराठे थेट किल्ल्यात घुसतील. मग तुमच्या चर्चच्या घंटानादाचे ध्वनी आमच्या मंदिरात वाजू लागतील.”

हे शब्द खरे ठरले. आज महाराष्ट्रात अनेक मंदिरात या घंटा बघायला मिळतात.

 

naroshankar temple inmarathi
Temple Advisor

 

नाशिकला असलेली प्रसिद्ध नारोशंकराची घंटा देखील पोर्तुगीजांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतिक आहे.

इतकेच काय नाशिक महापालिकेचे बोधचिन्ह म्हणून देखील ही घंटा विराजमान आहे.

इतिहासातील अनेक विजयी गाथांपैकी ही गाथा आपल्या स्मृतीत कायम राहील कारण या विजयाचे मोल तितकेच मोठे आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “या योध्याने तीन महिने चिवट झुंज दिली आणि वसईचं बंदर मराठ्यांच्या ताब्यात आलं!

  • September 16, 2019 at 10:34 am
    Permalink

    उत्तम माहिती व लेख

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?