' शहीद करकरे यांच्या मृत्यूबद्दल जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करणाऱ्यांचा अजेंडा काय? – InMarathi

शहीद करकरे यांच्या मृत्यूबद्दल जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करणाऱ्यांचा अजेंडा काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

गेल्या आठवड्यात जसा वेळ मिळेल तसा  २६/११ मुंबई हल्ल्यासंदर्भात श्री रमेश महाले (मुख्य तपास अधिकारी २६/११ मुंबई हल्ला) यांचे २६/११, कसाब आणि मी हे पुस्तक वाचून काढले.

यापूर्वी मी R.V.S. मणी (निवृत्त आय बी सहसचिव) यांचे द मिथ अॉफ हिंदू टेरर इनसायडर अॉफ मिनिस्ट्री अॉफ होम अफेअर्स २००६ ते २०१० वाचून काढले होते.

टू द लास्ट बुलेट हे हुतात्मा अशोक कामटे यांच्या पत्नी विनीता कामटे यांचे पुस्तकही वाचले होते…

आता मला शमसुद्दीन मुश्रीफ या माजी पोलीस अधिकाऱ्याने लिहिलेले हू किल्ड करकरे हे पुस्तक घ्यायचे होते…कोणतेही पुस्तक घेण्यापूर्वी त्या पुस्तकाबद्दल अॉनलाईन सर्च करत असतो. तसे करताना मला शमसुद्दीन मुश्रीफ यांची दोन भाषणे यू ट्युबवर पहायला मिळाली.

who killed karkare inmarathi

नुकतेच २६/११ कसाब आणि मी व द मिथ अॉफ हिंदू टेरर ही पुस्तके वाचली असल्याने शमसुद्दीन मुश्रीफ यांच्या भाषणातील मुद्दे ऐकून अवाक झालो….

शमसुद्दीन मुश्रीफ यांच्या भाषणातला महत्वाचा मुद्दे होते….

१) ब्राह्मणी वर्चस्ववादी मानसिकता कशी बहूजनांना नियंत्रणाखाली ठेवू पहात आहे.

२) भारताची आय बी ही संस्था अशाच ब्राह्मणी वर्चस्ववादी मानसिकतेच्या लोकांच्या नियंत्रणाखाली आहे. बहुतांश माध्यमे ही ब्राह्मणी वर्चस्ववादी लोकांच्या नियंत्रणाखाली आहेत.

३) राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना/ अभिनव भारत/बजरंग दल व अशा हिंदुत्ववादी संघटना भारतामध्ये मुस्लिम विरोध पसरवत आहेत….
हिंदुत्ववादी संघटनेचे लोकांनी ७/८ वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब हल्ले घडवून आणले… मिडियाच्या मदतीने हे सर्व हल्ले मुसलमानांनीच केले अशा बातम्या पसरवल्या.

आय बी च्या मदतीने गरीब निरपराध मुस्लिम तरूणांना तुरूंगात टाकले… अनन्वित अत्याचार केले.

४) मालेगाव स्फोट तपासादरम्यान कर्नल पुरोहित व पांडे यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या laptop मधून या ब्राह्मणी वर्चस्ववादाच्या सगळ्या भानगडींचा सुगावा करकरे साहेबांना लागला. हिंदू अतिरेक्याचा असली चेहरा जनतेसमोर आणणार होते म्हणून करकरे साहेबांना मारण्याचे नियोजन आय बी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कट्टरवाद्यांनी केले.

malegaon blast InMarathi

५) २६/११ रोजी मुंबई हल्ला केवळ समुद्र किनाऱ्यावरील पंचतारांकीत हॉटेलांवर करण्याचा पाकिस्तानी अतिरेक्यांचा कट आहे..याची सूचना अमेरिकन गुप्तचर संस्थेने रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेला दिली. रॉ ने आय बी ला दिली.

आय बी ने मुंबई पोलीसांना व वेस्टर्न कोस्टल कमांडला याबाबत सतर्क केले नाही. उलट पाकिस्तानी अतिरेकी समुद्र किनाऱ्यावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये हल्ला करणार आहेत याचा फायदा उठवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने सीएसटीवर कामा हॉस्पिटलमध्ये हिंदू तरूणांनी हल्ला चढवावा असे ठरले…

त्यानिमित्तानं आय बी अधिकारी हेमंत करकरे साहेबांना तिकडं बंदोबस्त करण्यासाठी पाठवतील व करकरे तिकडे आले की त्यांना मारून टाकण्याचे नियोजन करण्यात आले. व २६/११ ला ते अंमलात आणले.

 

mumbai-terror-attack-inmarathi
indiatoday.com

६) कसाब व अबू इस्माईलने सीएसटीवर कामा हॉस्पिटलमध्ये हल्ला केलाच नाही. हे पटवून सांगताना शमसुद्दीन मुश्रीफ म्हणतात,

“अतिरेकी व त्यांचे पाकिस्तानी मास्टर माइंड यांच्या मधील संभाषण मुंबई पोलीस रेकॉर्ड करत होती, व ते संभाषण एकदाही सीएसटी अथवा कामा हॉस्पिटलमधून झालेले नाही. अतिरेक्यांचे व पाकिस्तानातील मास्टर माइंडचे संभाषण केवळ ताज / ट्रायडंट सारख्या पंचतारांकित हॉटेलमधून झाले”

याचा अर्थ मुश्रीफांनी असा लावला की कसाब व अबू इस्माईलने सीएसटीवर हल्ला केला नाही…तो हल्ला हिंदू तरूणांनी केला.
हेमंत करकरेंनाही कसाबने मारले नाही तर हिंदू तरूणांनी मारले.

आता एकेक मुद्दे आपण द मिथ अॉफ हिंदू टेरर व २६/११ कसाब आणि मी या दोन पुस्तकाच्या माध्यमातून तपासून पाहू…

खरंच आय बी मध्ये / गृह मंत्रालयामध्ये ब्राह्मणी वर्चस्ववाद होता का?

त्यावेळच्या भारताच्या सुपर पंतप्रधान इंदिरा गांधी यांना कुणीही ब्राह्मणी वर्चस्ववादी मानसिकतेला उत्तेजन देणाऱ्या महिला म्हणू शकत नाही.

देशाच्या अंतर्गत सुरक्षितता यावर बारकाईने लक्ष ठेवून असणारी गुप्तचर संस्था आय बी (इंटेलिजन्स ब्युरो) ही गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.

 

intelligence inmarathi
prestoacademy.in

२००४ ते २०१४ या काळात प्रामुख्याने पी. चिदंबरम / शिवराज पाटील/ सुशीलकुमार शिंदे हे गृहमंत्री म्हणून काम पहात होते. या तिन्ही मंत्र्यांपैकी एकही मंत्री ब्राह्मणी वर्चस्ववादी विचारसरणीस चालना देणारा आहे असेही कुणी म्हणू शकत नाही.

२६/११ घटने दरम्यान गृह मंत्रालयात अन्वर एहसान कुरेशी हे एडिशनल सेक्रेटरी (बॉर्डर मेनेजमेंट) होते.  कुरेशी साहेबही ब्राह्मणी वर्चस्ववादी विचारसरणीचे नसणार.

२६/११ मुंबई हल्ल्यापूर्वी पाकिस्तानचे कसे नियोजन होते पाहा…..RVS मणी साहेबांनी तर अशी शंका नोंदवलीय या नियोजनात भारतीय सरकार/मुख्य अधिकारी सामील होते की काय…)

२६/११ घटनेपूर्वी साधारणतः एक महिना अगोदर मिलटरी इंटेलिजन्स विभागात कार्यरत असणाऱ्या कर्नल प्रसाद पुरोहितांना अवैध रितीने ताब्यात घेतले जाते.

karnal purohit InMarathi

दिनांक २६/११ घटनेच्या आधी दोन दिवस गृह मंत्रालयातील गृह सचिव मधुकर गुप्ता व सह सचिव अन्वर एहसान कुरेशींसह प्रमुख अधिकारी हे पाकिस्तानमध्ये होम सेक्रेटरी लेवल टॉक्स (HSLT) साठी गेले होते.

पाकिस्तानी गृह विभाग पाहणाऱ्या रेहमान मलिक यांच्या बरोबर २५/११ ला मिटिंग होती…ती एक दिवस वाढवून २६/११ दुपारी ठेवण्यात आली. २५/११ या दिवशी बहुतेक भारतीय अधिकारी मुरी या भागात फिरायला गेले. जिथून कुणाशीही संपर्क साधणे अवघड होते.

rehman malik pakistan InMarathi

२६/११ मुंबई हल्ल्याच्या दिवशी गृह मंत्रालयात सचिव पातळीचे काही मोजकेच अधिकारी उपस्थित होते त्या पैकी एक अधिकारी म्हणजे RVS मणी.(द मिथ अॉफ हिंदू टेरर पुस्तकाचे लेखक)

२००६ या वर्षी नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्यालयात झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या बरोबर आदल्या दिवशीही भारतीय गृह मंत्रालयाचे प्रमुख अधिकारी HSLT मिटिंग साठी पाकिस्तानात होते.

 

Hindu-Terror-book-by-RVS-Mani inmarathi
amazon.com

हा केवळ योगायोग असावा का?

शमसुदूदीन मुश्रीफ असा दावा करतात की २६/११ मुंबईवर हल्ला करणारे पाकिस्तानी अतिरेकी सीएसटीवर, कामा हॉस्पिटलमध्ये गेलेच नाहीत. कारण तिथून अतिरेक्यांनी पाकिस्तानात आपल्या मास्टर माइंडशी संपर्क साधला असा पुरावा मिळाला नाही.

जर सीएसटीवर, कामा हॉस्पिटलमध्ये गेलेच नाहीत तर कसाबच्या हातून करकरे साहेबांचा मृत्यू होण्याचा प्रश्नच नाही.

२६/११ कसाब आणि मी या रमेश महाले (२६/११ हल्ला मुख्य तपास अधिकारी ) यांच्या पुस्तकात काय लिहिले आहे?

-इस्माईल आणि कसाब सिएसटी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १३ च्या बाजूला असलेल्या सार्वजनिक मुतारीत गेले. इस्माईलने आपल्याकडील मोबाईलवरून कराचीतल्या म्होरक्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

pakistani terrorist InMarathi

पण रेन्ज/सिग्नल मिळत नव्हते. कसाबच्या मोबाईलवरूनही प्रयत्न केला पण त्याचीही तीच गत…अखेर संपर्क करण्याचा प्रयत्न सोडून देऊन अबू इस्माईलने ७ किलोचा आरडीएक्स बॉम्ब पेरला. (पान क्र. २४)

सीएसटीवर हल्ला सुरू असताना टाइम्स अॉफ इंडियाच्या कार्यालयात मुंबई मिरर चे छायाचित्रकार सेबेस्टिअन डिसोझा आणि टाइम्स अॉफ इंडियाचे छायाचित्रकार श्रीरामवर्णेकर हे दोघेही वेगवेगळ्या वेळेत आपापले कॅमेरे घेऊन सीएसटी स्थानकात गेले.

श्रीराम  वेर्णेकर यांच्या कडे निकॉन डी २०० हा अत्याधुनिक डिजिटल कॅमेरा होता.

shriram reporter InMarathi

गोळीबार व हात बॉम्बचा आवाज ऐकून ते धावतच आपल्या इमारतीबाहेर पडले. समोरच्या रस्त्यावरील दुभाजक अक्षरशः उडी मारून पार केला.

सिएसटीच्या फलाट क्रमांक एकच्या सबवे प्रवेशद्वारातून आत गेले. अजमल कसाब व अबू इस्माईल हे दोघं फलाट क्रमांक सहा समोरच्या मोकळ्या जागेत गोळीबार करताना वर्णेकरने पाहिले. न डगमगता वर्णेकरने दोघांची दहा छायाचित्रे काढली.

 

kasab inmarathi
newsnation.com

तेवढ्यात दोन्ही अतिरेकी फलाट क्रमांक एकच्या दिशेने येत असल्याचे पाहिले. वर्णेकरने परत आपले अॉफिस गाठले. व टाइम्स अॉफ इंडियाच्या दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीत जाऊन उभे राहिले.

दोन्ही अतिरेकी इस्माईल व कसाब पादचारी पुलावरून बद्रुद्दीन तय्यबजी मार्गाच्या दिशेने येत असल्याचे वर्णेकरांना स्पष्ट दिसत होते.

त्यावेळी वर्णेकरने दोघांची चार छायाचित्रे टिपली. पण अंधार असल्याने छायाचित्रं स्पष्ट येत नव्हती. अखेर फ्लॅश वापरून कसाबचे छायाचित्र टिपले.

फ्लॅश लाईट कसाबच्या लक्षात आला. त्याने वर पाहिले. खिडकीत उभे असलेले वर्णेकर दिसले. त्याने वर्णेकरच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. वर्णेकर आतल्या बाजूला पळाले.

कसाबने मारलेल्या दोन्ही गोळ्या टाइम्स अॉफ इंडियाच्या दगडी भिंतीवर आपटल्या होत्या.

मुंबई मिररचे छायाचित्रकार सेबेस्टिअन डिसोझानेही दोन्ही अतिरेक्यांची छायाचित्रे टिपली होती. डिसोझा आपल्या निकॉन कॅमेरासह फलाट क्रमांक सहाच्या दिशेने निघाले.

डिसोझाला एक गणवेशधारी पोलीस अतिरेक्यांच्या दिशेने गोळ्या झाडताना दिसला. त्याचे छायाचित्र टिपले. तेवढयात अतिरेक्यांनी त्या पोलिसाच्या दिशेने फायरिंग केले. तो गणवेशधारी पोलीस (सुदाम पंधरकर) क्षणात कोसळला.

इतक्यात साध्या वेषातील एका इसमाने त्या पोलीसाची बंदूक घेतली आणि गुडघ्यावर बसून अतिरेक्यांच्या दिशेने गोळी झाडली. हा क्षणही डिसोझाने आपल्या कॅमेरात टिपला.

ismail terrorist InMarathi

कसाबने गोळी झाडणाऱ्या इसमास (अंबादास पवार) गोळ्या घातल्या. अतिरेकी फलाट क्रमांक चारवर आले. त्यावेळीही डिसोझाने दोन्ही अतिरेक्यांची एकत्रित व वेगवेगळी छायाचित्रे टिपली.

या दोन्ही बहाद्दूर छायाचित्रकारांची साक्ष न्यायालयासमोर घेण्यात आली. दोघांनी टिपलेली छायाचित्रे न्यायालयासमोर ठेवण्यात आली.
दोघांच्या साहसी कामगिरीचा उल्लेख सत्र न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय या तिन्ही न्यायालयाच्या निकालपत्रात केला आहे.

वर्णेकरने व डिसोझाने सिएसटी स्थानकावर काढलेल्या छायाचित्राएवढा विश्वसनीय पुरावा दुसरा असूच शकत नाही असंही ताहिलियानी न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हणले आहे.

तपासादरम्यान सीएसटी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रिकरणही ताब्यात घेतले. परिणामी अतिरेक्यांच्या व पोलीसांच्या हालचालीही पाहाता आल्या. हे चित्रीकरणही न्यायालयाने पुरावा म्हणून ग्राह्य धरले.

सीएसटीवर निरपराध लोकांना मारून कसाब व इस्माईल पादचारी पुलावरून टाईम्स अॉफ इंडिया इमारतीपाशी आले. ते वाहनाच्या शोधात होते. तिथे पार्क केलेल्या मोटारींची दारे उघडण्याचा प्रयत्न करत होते.

एकाही मोटारीचा दरवाजा उघडता आला नाही. टाइम्स अॉफ इंडिया इमारतीवर असलेल्या सीसीटीव्ही क्यामेरामध्ये हे चित्रीकरण रेकॉर्ड झाले होते.

कसाबने सीएसटीवर हल्ला केल्याचे आपल्या जबानीत कबूल केले. (पान २९)

कामा हॉस्पिटलमधल्या अंजली विजय कुलथे (परिचारिका) यांनी कसाब व इस्माईलला येताना पाहिले. कुलथे यांनी प्रसंगावधान दाखवून हॉस्पिटलमधले सर्व दिवे बंद केले.

anjali kulthe InMarathi

नुकतीच जन्मलेली बाळं रडू नयेत म्हणून त्यांच्या त्यांच्या आयांना बाळांना दूध पाजायला (स्तनपान) सांगितले. जेणेकरून हॉस्पिटलमध्ये कुणीही नाही असे वाटून अतिरेकी निघून जावे…पण दोन्ही अतिरेकी कामा हॉस्पिटलमध्ये शिरले.

पुढे कसाबला जिवंत पकडल्यावर कामा हॉस्पिटलच्या परिचारिका अंजली कुलथेंनी ओळख परेडमध्ये सात अनोळखी माणसांत कसाबला बरोबर शोधून काढला.

त्यावर तो “मै ही अजमल कसाब हुँ! आपने सही पहचाना मॅडम!” असे म्हणाला. (पान३३/३४)

कामा हॉस्पिटलमध्ये अतिरेकी घुसल्याची सूचना मिळालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दातेसाहेब अतिरेक्यांच्या मागोमाग हॉस्पिटलमध्ये गेले. दाते साहेबांकडून झाडलेल्या दोन गोळ्यांनी अबू इस्माईलला लागली होती. अतिरेक्यांच्या हात बॉम्बने दातेसाहेब जबर जखमी झाले.

आपल्या कबूली जबाबात कसाबने कबूल केले की पोलीसांच्या गोळीबारात अबू इस्माईल जखमी झाला होता.

 

kasab-mumbai-terror-attach-marathipizza
youtube.com

शमसुद्दीन मुश्रीफ यांना जो प्रश्न पडलाय…करकरे साहेबांना कुणी मारलं…त्याचे स्पष्ट उत्तर अजमल कसाबने मुंबई महानगर दंडाधिकारी रमा वाघुले-सावंत यांच्या समोर दिले…त्याच्याच शब्दांत…

“एक पिली बत्तीवाली गाडी हमारी तरफ आती हुयी दिखाई दी! हमलोग दिवार को सटकर झाडी में खडे थे! जैसेही वह गाडी हमारें करीब आयी वैसेही हम दोनो ने उस गाडीपर फायरिंग की! उसी वक्त गाडी से भी हमारी और फायरिंग हुयी!

mubai blast InMarthi
Eros 26/11 halla movie

सी फायरिंग में मेरे (कसाब) दोनो हाथों को गोलीयाँ लगी! हम लगातार फायरिंग कर रहे थे! गाडीसे फायरिंग थमी तो हम दोनोने गाडी में देखा! सभी पुलीसवाले मरें पडे थे! पुलीसवालोंकी लाशें बाहर फेंककर हमने वही गाडी आगे जाने के लिए ली!

या सर्व घटना कसाबने स्वतः न्यायालयासमोर कबूल करूनही शमसुद्दीन मुश्रीफ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू तरूणांनी करकरे साहेबांना जाणूनबुजून मारल्याचा संशय का व्यक्त करतात?

हू किल्ड करकरे सारखे पुस्तक लिहितात. देशभर यासंबंधी भाषणे देतात. मुश्रीफांचा यामागे नेमका अजेंडा काय आहे?

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?