' देहविक्रीच्या दलदलीतून शेकडो जणींची सुटका करणाऱ्या या महिलेसमोर नतमस्तक व्हावं… – InMarathi

देहविक्रीच्या दलदलीतून शेकडो जणींची सुटका करणाऱ्या या महिलेसमोर नतमस्तक व्हावं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मुलगी, लक्ष्मी, आई बहिण म्हणून ती आपल्या आदरस्थानी असते, मात्र ह्याच स्त्रीचं आणखी एक रूप आहे जे दुर्लक्षित आहे. जी जगाची वासना शमवते. कधी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी, कधी दूर गावातल्या आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी तर कधी आपल्या चिमुकल्याच्या भरणपोषणासाठी.

भुकेसाठी देहाच्या चिंध्या करवून घेणारी ही जमात आहे देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांची. त्यानाही वाटतं मानाने जगावं, ह्या नरकातून बाहेर पडून आयुष्य खऱ्या अर्थाने जगावं आणि त्या जगतायत.

होय. ह्यासाठी त्यांच्या मदतीला गेली सव्वीस वर्षे एक महिला कार्यरत आहे जिने दहा हजारांहून जास्त सेक्सवर्कर महिला आणि त्यांच्या मुलांना नवजीवन दिले.

त्यांना परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसली जेव्हा भुकेने कळवळलेल्या मुलाने आपल्या आईला गिऱ्हाईक आणून दिले. तो क्षण ह्या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन पुढचे पाउल उचलण्यास कारणीभूत ठरला.

 

red-light-Area InMarathi

 

भेटूयात पुण्याच्या महिला सशाक्तीकारणाच्या कार्यकर्त्या ६५ वर्षे वयाच्या सीमाताई वाघमोडे ह्यांना.

पुण्यातील सर्वात जुन्या बाजारपेठेतील बुधवारपेठ ही देशातील अनेक रेड लाईट एरिया पैकी एक आहे..

ही अशी आहे जिथे अनेक शोकांतिका दडलेल्या आहेत. असा परिसर जिथे दिवसभर स्मशानशांतता असते आणि रात्री कोपरानकोपरा गजबजून उठतो. परंतु गेल्या पंचवीसेक वर्षांपासून ही जागा सीमा वाघमोडे ह्यांच्या साहस आणि अथक प्रयत्नांनी कात टाकण्यात यशस्वी होते आहे.

budhwar peth inmarthi
the indian feed

 

समाजाने बहिष्कृत केलेले आहे अशा सेक्स वर्कर्सच्या समाजासाठी एक बाहेरील व्यक्ती असणाऱ्या सीमा वाघमोडे ह्या आता त्यांच्या आजी आणि आई बनल्या आहेत.

देहविक्रय करणारया स्त्रिया आणि त्यांची मुलं ह्यांच्या आयुष्यात एक महत्वाचा बदल घडवण्यात सीमा यशस्वी झाल्या आहेतच शिवाय त्यांच्या विचारांत सकारात्मकता येऊन त्यांच्यासाठी अर्थार्जनाचे इतर विकल्पही खुले झाले आहेत जो ह्यापूर्वी त्यांना केवळ भ्रम वाटायचा. एक घटना आणि सीमा ह्यांना आपले ध्येय गवसले.

सीमांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि लगेच त्या समाजकार्यात उतरल्या. बरीच वर्षे कुष्ठरोग्यांसाठी काम केल्यानंतर त्यांनी मुंबई सोडली आणि त्या पुण्याला गेल्या आणि १९९३ साली त्यांनी स्वतःची “कायाकल्प” नावाची सामाजिक संस्था सुरु केली.

 

seema waghmode inmarathi
Your Story

 

हे ते वर्ष होते जेव्हा सरकारने एड्स आणि त्याचा प्रसार ह्याविषयी जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली होती. सीमा त्यांच्या गृपमध्ये सामील झाल्या आणि ही जनजागृती मोहीम राबवण्याची जबाबदारी त्यांच्या “कायाकल्प” संस्थेला देण्यात आली.

ही जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांना देहविक्रय करणारया ह्या स्त्रियांबद्दल काहीही माहिती नव्हती. त्यांच्याकडे होती तर केवळ काहीतरी चांगलं करून दाखवण्याची जबर इच्छाशक्ती आणि घरच्यांचा पाठींबा.

 

protest inmarathi
new indian express

जेव्हा त्यांनी आपल्या पतींना सांगितल की, त्या रेड लाईट एरियात काम करणार आहे तर त्यावर त्यांच्या पतीने दिलेली प्रतिक्रिया फार महत्वाची होती.

त्यांनी सीमांना कल्पना दिली की ह्या कामासाठी त्यांना संघर्ष करावा लागणार आहे आणि जर त्यांना खरच मनापासून काम करायचे असल तर एकदा पाउल पुढे टाकल्यावर त्यांना काम पूर्ण करावे लागेल मागे वळून पाहता येणार नाही.

परंतु प्रत्यक्ष हे काम करत असताना असं काही वास्तव त्यांच्या समोर आलं की त्यांना त्यांच्या कामाच्या हेतुवरच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले दिसले.

दरम्यान अशी एक घटना घडली की त्यांना आपल्या आयुष्याचे उद्देश्य स्पष्ट दिसायला लागले. जाणत्या वयात जेव्हा एक प्रौढ म्हणून बुधवार पेठेत सीमाताईंनी पाउल ठेवले तेव्हा त्याना त्यांचे लहानपण आठवले, ह्या परिसरात एक तेलाची घाणी होती जिथे सीमा लहानपणी आपल्या वडिलांसोबत खरेदीसाठी येत.

 

seema waghmode inmarathi
darpan magzine

 

त्यांना स्पष्ट आठवतं जेव्हा ते त्या गल्लीतून जात तेव्हा त्यांचे वडील त्यांचा हात घट्ट धरून ठेवत. आता त्यांना त्यांच्या त्या कृतीमागाचे कारण समजले, आणि कुठेतरी जाणवलं की आपल्याला हे बदलायचं आहे, ज्यासाठी केवळ औषधोपचार आणि जागृती निर्माण करणे पुरेसे नाही.

त्यांचा हा व्यवसाय बंद करणे आवश्यक होतेच मात्र ह्यापेक्षाही जास्त महत्वाचे होते त्यांना आपले पोट भरण्यासाठी व्यवसायाचे नवे पर्याय उपलब्ध करून देणे.

तुम्ही जर एखाद्याकडून त्याचं पोट भरण्याचं साधन काढून घेताय तर त्यातून त्याची मदत कशी होणार ? इथल्या बहुतांश स्त्रिया ह्या व्यवसायातच अडकून पडल्या आहेत. त्यांनी हेच काम करत राहावं ह्यासाठी त्यांच्यावर वेगवेगळे एजंट लोक दबाव आणतात.

 

pune budhwar peth inmarathi
pune visit

 

ह्या चाकोरीबाहेरचे जीवन म्हणजे त्यांच्यासाठी एक भ्रम आहे. त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाबद्दल आश्वस्त करणे कठीण होते. चांगल्या भवितव्याची हमी देण्यासाठी त्यांना नीट प्रशिक्षण देऊन, त्यांच्यात जागरूकता निर्माण करून, त्यांचे पुनर्वसन करणे जास्त महत्वाचे होते.

त्यांना हे दाखवण महत्वाचं होतं की ज्याला त्या जीवन समजतात ते ह्यापेक्षा कैकपटींनी वेगळे आणि सुंदर आहे.

 

deccan-institute-of-commerce-budhwar-peth-pune-computer-inmarathi
Justdial

जेव्हा लोकांना समजलं की, त्या देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांसोबत काम करतात, तेव्हा त्यांना बऱ्याचजणांनी विचारले की त्यांना हे असलं घाणेरडं काम करायची काय गरज आहे ? तर काहीजण बोलले की. हे नाली साफ करण्या सारखं आहे.

परंतु अशा शब्दांनी सीमा खचल्या नाहीत उलट त्यांचा संकल्प आणखी दृढ झाला की काहीही झालं तरी त्या हार मानणार नाहीत. सीमाताईंनी कामाला सुरुवात तर केली परंतु त्यांना सुरुवातीला फार संघर्ष करावा लागला.

सर्वात कठीण काम होतं ह्या स्त्रियांच्या मनात विश्वास निर्माण करणे. सुरुवातीच्या काळात तर देहविक्रय करणाऱ्या महिला सीमा ताईना आपल्या घरातही येऊ देत नसत. ज्या कोवळ्या वयात त्या सगळ्याजणी ह्या प्रकाराला सामोऱ्या गेल्या होत्या त्याची कल्पनाही करवत नाही.

केवळ १०० रुपयांसाठी त्या कोणाकडूनही आपलं शरीर ओरबाडून घ्यायला तयार असत. त्यांच्या संपूर्ण जगावरचा विश्वासच उडाला होता आणि आता तो परत मिळवणे हे सीमासमोर मोठे आव्हान होते.

 

परंतु हळूहळू सगळ्यांचा विश्वास मिळवण्यात सीमा ताईना यश आले आणि सगळ्या देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांनी त्यांचे आपल्या समजात स्वागत केले.

आज ह्यातल्या बऱ्याच महिलांनी देहविक्री सोडून इतर व्यवसाय सुरु केले आहे. त्यातल्या कोणी ब्युटी पार्लर चालवीत आहेत तर कोणी टेलरिंग करीत आहेत. शिवाय काहीजणी सीमा ताईंना त्यांच्या कामात मदत करतायत.

तरीही काही स्त्रिया अशाही आहेत ज्यांनी हे काम अजूनही सोडलेलं नाही परंतु सीमा ताई त्यांना विश्वास देतात की, त्या एकट्या नाहीत. त्यांना जर ह्या व्यवसायातून बाहेर पडायचे असेल तर त्यांना मदत करायला सीमा सदैव तिथे आहेत.

पुण्यापासून जवळजवळ १२० किलोमीटर अंतरावर हरिभाऊ वाघमोडे प्रतिष्ठान आहे जिथे ह्या स्त्रियांची मुलं आपले भविष्य घडवण्यासाठी धडपडत आहेत आणि आनंदाने आपले जीवन जगात आहेत. सध्या इथे एकूण ३५ मुले आश्रयाला आहेत.

seema-inmarathi
The Better India

 

सीमा सांगतात की, व्यवसायाच्या नव्या पर्यायांसोबातच त्यांच्या मुलांचे पुनर्वसन हा सुद्धा त्यांच्या कामाचा महात्वाचा भाग आहे, कारण असल्या वातावरणाचा वाईट परिणाम त्यांच्या मुलांवर थेट होतो.

गेल्या २६ वर्षांत “कायाकल्प” संस्थेने दहा हजारांपेक्षा जास्त देहविक्रय करणार्या स्त्रीयांना पर्यायी व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन आपल्या पायावर उभे राहायला मदत केली आहे आणि त्यांच्या मुलांना शिक्षण देऊन त्यांच्यातील कौशल्याचा विकास करून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे.

 

seema waghmode
darpan magazine

 

सीमा वाघमोडेंच्या “कायाकल्प” एनजीओला बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे समर्थन मिळाले आहे. सीमा म्हणतात. “देहविक्रय करणाऱ्या असल्या म्हणून काय झालं? त्याही तुमच्या माझ्यासारख्या सजीव स्त्रिया आहेत बाहुल्या नव्हेत”

खरंच स्वेच्छेने कुणीही ह्या व्यवसायात येत नाही. त्यांचीही स्वप्न असतील, इच्छा आकांक्षा असतील. त्यानाही सामान्य जीवन जगण्याचा अधिकार आहे. कुठल्याही सामान्य स्त्रीसारखा. तुमच्या माझ्यासारखा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?