'पुरुषांच्या दाढीत असतात कुत्र्याच्या केसांपेक्षाही जास्त जंतू...

पुरुषांच्या दाढीत असतात कुत्र्याच्या केसांपेक्षाही जास्त जंतू…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

पुरुषांना एकूणच दाढी करण्याचा कंटाळा येतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. फार कमी पुरुष असे असतील जे अगदी उत्साहाने रोज क्लीन शेव्ह करत असतील.

उरलेले बाकीचे बायको चिडते म्हणून, आई ओरडते म्हणून किंवा ऑफिसचा ड्रेस कोड म्हणून नित्यनेमाने दाढी करणे हे कंटाळवाणे आणि वेळखाऊ काम करतात.

दाढी करण्याचा कंटाळा येत असला तरी पुरुषांना दाढी अतिशय प्रिय असते.

सोळाव्या सतराव्या वर्षी मुलांना मिसरूड फुटलं आणि गालांवर दाढीचे खुंट उगवायला सुरुवात झाली की त्यांना आपण मोठे झाल्याची भावना येते आणि ज्या मुलाला लवकर दाढी येत नाही त्याला उगाचच कॉम्प्लेक्स येतो.

क्लीन शेव्हन लूक अगदी नीटनेटका आणि डिसेंट वाटत असला तरी आपापली दाढी प्रत्येक पुरुषाला प्रिय असते.

 

hindi.indiatvnews.com

आणि का असू नये? लोक दाढी म्हणजे मर्द/पुरुष असल्याची निशाणी मानतात. श्रावण पाळणे ह्याचे एक कारण दाढी करण्याच्या कटकटीतून काही दिवस तरी सुटका मिळावी हे तर नसेल ना? हल्ली तर नो शेव्ह नोव्हेम्बर ट्रेंडिंग आहे बाबा!

पण काहीही म्हणा! दाढी मेंटेन केलेला पुरुष हँडसम दिसतो हे ही तितकेच खरे.

प्राचीन काळात ऋषी मुनींची लांब दाढी असे. सॉक्रेटिस, गॅलिलिओ,अब्राहम लिंकन, रवींद्रनाथ टागोर,विल्यम शेक्सपिअर, कन्फ्यूशियस, कार्ल मार्क्स, लिओनार्दो द विंची, चार्ल्स डार्विन,ग्रेगरी रासपुतीन पासून तर फिडेल कॅस्ट्रो हे सगळे प्रसिद्ध दाढीवाले लोक आहेत.

लहान मुलांचा आवडता नाताळबाबा म्हणजेच सॅन्टा क्लॉज हा तर पांढऱ्याशुभ्र दाढीसाठी प्रसिद्ध आहे.

बच्चन साहेबांपासून ते विराट कोहली, विकी कौशल, रणवीर सिंग आणि आर माधवनपर्यंत अनेक युथ आयकॉन्स बिअर्डेड लूक मध्ये वावरतात.

पुरुषांच्या दाढीबद्दल बायकांची मिश्र प्रतिक्रिया असते. काहींना दाढी वाढवणे अस्वच्छ आणि जंगली प्रकार वाटतो, तर काहींना पुरुषांचा बिअर्डेड लूक जास्त आवडतो.

 

bachhan beard inmarathi
newsnation.com

फेसबुकवर काही असे व्हिडीओज आहेत ज्यात लहान मुले आपल्या वडिलांनी गुळगुळीत दाढी केली हे बघून चिडताना आणि अक्षरश: रडताना सुद्धा दिसतात. एकूण दाढी हे सध्या स्टाईल स्टेटमेंट आहे.

हल्ली तर बहुसंख्य मुलींना दाढीवाले पुरुषच आवडतात. म्हणूनच मुलेही विविध स्टाइलच्या दाढ्या मेंटेन करू लागलेत.

पण दाढी आवडणाऱ्या पुरुषांसाठी आणि असे पुरुष आवडणाऱ्या मुलींसाठी व दाढीचा कंटाळा करणाऱ्या समस्त पुरुषांसाठी एक वाईट बातमी आहे.

काही अभ्यासकांनी केलेल्या रिसर्चमध्ये दाढी संदर्भात एक निष्कर्ष निघाला आहे आणि त्यांनी तो जाहीर देखील केला आहे. त्या अभ्यासकांचे असे म्हणणे आहे की दाढी वाढवलेले पुरुष एखाद्या श्वानाच्या फरपेक्षाही जास्त जंतू आपल्या शरीरावर बाळगतात.

ही अतिशयोक्ती नसून स्वित्झर्लंड येथील हिर्सलँडन क्लिनिकमध्ये हा रिसर्च करण्यात आला आहे आणि त्यात असे आढळून आले आहे की श्वान हे दाढीवाल्या पुरुषांपेक्षा जास्त स्वच्छ असतात आणि त्यांच्या अंगावर तुलनेने कमी जंतू असतात.

आता हे वाचून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते. पण हे खरे आहे असे ह्या रिसर्च करणाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

Virat-Kohli-inmarathi
Cricketale

खरे तर हा रिसर्च MRI मशीन संदर्भात करण्यात आला होता.MRI मशीनचा उपयोग माणसांबरोबरच कुत्र्यांसारख्या प्राण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो का असा ह्या रिसर्चचा विषय होता.

तसेच वैज्ञानिकांना हे जाणून घ्यायचे होते की MRI मशिन्स श्वानांच्या आरोग्यासंदर्भात एखाद्या टेस्ट साठी वापरले तर त्याचा त्यांना काही धोका होणार नाही ना?

तसेच माणूस व श्वान ह्यांच्यासाठी एकच MRI मशीन वापरले तर त्यामुळे माणसांना श्वानांकडून कुठले इन्फेक्शन तर होणार नाही ना,ह्याची वैज्ञानिकांना खातरजमा करून घ्यायची होती.

ह्या रिसर्च साठी १८ पुरुषांच्या दाढीचे व ३० श्वानांच्या मानेजवळच्या फरचे swab सॅम्पल्स तपासण्यात आले. आणि ह्या तपासणीतून धक्कादायक गोष्टी समजल्या.

३० श्वानांपैकी २३ श्वानांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया आढळून आले. आणि सर्वच १८ पुरुषांच्या दाढीत सुद्धा खूप जास्त बॅक्टेरिया आढळले.

१८ पैकी ७ पुरुषांच्या दाढीत तर जंतूंचे प्रमाण इतके जास्त होते की त्यामुळे तर स्वत: तर आजारी पडूच शकतात शिवाय त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना सुद्धा विविध आजारांची लागण होऊ शकते.

जेव्हा ह्या MRI मशीनने पुरुषांची तपासणी करण्यात आली तेव्हा MRI स्कॅनर मध्ये जास्त प्रमाणात जंतू दिसले आणि जेव्हा त्याच मशीनने श्वानांची तपासणी करण्यात आली तेव्हा स्कॅनर मध्ये पुरुषांच्या तुलनेत कमी जंतू आढळून आले.

 

Beard Vs Dog Fur Feature InMarathi

ह्यावरून ह्या अभ्यासकांनी निष्कर्ष काढला की पुरुषांच्या दाढीत प्रचंड प्रमाणात जंतूंचा वास असतो त्यामुळे ते व त्यांच्या आजूबाजूची माणसे सुद्धा आजारी पडू शकतात. त्यामुळे पुरुषांनी स्वतःच्या व दाढीच्या स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेणे आवश्यक आहे.

ह्या रिसर्च टीममधील एक असलेले प्रोफेसर आंद्रेस गटझीट म्हणाले की,

“अभ्यासकांना असे आढळून आले आहे की पुरुषांच्या दाढीत श्वानांच्या फरपेक्षा जास्त जंतू आहेत. त्यामुळे ह्या निष्कर्षावरून आपण असे म्हणू शकतो की श्वान हे दाढी वाढवणाऱ्या पुरुषांपेक्षा तुलनेने जास्त स्वच्छ आहेत.”

आता ह्या रिसर्चचे सोडा, पण तसेही प्रत्येकाने शारीरिक स्वच्छता पाळलीच पाहिजे नाहीतर शरीर हे जीवजंतूंचे निवासस्थान होण्यास वेळ लागणार नाही. पुरुषांना दाढी करण्याचा कंटाळा येत असला तरी त्यांनी असलेली दाढी स्वच्छ ठेवायला काय हरकत आहे?

आजकाल बाजारात दाढीसाठी खास वेगळा शॅम्पू ,कंडिशनर आणि विविध प्रकारचे ट्रीमर ह्या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध असतात. मुलींना दाढीवाले पुरुष आवडत असले तरी कुणालाही अस्वच्छ घाणेरडे लोक आवडत नाहीत.

 

Girls like men with beard InMarathi
psychologyToday.com

त्यामुळे दाढी करायची की नाही हा तुमचा खाजगी प्रश्न आहे पण भावांनो, कृपा करून ती दाढी स्वतःच्या आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्यासाठी स्वच्छ ठेवा म्हणजे मिळवली!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?