तब्बल ७० वर्षे पाकिस्तानशी मैत्रीचा अयशस्वी राहिलेला प्रयत्न काय सांगतो? वाचा आणि तुम्हीच ठरवा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : स्वप्निल श्रोत्री

===

इ. स १९७१ च्या सिमला करण्याचे रोज उल्लंघन शस्त्रसंधीचा भंग करून पाकिस्तानी लष्कर करीत असते. परंतु, तरीही ते भारताची घोडदौड शकले नाहीत. कारण भारताच्या स्वातंत्र्य व सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास भारतीय लष्कर सक्षम आहे हे पाकिस्तानला समजणे गरजेचे आहे.

सी. आर. पी. एफ च्या जवानांवर झालेल्या हल्यानंतर भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध बरेच ताणले गेले. दक्षिण आशियातील ह्या दोन राष्ट्रांमधील वाद विकोपाला जावून प्रत्यक्ष युद्धाची वेळ येऊ नये यासाठी अनेक बड्याराष्ट्रांनी पुढाकार घेतला.

सध्या महिनाभरापूर्वी असलेली परिस्थिती हळूहळू निवळत चालली असली तरीही मधल्या काळात झालेल्या राजकीय व लष्करी घडामोडींनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते. उभय राष्ट्रांमधील काहीउत्साही तरुणांनी व वाचाळ नेत्यांनी युद्धाची भाषा सुरू केली तर काहींनी काहींनी शांततेची मागणी केली.

वरील घडामोडींचा संदर्भ लक्षात घेवून भारत – पाकिस्तान यांच्यात आजपर्यंत झालेली युद्ध व करार यांचा आढावा खास InMarathi च्या वाचकांसाठी…

पाकिस्तानविषयी थोडक्यात…

अधिकृत नाव : इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान
राजधानी : इस्लामाबाद
स्थापणा / स्वातंत्र्य दिवस : १४ ऑगस्ट १९४७
अधिकृत भाषा : उर्दू , इंग्रजी
राष्ट्रीय धर्म : इस्लाम : ९६.४ % ( सुन्नी ), इतर ३.६ %
क्षेत्रफळ : ७,९६,०९५ चौ. कि. मी
लोकसंख्या : अंदाजे १९ कोटी ( जागतीक बँकेच्या २०१६ च्या अहवालानुसार )

 

pakistan inmarathi
obortunity.org

कायदेमंडळ : मजलीस – ए – शुरा
वरिष्ठ सभागृह : सिनेट
कनिष्ठ सभागृह : नॅशनल असेंब्ली
राष्ट्राध्यक्ष : अरिफ अल्वी
पंतप्रधान : इम्रान खान
लष्कर प्रमुख : कमर जावेद बाजवा
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार : नासिर खान
प्रमुख राजकीय पक्ष : १) पाकिस्तान – मुस्लीम – लीग ( नवाज शरीफ )
२) पाकिस्तान – पिपल्स – पार्टी ( भुटटो )
३) तेहरिक – ए – इन्साफ – पाकिस्तान ( इम्रान खान )
मानव विकास निर्देशांक :०.५५० ( कमी )

भारत व पाकिस्तान संदर्भात ठळक घडामोडी

सीमारेषा : रॅडक्लिफ रेषा ( १७ ऑगस्ट १९४७ पासून अस्तित्वात )
सीमेची लांबी : ३,३२३ कि. मी
पाकिस्तान ला लागून असलेली भारतीय राज्ये : जम्मू आणि काश्मिर, पंजाब, राजस्थान, गुजराथ
आत्तापर्यंत झालेली युद्धे : ४

भारत व पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांचा इतिहास

भारताची फाळणी होवून भारत व पाकिस्तान अशी दोन सार्वभौम राष्ट्र अस्तित्वात आल्यापासून या दोन देशांमधील संबंध हे तणावपूर्णच राहिले आहेत. वास्तविक पाहता या दोन्ही राष्ट्रांमध्ये इतिहास, संस्कृती, भौगोलिक परिस्थिती
यांबाबत अनेक प्रकारचे साम्य आढळते.

 

indo-saudi-inmarathi
global.com

परंतु, भारतविरोध हे पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचे मूळ सूत्र राहिल्यामुळे उभय राष्ट्रांमधील संबंध हे कधीच सुधारले नाहीत. ' मी तर बुडेलच, पण भारताला घेऊन बुडेल ' असा
काहीसा प्रकार पाकिस्तानचा भारताच्या बाबतीत झालेला आहे.

भारत व पाकिस्तान यांच्यातील पहिला संघर्ष

नाव : काश्मीरचे युद्ध (अघोषित )
दिनांक : २६ ऑक्टोबर १७४७ ते ३१ डिसेंबर १९४८
नेतृत्व : १) भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू २) पाकिस्तानचे पंतप्रधान लिकायत अली खान

पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच जम्मू – काश्मीर हे संस्थान गिळंकृत करण्याची पाकिस्तानची मनीषा होती. त्याकरिता पाकिस्तानने इ. स १९४७ च्या ऑक्टोबर महिन्यात आपले सैन्य टोळीवाल्यांच्या वेशात काश्मीरमध्ये पाठविले. पाकिस्तानी सैन्याने अल्पावधीतच बराचसा प्रदेश पादाक्रांत केला.

काश्मीरचे महाराजा हरिसिंग पाकिस्तानच्या आक्रमणापुढे पुरते हडबडून गेले. पाकिस्तानच्या ह्या आक्रमणाचा प्रतिकार करण्याची किंवा त्यास तोंड देण्याची महाराजा हरिसिंग यांची क्षमता नव्हती.

त्यामुळे त्यांनी भारताकडे मदतीची याचना केली. परंतु, जोपर्यंत जम्मू आणि काश्मीर संस्थान भारतात विलीन होत नाही तोपर्यंत आपले सैन्य पाठविण्यात भारत सरकारने नकार दिला. दि. २६ ऑक्टोबर १९४७ रोजी महाराजा हरीसिंग यांनी जम्मू आणि काश्मीर संस्थान भारतात विलीन करण्यासंबंधित सामीलनाम्यावर सही केली. अशा प्रकारे जम्मू काश्मीर भारतात विलीन झाले.

काश्मीरचे संस्थान भारतात विलीन झाल्यावर भारत सरकारने आपले सैनिक जम्मू आणि काश्मीर रक्षणासाठी पाठविले. भारतीय सैन्याने अतुलनीय पराक्रम करून पाकिस्तानी सैन्यास मागे रेटले. परंतु, दरम्यानच्या काळात काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्राकडे भारत सरकारने नेल्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने दोन राष्ट्रांत युद्धबंदी घडवून आणली. भारत व पाकिस्तान या राष्ट्रांनी ३१ डिसेंबर १९४८ रोजी युद्धबंदी मान्य केली.

 

indo pak inmarathi
rediff.com

भारत सरकारने काश्मीरचा विषय संयुक्त राष्ट्रांकडे नेल्यामुळे काश्मीरचा काही भाग पाकिस्तानकडे राहिला तर दोन तृतीआंश भाग भारताच्या ताब्यात आहे.

नाव : १९६५ चे युद्ध ( घोषित )
दिनांक : ऑगस्ट १९६५ ते २२ सप्टेंबर १९६५
नेतृत्व : १) भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री २) पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल जनरल आयुबखान

काश्मिरच्या युद्धात सपाटून मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तान स्वस्थ बसला नव्हता. लष्करी बळावर काश्मिरचा प्रदेश बळकाविण्याची अभिलाषा पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या मनात तशीच होती.

इ. स १९६२ च्या चिनी आक्रमण नंतर भारतात गंभीर राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. अपमानजनक पराभवामुळे भारतीय लष्कराच्या क्षमतेवर जागतिक पातळीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. त्यातच इ. स १९६४ मध्ये पंडित नेहरूंचे निधन झाल्यामुळे देशात प्रभावी नेतृत्व उरले नाही असा पाकिस्तानचा समज झाला.

भारतातील परिस्थिती पाहिल्यावर काश्मीर पादक्रांत करण्याची हीच योग्य संधी आहे असा पाकिस्तानचा समज झाला. त्यामुळे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल आयुब खान यांनी भारताविरोधात युद्धाची घोषणा केली.

पाकिस्तानचा भारतावर आक्रमण करण्याचा निर्णय सहासी होता. परंतु त्यापेक्षा जास्त तो मूर्खपणाचा होता. अमेरिकेने दिलेल्या लढाऊ विमाने व शास्त्रांच्या बळावर सहज काश्मीर गिळता येईल हा पाकिस्तानचा भ्रम भारताचे
पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व भारतीय लष्कराने लवकरच फोल ठरविला.

पाकिस्तानी लष्कराला पिटाळून लावल्यानंतर पाकिस्तानवर चढाई करण्याचे आदेश पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय लष्कराला दिले.

त्यानुसार भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सरहद्दीचा भंग करून लाहोर, सियालकोट भागात चढाई केली. प्रत्येक आघाडीवर पाकिस्तानचा दारुण पराभव करीत भारतीय सैन्य एकेक पाकिस्तानी प्रदेश पादक्रांत करित होते. भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानी राज्यकर्ते पुरते हादरून गेले. त्यांना काश्मिरातील लढाई आवरती घेणे भाग पडले.

 

pakistan war inmarathi
Scroll.in

युद्धात भारताचे पारडे जड असतानाच संयुक्त राष्ट्रांनी २२ सप्टेंबर १९६५ रोजी युद्धबंदी घडवून आणली.

ताश्कंद करार

संयुक्त राष्ट्रांनी युद्धबंदी घडवून आणली तरीही युद्धजन्य परिस्थिती काही निवळली नव्हती. पुन्हा एकदा युद्धाचा भडका कधीही उडेल अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती.

अशावेळी सोव्हिएत युनियनने ( आजची रशिया ) भारत व पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्यास पुढाकार घेतला. सोव्हिएतचे तत्कालीन नेते ब्रेझनेव्ह व कोसिजिन यांनी भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल आयुब खान यांना आपल्या देशाच्या भेटीचे निमंत्रण दिले.

सोव्हिएत युनियन मधील ताश्कंद या शहरी इ. स १९६६ च्या जानेवारी महिन्यात पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व जनरल आयुब खान या दोन नेत्यांची भेट झाली, या वेळेस सोव्हिएत नेत्यांनी भारत व पाकिस्तान त्यांच्यात मध्यस्थी घडवून आणण्याच्या कामी महत्वपूर्ण भूमिका निभावली. त्यांच्या प्रयत्नातून भारत व पाकिस्तान यांच्यात जो करार झाला त्यालाच ताश्कंद करार असे म्हटले जाते.

बांग्लादेश मुक्ती संग्राम

नाव : १९७१ चे युद्ध ( घोषित )
दिनांक : ३ डिसेंबर १९७१ ते १६ डिसेंबर १९७१
नेतृत्व: १) भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी २) पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल याह्याखान

इ. स १९७० नंतर पाकिस्तानातील अंतर्गत संघर्ष अधिकच चिघळला गेला. धर्माच्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती झाली असली तरीही पूर्व पाकिस्तान व पश्चिम पाकिस्तान ह्यांच्यात धर्म वगळता सर्वच बाबतीत भिन्नता होती. पाकिस्तानच्या राजकारणावर स्थापनेपासूनच पश्चिम पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांचा दबदबा राहिला होता.

त्यामुळे पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी पूर्व पाकिस्तानला कायमच दुजाभावाची वागणूक दिली. त्यामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेच्या मनात आपल्या राज्यकर्त्यांविषयी असंतोष उत्पन्न होऊ लागला. अशा तणावग्रस्त वातावरणात पाकिस्तानमध्ये केंद्रीय कायदे मंडळाच्या निवडणुका झाल्या. या निवडणूकांत पूर्व पाकिस्तानचे नेते

शेख मुजिबूर रेहमान ह्यांच्या अवामी लीग या पक्षाने मोठे यश संपादित केले. कायदेमंडळातही हाच पक्ष मोठा म्हणून पुढे आला. परंतु पाकिस्तानचे तत्कालीन हुकूमशहा जनरल याह्याखान यांनी आवामी लीगला सरकार स्थापन करण्याची परवानगी दिली नाही.

 

dhaka inmarathi
dawn.com

याह्याखान या निर्णयामुळे पूर्व पाकिस्तानात तीव्र असंतोष निर्माण झाला. हा असंतोष दडपून टाकण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने पूर्व पाकिस्तानातील जनतेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचाराला विरोध करण्यासाठी पूर्व पाकिस्तानातील जनतेने मुक्तीवाहिनी  नावाची सशस्त्र सेना उभी केली. परिणामी संघर्षात अधिकच भर पडली. वाढत्या संघर्षामुळे पूर्व पाकिस्तानातील निर्वासितांचे लोंढे भारतात येऊ लागले.

भारताने या निर्वासितांसाठी आश्रय छावण्या उभ्या केल्या. परिणामी हा राग डोक्यात ठेवून पाकिस्तानी हवाई दलाने दि. ३ डिसेंबर १९७१ रोजी भारताच्या पश्चिम विभागातील ८ हवाई तळांवर हल्ले केले.

भारत युद्धासाठी अगोदरच तयार असल्याने अचानक हल्ला होवूनही फारसे नुकसान झाले नही. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तातडीने पाकिस्तान विरोधात युद्धाची घोषणा केली. भारतीय सैन्याच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानचा जास्त दिवस निभाव लागला नाही.

दि. १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने युद्ध जाहीर केल्यापासून केवळ ११ दिवसात पाकिस्तानी लष्कराने भारतासमोर शरणागती पत्करली. पाकिस्तानी सैन्याच्या पराभवामुळे जगाचा नकाशात बांग्लादेश नावाचे नवे राष्ट्र जन्माला आले.

सिमला करार

बांग्लादेश युद्धानंतर पाकिस्तानात सत्ता परिवर्तन होऊन झुल्फिकार अली भुत्तो पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. त्यांनी भारताबरोबर शांततेची बोलणे सुरू केली. त्यानुसार पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भुट्टो यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले.

दि. २८ जून ते २ जुलै १९७२ या काळात भारतातील सिमला येथे गांधी व भुट्टो यांच्यात प्रदीर्घ वाटाघाटी होऊन चर्चा झाल्या. चर्चेच्या माध्यमातून उभय राष्ट्रांच्या प्रमुखात जो करार झाला तोच करार आज सिमला करार म्हणून ओळखला जातो.

पाकिस्तान आणि दहशतवाद

भारताबरोबरील सरळ युद्धात ३ वेळा सपाटून मार खाल्ल्यानंतर भारताशी मैदानावर लढणे अशक्य असल्याची पाकिस्तानी लष्करास जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी भारताबरोबर युद्धाचा एक नवा मार्ग अवलंबला तो म्हणजे दहशतवाद.

 

Terrorism-Pakistan-marathipizza
http://www.wishesh.com

भारतात केल्या जात असलेल्या दहशतवादी कारवायांना पाकिस्तानचे समर्थन लागते. किंबहुना पाकिस्तानच्या इशाऱ्यावरच दहशतवादी कारवाया होतात हे उघड गुपित आहे. भारतात विविध राज्यात विशेषतः जम्मू – काश्मिरमध्ये जम्मू – काश्मिर लिबरेशन फ्रंट, हिजबुल मुजाहिद्दीन, अवामी एक्शन कमिटी, लष्कर – ए – तोयबा, जैश – ए – मोहम्मद अशा वेगवेगळ्या नावाने या संघटना कारवाई करीत असतात.

परंतु, त्या सर्वांचे उगमस्थान आश्रयस्थान पाकिस्तान हेच राहिले आहे.

इ. स १९९८ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका भारतात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले. आघाडीचे नेते म्हणून अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले.

देशाची सत्ता सूत्रे हाती घेताच त्यांनी अण्वस्त्र धोरणाचा विचार सुरू केला. देशाच्या सुरक्षिततेसाठी अण्वस्त्रांची गरज असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केले. पंतप्रधानांच्या आदेशानुसार इ. स १९९८ च्या मे मध्ये राजस्थानच्या येथील पोखरण वाळवंटात भारताने एकामागून एक अशा ५ अणू चाचण्या घेतल्या आणि संपूर्ण जगाला पुन्हा एकदा आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडविले.

त्याच काळात पाकिस्तानने घौरी नावाच्या अण्वस्त्राची चाचणी घेतली होती. त्यामुळे भारतीय उपखंडात अण्वस्त्र स्पर्धेचे धोका निर्माण झाला.

पुन्हा एकदा युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पुढाकार घेतला.

दिल्ली-लाहोर बस सेवा व लाहोर जाहीरनामा

भारत व पाकिस्तान या दोन शेजारी राष्ट्रांमध्ये सलोख्याचे संबंध राहावेत यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे पहिले दृश्य स्वरूप म्हणजेच दिल्ली-लाहोर बस सेवा होय.

बऱ्याच काळानंतर दोन्ही राष्ट्रांच्या द्विपक्षीय संबंधात सुधारणा होण्याची चिन्हे निर्माण झाली. प्रथम सचिव दर्जाची नंतर पंतप्रधानांनी एकमेकांशी बोलणी सुरू केली. भारताच्या पंतप्रधानांनी फेब्रुवारी १९९ मध्ये एक दिवसीय
पाकिस्तानला भेट दिली.

पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात मनमोकळी चर्चा होऊन एक नवीन जाहीरनामा अस्तित्वात आला हा तोच ' लाहोर जाहीरनामा ' म्हणून प्रसिद्ध आहे.

कारगिलमध्ये घुसखोरी

नाव: कारगिलचे युद्ध ( अघोषित )
दिनांक : मे १९९९ ते जुलै १९९९
नेतृत्व : १) भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी २) पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल परवेज मुशर्रफ

 

scoopwhoop.com

लाहोर करार होवून अवघे काही दिवस होत नाहीत तोच पाकिस्तानने पुन्हा एकदा कुरापती करण्यास सुरुवात केली. इ. स १९७१ च्या सिमला करारानुसार दोन्ही राष्ट्रांच्या अंतरराष्ट्रीय सीमांचा आदर करण्याचे ठरले असताना
पाकिस्तानी लष्कराने काश्मिरच्या द्रास, कारगिल, बटालिक भागात घुसखोरी केली.

या घुसखोरीत काश्मिर मधील दहशतवादी, अफगाणिस्तानातील तालिबानी बंडखोर व पाकिस्तानी लष्कराचे जवान सामील होते.

ऑपरेशन विजय व ऑपरेशन सफेद सागर

पाकिस्तानी लष्कराची कारगिलमध्ये घुसखोरी लक्षात येताच भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना भारताच्या बाहेर पिटाळण्यासाठी आक्रमक कारवाई सुरू केली. भारतीय लष्कराने या कारवाईला ऑपरेशन विजय हे नाव दिले तर हवाई दलाने ऑपरेशन सफेद सागर अंतर्गत कारवाई सुरु केली.

भारतीय जवानांनी अत्यंत आक्रमक हालचाली करीत पराक्रमाच्या बळावर महिनाभरात पाकिस्तानच्या ताब्यात गेलेली लष्करी ठाणी परत मिळविली. भारतीय सैन्य व पाकिस्तान घुसखोर ह्यांच्यातील या संघर्षाला कारगिलचे युद्ध असे म्हटले जाते.

आग्रा शिखर परिषद

कारगिल युद्ध आणि पाकिस्तानातील तत्कालीन राजकीय उलथापालथ यामुळे भारत – पाकिस्तान संबंधात एक प्रकारची अडचण निर्माण झाली होती. हि अडसर दूर करण्यासाठी भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले. भारतीय पंतप्रधानांच्या निमंत्रणाचा

स्वीकार करून मुशर्रफ भारतात आले. भारत व पाकिस्तानच्या ह्या सर्वोच्च नेत्यांत आग्रा येथे १५ व १६ जुलै २००१ रोजी शिखर परिषद झाली ही बैठक यशस्वी व्हावी म्हणून भारतीय नेत्यांनी मनापासून प्रयत्न केले. परंतु मुशर्रफ यांनी ठरवून आल्याप्रमाणे हटवादी भूमिका घेऊन ही परिषद एक प्रकारे उधळून लावली.

 

agra summit inmarathi
amarujala.com

भारत – पाक संबंधांवर परिणाम

जनरल परवेज मुशर्रफ यांच्या नंतर पाकिस्तानचा सत्तेवर आलेले राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी, पंतप्रधान नवाज शरीफ व सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सत्ता सूत्रे स्वीकारताच भारत – पाकिस्तान संबंधात सुधारणा करण्यास आपण उत्सुक आहोत असे जाहीर विधाने केले होती.

ज्यावेळी भारत – पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय बोलणी सुरु होते त्यावेळी पाकिस्तानी लष्कर कुरापती काढून या संबंधात कटुता निर्माण करते. यावरून पाकिस्तानात सत्तेचे २ केंद्रबिंदू असून एक लोकनियुक्त सरकार ( नामधारी ) तर दुसरे पाकिस्तानी लष्कर आहे याची खात्री होते.

कारगिल युद्धातील मानहानीकारक पराभवानंतरही पाकिस्तान सुधारला नाही. इ. स २००१ चा संसदेवरील हल्ला, इ. स २००८ चा मुंबई हल्ला, सप्टेंबर २०१६ चा पठाणकोट हल्ला आणि नुकताच केलेला पुलवामा हल्ला यासारखी नापाकृत्ये पाकिस्तानी लष्कराकडून सुरूच आहेत.

इ. स १९७१ च्या सिमला करण्याचे रोज उल्लंघन शस्त्रसंधीचा भंग करून पाकिस्तानी लष्कर करीत असते. परंतु, तरीही ते भारताची घोडदौड शकले नाहीत. कारण भारताच्या स्वातंत्र्य व सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास भारतीय
लष्कर सक्षम आहे हे पाकिस्तानला समजणे गरजेचे आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?