' सभेची गर्दी : एक कालबाह्य बॅरोमीटर? – InMarathi

सभेची गर्दी : एक कालबाह्य बॅरोमीटर?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : प्रसाद फाटक 

==

“बघा बघा अमक्या नेत्याच्या सभेला केवढी गर्दी होती”..

“बघा तमक्याच्या सभेच्या वेळच्या रिकाम्या खुर्च्या”…

सध्याच्या निवडणूक मोसमात टीव्ही, वर्तमानपत्र आणि समाजमाध्यमांमध्ये अशा चर्चा खूप दिसत आहेत. मला प्रश्न हा पडतो की हा घटक खरंच पूर्वीइतका relevant राहिला आहे का?

पूर्वी नेत्यांचं भाषण, आश्वासनं, विद्यमान सरकारने काय केलं/केलं नाही हे जाणून घेण्याचा हा थेट मार्ग होता.

वर्तमानपत्र वृत्तांत देत असतील तरी तो दुसऱ्या दिवशी येणारा, त्यात पुन्हा भाषणातल्या सगळ्या गोष्टी येणार नाहीत हेही माहित असल्याने कदाचित फार लोकांना तो वाचण्यात लोकांना रस वाटत नसावा, शिवाय ते वाचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साक्षरतेचं प्रमाणही कमी होतं. अशा परिस्थितीत थेट भाषण ऐकण्याचं महत्त्व वेगळंच असायचं.

सभास्थानावरची एकूण वातावरण निर्मिती, भारलेलं वातावरण या सगळ्यामुळे त्या त्या नेत्यांसाठी, पक्षासाठी अनुकूल स्थिती व्हायला मदत व्हायची.

 

elections inmarathi
asiadialogue.com

आपल्या समाजाची व्यक्तिपूजेची प्रवृत्ती पाहता त्या सभेतल्या नेत्यांचं, पक्षाचं आधीचं वर्तन, त्यांनी दिलेली (आणि अपूर्ण राहिलेली) आश्वासनं या सगळ्यांचा समोर जमलेल्या जनता जनार्दनाला एका क्षणात विसर पडून बोलणाऱ्या नेत्याने निर्माण केलेल्या प्रतिमेवर त्याचं चट्कन प्रेम बसून त्याचा फायदा जनमत त्याला मतदान करण्यासाठी अनुकूल होत जायचं..

आता परिस्थिती वेगळी आहे. माध्यमांची (इलेक्ट्रॉनिक आणि समाजमाध्यमं दोन्ही) नुसती चलतीच नाही तर हैदोस आहे.

५ वर्षं बरंवाईट उगाळलं जाऊन साधारण वातावरण आधीच तयार झालेलं असतं. मोबाईल तर कुठल्याही कानाकोपऱ्यात पोचले आहेत. त्यावर मिम्सपासून, भाषणाच्या/मुलाखतीच्या खऱ्या कोट्या क्लिप्स पर्यंत सगळं काही सतत गळत असतं.

Jio क्रांती पासून तर बऱ्यापैकी रेंज असणाऱ्या भागातही आपल्या गावातल्या पासून ते देशाच्या दुसऱ्या सभांची भाषणं लाईव्ह बघायला मिळतात.

अशा परिस्थितीत उन्हातान्हात, धुळीत जाऊन, उशीरापर्यंत ताटकळत सभा ऐकण्यामधला रस कमी होणं अगदी स्वाभाविक आहे.

शिवाय स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला प्रभावी असणाऱ्या पक्षाची हळूहळू कामगिरी कामगिरी घसरायला लागल्याची हवा तयार झाली तेव्हा आधी सभांच्या तुडुंब गर्दीची सवय असलेल्या त्या पक्षाने पत जायला नको म्हणून चक्क पैसे देऊन गर्दी जमवायला सुरुवात गेली (पक्ष कुठला ओळखा पाहू?).

यथावकाश अन्य पक्षांनीही असली उसनवारी सुरू केली आणि आता कुठलाही पक्ष उचलून आणलेल्या गर्दीशिवाय सभा घडवून आणत असल्याची शक्यता नाही. मग आलेल्यातली खरी गर्दी ओळखायची कशी?

 

rally inmarathi
cnbctv18.com

हे सगळे मुद्दे विचारात घेतले तर सभेची गर्दी हा आता एखाद्या पक्षाच्या लोकप्रियतेचा निकष ठरवणे हळूहळू कालबाह्य होईल असं मला वाटतंय. मला याची पहिली स्पष्ट जाणीव झाली ती मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस.

फडणवीस यांची पुण्यात ४-५ च्या सुमाराला सभा होती. शुकशुकाट होता. दुसऱ्या दिवशी मोकळ्या खुर्च्यांचे फोटो वर्तमानपत्रांत आले आणि “१ ते ४ पुणेकर झोपतात तेव्हा कशाला सभा घेताय” वगैरे धमाल प्रतिक्रिया येऊ लागल्या.

पण निकाल लागले तेव्हा काय दिसलं ? भाजपला अभूतपूर्व यश मिळालं. पुण्यातल्या सातही जागा भाजपने खिशात टाकल्या.

सभेच्या गर्दीचा काही प्रश्नच आला नाही. दुसरीकडे जबरदस्त वक्ते असणारे राज ठाकरे आजही गर्दी तुडुंब गर्दी खेचत होते (आजही खेचतात) पण मनसेला अवघी एक जागा मिळाली (तीही नाराज होऊन ऐनवेळी शिवसेना सोडून मनसेत आलेल्या उमेदवाराला!!).

गर्दी ही मतांमध्ये परिवर्तित होण्याचे दिवस हळूहळू कमी होत जाणार आहेत.

निदान जिथे टीव्ही आणि मोबाईल नेटवर्क व्यवस्थित पोचले आहेत तिथे सभेच्या बित्तंबातम्या क्षणार्धात पोचत असल्याने गर्दी हा एखाद्या पक्षाच्या यशापयशाचा बॅरोमीटर ठरवून चालणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?