' ४०० हुन अधिक चित्रपटांसाठी थरारक स्टंट सीन्स करणारी धाडसी “शोले गर्ल”… – InMarathi

४०० हुन अधिक चित्रपटांसाठी थरारक स्टंट सीन्स करणारी धाडसी “शोले गर्ल”…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्टंट करणे ही खरं तर पुरुषांची मक्तेदारी समजली जाते. सुरुवातीला तर चित्रपटांमध्ये सुद्धा किडनॅप केलेल्या नायिकेला किंवा इतर कुठल्याही प्रसंगात कुठल्याही संकटातून वाचवण्यासाठी नायकच दमदार एंट्री घेऊन, शत्रूच्या अड्ड्यावर जाऊन तिथे पाचपन्नास माणसांना सहज लोळवून, शेवटी खलनायकाला मारून किंवा जखमी करून नायिकेला सोडवणार आणि सगळ्यात शेवटी पोलीस येऊन नायक -नायिकेचे लग्न होणार असाच चित्रपटांचा शेवट असायचा.

काही अपवाद सोडल्यास आपल्या चित्रपटांत नायिका कधीच फायटिंग करताना किंवा खतरनाक स्टंट करताना दाखवल्या जात नसत. ते काम फक्त आपले हिरो आणि त्यांचे स्टंटमेन करीत असत.

पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली आहे. आता हिरोईन इतर कुणाची वाट न बघता स्वतःच स्वतःची सुटका करून घेत असल्याचे अनेक चित्रपटांत दाखवले जाते.

 

stunt inmarathi
net4u.com

पूर्वी अशी परिस्थिती असताना देखील ह्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ह्या क्षेत्रात उतरून एका सामान्य महिलेने अनेक धोकादायक स्टंट यशस्वीपणे करून दाखवले आहेत.

पुरुषांचे वर्चस्व असलेल्या ह्या क्षेत्रात उतरून असामान्य कामगिरी करून दाखवणाऱ्या भारतातल्या ह्या पहिल्या स्टंटवुमनचे नाव आहे रेशमा पठाण!

त्यांच्या असामान्य धैर्यामुळे आणि धाडसी स्वभावामुळे त्यांनी ह्या क्षेत्रात यश मिळवले आहे. रेशमा पठाण ह्यांनी हे दाखवून दिले आहे की स्त्रियांनी ठरवले तर त्या कुठल्याही क्षेत्रात उतरू शकतात आणि त्यात त्या यशाची शिखरे सुद्धा पादाक्रांत करून दाखवू शकतात.

“ठरवले आणि मनापासून कष्ट घेतले की काहीही अशक्य नाही” ही उक्ती त्यांनी सार्थ करून दाखवली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

रेशमा पठाण ह्यांचा हा प्रवास मात्र काही साधा सोपा आणि सरळ नव्हता. काट्यांनी भरलेल्या ह्या मार्गाची निवड करून, खाचखळगे पार करून, अनेकांचा विरोध मोडून काढत त्यांनी हे यश संपादन केले आहे.

त्यांच्या यशातून त्या आपल्याला हा संदेश देतात की जगाने तुम्हाला तुमच्या लक्ष्यापासून कितीही दूर नेण्याचा प्रयत्न केला, तुमच्या मनात कितीही भीती भरवली, तुमचे लक्ष विचलित केले तरी तुमच्या दृढनिश्चयाच्या जोरावर तुम्ही ह्या जगात आपले स्थान निर्माण करू शकता आणि तुमचे उद्दिष्टय सुद्धा यशस्वीपणे पूर्ण करू शकता.

 

reshma pathan inmarathi
betterindia.com

आज जवळपास ४०० चित्रपटांत अंगावर काटा आणणारे ,जीवावर बेतू शकणारे धोकादायक स्टंट करणाऱ्या रेशमा पठाण म्हणतात की, “शो मस्ट गो ऑन!”

रेशमा पठाण ह्यांना फार कमी वयातच घराची जबाबदारी सांभाळावी लागली. त्यांच्या आईला तांदळाची तस्करी केल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतले आणि घर चालवण्याची जबाबदारी रेशमांच्या अंगावर आली.

त्यांचे वडील सतत आजारी असत. त्यामुळे वयाच्या नवव्या वर्षीच रेशमा ह्यांना घर चालवण्यासाठी पैसे कमावण्यासाठी हातपाय चालवावे लागले. त्या बिडीची पाकिटे तुरुंगातील कैद्यांना विकत असत.

पण इतक्यावर त्यांचे घर चालणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्या कारच्या छतावर काहीतरी कलाबाजी करून थोडेबहुत पैसे कमवत असत.

रेशमा केवळ १४ वर्षांच्या असताना त्यांनी पहिल्यांदा स्टंट डबल म्हणून काम करणे सुरु केले. बॉलिवूडमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करणाऱ्या अझीम ह्यांनी रेशमा ह्यांना ह्या क्षेत्रात काम करण्याचा सल्ला दिला.

स्टंट करून पैसे कमावून त्यांना घर चालवणे सोपे झाले असते. पण घरची परिस्थिती इतकी हलाखीची असून देखील त्यांच्या वडिलांनी त्यांना हे काम करण्याची परवानगी नाकारली. त्यांच्या वडिलांनी त्यांना ही संधी नाकारण्यास सांगितले.

त्यांच्या वडिलांचे म्हणणे होते की ह्या क्षेत्रात पैसे असले तरी खूप जास्त धोका आहे, आणि कुठलाही धोकादायक स्टंट करताना जीवावर बेतू शकते.

sholey girl inmarathi
rediffmail.com

आणि त्यासाठी कितीही पैसे मिळाले तरी त्यासाठी इतका धोका पत्करण्याची गरज नाही. वडिलांचा इतका विरोध असतानाही रेशमा ह्यांनी त्यांच्या वडिलांचे मन वळवले. त्या त्यावेळी सुद्धा धाडसी स्वभावाच्या होत्या. त्यांना आत्मविश्वास होता की त्या हे धोकादायक काम करू शकतील.

त्यानंतर ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनच्या सदस्या झाल्या. पण लवकरच त्यांच्या लक्षात आले की नुसते ज्युनिअर आर्टिस्ट बनल्याने काही होणार नाही.

आणि जर व्यवस्थित पैसे कमवायचे असतील तर त्यांना जीवाचा धोका पत्करून स्टंट करावेच लागतील. त्या “गंगा की सौगंध” ह्या चित्रपटासाठी काम करीत असताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला.

ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला आदर आणि सन्मान मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी होती. त्यांचा हा लढा यशस्वी झाला आणि त्या स्टंट आर्टिस्ट असोसिएशनमध्ये जाणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.

 

Reshma and Shridevi Inmarathi

रेशमा ह्यांना स्टंट वुमन म्हणून चित्रपटांत काम करताना अनेक वेळा अपघातांना सामोरे जावे लागले आहे. १९७५ साली आलेल्या रमेश सिप्पी ह्यांच्या शोले ह्या चित्रपटाच्या चित्रीकरण्याच्या वेळी हेमा मालिनी ह्यांची स्टंट डबल म्हणून रेशमा काम करीत होत्या.

टांग्याचे चित्रीकरण करताना टांगा उलटला आणि खरंच रेशमा ह्यांच्या जीवावर बेतले असते. चित्रीकरण करत असताना टांगा उलटला आणि रेशमा टांग्यातून बाहेर फेकल्या गेल्या आणि त्या एका मोठ्या दगडावर आपटल्या.

पण इतका मोठा अपघात होऊन सुद्धा त्या दोनच दिवसांत सेटवर परत हजर झाल्या. डायरेक्टरांनी हा सीन जवळजवळ रद्द केल्यात जमा होता.

पण रेशमा ह्यांनी सर्वांना हा सीन चित्रपटात ठेवण्याची विनंती केली आणि त्यांचे मन वळवले.

 

stunt women inmarathi
indian women blog

त्यांनी सर्वांना सांगितले की त्या परत हा सीन करून धोका पत्करण्यासाठी तयार आहेत. ह्यावेळी शोलेच्या संपूर्ण टीमने उभे राहून रेशमा पठाण ह्यांचे अभिनंदन केले होते कारण रेशमा ह्यांनी एकाच टेक मध्ये हा शॉट यशस्वीपणे शूट केला होता.

कर्ज ह्या चित्रपटाच्या वेळी दुर्गा खोटे ह्यांची डुप्लिकेट म्हणून काम करताना एका सीन दरम्यान ट्र्क ड्रायव्हरने रेशमा ह्यांना धडक दिली. डायरेक्टरनेच तो सीन तसा करण्यास सांगितले होते.

ह्या सीनमध्ये रेशमा गंभीर जखमी झाल्या आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांनी परत त्या डायरेक्टरबरोबर काम केले नाही तरीही त्यांनी नंतर सुद्धा यशस्वीपणे अनेक धोकादायक सीन केले. आणि काम करणे सुरूच ठेवले.

आजही चित्रपटसृष्टीत स्टंट वुमन म्हणून फार कमी महिला काम करतात. अशा वेळी त्या काळी सुद्धा रेशमा ह्यांनी करियर म्हणून ह्या क्षेत्राची निवड करणे आणि ह्या क्षेत्रात यशस्वीपणे इतकी वर्ष काम करणे हे खरंच कौतुकास्पद आहे.

रेशमा पठाण ह्यांचा हा प्रवास प्रेरणादायक आहे. त्यांच्या ह्या कामाची दखल पहिल्यांदा “फुल खिलते है गुलशन गुलशन” ह्या कार्यक्रमात घेतली गेली.

ह्या कार्यक्रमात रेशमा ह्यांना आमंत्रित करण्यात आले होते व तबस्सुम ह्या निवेदिकेने रेशमा ह्यांची मुलाखत घेतली होती.

ह्या मुलाखतीत त्यांनी ऍक्शन सीनच्यावेळी पडद्यामागे काय चालते ह्याची माहिती दिली होती तसेच ह्या क्षेत्रात पत्कराव्या लागणाऱ्या धोक्यांची माहिती दिली होती.

 

 

रेशमा पठाण ह्यांचा हा कष्टप्रद प्रवास व त्यांच्या कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा व वचनबद्धता सर्वांसाठीच प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या आयुष्याच्या प्रवासातून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो.

ही “शोले गर्ल” अजूनही अजेय म्हणजेच अनस्टॉपेबल आहे. तुम्ही मनाशी पक्के ठरवले तर तुम्ही कुठल्याही संकटावर मात करून परत आपल्या पायांवर खंबीरपणे उभे राहू शकता हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

आजही वयाच्या ६५ व्या वर्षीही त्या अविरत काम करीत आहेत. अनेक चित्रपटांत स्टंट डबलचे काम करीत आहेत, अभिनय सुद्धा करीत आहेत.

त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘द शोले गर्ल रेशमा पठाण’ हा चित्रपट सुद्धा आलाय. ह्या चित्रपटात त्यांचे धाडस, सामर्थ्य आणि अतुलनीय धैर्य ह्यांचे चित्रण करण्यात आले आहे.

Sholay Girl Screening Inmarathi
Zee5

 

पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात आपले मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या धाडसी रेशमा पठाण ह्यांना एक कडक सॅल्यूट!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?