' स्वतःचे आयुष्य वेचून सुंदरबन आणि तिथल्या रहिवाशांना वाचवणाऱ्या वृद्धाची कहाणी!

स्वतःचे आयुष्य वेचून सुंदरबन आणि तिथल्या रहिवाशांना वाचवणाऱ्या वृद्धाची कहाणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पश्चिम बंगाल व बांगलादेश ह्यांच्या दरम्यान पसरलेल्या गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या समुद्राकडील बाजूस असलेल्या जगातील सर्वात मोठ्या खारफुटीच्या जंगलप्रदेशाला आपण सुंदरबन म्हणून ओळखतो.

ह्या खारफुटीच्या जंगलात जैवविविधतेचे दर्शन घडते. ह्या जंगलात विविध प्राण्यांच्या विविध प्रजाती आढळतात.

छोटे शिंपले, दुर्मिळ कीटकांपासून ते मगरी व वाघांपर्यंत अनेक प्राण्यांच्या विविध प्रजातींचे हे घर आहे.

इथले वाघ केवळ प्राण्यांचीच शिकार करत नाहीत तर मासेमारी करून आपली भूक भागवतात. खारफुटीचे वन जितके विस्तृत, तितकी जैवविविधता ह्या प्रदेशात आढळते.

ह्या वनात आढळणाऱ्या रिव्हर मॅन्ग्रूव्ह किंवा काजळा ह्या वनस्पतीच्या फुलापासून अतिशय उत्तम प्रतीचा मध मिळतो.

हा मध इतक्या उत्तम प्रतीचा आहे की जगभरातून ह्या मधाला खूप जास्त मागणी आहे. म्हणूनच ह्या सुंदरबनात आढळणाऱ्या वाघाचा धोका पत्करून देखील इथले माधोक हे लोक जंगलात मध गोळा करण्यास जातात.

 

sunderban inmarathi
thefinancialexpress.com

 

भारत व बांग्लादेशात संयुक्तपणे पसरलेले हे सुंदरबन जगातील सर्वात मोठे व वैविध्यपूर्ण खारफुटीचे वन आहे. नैसर्गिकदृष्ट्या ह्या खारफुटीच्या जंगलाचे अनन्यसाधारण महत्व असून देखील स्वार्थी मानव मात्र कायमच निसर्गाची नासधूस करत आला आहे.

पण सुंदरबन आणि त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी झटणाऱ्या ह्या माणसाने मात्र आपल्या वयाची पन्नास वर्ष सुंदरबनाच्या संवर्धनात व्यतीत केली आहेत.

कोलकातापासून सुमारे १०० किमी लांब सुंदरबनच्या प्रदेशात वसलेले एक गाव काही दशकांपूर्वीच नष्ट झाले असते, पण निसर्गासाठी आयुष्य समर्पित केलेल्या एका व्यक्तीच्या प्रयत्नांमुळे हे गाव नष्ट होण्यापासून वाचले.

सुंदरबनचे रक्षक अशी ओळख असलेल्या तुषार कांजीलाल ह्या व्यक्तीच्या प्रयत्नांनी हे गाव सुरक्षित राहीले.

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी तुषार कांजीलाल हे ह्या सुंदरबनच्या प्रदेशात आले आणि इथल्या सुंदर निसर्गाच्या प्रेमातच पडले.

रवींद्रनाथ टागोर ह्यांचे कट्टर अनुयायी असलेले तुषार कांजीलाल ह्यांनी हजारो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत उज्ज्वल भविष्यासाठी बदल घडवण्यासाठी ह्या कार्यात उडी घेतली.

बेटर इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान आपल्या कार्याविषयी बोलताना ८४ वर्षीय तुषार कांजीलाल म्हणतात की,

“बहुतांश लोक रवींद्रनाथ टागोरांना एक पुरस्कार विजेते कवी आणि साहित्यकार म्हणून ओळखतात. पण फार कमी लोकांना हे माहिती आहे की त्यांनी ग्रामीण प्रदेशाच्या विकासासाठी सुद्धा मोलाचे योगदान दिले आहे.

 

kanjilal inmarathi
betterindia.com

 

खास करून त्यांनी जी तीन गावे दत्तक घेऊन त्यांचे नामकरण श्रीनिकेतन असे केले, त्या गावांसाठी तर त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले आहे. केवळ वरवरचे कार्य न करता त्या कार्यासाठी संपूर्ण झोकून देणे आणि आयुष्यभरासाठी नाती जोडणे ही मोलाची शिकवण त्यांनी दिली आहे.

टागोरांच्या विचारांचा आणि कार्याचा माझ्या मनावर खूप मोठा प्रभाव पडला आणि त्यांच्याच वाटेवर चालण्याचा मी निर्णय घेतला.”

त्यांच्या कार्याविषयी विस्तृतपणे बोलताना ते म्हणतात की,

“मी संपूर्ण देशात फिरलो. पण अखेर मी माझ्या राज्यात परत आलो आणि रंगाबालिया हे गाव मला सापडले. हे गाव सुंदरबनच्या एका बेटावर वसलेले आहे. ह्या गावाला विकासाचा अजिबातच स्पर्शही झाला नव्हता.

ह्या गावात साधे पिण्यायोग्य पाणी, प्राथमिक आरोग्यसेवा, पक्के रस्ते तसेच वाहतुकीची साधने इतक्या प्राथमिक व जीवनावश्यक सुविधा सुद्धा उपलब्ध नव्हत्या. शिक्षणाची सुद्धा येथे वानवाच होती.

म्हणूनच ह्या गावात कायमचे स्थायिक होण्याचा व इथल्या लोकांना माझ्या परीने जमेल ती मदत करून ह्या गावाचा विकास करण्याचा मी निर्णय घेतला.”

१ जानेवारी १९६७ साली तुषार कांजीलाल ह्या ठिकाणी स्थायिक झाले आणि तेव्हापासून सुंदरबनात राहणाऱ्या लोकांसाठी त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केली. ह्या दुर्गम भागात त्यांनी योग्य त्या तंत्राचा वापर करून जगातील सर्वात मोठ्या खारफुटीच्या जंगलाचे संवर्धन करण्याचे काम केले.

ह्या ठिकाणच्या समृद्ध वन्यजीवनाचे आणि खास करून रॉयल बंगाल टायगरचे रक्षण आणि संवर्धन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. गेली काही दशके तुषार कांजीलाल हे दुर्गम खारफुटीचा प्रदेश व आधुनिक जग ह्यांचातला दुवा म्हणून आयुष्य जगत आहेत.

तसेच अनेक प्रथितयश लोक व संस्थांना इथल्या लोकांच्या संघर्षमय आयुष्यात मदत करण्यासाठी आवाहन करत आहेत आणि अनेकांना हे कार्य करण्यासाठी प्रेरणा देत आहेत.

 

tushar inmarathi
thebetteridia.com

 

तुषार कांजीलाल ह्यांच्यासाठी हे कार्य करणे अत्यंत कठीण होते. हा मार्ग काही सोपा नव्हता. सुंदरबन प्रदेश हा भारत व बांगलादेशमध्ये २०००० चौरस किमीच्या परिसरात पसरलेला आहे. हा प्रदेश निसर्गसौंदर्याने नटलेला आहे तरीही कायम नष्ट होण्याच्या सावटाखाली आहे.

पर्यावरणात झालेल्या बदलांमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे सुंदरबनच्या काही बेटांवरील काही भाग समुद्राने गिळंकृत केला आहे.

त्यामुळे ह्या प्रदेशावर कायम संकट घोंघावते आहे. त्यामुळे हे जर सुरक्षित ठेवायचे असेल तर ही खारफुटीची वने जी ही मऊ जमीन धरून ठेवतात,ती वने सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे, असे तुषार कांजीलाल सांगतात.

“जेव्हा मी इथल्या गावकऱ्यांबरोबर काम करणे सुरु केले, तेव्हा आम्हाला अनेक अडचणी आल्या. सर्वात पहिली अडचण म्हणजे गावकऱ्यांच्या मनात आपल्याविषयी विश्वास निर्माण करणे.

तसेच त्यांना त्यांच्या प्राथमिक गरजांची ओळख करून देऊन त्यांना त्याविषयी जागृत करणे व त्यासाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करणे ह्या सुद्धा समस्या माझ्यापुढे होत्या. आमच्यापुढे असणारी आणखी मोठी समस्या म्हणजे पर्यावरणात होणारी घट!

मानवाने विध्वंस करून सगळं नष्ट करून टाकावे ह्यासाठी तर निसर्गाने हे सुंदर वन निर्माण केले नाही. पण ह्या विध्वंसामुळे ह्या भागाच्या आसपासच्या गावांवर व निसर्गावर भयंकर परिणाम होत चालले होते.

इथल्या लोकांना हे मौल्यवान जंगल आणि इथला अमूल्य निसर्ग जतन करायला हवा व त्यासाठी प्रयत्न करायला हवेत हे पटवून देण्यास मी मदत केली.” असे तुषार ह्यांनी सांगितले.

 

sundarban-beauty inmarathi
tripadvisor.in

 

तुषार कांजीलाल ह्यांनी पुढाकार घेतल्यामुळे ह्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, खारफुटीचे संरक्षण आणि वृक्षारोपण, ग्रामीण समुदायांमध्ये सुधारणा करण्यासाठी स्वयं-विकास योजना आणि सस्टेनेबल शेतीच्या पध्दतींचा वापर ही पावले उचलली गेली.

त्यांच्या ह्या कार्यामुळे त्यांनी अनेक महत्वाची पदे भूषवून अनेक जोखमीच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

सुंदरबन डेव्हलपमेंट बोर्डमधील सदस्य, ह्या संपूर्ण क्षेत्राच्या संवर्धनाच्या मास्टर प्लॅनच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष, आर्थिक व सामाजिक कल्याण राष्ट्रीय समितीचे सदस्य, भारत सरकारच्या CAPART च्या स्थायी समितीचे सदस्य अशी महत्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत.

त्यांच्या ह्या महत्वपूर्ण योगदानाचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९८४ साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर १९८५ साली त्यांचा द वीक ह्या मासिकाने ‘मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन गौरव केला.

द वीक हे मासिक दर वर्षी भारतातील अश्या सर्वोत्तम २० लोकांचा सन्मान करते जे समाजासाठी मोलाचे कार्य करीत असतात पण ज्यांच्याबद्दल लोकांना माहिती नसते.

त्यानंतर १९९६ साली त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला तसेच २००८ मध्ये जमनालाल बजाज फाऊंडेशन ह्यांच्याकडून ग्रामीण विकास विज्ञान व तंत्रज्ञान उपयोजन श्रेणीत जमनालाल बजाज पुरस्कार सुद्धा त्यांना जाहीर करण्यात आला व २००६ साली विश्व-भारती विद्यापीठाकडून रबिन्द्रनाथ टागोर पुरस्कार देण्यात आला.

 

tushar kanjilal inmarahi
indiapress.com

 

१५० वर्षांपूर्वी लाकूड मिळवण्यासाठी ब्रिटिशांनी सुंदरबनमधील झाडांची कत्तल सुरु केली ती आजतागायत थांबलेली नाही.

पण तुषार कांजीलाल व त्यांच्यासारख्या इतर लोकांनी मिळून आटोकाट प्रयत्न करून ही झाडांची कत्तल कमी करण्यात यश मिळवले आहे. आता ही कत्तल पूर्णपणे थांबवण्यासाठी सरकार व नागरिकांनाही ठोस प्रयत्न करावे लागतील.

“आणखी पन्नास वर्षानंतर सुंदरबन अस्तित्वात असेल की नाही ह्याबाबत मला खात्री नाही. मला भीती वाटते की कदाचित पुढच्या पिढीला ह्या सुंदरबनचे अप्रतिम सौंदर्य बघायलाच मिळणार नाही.”

तरीही मी अजूनही आशा सोडलेली नाही. तरुण पिढी हा सगळा विनाश बंद करून निसर्गाच्या संवर्धनासाठी पुढे येत आहे.

देशाच्या इतर भागातून सुद्धा जगातील सर्वात मौल्यवान नैसर्गिक चमत्कार असलेल्या ह्या सुंदरबनच्या संवर्धनासाठी असेच प्रयत्न होतील अशी मी आशा करतो.” असे तुषार कांजीलाल म्हणतात.

वयाच्या ८४व्या वर्षी सुद्धा तितक्याच जोमाने कार्यरत असणाऱ्या आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या, त्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या तुषार कांजीलाल ह्यांच्या कार्याला सलाम!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “स्वतःचे आयुष्य वेचून सुंदरबन आणि तिथल्या रहिवाशांना वाचवणाऱ्या वृद्धाची कहाणी!

  • April 5, 2019 at 7:50 pm
    Permalink

    Apratim.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?