' आपले रोजचे व्यवहार सुरळीत करणाऱ्या “जी मेल” च्या जन्माची अफलातून कथा… – InMarathi

आपले रोजचे व्यवहार सुरळीत करणाऱ्या “जी मेल” च्या जन्माची अफलातून कथा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

२००० च्या दशकात सुरुवातीला जीमेलवर आपला मेल आयडी असणे हे आपण कुणीतरी स्पेशल असण्याचे लक्षण लोक मानत होते. कारण तेव्हा आपल्याला कुणीतरी इन्व्हाईट पाठवल्याशिवाय आपल्याला जीमेलवर अकाउंट उघडता येत नसे. आणि त्यावेळी जीमेलवरून फक्त मर्यादित इन्व्हाईटस पाठवता येत असत.

ईमेलचा अतिशय सुरक्षित पर्याय म्हणून रेडीफ आणि याहू नंतर जीमेल पुढे आले आणि आता जीमेल वर अकाउंट असल्याशिवाय बऱ्याच गोष्टी आणि ऍप्स वापरता येत नाहीत.. आज ह्याच जीमेलच्या जन्माची गोष्ट आपण जाणून घेऊया.

आधुनिक वेबची सुरुवात केव्हा झाली असा कुणी प्रश्न विचारला तर त्याला आपण ज्या दिवशी जीमेल लाँच झाले तीच आधुनिक वेबची सुरुवात होती असे आपण म्हणू शकतो.

१ एप्रिल २००४ रोजी जीमेल लाँच झाले. सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन असलेले गुगल हे विनामूल्य ईमेलची सेवा देणार अशी कुजबुज इंटरनेटच्या विश्वात सुरु होती. पण एक सर्च इंजिन ईमेलची सेवा देणार ही आयडियाच त्यावेळी अनेकांना चकित करणारी होती. जीमेलची १ जीबी ही स्टोरेज कॅपॅसिटी सुद्धा मायक्रोसॉफ्टच्या हॉटमेलपेक्षा ५०० पटींनी जास्त होती.

पण असे होणे अशक्य आहे असेही अनेकांना वाटले. त्यात गुगलने नेमके १ एप्रिल रोजीच जीमेल ह्या सेवेबद्दल प्रसिद्धीपत्रक जाहीर केले तेव्हा अनेकांना ती एक प्रॅन्क असेल असेच वाटले होते.

 

discover.com

पण जीमेल ही कुठलीही गंमत किंवा प्रॅन्क नसून एक खरंच चांगली आणि जलद ईमेल सेवा होती आणि जीमेलने इंटरनेटच्या विश्वात क्रांतीच घडवली. काळाच्या ओघात अनेक बदल होत होत आज जीमेल ही जगात सर्वोत्तम फ्री ईमेल सर्व्हिस मानली जाते.

गुगलने लाँच केलेली ही फ्री ईमेल सर्व्हिस १९९८ साली गुगल हे सर्च इंजिन सुरू झाल्यापासून गुगलने दिलेली सर्वोत्तम आणि क्रांती घडवणारी सेवा आहे.

जीमेलने त्यावेळी प्रसिद्ध आणि लोकप्रिय असणाऱ्या हॉटमेल आणि याहू मेल चे शब्दश: बारा वाजवले. २००४ पासून आलेले जीमेल आज जगातील सर्वोत्तम ईमेल सर्व्हिस मानले जाते.

मोठ्ठे स्टोरेज, चांगले इंटरफेस, फास्ट आणि इन्स्टंट सर्च आणि इतर आधुनिक वैशिष्ट्यांसह जीमेल हे पहिले क्लाउड बेस्ड ऍप आहे असे आपण म्हणू शकतो. जीमेल हे पारंपरिक पीसी सॉफ्टवेअरला केवळ पूरक नसून त्या सॉफ्टवेअरला यशस्वीपणे रिप्लेस करण्याची क्षमता जीमेल कडे आहे.

जीमेलची मेसेजेस स्कॅन करण्याची पद्धत असल्याने त्यात कीवर्डस शोधले जातात आणि ते मेसेजेस ऍडव्हटारायझिंग साठी वापरले जाऊ नये आणि जीमेल वापरणाऱ्या व्यक्तीची ऑनलाईन प्रायव्हसी सुरक्षित राहावी ह्यासाठी आजही जीमेल कायम पावले उचलत आहे.

आजही जीमेल जितके सुरक्षित आहे तितकी इतर कुठलीही फ्री ईमेल सर्व्हिस सुरक्षित नाही.

गुगलमध्ये अंतर्गत निर्णय घेणाऱ्यांनी सुद्धा जीमेल हे प्रचंड आणि असंभवनीय प्रोजेक्ट आहे असे म्हटले होते. सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याच्या तीन वर्षे आधीपासून गुगलमध्ये जीमेलवर काम सुरु होते.

ह्या काळात हे प्रोजेक्ट यशस्वी होऊ शकेल की नाही ह्याबद्दल साशंक असलेल्या गुगलच्या लोकांनी हा प्रोजेक्ट अशक्यप्राय आहे असे अनेक वेळा दाखवून दिले होते. प्रचंड गुंतागुंतीच्या तांत्रिक बाबींपासून तर तात्विक पातळ्यांवर जीमेल तयार करणे किंवा ते यशस्वी होणे अशक्य आहे ह्यावर गुगलमधील अनेकांचे एकमत होते. अर्थात ते म्हणत होते तसे झाले असते तर आज आपण जीमेल न वापरता दुसरे काही वापरत असतो.

 

email-writing-tips-marathipizza02
india.com

गुगलने तेव्हा ज्या कुठल्या नव्या गोष्टी लोकांना दिल्या,त्यामागे जॉर्जेस हॅरिक ह्यांचे प्रयत्न होते. जेव्हा जीमेल सुरु झाले तेव्हा ते म्हणाले होते, “इंटरनेटसाठी हा फार महत्वाचा क्षण होता.”

गुगलमधील लोक जे काही काम करीत होते त्यापैकी २० टक्के वेळ हा जीमेलची बांधणी करण्यात त्यांनी घालवला होता.

ही गुगलची एक क्रांतिकारी पद्धत आहे की ते त्यांच्याकडे काम करणाऱ्या इंजिनिअर्सना त्यांच्या कामाच्या वेळांपैकी काही वेळ त्यांच्या खाजगी प्रोजेक्ट्ससाठी वापरायला परवानगी देतात. गुगलच्या ह्या आगळ्यावेगळ्या पॉलिसीमुळेच जीमेल शक्य झाले. जीमेलचे जनक पॉल बुशेट ह्यांनी २००१ च्या ऑगस्ट महिन्यापासूनच जीमेलवर काम करणे सुरु केले.

गुगलमध्ये येण्याआधी ते एका दुसऱ्या ठिकाणी काम करीत असत आणि तिथे काम करत असताना त्यांनी ईमेल सर्व्हिसचा असाच एक प्रयत्न केला होता जो अयशस्वी झाला.

त्यानंतर त्यांनी १९९९ साली गुगलसाठी काम करणे सुरु केले. ते गुगलचे तेवीसावे कर्मचारी म्हणून रुजू झाले होते.

जीमेलबद्दल सांगताना ते म्हणतात की, “मी १९९६ सालीच एक ईमेल प्रोग्रॅम तयार करण्याची सुरुवात केली होती. माझ्या डोक्यात होते की एक वेब बेस्ड ईमेल प्रोग्रॅम तयार करायचा! मी दोन आठवडे त्यावर काम केले पण नंतर मला कंटाळा आला.

त्यातून मी हे शिकलो की माझ्याकडे कायम एक वर्किंग प्रोडक्ट असणे अतिशय महत्वाचे आहे. पहिल्या दिवसापासूनच मी एक काम नक्की करतो की काहीतरी उपयोगी प्रोडक्ट तयार करणे आणि नंतर रोज त्यात सुधारणा करत राहणे.

जीमेलचे आधीचे कोड नेम कॅरिबू असे होते. स्वतःच्या ईमेल साठी एक सर्च इंजिन तयार करणे ही बुशेट ह्यांनी तयार केलेली पहिली उपयोगी गोष्ट होती.

आणि हे करण्यासाठी त्यांना फक्त एक ते दोन दिवसांचा वेळ लागला. गुगल ग्रुप्स हा त्यांचा पहिला प्रोजेक्ट होता. हा प्रोजेक्ट म्हणजे इंटरनेटचा महत्वाचा युझनेट डिस्कशन ग्रुप बद्दल होता.

त्यांनी फक्त ह्या ग्रुपच्या अत्यंत जलद सर्च फीचर हॅक केले आणि ते युझनेट कडे पॉईंट न करता त्यांच्या मेलकडे पॉईंट केले.

सुरुवातीला बुशेट ह्यांचे ईमेल सर्च इंजिन त्यांच्या डेस्कच्या सर्व्हरवर चालले. त्यांनी इतर इंजिनियर्सना त्यांची मते मागितली तेव्हा त्या इंजिनियर्सने सर्वात महत्वाचा त्यांना एकच सल्ला दिला की हे सर्च त्यांच्या मेलमध्ये सुद्धा व्हायला हवे. आणि बुशेट ह्यांनी ते सुद्धा शक्य करून दाखवले.

जीमेल मुळी सुरु झालेच ते त्याच्या सर्च फिचर सह! आणि हे फिचर त्यावेळच्या प्रसिद्ध आणि मोठ्या ईमेल सर्व्हिसेस पेक्षा खूपच चांगले होते आणि येथेच जीमेलच्या खास वैशिष्ट्यांचा पाया रचला गेला.

जर जीमेलची क्षमता हॉटमेल इतकीच असती तर जीमेलला इंडस्ट्रियल क्षमतेच्या सर्चची गरजच भासली नसती. कमी स्टोरेज असलेल्या ईमेलमध्ये काही हरवणे आणि ते शोधण्याची गरजच पडणार नव्हती.

पण जीमेल मुळे ईमेल कायमचे स्टोअर करू शकणे शक्य झाले. जीमेल आल्यापासून स्पेस वाचवण्यासाठी आणि लिमिट मध्ये स्टोरेज ठेवण्यासाठी ईमेल डिलीट करण्याची गरज संपली. त्यामुळे गुगलने प्रत्येक युझरला फक्त १०० एमबी इतकी स्पेस न देता एक जीबी इतकी प्रचंड स्पेस देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

 

Google Search.Inmarathi
quicknewstamil.com

प्रोडक्ट आणि स्ट्रॅटेजीच्याही दृष्टीने इतकी स्पेस देणे ही कल्पना अनेक लोकांना मूर्खपणाची आणि अशक्य वाटली. तरीही गुगलने प्रत्येक युझरला १ जीबी स्पेस देण्याचा निर्णय घेतला कारण जीमेल ही कमर्शियल सर्व्हिस होती.

गुगल आणि इतर साईट्स ह्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे गुगलने सर्च इंजिन असण्यावरच संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते.

त्यावेळी याहू, एक्ससाईट, lycos आणि इतर साईट्सने पोर्टल असण्यावर भर दिला होता. ह्या साईट्स स्पोर्ट्स पासून ते वातावरणापर्यंत आणि गेम्स पासून ते इतर सर्व विषय हाताळण्याकडे ह्या साईट्सने लक्ष केंद्रित केले होते. पोर्टल्स एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळत होत्या पण त्या सर्वच गोष्टी चांगल्याप्रकारे हाताळल्या जात नव्हत्या.

म्हणूनच अश्या वेळी जीमेल ही कल्पना अनेकांच्या पचनी पडली नाही. मायक्रोसॉफ्ट आपल्याला नष्ट करून टाकेल अशी भीती त्यावेळी अनेकांना वाटली.

पण सुदैवाने गुगलचे जनक लॅरी पीक आणि सर्जी ब्रिन ह्यांनी कायम बुशेट ह्यांना पाठिंबा दिला. त्यांना इतरांकडून फारसा पाठिंबा मिळाला नाही. एक दोन महिने एकट्यानेच ह्या प्रोजेक्टवर काम केल्यावर त्यांना संजीव सिंह हे इंजिनिअर सुद्धा ह्या प्रोजेक्टवर काम करू लागले. त्यानंतर अनेक लोक जीमेल टीम मध्ये आले.

२००४ मध्ये जीमेल सुरु झाल्यावर सुद्धा फक्त १२-१३ लोक जीमेलमध्ये काम करीत होते. पुढे २००६ साली बुशेट व सिंह ह्यांनी गुगल सोडून फ्रेंडफीड ही सोशल नेटवर्किंग स्टार्टअप सुरु केले. नंतर २००९ साली ते फेसबुकने ताब्यात घेतले.

जीमेलचे पहिले प्रोजेक्ट मॅनेजर ब्रायन राकोवस्की ह्यांना जीमेलबद्दल त्यांच्या बॉस कडून म्हणजे मारिसा मेयर ह्यांच्याकडून त्यांच्या गुगलमधील कामाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २००२ साली कळले. तेव्हा ब्रायन नुकतेच कॉलेजचा अभ्यास पूर्ण करून नोकरीला लागले होते.

आजही ते गुगलमध्येच कामाला आहेत फक्त आता ते अँड्रॉईडवर काम करतात. तेव्हा त्यांना जीमेलचा कच्चा मसुदा बघून हा प्रोजेक्ट इंटरेस्टिंग आहे असेच वाटले होते. तेव्हाचे रफ ड्राफ्ट मध्ये असलेले जीमेल आताच्या जीमेलपेक्षा आणि लाँच झाले त्या जीमेलपेक्षा खूपच वेगळे होते.

ते जीमेल हे गुगलच्या इंजिनियर्सना फार आवडेल पण सर्वसामान्य युझर्सना ते फारसे आवडणार नाही असे तेव्हा ब्रायन ह्यांना वाटले होते.

तर असे हे सगळे जीमेलचे निर्माते तेव्हा स्वतःला आवडेल, रुचेल आणि वापरण्यास सोपे असलेले प्रोडक्ट तयार करण्यात गुंतलेले होते. त्यांची अशी दूरदृष्टी होती की ईमेलच्या ज्या समस्या त्यांना येतात त्या पुढे जाऊन सामान्य युझरला सुद्धा येऊ शकतील.

“आता आपण जसे आहोत तसे सामान्य युझर्स येत्या दहा वर्षांत असतील” ही दूरदृष्टी गुगलच्या लॅरी पेज ह्यांच्याकडे होती असे ब्रायन सांगतात.

ऑगस्ट २००३ मध्ये जीमेलवर काम सुरु होऊन दोन वर्षे झाली होती. आणि इतक्या वेळात जीमेलचे फक्त प्राथमिक स्वरूप तयार झाले होते. त्याच वेळी गुगलचे नवे सदस्य केव्हिन फॉक्स जीमेलच्या टीममध्ये आले आणि त्यांना जीमेलचे इंटरफेस तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली.

 

gmail inmarathi

 

फॉक्स ह्यांना माहिती होते की जीमेल हे गुगलशी मेळ खाणारे असायला हवे. पण त्याचे डिझाईन नेमके कसे असायला हवे हे त्यांच्या नेमके लक्षात येत नव्हते. तसेच ह्या सर्व्हिस मध्ये काय काय असणार आहे ह्याचीही स्पष्ट कल्पना कंपनीने तेव्हा त्यांना दिली नव्हती. गुगलचे तगडे सर्च इंजिन ह्यांच्याशिवाय फॉक्स ह्यांना डिझाईची कल्पना डोक्यात येण्यासाठी फक्त गुगल न्यूज हीच सर्व्हिस तेव्हा उपलब्ध होती. गुगल न्यूज ही सेवा गुगलने २००२ साली सप्टेंबर महिन्यात सुरू केली होती.

पण सर्च इंजिन आणि न्यूज ह्या दोन्ही वेबसाईट्स होत्या. आणि जीमेल हे वेब मेल ऍप असणार होते. हे प्रोडक्टच वेगळ्या स्वरूपाचे असणार होते. फॉक्स सांगतात की कंपनीने त्यांना विविध डिझाइन्स तयार करण्यासाठी भरपूर वाव दिला.

फॉक्स ह्यांनी मग दोन्ही वेबसाईट्स आणि डेस्कटॉप ऍप्लिकेशन्सची निव्वळ नक्कल न करता त्यातून फक्त काही आयडिया घेऊन त्यांचे डिझाईन तयार करण्याचे ठरवले. त्यांनी तीन वेगवेगळी डिझाइन्स तयार केली पण ती त्यांना स्वतःलाच फारशी रुचली नाहीत. शेवटी एक डिझाईन नक्की ठरवण्यात आले. ते डिझाईन आजच्या जीमेलच्या डिझाईनशी मिळतेजुळते होते.

जीमेल ही साईट म्हणून न डिझाईन करता एक ऍप म्हणून डिझाईन करणे ह्यात अनेक तांत्रिक अडचणी सुद्धा होत्या. १९९० च्या दशकात हॉटमेल आणि याहू मेल आले होते.

पण त्यांचा इंटरफेस अतिशयच धीम्या गतीने चालत होता. आणि त्यांचे हे इंटरफेस हे प्लेन HTML मध्ये राईट केलेले होते. ह्यामुळे तुम्ही कुठलीही ऍक्शन घेतली किंवा कमांड दिली की त्या सर्व्हिसमध्ये संपूर्ण वेब पेजच रीलोड करावे लागत असे. ह्या मेल सर्व्हिस वापरणे म्हणजे एक वेगळाच थंड आणि धीमा अनुभव होता. ह्या ईमेल सर्व्हिसमध्ये विंडोज किंवा मॅक प्रोग्रॅमची चपळता अजिबातच नव्हती.

बुशेट ह्यांनी HTML च्या मर्यादित प्रोग्रॅममध्ये आणि अतिशय इंटरऍक्टिव्ह असलेल्या जावास्क्रिप्ट कोड मध्ये काम केले. ह्यामुळे जीमेल हे वेब पेजेसचा एक सिक्वेन्स न वाटता एक सॉफ्टवेअरप्रमाणे तयार झाले.

आज ज्या प्रोग्रॅमचा वापर करून सगळे वेब पेजेस तयार केले जातात, त्यावेळी ह्याच तंत्राचा वापर करून जीमेल तयार करण्यात आले. पण हे तंत्र नीट चालू शकेल आणि काम करू शकेल की नाही ह्याची तेव्हा कुणाला खात्री नव्हती.

तसेच जावास्क्रिप्टचा वापर करणे ही कल्पनाच त्यावेळी कुणाला पटली नव्हती असे बुशेट सांगतात. “तेव्हा आपले वेब ब्राऊझर्स तितकेसे चांगले आणि सक्षम नव्हते.आम्हाला भीती होती की आम्ही तयार करत असलेल्या प्रोग्रॅममुळे वेब ब्राऊझर्स क्रॅश होतील आणि मग कुणीच ह्या प्रोग्रॅमचा वापर करू इच्छिणार नाही”, असे बुशेट म्हणाले.

पण जीमेलमध्ये अधिकाधिक जावास्क्रिप्टचा वापर केल्या गेल्यामुळेच जीमेल अधिकाधिक सोफिस्टिकेटेड होऊ शकले. जीमेलच्या मुख्य फीचर्सपैकी एक म्हणजे आपल्या इनबॉक्समधील संदेश हे कंपलसरी सीक्वेनशियल नाहीत.

ह्याउलट युझर्सना डिस्कशन थ्रेड्सप्रमाणे मेसेजेस दिसावेत ह्या पद्धतीने जीमेल डिझाईन करण्यात आले. सगळे मागचे पुढचे एका डिस्कशनमधील मेसेजेस कन्व्हरसेशन नामक एका समूहात एकत्रित ठेवण्यात आले. पण हे तांत्रिक दृष्ट्या सर्वात मोठे चॅलेंज होते.

हे सगळे तांत्रिक प्रश्न सुटल्यानंतर प्रश्न आला जीमेलच्या बिझनेस मॉडेलचा! गुगलमधील अनेकांचे म्हणणे होते की जीमेल ही पेड सर्व्हिस असायला हवी.

पण बुशेट आणि इतर अनेक लोकांचे म्हणणे होते की ही सर्व्हिस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी. त्यामुळे ही सर्व्हिस मोफत असायला हवी आणि तिला आर्थिक पाठबळांसाठी ऍडव्हरटाईझमेंट्स असायला हव्या असे त्यांचे म्हणणे होते. त्यावेळी ज्या फ्री ईमेल सर्व्हिस होत्या त्यांच्या सर्व्हिस मध्ये फ्लॅशी ग्राफिकल बॅनर ऍड्स , लहान लहान टेक्स्ट ऍड्स सुद्धा होत्या. अर्थातच आज हे सगळे गुगलच्या सर्च रिझल्ट्समध्येही दिसते .

बुशेट म्हणतात , “आम्हाला जीमेलमध्ये बॅनर्स नको होते हे आम्ही आधीपासूनच ठरवले होते. म्हणूनच जीमेलमध्ये लहान लहान टेक्स्ट ऍड्स ठेवण्याचे आम्ही ठरवले. ह्या ऍड्स युझरच्या ईमेलमधील टेक्स्ट मध्ये असलेल्या कीवर्डस वरून त्या ऍड्स युझरला दिसणार असे जीमेलचे डिझाईन असणार होते. म्हणजे थोडक्यात जर दोन व्यक्ती त्यांच्या ईमेलमध्ये बीच बॉईज कॉन्सर्ट बद्दल बोलत असतील तर त्यांना त्यांच्या इनबॉक्समध्ये तिकीट एजन्सीबद्दलच्या दोन ऍड्स दिसतील ,अशी ही सिस्टीम होती.” सुरुवातीला हे उदाहरण गुगलनेच त्यांची सिस्टीम समजावून सांगण्यासाठी दिले होते.

जीमेलमध्ये ऍड्स मधून किती आर्थिक फायदा होऊ शकेल ह्याचा अंदाज त्यावेळी येत नव्हता. आणि ऍडव्हर्टाइझमेंट मधून होऊ शकणार फायदा इतकीच ही समस्या मर्यादित नव्हती.

इतर ईमेल सर्व्हिसेस स्पॅम आणि व्हायरस चेक करण्यासाठी ईमेल स्कॅन करतच होते. पण हेच स्कॅनिंग ऍडव्हर्टाइजमेण्ट साठी करणे ही कल्पना पूर्णपणे नवीन होती. आणि आपले खाजगी मेसेजेस इतर कुणी वाचतंय ,मग ते मशीन का असेना ही कल्पना बऱ्याच लोकांना [पटणार नाही हे गुगलला चांगलेच माहिती होते.

“आम्ही जे केले,ते करण्याच्या आधी आम्ही खूप विचार केला” असे हॅरीक म्हणतात. “आम्ही विचार केला की हा मशीनने ईमेलचे स्कॅनिंग म्हणजे खरोखर एखाद्याच्या प्रायव्हसीचा भंग केल्यासारखे होईल का? पण मग आम्ही असाही विचार केला की हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा भाग आहे.”

जीमेल तयार करताना हा प्रोजेक्ट पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आला होता. गुगलमधील काही व्यक्ती सोडल्या तर इतरांना ह्या गोपनीय प्रोजेक्टची काहीही कल्पना देण्यात आली नव्हती. फॉक्स म्हणतात की हा प्रोजेक्ट लाँच होईल की नाही ह्याविषयी सुद्धा आम्हाला खात्री नव्हती. पण २००४ सालच्या सुरुवातीला जीमेल व्यवस्थित सुरु झाले आणि ते यशस्वीपणे चालले.

 

google-birthday-inmarathi02
hindustantimes.com

गुगलमधील सर्वच लोक ह्या ऍपचा वापर करू लागले. कंपनीच्या अंतर्गत ईमेल सिस्टीमसाठी जीमेलचाच वापर होऊ लागला. आणि आता ह्या प्रोजेक्टचे लोकार्पण करण्याचे ठरले आणि कंपनीने १ एप्रिल ही तारीख ठरवली.

१ एप्रिल ही काही सामान्य तारीख नव्हती. गुगलने त्यांची एप्रिल फूल करण्याची परंपरा २००० सालापासून सुरु केली होती. गुगल चंद्रावर एक रीसर्च सेंटर तयार करणार आहे आणि त्यासाठी ते योग्य उमेदवारांच्या शोधात आहेत अशी २००४ साली अफवा पसरली होती.

त्यामुळे ह्याच वेळी जीमेलची घोषणा करणे ही सुद्धा एक अफवा असेल असे लोकांना वाटले होते. कारण २००४ साली १ जीबी इतकी स्पेस देणे हे अशक्य असल्याचे अनेकांना वाटले होते.

पण १ एप्रिल ही डेडलाईन गाठण्यासाठी जीमेलच्या टीम मधील लोकांना दिवसरात्र एक करून काम करावे लागले. जीमेल लाँच करण्यासाठी गुगल पूर्ण तयार सुद्धा नव्हते. त्यावेळी लाखो लोकांना सुरक्षित मेल आयडी देणे आणि इतकी गिगाबाईट स्पेस देणे ह्यासाठी गुगलच्या सर्व्हरची क्षमता तितकी सक्षम नव्हती. बुशेट सांगतात की,

“आम्ही जीमेल लाँच केले तेव्हा आम्हाला कॅच २२ चा सामना करावा लागला. लोकांना वाटले की आम्ही लाँच करू शकणार नाही म्हणून आम्हाला जास्त मशिन्स मिळू शकल्या नाहीत,पण खरे तर आम्हाला पुरेश्या मशिन्स मिळू शकल्या नाहीत म्हणून आम्ही लाँच करू शकलो नाही.”

अखेर जुन्या पेंटियम थ्री कंप्यूटरवर जीमेल चालले. कंपनीने ठरवलेल्या लिमिटेड बीटा रोलआउटसाठी हे पुरेसे होते. ह्यात कंपनीने गुगलच्या बाहेरच्या हजार लोकांना जीमेल अकाउंट दिले. आणि त्यांना इतर काही मर्यादित लोकांना इन्व्हाईट पाठवण्याची सुविधा दिली. इथूनच जीमेलच्या वाढीला सुरुवात झाली.

कंपनीने जीमेल लाँच करण्याच्या एक दिवस आधीच म्हणजे ३१ मार्चलाच जीमेलची बातमी सगळीकडे पसरली. आणि ती जीमेलबद्दल चर्चा एप्रिल फूल्स डे आणि त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच होती.

अनेकांना ह्यात १ एप्रिल ही तारीख असल्यामुळे जीमेलच्या सत्यतेबद्दल शंका होती. “तुम्ही जगाच्या फारच पुढे असाल तर लोकांना तुम्ही सत्य बोलत आहात की जोक करत आहात हे कळत नाही, पण तुम्हाला माहिती असते की तुम्ही काहीतरी नवे शोधून काढले आहे.”

सुरुवातीला पत्रकार आम्हाला फोन करून विचारत असत की जीमेल हे नक्की खरे आहे की तुम्ही मंडळी जोक करत आहात हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तेव्हा आम्हाला गम्मत वाटत असे” ,असे हॅरीक म्हणतात.

जेव्हा लोकांना हे कळले की जीमेल खरे आहे, तेव्हा जीमेल इन्व्हिटेशन्स ही एक मौल्यवान गोष्ट झाली. खरे तर मर्यादित इन्व्हिटेशन्स ही तेव्हा सर्व्हरची गरज होती.

पण प्रत्येकाला अधिकाधिक इन्व्हिटेशन्स आणि जीमेल अकाउंट हवे होते. जीमेलचे मर्यादित इन्व्हिटेशन्स ही टेक इंडस्ट्रीमधील सर्वोत्कृष्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी समजली जाते. अर्थातच हे अनावधानाने घडले होते.

लोक ebay वर इन्व्हिटेशनसाठी १५० डॉलर्सपर्यंत बोली लावत होते. तेव्हा असे झाले होते की तुमच्याकडे हॉटमेल किंवा याहूमेल चे अकाउंट असणे हे लोकांना कमी दर्जाचे वाटू लागले होते आणि तुमच्याकडे जीमेलचे अकाउंट आहे म्हणजे तुम्ही कुणीतरी खास आहात आणि सामान्य लोक ज्या क्लब मध्ये येऊ शकत नाहीत त्या क्लब मध्ये तुम्ही आहात,असे काहीतरी त्यावेळी लोकांना वाटत होते.

जीमेलचे इतके यश बघून सुद्धा बुशेट म्हणतात की त्यावेळी जर आम्हाला आणखी स्रोत मिळाले असते तर जीमेल आणखी प्रगत झाले असते. २००४ नंतर वेळोवेळी जीमेलचे इन्व्हिटेशन्स वाढविण्यात आले आणि दिवसेंदिवस अधिकाधिक लोक जीमेलशी जोडले जाऊ लागले.

पण नवीन आलेल्यांना सर्वच सुविधा तेव्हा मिळाल्या नव्हत्या. पण २००७ च्या १४ फेब्रुवारीला जीमेलने सर्वांनाच विनामूल्य सर्व्हिस देण्याचे जाहीर केले.

पण जीमेलमध्ये ईमेलमधील किवर्ड ओळखून त्याप्रमाणे ऍड्स येणार ही कल्पना अनेकांना पातळी नाही. अर्थात गुगलला ह्याची कल्पना होतीच. अनेक लोकांनी असे मत व्यक्त केले की ह्यामुळे युझर्सची प्रायव्हसी धोक्यात येते.

अनेकांनी हा प्रश्न उपस्थित केला की ह्या सगळ्या डेटाचे गुगल काय करणार आहे आणि तो डेटा किती काळापर्यंत जपून ठेवणार आहे? ह्यावर अनेकांनी आक्षेप घेतले, गुगलच्या प्रमुखांना जीमेल बंद करण्याविषयी पत्रे वगैरे पाठवली. कॅलिफोर्निया स्टेट सिनेटर लिझ फिग्युरोआ ह्यांनी सुद्धा गुगलला पत्र पाठवले. त्या पात्रात त्यांनी असे लिहिले की जीमेल ही गुगलच्या लोकांसाठी आणि गुगलच्या ग्राहकांसाठी सुद्धा एक मोठी आपत्ती आहे. त्यांनी एक बिल सुद्धा तयार केले.

ह्यात त्यांनी असे लिहिले होते की जर कंपनी त्यांच्या युझर्सचे ईमेल स्कॅन करत असेल तर त्यासाठी त्यांनी युझर्सची परवानगी घेणे आवश्यक आहे. पण कॅलिफोर्निया सिनेटने ही बिल पास करेपर्यंत काही लोकांनी ह्या गोष्टीत हस्तक्षेप करून हा नियम हटवण्यात आला.

आज जीमेल जास्त ऍक्शन ओरिएंटेड करणे हे जीमेलपुढे असणारे आव्हान आहे. आता तर गुगलने लाईव्ह फ्लाईट स्टेट्स इन्फॉर्मेशन मेसेजेसमध्ये देणे सुरु केले आहे. ह्याच सगळ्या सुविधा आता टॅबलेट आणि फोनमध्ये सुद्धा गुगल देत आहे. जीमेलचे सध्याचे प्रोडक्ट मॅनेजर ऍलेक्स गॉली म्हणतात की असेच अनेक आधुनिक फीचर्स जीमेलमध्ये आणण्यासाठी जीमेलची टीम सतत काम करीत आहे. असे आधुनिक फीचर्स आणणे जे जीमेलच्या टीमपुढे मोठे चॅलेंज आहे आणि हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी जीमेलची टीम पुढची पाच वर्ष तरी बिझी राहणार आहे.

इंटरनेटवर क्रांती घडवणारे बुशेट हे मात्र मान्य करतात की “ईमेलने माणसाला गुलाम बनवून टाकले आहे. आता २४/७ कल्चर तयार झाले आहे. आणि लोकांना जलद रिप्लायची अपेक्षा असते.

रात्री बेरात्री सुद्धा ईमेल केला तर त्याला चटकन रिस्पॉन्स यावा अशी लोक तुमच्याकडून अपेक्षा करतात. रविवार नाही, सुट्टी नाही. लोक सतत अव्हेलेबल असतात आणि दुसऱ्यानेही तसेच करावे अशी त्यांची अपेक्षा आहे. माणूस हा ईमेल्सचा गुलाम झाला आहे. आणि हा काही टेक्निकल प्रॉब्लेम नाही. तो कंप्यूटर अल्गोरिदमने सोडवता येऊ शकतो. ही एक सामाजिक समस्या निर्माण झाली आहे.”

स्वतः जीमेलचा जनकच हे मान्य करत असेल तर ह्या समस्येची तीव्रता आपल्याला लक्षात येऊ शकते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?