उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र चाचणीचे परिणाम काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : अंबरीश फडणवीस

===

२७ मार्च रोजी सकाळी भारताने पृथ्वीच्या लो-अर्थ-ओर्बीट (LEO) या कक्षेत भ्रमण करणाऱ्या उपग्रहांना टिपू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. पंप्र मोदींनी सकाळी ११:२३ ला केलेल्या tweet मुळे अनेकांचे थांबे दणाणले होते आणि आमच्यासारख्या जिंगो-लोकांना उत आला होता की आता घोषणा काय करतील.

एका तासाच्या विलंबानंतर मोदींनी भारताच्या उपग्रह-विरोधी क्षेपणास्त्राच्या चाचणीची माहिती देशाला दिली. मजेशीर प्रतिक्रिया बघायला मिळाल्या.

काहींचा भ्रमनिरास झाला, काहींना अपेक्षित असलेले पाकिस्तानशी युद्ध किंवा मसूद-अझहर चा मृत्यू वगैरे नाही मिळाल्यामुळे थोडा हिरमोड झाला, बहुतेक मोदींच्या विरोधकांनी आणि द्वेष्ट्यांनी तर सरळ याचे सुद्धा श्रेय पंडित नेहरूंना देऊन टाकले. थोडक्यात काय तर दुपार मोठी मजेशीर गेली.

पण आज झालेल्या चाचणीचा अर्थ काय, हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. आजच्या चाचणीचे दोन परिमाण आहेत – तांत्रिक आणि भूराजकीय.

 

asm-inmarathi
news18.com

भाग १ – चाचणीचे तांत्रिक परिमाण

मी खूप आधी (सुमारे १० वर्षांपूर्वी, ओर्कुटच्या काळात) भारताच्या जी.एस.एल.वी आणि त्यात उपयोगात येणाऱ्या क्रायोजेनिक इंजिनावर एक लेख लिहिला होता. दुर्दैवाने माझा जुना फडणविशी ब्लॉग गुगल ने काहीही न सांगता काढून टाकला, त्यामुळे माझे असंख्य लेख नष्ट झाले. archives आणि cache मधून मी जे लेख वाचवू शकलो, त्यांना या नवीन ब्लोगवर टाकले आहे.. सुदैवाने क्रायोजेनिक इंजीनावरचा हा लेख वाचला.. त्याची लिंक मी इथे देत आहे. वाचकांनी तो लेख अगोदर वाचवा, आणि मग इथे पुढे सरकावे हा माझा सल्ला..

भारताचे क्रायोजेनिक रॉकेट इंजिन आणि कावेरी जेट इंजिन

वरील लेखात तुम्हाला हे कळेल कि मनुष्याला पुढे जायला काहीतरी मागे सोडावे लागते. सहसा मागे सोडलेली गोष्ट माणसाने “जाळून” सोडलेली असते. कुठलीही गोष्ट जळायला आवश्यक अश्या दोन वस्तू – इंधन आणि प्राणवायू (ऑक्सिजन). अंतरिक्षात हवा नसते, त्यामुळे नुसते इंधन नेऊन उपयोगाचे नाही, सोबत ऑक्सिजन सुद्धा न्यावा लागतो.

तर क्रायोजेनिक इंजिन मध्ये इंधन असते हायड्रोजन आणि सोबत जाळायला ऑक्सिजन. हे दोन्ही – २५० डिग्री सेल्शियस इतक्या तापमानावर ठेवलेले असतात, त्यांना क्षणार्धात वायुरूपात बदलवून ज्वलन घडवणे (कंट्रोल मध्ये, नाहीतर स्फोट व्हायचा) हे फार क्लिष्ट इंजिनियरिंग आहे.

अश्या रॉकेट मध्ये वेगवेगळ्या स्टेज असतात, वरील परिच्छेदात वर्णिलेली स्टेज हि क्रायोजेनिक स्टेज म्हणवते. या स्टेज मध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन च्या टाक्या असतात ज्यात द्रवरूपातील हे वायू प्रक्षेपणाच्या काही तास अगोदर भरले जातात.

इतक्या मोठा टाक्या भरायला भरपूर वेळ लागतो, जो प्रोब्लेम नसतो कारण अंतराळ प्रक्षेपणे हि कित्येक महिने अगोदर ठरवलेली असतात, त्यांच्या प्रक्षेपणाचे ठिकाण ठरलेले असते आणि त्या ठिकाणी सर्व उपकरणे, सामग्री आणि काही प्रोब्लेम झाल्यास तो निस्तरायला इंजिनियर/वैज्ञानिक तत्पर असतात. तीनही शिफ्ट मध्ये.

 

 

एक सामरिक मिसाईल हे दिसायला जरी रॉकेट सारखे असले (टेक्निकली ते रॉकेटच) तरी वरील परिच्छेदात वर्णिलेल्या सोयी आणि सुविधा क्षेपणास्त्राला मिळत नाहीत. कारण क्षेपणास्त्र सोडायची वेळ युद्धात येते आणि युद्धजन्य परिस्थितीत वेळ आणि जागा हि सर्वात महत्वाची. म्हणून सहसा युद्धात वापरायच्या क्षेपणास्त्रांमध्ये इंधन हे द्रवरुपातले नसते तर घनरुपातले असले (solid fuel). सहसा क्षेपणास्त्रे पृथ्वीचे वातावरण सोडत नाहीत, त्यामुळे इंधन जळायला लागणारा ऑक्सिजन हवेतूनच मिळतो..

अगदी १०,००० किमी मारा करू शकणारी ICBM (Inter-Continental Ballistic Missile) सुद्धा फार उंच जातात पण वातावरणाच्या बाहेर जात नाहीत. त्यामुळे ऑक्सिजन चे काय करायचे – हा प्रश्न त्यांना कधीच पडत नाही.

एका टिपिकल क्षेपणास्त्राची वाट (trajectory) हि सहसा अशी दिसते –

आपण हवेत फेकलेला दगड सुद्धा याच मार्गाने जातो – जोवर आपण दिलेली शक्ती आहे तोवर दगड वर जातो, मग एका उंचीवर जाऊन तो थांबतो (गती शून्य होते) आणि मग तितक्याच वेगाने येऊन खाली पडतो. क्षेपणास्त्र देखील असेच काम करते, त्याच्या सर्वोच्च बिदुवर त्याची गती सर्वात कमी असते (एखाद्या सेकंदासाठी गती शून्य होते).

कुठल्याही क्षेपणास्त्राला पाडायला, हा सर्वात सोपा बिंदू आहे. या बिंदू नंतर खाली पडतांना क्षेपणास्त्र गुरुत्वाकर्षण मुळे वेग धरते आणि जेव्हा ते टार्गेट वर आदळते त्याची गती आवाजाच्या ७-१० पट असते (mach 7-10).

क्षेपणास्त्राच्या खाली पडतांनाच्या स्टेज मध्ये त्याला अडवून नष्ट करणे (interception) जवळपास अशक्य असते. कारण विलक्षण गती. तुमच्या रडार ते पडतांना दिसते पण ते इतक्या वेगात पडत असते (गुरुत्वाकर्षण त्याला साथ देते आहे) कि तुम्ही त्याचे सहसा काहीच करू शकत नाही. ध्वनीचा दहापट वेग म्हणजे जवळपास तासाला १०,००० किमी हा स्पीड..

हे झाले साधारण क्षेपणास्त्र.

आज ज्याची चाचणी झाली, त्या क्षेपणास्त्राला पाच मुख्य प्रॉब्लेमना सामोरे जावे लागते.

१. ३००-५०० किमी उंचीवर वातावरण नाही – इंधन जळायला ऑक्सिजन येणार कुठून – सोबत न्यावा लागेल.

 

horisons-inmarathi
space.com

२. द्रव रुपात ऑक्सिजन नेता येणार नाही (टाकी भरायला तासंतास लागतात – युद्धात इतका अवधी कसा मिळणार). घन रुपात शुद्ध ऑक्सिजन नेणे शक्य नाही युद्धजन्य परिस्थितीत. त्यामुळे ऑक्सिजन सोडणारे oxidants सोबत असतात – क्लिष्ट केमिस्ट्री आहे – विश्वास ठेवा. इथे सांगता येणार नाही.

३. क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाच्या ठिकाणाचा भरोसा नाही – हे युद्ध आहे, कुठूनही प्रक्षेपण करता आले पाहिजे (विमानातून, जहाजातून, पाणबुडीतून, ट्रकच्या कंटेनर मधून, रेल्वेतून). प्रक्षेपण करणारे लोक हे सैनिक असतात, शास्त्रज्ञ नाही, काही प्रोब्लेम आला तर तो दुरुस्त करायला कुणीही नसणार.

अधिक, ट्रक जर जबलपूरच्या एखाद्या माळरानात उभा असेल तर इंजिनियर कुठून आणणार? त्यामुळे ready-to-launch स्वरुपात असलेल्या canister मध्ये यांना स्टोर केलेले असते.

४. सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे या क्षेपणास्त्राचे जे टार्गेट आहे ते सेकंदाला ८-१५ किमी या गतीने पृथ्वीची प्रदक्षिणा करत असते. सेकंदाला ८-१५ किमी म्हणजे ताशी ३२,५०० ते ५४,००० किमी – हा वेग.. मी वर म्हंटले आहे – इतक्या वेगात जाणाऱ्या वस्तूला बघणे सोपे आहे (tracking) पण अडवणे (interception) खूप कठीण.

साधारण क्षेपणास्त्राचे टार्गेट स्थिर असते किंवा तुलनेने खूप हळू चालत, अगर उडत असते. वरील आकृतीनुसार सर्वोच्च बिंदूवर साधारण क्षेपणास्त्राची गती शून्य असते – शून्य (किंवा सर्वात कमी गती असलेला बिंदू) गती असतांना सेकंदाला ८-१५ किमी गतीने जाणार्या उपग्रहाला पोहोचायचे कसे?

५. बरे गणिताने टायमिंग साधून जर क्षेपणास्त्र सोडले तर ते उपग्रहाजवळ जाईल देखील. पण मग त्या क्षणी त्या उपग्रहाला फोडायचे कसे? दोन मार्ग आहेत. पहिला सर्वात सोपा आणि सर्वात inefficient म्हणजे proximity fuse. म्हणजेच थोडेफार जवळ जाऊन जोरात स्फोट घडवायचा. आपल्यापासून ५० मीटर वर मोठा स्फोट झाला तरी आपल्याला इजा होते.

प्रत्यक्ष आपल्या अंगावर बॉम्ब फुटायची आवश्यकता नाही. दुसरा मार्ग म्हणजे Kinetic Kill. Kinetic kill म्हणजे प्रत्यक्ष धक्का देऊन मग स्फोट करणे. ८-१५ किमी/सेकंद गतीने जाणाऱ्या उपग्रहाला धक्का देणे म्हणजे स्वतः देखील जवळपास त्याच गतीने प्रवास करणे हे ओघाने आलेच.

क्षेपणास्त्राच्या सर्वोच्च बिंदूवर (जिथे गती सर्वांत कमी असते), तिथे ती सर्वात कमी गती हि ८-१५ किमी/सेकंद च्या रेंज मध्ये ठेवणे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे.

इतक्या वेगात स्वतः जात असतांना टार्गेट ला अंतरिक्षात बघणे, track करणे – जिथे सौर-लहरी असतात, कॉस्मिक-किरणे इलेक्ट्रोनिक वस्तूंना इजा पोहोचवत असतात, तापमानातील फरक आणि तफावत प्रचंड असते. आपण आज घेतलेल्या चाचणीत दुसरा मार्ग निवडला होता जो खचितच अत्याधिक अवघड आहे.

आज मोदींनी हे सांगितले नाही, पण चाणाक्ष लोकांच्या सहज लक्षात आले कि सेकंदाला ८-१५ किमी वेगाने जाणाऱ्या वस्तूला बघायचे (tracking) आणि अडवायचे (interception) – दोन्ही करायचे तंत्रज्ञान आता भारताकडे आहे – याचे अप्लिकेशन साधारण मिसाईल अवरोधी शिल्ड (anti ballistic missile defensive shield – ज्याला आपण Prithvi Aerial Defense – PAD – प्रद्युम्न आणि advanced air defence – AAD असे म्हणतो) इथे आहे.

आता येणाऱ्या मिसाईल ला भारत त्याच्या शेवटच्या टप्प्यात देखील भारत बघू आणि अडवू शकतो हे आपण शब्दात जाहीर न करता जगाला दाखवून दिले.

या पाच प्रॉब्लेम वरून तुम्हाला कळेल कि आज झालेली चाचणी हि तांत्रिक दृष्ट्या किती क्लिष्ट होती ते. आजची चाचणी हे सांगते कि आपण हे पाचही खूप क्लिष्ट असे प्रॉब्लेम सोडवले आहेत.. खूप मोठी गोष्ट आहे ही.

म्हणून आपल्या शास्त्रज्ञांचे आणि अभियंत्यांचे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे. तांत्रिक दृष्ट्या आजची चाचणी अणुचाचणी इतकीच क्लिष्ट आणि महत्वाची होती. ती करून भारताने एक खूप मोठा मैलाचा दगड सर केला आहे.

भाग दोन -चाचणीचे भूराजकीय परिमाण

बऱ्याच पुरोगामी लोकांची आज या कारणास्तव जळाली कि मोदींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात हि चाचणी जाहीर का केली? ती तशी करणे आवश्यक होते म्हणून.

वर सांगितल्या प्रमाणे, आजची उपग्रहरोधी क्षेपणास्त्र चाचणी हि तांत्रित दृष्ट्या अणुचाचणी इतकीच क्लिष्ट होती. पण ती राजकीय दृष्ट्या सुद्धा अणुचाचणी इतकीच महत्वाची होती.

लक्षात घ्या – आजचे संपूर्ण युग आणि या युगातील सर्व उपकरणे हि डिजिटली एकमेकांशी लिंक झालेली आहेत. अगदी आपण घरी दैनंदिन वापरणाऱ्या गोष्टी देखील आता आपण मोबाईल वरून लांबून हाताळू शकतो – कारण सगळे काही एकमेकांशी नेटवर्क झालेले आहे. घर-कार-फ्रीज-टीव्ही-एसी-वाशिंग मशीन-पंखे-दिवे-भांडे धुवायचे मशीन – सगळे काही एकमेकांशी डिजिटली लिंक झालेले आहे.

आपल्याकडे याचे प्रस्थ अजून यायचे आहे पण टीव्हीवर जाहिरातींमध्ये हे दिसू लागले आहे. हे सगळे नेटवर्क सांभाळायचे आणि संचालित करायचे काम हे अवकाशातील उपग्रह आणि जमिनी खालील optical fiber cable जाळ्याने होते.

यातील उपग्रह हा सर्वात महत्वाचा घटक – सगळे फोन, टीव्ही उपग्रहाच्या माध्यमातूनच संचालित होते. एक उपग्रह बनवायला कित्येक महिने लागतात, तो पडायला तीन मिनिटे लागतात.

अगोदर उपग्रह खूप उंच असल्या मुळे त्यांना कुणी हात लाऊ शकत नसे. शीतयुद्धात उपग्रह देखील क्षेपणास्त्रांच्या माऱ्याच्या कक्षेत आले. त्यामुळे एखाद्या देशाच्या सर्व उपग्रहांना पाडणे हे आता ३ मिनिटांचे काम झाले आहे. उपग्रह निकामी झाले कि संपूर्ण देश कोलमडतो, सगळे दळणवळण आणि त्यांची साधने बंद पडतात.

हे क्षेपणास्त्रे हि आजकालचे नवीन अणुबॉम्ब आहेत. अणुबॉम्ब ची भीती का होती (आणि आहे)? दुसऱ्या महायुद्धात जर एक शहर उध्वस्त करायला ४०० विमाने आणि शेकडो बॉम्ब लागायचे (आणि वेळ) तेच काम एक बॉम्ब काही मिनिटात करू शकतो – हे जेव्हा जगणे हिरोशिमा-नागासाकी ला बघितले तेव्हा माणुसकी थरारून उठली होती.

 

Hiroshima-Nagasaki-marathipizza05
en.farsnews.com

इतकी मोठी संहारक शक्ती हि नेहमी घाबरवणारी असते. माणुसकीच्या इतिहासात “क्षणार्धात होत्याचे नव्हते होणे” – हि म्हण फक्त म्हण म्हणूनच होती हिरोशिमा अगोदर.. ते प्रत्यक्षात घडू शकते हे बघितल्यावर जगाचा युद्धाकडे बघायचा दृष्टीकोनच बदलला.

हि शक्ती कमीत कमी लोकांकडे राहणे हा त्या वेळेसच्या शक्तींचा अट्टाहास होता – कारण अणुबॉम्ब च्या नुसत्या असण्याने युद्धे टाळता येत होती (अमेरिका-रशिया १९४७ मध्ये इराण मध्ये युद्धाच्या खूप जवळ आले होते – इराण मधून माघार घ्यायला रशिया टाळाटाळ करत होता, अमेरिकेने रशियन सेनेवर अणुबॉम्ब टाकायची धमकी दिली आणि रशियाने घाबरून माघार घेतली – हि मोठी गोष्ट आहे खूप).

अणुबॉम्ब वापरावा लागत नाही सहसा. त्याच्या नुसत्या आपल्याकडे असण्याने आपल्याला हवे ते करवून घेता येते – हे जगाने बघितले.

१९४९ मध्ये रशिया कडे अणुबॉम्ब आला आणि मग फ्रांस, ब्रिटन, चीन वगैरे. या इतिहासावर पुन्हा कधीतरी लिहीन. पण १९५०च्या दशकात अणुबॉम्ब विरोधी वातावरण तयार झाले आणि ज्यांच्याकडे १९६८ अगोदर अणुबॉम्ब होता, त्यांनी अणुबॉम्बचे तंत्रज्ञान त्यांच्यापुरतेच राहावे आणि इतरांना ते बनवता येऊ नये असा करार केला..

याची वाच्यता १९५०च्या दशकातच झाली होती आणि त्यावेळेस डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी नेहरूंना १९६० मध्ये अणुचाचणी करा आणि या लहान क्लब मध्ये भारताला स्थान मिळवून द्या असा सल्ला दिला होता.

तर आपण भाभांचे ऐकून अगोदर अणुचाचणी केली नाही आणि मग २००७/०८ पर्यंत अणुशक्ती म्हणून मान्यता मिळवायची भिक मागत बसावे लागले. आणि २००८ मध्ये मनमोहन सिंह यांनी अमेरिकेशी केलेल्या करारान्वये देखील आपण आयात करत असलेले युरेनियम हे अंतरराष्ट्रीय एजन्सी (IAEA) यांच्या देखरेखी खाली करावे लागते. ती एजन्सी चीनवर किंवा फ्रांस वर देखरेख करू शकत नाही (कि आयात होत असलेले युरेनियम भट्टीत उपयोगात आणले जात आहे कि अणुबॉम्ब बनवायला उपयोगात आणले जात आह).

त्यामुळे नेहरूंनी १९६० मध्ये सोडलेली संधी आजवर आपल्याला भोवते आहे.

मी हे इथे सांगायचे कारण कि उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र – हे तंत्रज्ञान हे त्यावेळेस च्या अणुबॉम्ब इतकेच disruptive आहे. त्यामुळे सध्या जिनीवा, स्वित्झरलंड मध्ये हे तंत्रज्ञान असेच सीमित ठेवायचा करार करायची बैठक सुरु आहे. हि बैठक अजून काही वर्षे वरचेवर भेटत राहील. आणि मग १९६८ सारखाच एक करार करेल कि अमुक तारखे नंतर कुणीही उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राच्या चाचण्या करू शकणार नाही आणि जो करेल त्यावर अंतरराष्ट्रीय निर्बंध लागतील.

कोणताही आंतरराष्ट्रीय करार होण्याच्या आत भारताने आता अमेरिका-रशिया-चीन या तिकडी च्या बैठकीत कायमचे स्थान मिळवले आहे. आता जेव्हा केव्हा करार होईल (जो होईलच – कारण हे तंत्रज्ञानाच तितके भयावह आहे ), तेव्हा आपण “आतले” असू.. बाहेरचे नाही..

दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानशी सुरु असलेले प्रोब्लेम. चीन ने सिंध प्रांतात आपली सेना तैनात केलेली आहे. जर पाकिस्तानशी युद्ध उद्भवले (जे अनिवार्य दिसते आहे ), तर चीन विरुद्ध या तंत्रज्ञानाशिवाय युद्धात उतरणे खूप disadvantage चे ठरले असते.

आता आपल्याकडे पण चीन चे उपग्रह पाडायचे तंत्रज्ञान असल्यामुळे चीन उघडपणे भारताविरुद्ध आघाडी उघडतांना दहा वेळेला विचार करेल (को अगोदर पाच वेळेलाच केला असता). पाकिस्तानचा एक मोठा प्यादा आपण या चाली मुळे परस्पर गुंतवून ठेवला आहे.

या वरील कारणास्तव हि चाचणी करणे आणि या चाचणी ची घोषणा पंतप्रधानाने करणे हे क्रमप्राप्त होते. आणि आवश्यक होते..

कारण जर अणुबॉम्ब किंवा हे क्षेपणास्त्र वापरायची वेळ आली तर तो निर्णय सेना घेत नसते – तो निर्णय पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष घेतात. म्हणून अश्या अस्त्रांना राजकीय अस्त्रे म्हणतात (strategic weapons). जी शस्त्रास्त्रे वापरायचा (अगर न वापरायचा) निर्णय सेना घेते त्यांना tactical weapons म्हणतात.

भारतीय अभियंता आणि शास्त्रज्ञांना अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन.. एक खूप अवघड तंत्रज्ञान पहिल्या झटक्यात आत्मसात केल्या बद्दल (चीन ४ वेळेस अपयशी ठरला, पाचव्यांदा यश आले).

देश तुम्हा दोघांचा कायम ऋणी राहील….

वंदे मातरम….

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?