' आतताई "स्त्री-वाद" दुर्लक्षित करा, पण घरातील लहान मुलांवर हे ५ संस्कार मात्र नक्की करा...!

आतताई “स्त्री-वाद” दुर्लक्षित करा, पण घरातील लहान मुलांवर हे ५ संस्कार मात्र नक्की करा…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

फेमिनिझम किंवा स्त्रीवाद, हा शब्द गेल्या काही वर्षांत बदनाम झाला आहे. अर्थात त्याला कारणेही तशीच आहेत म्हणा! फेमिनिजमच्या नावाखाली वाटेल ते प्रकार, वाटेल ते विचार आणि मतप्रवाह समाजात रुजवणाऱ्या रॅडिकल (अतिरेकी) स्त्रीवादी स्त्री पुरूषांनी स्त्रीवादी चळवळ बदनाम करून टाकली आहे.

 

Feminism InMarathi
TheConversation.com

 

स्त्रियांना फक्त एक स्त्री म्हणून न बघता एक जिवंत हाडामांसाचा माणूस म्हणून बघणे आणि त्यांनाही पुरुषांप्रमाणेच सर्व हक्क व अधिकार मिळवून देणे तसेच त्यांच्यावर शतकानुशतके होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून तो अन्याय संपवून टाकणे , समाजात समानता आणणे ही स्त्रीवादी चळवळीची उद्दिष्टये होती.

पण काही रॅडिकल स्त्रीवाद्यांनी मात्र स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराचा पुरस्कार केला. स्त्री व पुरुष एकमेकांना पूरक आहेत हा विचार अडगळीत टाकून पुरुष व स्त्रियांमध्ये वैरच उत्पन्न केले.

ह्यामुळे झाले असे, की लोक फेमिनिजम ह्या चळवळीचीच खिल्ली उडवू लागले. समाजात पुरुषवादी व अतिरेकी स्त्रीवादी असे दोन गट पडले. ह्या अतिरेकी स्त्रीवाद्यांच्या अतिरेकी विचारांमुळे जिथे खरंच सुधारणा होण्याची गरज आहे ते विषय मागे पडले.

स्त्रीवाद हा कितीही वादग्रस्त विषय असला तरी ह्याविषयी चर्चा होणे गरजेचे आहे. अजूनही आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृतीच आहे. त्यात सुधारणा झाल्या असल्या तरी स्त्रीचे स्थान हे पुरुषाच्या तुलनेत दुय्यमच मानले गेले आहे आणि लहानपणापासूनच मुलांना एक “पुरुष” म्हणूनच घडवले जाते.

एखादे बाळ जन्माला आले की ते नुसते बाळ न राहता त्याच्यावर माणूस म्हणून संस्कार न होता स्टीरियोटिपिकल संस्कार होतात.

 

Feminism 2 -InMarathi
PeoplesWorld.org

 

मुलाला लहानपणापासूनच तू पुरुष आहेस म्हणजे कुणीतरी खास आहेस अशी जाणीव करून दिली जाते. ज्या घरांत मुलांवर लहानपणापासूनच समोरच्या व्यक्तीचा मग ती स्त्री असो की पुरुष आदर करण्याचे संस्कार केले जातात ती मुले पुढे जाऊन स्त्री-पुरुषांत भेदभाव करीत नाहीत. त्या व्यक्ती आपल्या आजुबाजुंच्या सर्वच लोकांचा आदर करतात.

स्त्रियांशी त्याही माणूस असल्याचे भान ठेवून वागतात. आपण पुरुष असल्याचा अहंगंड बाळगत नाहीत. पण हे होण्यासाठी घरातल्या सर्वांनीच लहानपणासून तसे संस्कार करण्याची आवश्यकता आहे.

आज स्त्रियांच्या बाबतीत जे भयंकर गुन्हे घडत आहेत त्यामागे पुरुषांची “आपण कुणीतरी खास” आहोत आणि आपण आपले वर्चस्व गाजवले नाही तर आपली “मर्द” म्हणून ओळख निर्माण होणार नाही ही भावना असूच शकते.

पुरुषांवर समाजाने सतत स्वतःला सिद्ध करत राहण्याचे पियर प्रेशर टाकले आहे. ह्या प्रेशरखाली पुरुष स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी झगडत असतात. जो हे वर्चस्व सिद्ध करू इच्छित नाही त्याला समाज वाटेल ती नावे ठेवतो.

स्त्रियांना नियंत्रणाखाली ठेवणे हा तर मर्द म्हणून सिद्ध करण्याचा मोठाच निकष मानला जातो. स्त्री ही मालकी हक्काची वस्तू आहे ही विचारसरणीच स्त्रीविषयक गुन्ह्यांच्या विविध कारणांपैकी एक आहे.

 

dominating-bf-inmarathi
newwomanindia.com

 

बरं असे विचार फक्त पुरुषांचे आहेत असे आहे का? तर नाही…स्त्रियाच स्त्रियांना माणूस समजत नाहीत, ही देखील एक समस्या आहेच.

घरात लहानपणापासून बघितले तर स्त्री आपल्या नवऱ्याला आपला मालक समजते, ती तिचे संपूर्ण आयुष्यच त्याच्या स्वाधीन करते आणि त्याच्याप्रमाणे वागण्याला प्राधान्य देते. तिला बाळ झाले आणि तो जर का मुलगा असेल तर लोक तिचे प्रचंड कौतुक करतात.

ज्या स्त्रियांना मुलगा आहे त्यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्यामुळे “आपल्याला आपल्या मुलामुळेच खास वागणूक मिळते” हे स्त्रियांच्या लक्षात आले की त्या आपल्या मुलालाही अगदी खास वागणूक देतात.

नकळतपणे त्याही आपल्याच मुला -मुलीत दुजाभाव करतात. घरातल्या इतर स्त्रिया, म्हणजे आजी, आत्या, काकू वगैरे तर मुलाचे उघड जास्त कौतुक करतात.

“तू मुलगा आहेस ,वंशाचा दिवा आहेस” वगैरे लहानपणापासून त्याला ऐकवून त्याच्या मनावर आपण कुणीतरी खास आहोत हेच संस्कार करीत असतात.

एकवेळ घरातले पुरुष म्हणजे आजोबा किंवा वडील, काका, मामा मुलीचे जास्त लाड- कौतुक करतात. पण घरातल्या स्त्रियाच आपल्याच अपत्यांमध्ये दुजाभाव करतात.

पुढे असे संस्कार झालेली मुलं, पुरुष म्हणून स्त्रियांना दुय्यम लेखून वागत राहतात. म्हणूनच ही दरी संपवण्यासाठी फक्त बाहेर समाजात प्रयत्न होऊन उपयोग नाही तर घरातूनच लहानपणापासून मुलामुलींवर समानतेचे संस्कार व्हायला हवेत. सर्वांनाच एकमेकांचा आदर करणे शिकवायला हवे.

अजूनही मुलांबरोबर जास्तीत जास्त वेळ घरच्या स्त्रियाच असतात. त्याच मुलांवर हे समानतेचे संस्कार करू शकतात. तसेच घरातील पुरुष आपल्या वागण्यातून आपल्या मुलांवर स्त्रीवादाचे म्हणजेच स्त्रियांवर अन्याय न करण्याचे, त्यांचा आदर ठेवून त्यांच्याशी योग्य वागण्याचे संस्कार मुलांवर करू शकतात.

ज्या घरातील वडील आईचा आदर ठेवून वागतात, त्या घरातली मुलेही आपसूकच सर्व स्त्रियांचा आदर करण्यास आणि त्यांच्याशी नीट वागणे शिकतात.

 

indian motherhood inmarathi
ThePrint

 

स्त्रीवाद म्हणजे पुरुषांवर वर्चस्व नसून समानतेने आणि सुरक्षितपणे जगण्याचा हक्क होय. आधी तुम्ही आम्हाला छळले, आमच्यावर अन्याय केला ,आमच्यावर वर्चस्व गाजवले म्हणून आम्हीही आता तेच करणार आणि सगळा समतोल बिघडवून टाकणार, an eye for an eye असा हिशोब म्हणजे स्त्रीवाद नव्हे.

स्त्रीलाही पुरुषांसारखाच एक स्वतंत्र माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे हे इतके जरी समजले तरी बराच फरक पडेल आणि त्यासाठी सुरुवातीपासून घरातल्यांनी आणि समाजाने प्रयत्न करायला हवे आहेत.

ह्याच संदर्भात प्रसिद्ध ब्रिटिश पत्रकार आणि लेखिका टॅनिथ कॅरी ह्यांनी टिप्स दिल्या आहेत की “हाऊ टू रेझ फेमिनिस्ट बॉईज”…!

त्यामुळे टोकाच्या, आततायी स्त्रीवादाकडे दुर्लक्ष करत, आपल्या घरात पुढील ५ गोष्टींची काळजी घेतलीत तर आपली मुलं खऱ्या अर्थाने “समानता” शिकत लहानाची मोठी होतील.

१. रोल मॉडेल

लहान मुले अनुकरणप्रिय असतात. त्यांची मने ही एखाद्या टिपकागदासारखी असतात आणि आपल्या घरात व आजूबाजूला घडणाऱ्या घटना ते टिपून घेत असतात. आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्याचे निरीक्षण करीत असतात.

आपल्या आईवडिलांकडून त्यांना स्त्री कशी असते आणि पुरुष असा असतो ह्याचे धडे मिळतात.

blog.rustomjee.com

 

तुमच्याकडूनच तुमची मुले शिकतात त्यामुळे तुम्ही एकमेकांशी कसे वागता ह्यावर तुमची मुले पुढे जाऊन स्त्रियांशी किंवा पुरुषांशी कसे वागणार आहेत हे ठरणार आहे.

तुम्ही समानता ठेवून वागलात, भेदभाव केला नाहीत, एकमेकांशी आदरपूर्वक वागलात तर तुमची मुले सुद्धा एक जबाबदार आणि उत्तम व्यक्ती म्हणून समोरच्याशी वागतील.

२. तुमच्या मुलाला त्याच्या सर्व भावना व्यक्त करू शकण्याचे स्वातंत्र्य द्या

लहानपणापासूनच मुलांना “काय मुलीसारखे रडतोस” म्हणत आपले दुःख मनातच दाबून टाकणे शिकवले जाते. रडणारा पुरुष म्हणजे दुर्बल! रडणे ,घाबरणे, भावना व्यक्त करणे हे फक्त स्त्रियांचे काम आहे. कारण त्या अबला आहेत म्हणून त्या रडतात असेच मुलांच्या मनावर ठसवले जाते.

“मर्द को दर्द नहीं होता”  ही किंवा या अर्थाची वाक्य मुलांच्या मनावर सर्रास ठसवली जातात

पुरुषाने कायम खंबीर राहायला हवे, मर्द को दर्द नहीं होता वगैरे वाक्य मुलांच्या मनावर ठसवली जातात. त्यामुळे भावना व्यक्त करणे हे दुर्बल व्यक्तीचे काम आहे असेच संस्कार मुलांवर होतात.

त्यामुळे पुरुषांची कायम आतल्या आत घुसमट होते. ते त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्तच करू शकत नाहीत. मी थकलोय, घाबरलोय किंवा दुःखी आहे हे सांगण्याचा त्यांच्याकडे ऑप्शनच उरत नाही.

 

Boys Dont Cry InMarathi

 

सतत स्वतःला सिद्ध करण्याचे प्रेशर तर त्यांच्यावर लादलेले असतेच. लागले तरी “मुलीसारखे” रडायचे नाही असे लहानपणापासूनच ऐकत आल्यामुळे त्यांना “तोंड दाबून बुक्क्यांचा मार” सहन करावा लागतो. भावना व्यक्त न करण्याबद्दल त्यांचे कौतुक होते. पण ह्यामुळे त्यांच्या शारीरिक मानसिक आरोग्याची अपरिमित हानी होते.

एक “राग” सोडल्यास त्यांना कुठली भावना व्यक्त करायची असते हेच माहिती नसते. वर्षानुवर्षे हेच चालत आहे आहे. पण हे बदलण्याची गरज आहे. सर्वांनाच आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याचा हक्क आहे आणि स्त्री असो की पुरुष प्रत्येकालाच आपल्या भावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य लहानपणापासूनच मिळायला हवे.

आपल्या भावना व्यक्त करायला मिळाल्या तर पुरुष सुद्धा स्त्रियांच्या भावना समजून घेऊ शकतील.

३. मुलाला हवे ते खेळू द्या

हे मुलांचे खेळ आणि हे मुलींचे असा भेदभाव करू नका. मुलीला विमाने, बंदूक गाड्या आवडत असतील तर तिला ते खेळू द्या आणि मुलाला जर भातुकली आवडत असेल तर त्याला ते खेळू द्या. घर सांभाळणे, स्वयंपाक करणे ही कामे “फक्त” स्त्रियांची आहेत हे त्याच्या मनावर ठसता कामा नये.

स्वयंपाक ही जीवनावश्यक गोष्ट आहे. मुलगा असो की मुलगी प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी आपल्यापुरता आणि आपल्या बरोबरच्या दोन माणसांना खाऊ घालता येईल इतका स्वयंपाक आलाच पाहिजे हा प्रॅक्टिकल विचार आहे.

मुलाला बार्बी डॉल आवडत असेल आणि मुलीला जर बॅटमॅन आवडत असेल तर त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे खेळू द्या. खेळण्यातून मुले बरेच काही शिकत असतात. त्यांच्या खेळण्यावर स्त्री-पुरुष अशी लेबलं लावून त्यांना स्टिरिओटिपिकल विचार शिकवू नका.

 

Freedom to Play InMarathi
NYTimes.com

 

४. स्त्रीवादाच्याही पुढे जाऊन समानता मनात रुजवा

“मी-टू” चळवळ मध्यंतरी खूपच जोर पकडून होती. त्यामुळे सगळीकडे “टॉक्सिक मॅस्क्युलिनीटी” वर चर्चा होते आहे. पण एक लक्षात घ्या. सगळे पुरुष ही समस्या नसून ते “अत्याचारी पुरुष” कुठल्या वातावरणात वाढले आहेत, त्यांच्यावर कसे संस्कार झाले आहेत, त्यांचे विचार कसे आहेत ही मुख्य समस्या आहे.

 

equality-Inmarathi

 

आपण पुरुष आहोत म्हणजे आपण खास आहोत ही विचारसरणी दोषी आहे. त्यामुळे तुमच्या मुलाला आपण एक माणूस आहोत तसेच स्त्रियादेखील आपल्याप्रमाणेच एक मनुष्य आहेत हे शिकवा.

५. पोर्नोग्राफीचे सत्य मुलांना सांगा

हल्ली टेक्नॉलॉजीच्या युगात मुलांची पॉर्नशी अगदी सहज आणि लहान वयात ओळख होते. ह्या पॉर्न व्हिडीओजमध्ये स्त्रियांचे चित्रण अतिशय विचित्र व गलिच्छ पद्धतीने केलेले असते. स्त्रियांचा “स्लट” किंवा “व्होअर” असा असभ्य उल्लेख केलेला असतो. त्यांचे चित्रण एक उपभोग्य वस्तू म्हणून केलेले असते.

न कळत्या वयात मुलांनी अश्लील व्हिडीओ (पॉर्न) बघितले तर त्यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन अतिशय विचित्र होऊ शकतो.

स्त्रियांचे असे चित्रण बघून त्यांच्या मनात स्त्रियांविषयी आदर निर्माण होणे तर लांबच राहिले पण स्त्रियांना वर्चस्व गाजवलेले आवडते असा काहीतरी मुलांचा समज होऊ शकतो.

“उसकी ना में हां है” असे काहीतरी भलते गैरसमज त्यांच्या मनात निर्माण होऊ शकतात आणि पुढे जाऊन त्यामुळे गंभीर परिस्थिती ओढवू शकते. म्हणूनच मुलांना आधीच पोर्नोग्राफीच्या फसव्या आणि खोट्या जगाची कल्पना द्या.

तिथे जे चित्रित केले असते ते खोटे असते आणि फक्त पैश्यांसाठी तसे चित्रित केलेले असते हे त्यांच्या मनात रुजणे आवश्यक आहे.

 

Bad Effects of Porn InMarathi
NYTimes.com

 

मुलांना कन्सेंट किंवा संमती ह्या संकल्पनेबद्दल सांगा. एकमेकांच्या (स्त्री किंवा पुरुष) कन्सेंटचा आदर करणे हा शिष्टाचार बालपणापासूनच शिकवणे अत्यंत आवश्यक आहे. ह्यामुळे मुले स्वतः देखील सुरक्षित राहतील आणि दुसऱ्याला देखील त्रास देणार नाहीत. आणि असे झाले तर स्त्रियांना होणारे त्रास निश्चितपणे कमी होऊ शकतील.

परवानगीशिवाय कुणालाही स्पर्श करण्याचा अधिकार आपल्याला  नाही आणि संमतीशिवाय त्या व्यक्तीला स्पर्श करणे चुकीचे आहे हे मुलांना सांगणे आणि पटवून देणे आवश्यक आहे.

 

IndiaToday.in

 

समानता ही स्त्रियांसाठी जितकी आवश्यक आहे तितकीच पुरुषांसाठी सुद्धा गरजेची आहे हे मुलांना शिकवा. आपल्याला भेटलेल्या सर्वच व्यक्तींचा आपण आदर केला पाहिजे, त्यांच्याशी चांगली वागणूक ठेवली पाहिजे. मग ती व्यक्ती कुठल्याही लिंगाची का असेना हे संस्कार आपल्या अपत्यांवर करणे ही काळाची गरज आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “आतताई “स्त्री-वाद” दुर्लक्षित करा, पण घरातील लहान मुलांवर हे ५ संस्कार मात्र नक्की करा…!

  • November 6, 2019 at 4:21 pm
    Permalink

    मुलगी किंवा मलगा अस न मानता दोघांना समान समजल पिहीजे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?